Wednesday, March 30, 2016

कुछ लोग सोच मे ही....

     ‘‘कुछ लोग सोच मे ही जिंदगी बिता देते है’’ हे वाक्य आज अनेक व्यक्तींना लागू पडत आहे. त्याची आता अनेकांना सवय जडलेली दिसते. अनेक व्यक्ती फक्त विचारच करत बसतात किंवा दिवास्वप्ने रंगविण्यात त्यांना विशेष आनंद मिळत असतो. एखाद्या व्यक्ती विषयी निंदा करणे,  किंवा त्याच्या पाठीमागे त्याची चर्चा करणे असे करत असतात. परंतु निंदा किंवा चर्चा ही फक्त यशस्वी व्यक्तींच्याच वाट्याला येत असते. त्यामुळे अशा व्यक्तींकडे लक्ष न देता सतत आपण आपले चांगले कर्म करीत राहिले पाहिजे.
     आज सकाळी चहा घेत असताना रेडिओ ऐकत होते. त्यावर एक अतिशय सुंदर गीत लागले होते. कदाचित बर्‍याच जणांना ते माहित ही असेल. ‘‘एका तळ्यामध्ये अनेक लहान पिल्ले राहत असतात, त्यातील एक कुरूप असते.’’ अतिशय सुरेख दिसणारी अनेक बदके त्यामध्ये राहत असतात. त्या पिल्लापैकी कुरूप दिसणार्‍या पिलाची नेहमी निंदा केली जाते, त्याला कशातच समावून घेतले जात नाही ना खेळात, ना इतर कशातच. ते कुरूप दिसणारे पिल्लू खूप नाराज होते, दुःखी होते. आपल्याला कोणीही जवळ करत नसल्याचे दुःख त्याच्या मनामध्ये असते. एके दिवशी ते दुःखी होऊन त्या तळ्याच्या काठावरती बसलेले असते अचानक त्याची नजर पाण्यातील स्वतःच्या प्रतिबिंबाकडे जाते आणि ते पिल्लू खूप आनंदी, उत्साही होते, त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. कारण त्याच्या लक्षात येते की आपण इतर बदकांच्या पिल्लासारखे नाही तर आपण राजहंस आहेत. हे त्याला समजताच त्याच्यातील सर्व नैराश्य, भिती दूर होते आणि ते स्वतःला खूप भाग्यवान समजते.
     अशा पद्घतीचे जीवन अनेकांचे असते, स्वतः जवळ खूप काही असते परंतु अनेक व्यक्ती ह्या स्वतः जवळ नाही त्याच गोष्टींचे दुःखात असतात. आणि जवळ असणार्‍या असह्य गोष्टी सुद्धा ते विसरून जातात. वर्तमानामध्ये जी व्यक्ती जगायला शिकते तिचा भविष्यकाळ खूप सुंदर असतो. समाजात अनेक व्यक्तींना आपण पाहतो की, एखादा सण, उत्सव किंवा इतर समारंभ घडून गेल्यानंतर असे म्हणतात की, पुढच्या वेळी मी यापेक्षा चांगले करेन त्यावेळी तुम्ही बघत रहाल. परंतु वास्तव हे असते की, ते फक्त विचार करून स्वतःला सुखी समजत असतात.
     तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर विचार करत बसण्यापेक्षा, जो काही विचार केला आहे त्यावर कृती करणे ही तितकेच आवश्यक असते. एखादा नवीन चांगला विचार मनामध्ये आला की, तो जास्तीत जास्त प्रमाणात आचरणात कसा आणता येईल याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. स्वतःजवळ असणार्‍या गोष्टींचा, साधनांचा पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे. नाहीतर कालांतराने त्या गोष्टींचा आपोआप नाश होत असतो हे आपण लक्षात ठेवा. फक्त विचारात वेळ दवडू नका तर जो काही चांगला विचार केला आहे, त्यावर कृती करण्यात वेळ घालविला तर यश नक्कीच मिळेल.

शिक्षक भरतीला मुहूर्त केंव्हा....

     भारतामध्ये प्राचीन काळापासून गुरूला विशेष महत्व आहे. राजे महाराजे यांच्या काळापूर्वीपासून गुरुचे महत्व आणि अस्तित्व यामध्ये थोडे देखील कमीपणा झालेला नाही. आज या संगणकीय युगात एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये देखील गुरूला महत्वाचे स्थान दिले जात आहे. याचे कारण म्हणजे कोणालाही कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्या क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला गुरू करून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक मानवाला लहानपणापासून गुरू जवळ (शिक्षक) याच्या सानिध्यात ठेवले जाते. बालकाच्या सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हायला हवा यामध्ये शिक्षकाची भूमिका फार महत्वाची असते. या मोबाईल च्या काळात 2जी, 3जी, 4जी, 5जी आले असले तरी मात्र गुरुजींचे महत्व अढळ राहिले आहे.
     काही वर्षांमध्ये शाळेची स्थिती पाहता प्रगतिशील व शिक्षणाची गंगा मानल्या जाणार्‍या महाराष्ट्रातल्या शाळांची स्थिती दयनीय होत असून, सर्व शिक्षण अभियानाच्या प्रगतीत राज्याची घसरण सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात 49 हजार 962 शिक्षकांची पदे रिक्त असून, तब्बल तीन हजार 97 शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक असल्याची आकडेवारी समर्थन या आर्थिक क्षेत्रात मूल्यमापन करणार्‍या संस्थेने जाहीर केले आहे. 13 हजार 312 शाळा मुख्याध्यापकांच्या शिवाय सुरु आहेत. मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने शाळांच्या प्रशासकीय कामांना खीळ बसली आहे. राज्यात 19 हजार 732 व उच्च प्राथमिक शाळांत 23 हजार 212 मंजूर मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. दोन हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त असल्याने जिल्ह्यांमध्ये यवतमाळ (2915) पहिल्या क्रमांकावर आहे, अहमदनगर (2336), मुंबई उपनगर (2171), जळगाव (2062), व सांगली (2036) यांचा समावेश आहे.
     शिक्षण हक्क कायद्यानुसार एक शिक्षकी शाळा कालबाह्य ठरवल्या आहेत. 60 विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असणे बंधनकारक आहे. पण 2013 मधील नियमानंतरही राज्यात तीन हजार 97 शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक असल्याचे वास्तव समोर आले आहे. जर संपूर्ण महाराष्ट्राची हि स्थिती असेल तर भारत देशामध्ये अशा प्रकारच्या किती शाळा आज अस्तिवात असतील याचे मोजमाप होणे गरजेचे आहे. आणि त्यानुसार योग्यती कारवाई होणे देखील आवश्यक आहे. पढेगा इंडिया तो हि बढेगा इंडिया हे वाक्य वास्तवात आणण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व शिक्षणाची रिक्त असणारी पदे लवकरात लवकर भरली गेली पाहिजेत. नाही तर भविष्यातील बालकांना अज्ञानी राहिल्या शिवाय गत्यंतर उरणार नाही.

मागे काही राहिले नाही ना

     अनेकांचे आयुष्य याच प्रश्नाभोवती घूटमळत राहते. आयूष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा प्रश्न निरनिराळ्या रूपात समोर ऊभा ठाकला इतके मोठे प्रतल या प्रश्नाचे. बालपण सरताना अनेक गोष्टी मागे राहील्या काही खेळ विकत घ्यायचे तर काही खेळायचे राहीले. तारूण्याच्या उंबरठ्यावर मनापासून आवडलेल्या व्यक्तीला अंतरीचे गूज सांगायचे राहून जाते. व्यवहारी आयूष्य पूढेच सरकत असले तरी मन मात्र सदैव मागे मागे घूटमळत असत.
     आपण दररोज एकदा तरी या गोष्टींचा वापर करत असतो काही जण याला काडी मात्र किंमत देत नाहीत परंतु काही व्यक्तींसाठी व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी उपयोगी पडणार आहे हे माहित असते. स्वतःच्या व्यक्तीमत्व विकासासाठी तुमच्या हातून घडलेल्या गोष्टींवर थोडावेळ विचार जरूर केला पाहिजे. एका शास्त्रज्ञाने असे म्हटले आहे की कोणतेही काम करण्यासाठी मला 60 मिनिटे दिलीत तर त्यातील 45 मिनिटे ते काम कशा पद्धतीने पूर्ण करता येईल यावर जास्त भर दिला पाहिजे आणि उरलेल्या 15 मिनिटामध्ये ते काम आत्मविश्‍वासपूर्वक पूर्ण केले पाहिजे.
     एखादे काम पूर्ण केल्यानंतर मागे काही राहिले नाही ना याची काळजी घ्यायला हवी. अनेक व्यक्ती अपयशी होण्यामागे हेच कारण असते. यालाच आपण सिंहावलोकन असे सुद्धा म्हणत असतो, कारण सिंह जेव्हा चालत असतो तेव्हा काही पाऊले पुढे चालल्यानंतर तो मागे वळून पाहतो की मागे काही राहिले तर नाही ना. त्याच प्रमाणे प्रत्येकाने स्वतःचा व्यक्तीमत्व विकास करत असताना भूमिका पार पाडली पाहिजे.
एक उदाहरण सांगतो म्हणजे या काही शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. आपलं काही राहिले नाही ना? स्मशानातून बाहेर पडताना भडजींनी त्याला विचारले, नाही असं सांगत ते पुढे निघून गेले. त्याला मात्र मागे पाहताना आईची धडधडणारी चिता. नाही कसं? खूप काही राहिलयं मागे. आणि तो आवेगाने मागे फिरला, सरणा जवळ पडलेली चिमुटभर राग त्याने हातात घेतली. त्याला मागे फिरलेले पाहून एकाने विचारले, काही राहिलं होत का मागे? भरल्या डोळ्यांनी तो म्हणाला नाही. काही राहिलं नाही आता मागे आणि जे राहिलं आहे ते आता कधी कधीच परत येणार नाही. काही उरलेच नाही, सोबत घेण्यासारखे कोणाच काही राहिल नाही ना मागे?
      अनेकांना स्वतः न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची घानेरडी सवय जणू अंगिकारलेली असते. अशा व्यक्तींना कोणतेही काम किंवा त्यांच्या आसपासच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. आणि काम संपताच दुर करतात. स्वतः न केलेल्या काम सर्वांच्या समोर उगाळत बसतात.
एकदा सकाळी माझ्या हातात चहाचा कप होता, उभ्यान चहा पित होतो अचानक तोल गेला. कप सांभाळत पडल्यामुळे हाताच्या कोपर्‍याला लागले, कप ही फुटला. जर मी कप सोडला असता तर लागले नसते, आपल्याला हाही असाच अनुभव बराच वेळा आला असेल. शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटून जातात, गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडून देण्याची. मला विचारल नाही, मला बसायला खुर्चीच दिली नाही अशा गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. सोडायला शिकल की मग पहा निसटून चाललेल्या अनेक चांगल्या गोष्टींमध्ये पुन्हा जीवन येईल. सुक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखू देत नाही, तो सोडला किंवा मागे काही राहीले नाही ना याची चिंता सोडा आणि पहा तुम्ही एका यशाच्या शिखरापर्यंत पोहचला असाल.

Wednesday, March 16, 2016

परिणामांची चिंता नको.

     आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या चिंतेमध्ये जगत आहे. अनेकांची प्रगती न होण्यामागच्या कारणांचा थोडासा आढावा घेतला, तर एक गोष्ट स्पष्ट पणे जाणवेल ती म्हणजे चिंता होय. चिंता आणि चिता या दोन शब्दामध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता हि मानवाला एकदाच संपवते परंतु चिंता हि मानवाला प्रत्येक क्षणाला संपवत असते. अनेक लोक कशाची चिंता करतात याची यादी तयार केली तर खूप लांबलचक होईल. त्याचप्रमाणे अनेकांची प्रगती खुंटण्याचे प्रभावी कारण म्हणजे लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, याची सतत चिंता करत रहात असतात. अनेक जण उद्या स्वतःच काय होणार, कस होणार यातच आजचा वेळ वाया घालवत असतात.
     अनेक व्यक्तींना एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल किंवा एखादी गोष्ट मनापासून आवडत असेल, त्या गोष्टी केल्यामुळे स्वतःला आनंद मिळत असतो हे देखील माहित असते. परंतु हे सर्व करण्याआधी त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न गोंधळ घालत असतो तो म्हणजे त्याचा काय परिणाम होईल. याचाच मोठ्या प्रमाणात विचार होतो मग त्यातच वेळ जातो. मात्र स्वतःच्या हातून कोणतीही क्रिया होताना दिसत नाही. तुम्ही केलेली चूक हि सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे, कोणाला दोष देऊ नका झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा. अनेकजण स्वतःच्या चुकीचे खापर इतरांच्यावर फोडून रिकामे होतात. त्यांना त्यातून मुक्त झाल्यासारखे वाटते परंतु हे चुकीचे आहे तुम्ही ज्याच्यावर असे खापर फोडता तो मात्र त्याला नवी मिळालेली संधी समजतो आणि सामोरे जातो.
     काही दिवसापूर्वी मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो तिकडे एक छान कार्यक्रम होता, कार्यक्रम खूप छान पद्धतीने सुरु होता. अचानक माझा फोन वाजला मी तो उचलला संभाषण संपले, परंतु संभाषणा दरम्यानचे विचार माझ्या मनात तसेच गोंधळ घालत होते. माझ्या बरोबर आलेल्या मित्राने मला विचारले काय झाले, मग मी त्याला झालेल्या संभाषण बद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला काही काळजी करू नकोस आता एवढा छान कार्यक्रम सुरु आहे त्याचा आनंद घे, जे फोनवर बोलणे झाले त्याचा काय परिणाम होईल हे आपण परतल्यावर पाहूया. त्याच वेळी मी ठरविले की पुढे काय परिणाम व्हायचा आहे तो होणार आहे परंतु आताची वेळ आपल्याला आनंद मिळवून देणारी आहे. मग परिणामांचा विचारात हे आनंदाचे क्षण वाया घालवायला नकोत.
     कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परतलो पाहिले तर मी ज्या परिणामाची काळजी करत होतो तसे काहीही घडले नाही. बर्‍याच वेळा असे होते कि, आपण उगाचच चिंता करत असतो. मी जर त्यावेळी फक्त विचार करत राहिलो असतो तर तो कार्यक्रमातील आनंद कदाचित उपभोगू शकालो नसतो. नेहमी तुम्ही करत असलेले काम हे आत्मविश्वासपूर्वक करायला हवे, म्हणजे पुढील परिणाम काय होतील याचा विचार करण्यासाठी वेळ वाया जात नाही. अनेक जणांना अशी सवय असते की, एखादी क्रिया घडून गेल्यावर किंवा भविष्यात काही घडणार असेल त्या गोष्टीवर तासंतास गप्पा करायच्या त्याचा स्वतः च्या आयुष्यावर एकच परिणाम होतो फक्त चांगली वेळ निघून जाते आणि वेळ हि नदीतील वाहणार्‍या पाण्यासारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा कधीच स्पर्श करू शकत नाही.
     नेहमी स्वतःचे आत्मभान ठेऊन जगायला हवे. कोणी ढकलून देई पर्यंत कोणाच्याही दरात उभे राहू नका, जबाबदारीने धाडसाने पाऊल उचलायला मागेपुढे पाहू नका. आपल्या स्वतःच्या निर्णयाला परिश्रमाची साथ द्यायला कधी विसरू नका, आत्मविश्वासाने सर्वकाही कमावता येते. अपयशाने मात्र कधीच खचून जाऊ नका, मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील. आणि त्याच्यासाठी पुढील परिणामांची काळजी करू नका, जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकाल.

Friday, March 11, 2016

न मागेल त्यालाही देणार

     दिवसभरातील गोष्टी करीत असताना तुम्हाला न मागता हा शब्द अनेक वेळा कानी पडतो. मग तो एखाद्याचा सल्ला असेल किंवा इतर काहीही असू शकतो. जीवनामध्ये न ठरविता अनेक संकटे येत असतात, त्यांना कशा पद्धतीने सामोरे जायचे असा सल्ला देणारे अनेक जण मिळतील. परंतु ती संकटे स्वतः समोर उभी राहूच नये म्हणून नेमके काय केले पाहिजे असे सांगणारे बोटावर मोजण्या इतपतच असतात. आयुष्यात आपण असंख्य चुका केल्या याचं दुःख जास्त असतंच पण त्याहीपेक्षा जास्त दुःख असतं ते चुकीच्या माणसासाठी आपण असंख्य गोष्टी केल्याचे, हे वाक्य सत्य आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तीकडून कितीही मोठी चूक झाली तरी ती तुम्ही सहजपणे सहन करता परंतु ना आवडत्या व्यक्तीकडून थोडीशी जरी चूक झाली तरी तुम्ही सर्वांचा राग त्याच्यावर काढता असे का घडते याचा विचारच तुम्ही करीत नाही.
     तुमच्या सोबत असणार्‍याचे हसू पाहून तुमचे दुःख विसरले पाहिजे पण तुमच्या सोबत असणार्‍या प्रत्येकाचे दुःख पाहून तुम्हाला कधीच हसू येणार नाही. तुमच्या बरोबर असणार्‍या व्यक्तींना तुम्ही एक गोष्ट सांगा माझ्या चुका मला सांगा त्या इतरांना सांगू नका कारण त्या चूका फक्त मी बरोबर करू शकतो इतर लोक नाहीत. तुम्ही जेथे कार्य करता किंवा ज्या ठिकाणी दिवसभरातील अधिकाधिक वेळ घालविता त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच आज अनेक जणांना अशी सवय जडली आहे कि एखाद्याची चूक झाली तर त्याला न सांगता इतरांना सांगणे किंवा एखादी व्यक्ती कशा पद्धतीने चुकीची वागत आहे, यावर एकत्र येऊन तासंतास चर्चा, गप्पा करणे आणि त्या व्यक्तीच्या चुकांचा पाढा वाचून दाखवणे. असे केल्याने फक्त जीवनातील चांगला वेळ वाया घालवायचा त्यातून स्वतः ला आणि इतरांना काहीही मिळत नाही याची कल्पना असून सुद्धा असे वागले जाते.
नेहमी लक्षात ठेवा जेंव्हा जीभ जास्त बडबडत असेल तेंव्हा मेंदूचे काम करण्याचे प्रमाण खूप कमी झालेले असते. त्यासाठी कमी बोला आणि तुम्ही करीत असलेल्या कामातून स्वतः ची ओळख कशा पद्धतीने निर्माण होईल  यावर जास्त कष्ट घेतले पाहिजे. स्वतः किती श्रेष्ठ आहे किंवा मी हे केले, माझ्यामुळे ते झाले, मी नसतो ते काय झाले असते, मीच सर्व काही केले आहे. असे शब्द ज्या व्यक्तीच्या तोंडातून येतात त्या व्यक्ती स्वतः च्या कर्तृवाने कधीही मोठ्या होत नाहीत. त्यांच्याकडे स्वतः चे निर्णय घेण्याची क्षमता नसते आणि जे स्वतः निर्णय घेतील त्यावर ठाम नसतात. आज एखादा निर्णय घेतला तर उद्या दुसराच निर्णय घेतात, अशा व्यक्तीची प्रगती कधीच होत नाही त्यांच्या पासून थोडस दूर राहा.
     बी रुजवायला सुद्धा काही कालावधी लागतो कारण माती, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश व्यवस्थित असेल तरच बी रुजते. हे साधे निसर्गाचे तत्व ज्याला समजते तो शांतपणे फळाची वाट बघतो गडबड करत नाही. कासवाच्या गतीने का होईना पण दररोज थोडीथोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवायला हवी. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतेही कार्य हाती घेत असताना मनाची तयारी केली कि जग जिंकण्याची, अर्धी कसरत पूर्ण होते.
     अनेक व्यक्तीना न मागता काही देण्याची सवय असते. जीवनामध्ये नेहमी चांगले विचार ठेवा, प्रत्येकाचे ऐकूण घ्या. प्रत्येकाकडून काहीतरी शिका कारण प्रत्येकजण सगळं जाणतो असे काही नाही परंतु प्रत्येकजण काहींना काही तरी जाणतो हे नक्की. कोणालाही कधीच कमी समजू नका. असे म्हणतात कि कोणा वाचून कोणाचे काहीही अडत नाही हे जरी खरे असले तरी त्या व्यक्तीची कमतरता हि जाणवतेच हे हि सत्य आहे. त्यासाठी नेहमी स्वतः ला सिद्ध करा प्रसिद्ध आपोआप व्हाल आणि यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही.


Thursday, March 3, 2016

आजचा दिवस माझा

नको चिंता उद्याची, नको स्मृती कालची, वेळ वाया दवडू नको, कदर कर तू या क्षणाची.
घडले काल जे घडायचे, होईल उद्या जे व्हायचे, हाच एक क्षण हाती तुझ्या, गमावल्यावर मग न रडायचे.
उद्या काही होणार नाही, काल गेले ते येणार नाही, आणि आज स्वस्थ बसला, तर काहीच तुझ्या हातून होणार नाही.
      वरील ओळी प्रमाणे ज्याचे जीवन असते तो कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता खंबीरपणे उभा राहतो, आणि असे व्यक्तिमत्व बनविणे काही सोपी गोष्ट नाही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते. एखाद्याच्या सावलीत उभा राहून स्वतः ची सावली कधीच शोधता येत नाही, त्यासाठी स्वतः ला उन्हात उभे राहावे लागते. काल माझ्या मनात आले म्हणून व्हाट्सअप वरती बर्‍याच जणांना एक प्रश्न विचारला. तो म्हणजे आपण शिक्षण कशासाठी घेतो? या प्रश्नावर मोजक्याच व्यक्तींनी खूप छान आणि समर्पक वाटावीत अशी उत्तरे दिली. यातील काही उत्तरे तर प्रत्येकाला विचार करण्यास लावणारी होती तर काहींनी थट्टा म्हणून किंवा स्वतः च्या शिक्षणा बद्दल गंभीर नसल्यासारखी उत्तरे दिली. आज आपण काय शिकलो किंवा काय शिकत आहोत? या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या जवळ कदाचित आज नसतील. परंतु आज आपण काय करतो यावर स्वतः चा भविष्यकाळ अवलंबून असतो याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
      कोणत्याही कार्याची सुरुवात हि त्या कार्यामध्ये यश मिळवून देईल कि नाही हे ठरवीत असते. आजचा दिवस कशा पद्धतीने तुमच्या जीवनात अविस्मरणीय ठरविला जाईल याचा विचार करणार्‍या व्यक्तींची संख्या खूपच थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याच्या बरोबर उलट म्हणजे आजचे कार्य उद्या कसे करता येईल असे वागणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तुम्हाला दररोज एक गोष्ट स्वतः च्या जवळपास जाणवत असेल ती म्हणजे कोणी एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करीत असेल तर त्या व्यक्तीला सकारात्मक पाठींबा देण्या ऐवजी त्या नवीन गोष्टीतील अडचणी किंवा नकारात्मक विचारच सांगितल्या जातात.
      उदा,- एखादा लहान मुलगा सायकल शिकत असतो तेंव्हा त्याला पाठींबा देणारे कमी असतात परंतु सायकल चालविताना तू कशा प्रकारे पडशील, कोठे तरी अपघात घडेल, त्यातून तूला गंभीर जखमी होशील किंवा कायमच अपंगत्व येऊ शकेल. अशा अनेक गोष्टी रंगवून आणि वारंवार सांगितल्या जातात.
त्याच बरोबर आणखी एक उदा, म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास करीत असेल तर त्याच्या पालकांना ज्या वाईट सवयी अभ्यास करताना जडलेल्या असतात त्याच मुलांनाही ते न कळत लावतात. मुलाला एकदा वाचल्या नंतर लक्षात राहत हि असते, परंतु त्याचे पालक त्याला सांगतात कि दोन-तीन वेळा वाचल्याशिवाय तुझ्या लक्षात राहणार नाही. मग त्या विद्यार्थ्याला हि तशीच सवय लागते. या गोष्टी कोठे तरी थांबल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात आता पासूनच करायला हवी.
      आजच्या दिवसापासूनच करायला हवी. आजचा दिवस जर तुम्ही वाया घालविला तर हा दिवस, हि गेलेली वेळ परत कधीच मिळणार नाही एवढेच लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने कोणता हि दिवस उजाडल्यावर स्वतः ला सांगितले पाहिजे कि आजचा दिवस माझा आहे आणि मी आज प्रत्येक कार्यात नक्कीच यशस्वी होईन.