Monday, October 30, 2017

पालकत्व....


अनेकांना पालकत्व म्हणजे नक्की काय? हे समजावून सांगण्याची आवशक्यता समाजामध्ये निर्माण झाली आहे. मग प्रश्न उरतो तो हा की, यापूर्वी आजी-आजोबा किंवा आई-वडील यांना पालकत्वाची कल्पना नव्हती का? ते जे आपल्या बरोबर वागले? आपल्याला आताच्या परिस्थितीत जगण्यास लायक केले ते नक्की काय? तुम्ही आमच्यासाठी आता पर्यंत काय केले? याला पालकत्व म्हणायचे का? अशा अनेक प्रश्नांनी आजची तरुण पिढी संभ्रमावस्थेत आहे.
एका मित्राबरोबर फोनवर बोलत होतो. त्याला समुपदेशन करताना काही अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या तो सांगत होता. पुढे तो म्हणाला; मी तुला एक फोटो पाठवतो, तो फोटो पाहून तुला काय वाटते ते सांग? कारण आजच्या तरुण पिढीला सर्वच गोष्टी कमीत कमी कष्टामध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्यांचा मानसिक दृष्टीकोन बदलत चालला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाने भावनिकता किंवा जवळच्या व्यक्तीबद्दलचे भाव भावना कमी होत चालल्या आहेत. यावर कोणकोणत्या उपाय योजना करता येतील यावर आमची चर्चा सुरु झाली.
मित्राने जो फोटो पाठवला, तो पाहून आपण खूप मोठा मेसेज यातून समजाला देऊ शकतो असे मला वाटले, आज अनेक पालक हे मुलांच्या प्रेमाखातर स्वत:ला हवे तेवढे कष्ट घेतात. आपला पाल्य समाजात वावरताना, समाजात जो कृत्रिम मुखवटा घालण्याची पद्धत रूढ होत आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. जसे की, पाल्य शाळेतून आला की, घरातील शाळा सुरु होते. शाळेतील दप्तर खाली ठेवल्या बरोबर घरात प्रश्न केला जातो. आज शाळेत काय शिकवलं? होमवर्क काय दिला आहे? टीचर काय म्हणाले? वगैरे वगैरे अशा प्रश्नांची सुरुवात होते. आता तर ऑनलाईन शिक्षणामुळे तर त्याचे प्रमाण जास्तच झाले आहे.
पाल्य रात्रीचे जेवण कसे बसे पार पडले की, लगेच होमवर्कची नोट बुक काढून त्याची घरातील शाळा सुरु होती. रात्री पाल्य झोपण्याची वेळ झाली तर, त्याला ओरडून कधी कधी तरी मार देऊन देखील होमवर्क पूर्ण केला जातो. तरीही तो पूर्ण होत नसेल, तर मात्र काही पालक स्वत: तो होमवर्क पूर्ण करतात. बाहेर इतर ठिकाणी पाल्यासोबत फिरायला गेले की, आपल्या पाल्याची इतर पाल्याशी तुलना केली जाते. त्यातून बऱ्याच अंशी पाल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागते. आपल्या पाल्याच्या मनातील नकारात्मकता कमी करायची असेल किंवा ती कायमची दूर करायची असेल. त्यावर नक्की काय करायला हवे? हे पालकांनी आणि पाल्यांनी जरुरू समजावून घेतले पाहिजे.
अनेक पाल्यांना वाटते की, आपल्याला मिळणारे पालकत्व अपुरे आहे. किंवा जे पालकत्व दिले जात आहे, त्याची किमत पाल्यांना बहुतांशी नसते. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना लहानपणी पालकत्व म्हणजे नक्की काय? कोणत्या गोष्टीला पालकत्व म्हणायचे? प्रत्येक जबाबदारी म्हणजे एक पालकत्वच असते? पालक जे पालकत्व करत आहेत. याची जाणीव आपल्या पाल्यांना करून दिली पाहिजे? अशा सर्व प्रश्नासाठी पालकांनी पाल्यांना किमान महिन्यातून एकदा किंवा जसा वेळ मिळेल तेंव्हा ज्या मुलांना पालक नाहीत, रस्त्यावर जी लहान मुले इतरत्र फिरत असतात, किंवा जे अनाथ आश्रमात राहतात. त्या ठिकाणी आपल्या पाल्याबरोबर भेटी दिल्या पाहिजेत. त्यावेळी त्याच्या लक्षात येईल की, त्यांना मिळत असलेले पालकत्व किती मोलाचे आहे. समजून सांगण्यापेक्षा त्यांना “बी प्रॅक्टिकल” सांगितलेले नेहमी उत्तम असे मला वाटते. हा प्रयोग प्रत्येक पालकांनी जरुरू करून पहावा. आणि आपल्या पाल्यातील पालकत्वाची भावना तपासावी.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

Monday, October 23, 2017

बोले तैसे चाले, त्याची वंदावी....



काल संध्याकाळी ऑफिसमधून साडेसातच्या सुमारास घरी परतण्यास निघालो. चर्चगेट रेल्वे स्टेशनला पायीच चालत जात होतो. त्यावेळी १ नंबर फलाटावरती वांद्रे गाडी लागल्याचा आवाज कानी आला. मी मनात ठरवले कि आपण याच गाडीने गेलो तर लवकर पोहोचेन आणि त्या गाडीला गर्दीही कमी असते. कारण पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातील सर्वात जवळचे अंतर असणारी रेल्वे म्हणजे चर्चगेट ते वांद्रे हि आहे. त्यासाठी मी फलाट क्रमांक १ वर उभी असणारी गाडी पकडण्यासाठी भरभर पाऊले टाकू लागलो. तेंव्हा नुकतीच एक वांद्रे रेल्वे माझ्या समोरून पास होत होती. मी धावत जाऊन त्या रेल्वेमध्ये बसण्याचा प्रयत्न केला परंतु शक्य नाही झाले. मग मी दुसरी रेल्वे येण्याची वाट पाहत उभा राहिलो.
फलाट क्रमांक २ वर बोरविली जाणारी रेल्वे लागली. त्या रेल्वेला खूप गर्दी असल्यामुळे मी दुसऱ्या रेल्वेची वाट पाहू लागलो. तेवढ्यात फलाट क्रमांक १ वर अंधेरीला जाणारी रेल्वे च्या घोषणेचा आवाज झाला. मी त्या गाडीची वाट पाहू लागलो. त्यावेळी माझ्या जवळ उभा असणाऱ्या एक व्यक्तीचे फोन वरचे संभाषण ऐकू आले. तो कोणाला तरी सांगत होता कि आज दिवाळी नंतर ऑफिसचा पहिला दिवस होता, दिवाळीचा फराळ घेऊन ऑफिसला गेलो होतो सर्वांनी मिळून खूप आनंदाने तो खाल्ला. माझ्या ऑफिस मध्ये साफ सफाई करणाऱ्या बाहेरील राज्यातील एक व्यक्तीला दिवाळी फराळ दिला मनाला खूप छान वाटले. तो व्यक्ती खूप आनंदी होता, एखादा व्यक्ती आपल्या साठी एवढी कामे करतो बिचार किती थकत असेल. त्याला आमच्या बरोबर अड्जेस्ट करून घेतले. आम्हाला हि त्याच्या आनंदामध्ये सामील झाल्याचे समाधान होते. वगैरे वगैरे असा संवाद सुरु होता.
तेवढ्यात अंधेरीला जाणारी रेल्वे समोर येऊन उभा राहिली. मी त्या रेल्वेत जाऊन बसलो. थोड्या वेळापूर्वी फोनवर बोलणारा तो व्यक्ती सुद्धा रेल्वेत माझ्या समोरील बाकड्यावर येऊन बसला. रेल्वे सुटे पर्यंत आमच्या आजू बाजूच्या सीटवरील जागा पूर्ण भरल्या. त्या व्यक्तीच्या शेजारी एक २५ वयाच्या आसपास असणारा मुलगा बसला होता. हातात खूप ओझ होत. त्याने ते ओझ त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये पकडले. रेल्वे सुरु झाली. थोडं अंतर गेल्यानंतर त्या मुलाला झोप येऊ लागली. कदाचित दिवसभरातील कष्टाने थकलेला असावा. तो मुलगा झोपेत असताना त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या खांद्याला सारखे त्याचे डोके लागत होते. तो व्यक्ती खूप रागाने आणि तिरस्काराने त्याच्याकडे बघत होता. परंतु तो मुलगा खूपच थकल्यामुळे स्वत:ला झोपेतून सावरू शकत नव्हता. लोअर परळ जवळ गेल्यावर त्या व्यक्तीने रागाने त्या मुलाचे डोके हाताने बाजूला करत खूप मोठ मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. आणि म्हणू लागला अशा माणसांना जवळ बसून घेतले कि जास्त त्रास होतो वगैरे वगैरे खूप बडबड करू लागला. त्याची हि बडबड वायफळ आणि सर्वाना नकोशी वाटत होती.
त्यावेळी मला थोड्या वेळापूर्वी त्याचे फोन वरील संभाषण आणि त्या व्यक्तीच्या आताच्या वागण्यातील तफावत खूप मोठी असल्याचे जाणवले. अशा अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. एका बाजूला सहानभूती दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला असहानभूती. ऑफिस मधील साफसफाई करणाऱ्या व्यक्तीला केलेली मदत तो थकत असेल हि भावना, आणि इथे दिवसभर कष्ट करून थकलेला तो मुलगा हि वास्तवता. त्या व्यक्तीच्या विचारातील आणि वागण्यातील हा दुटप्पी पणा पाहून असे वाटले कि, “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.” हि मराठीतील म्हण आज फक्त ऐकायला छान वाटत, कृतीत मात्र दिसत नाही.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

Sunday, October 22, 2017

बदल घडवावा लागतो...

“बदल घडत नाही, तो घडवावा लागतो” निसर्गाचा हा साधा आणि सोपा नियम आज मानवाने स्वत:चे जीवन जगत असताना त्याचा अवलंब केला पाहिजे. सर्व सजीव सृष्टीतील मानव ही निसर्गातील सर्वोत्तम निर्मिती समजली जाते. कारण इतर सजीवांच्या वैचारिक दृष्टिकोनापेक्षा मानवाची वैचारिक पातळी त्याचबरोबर त्याचा असणारा व्यापक दृष्टीकोन आणि विविध नैपुण्य एकाच ठिकाणी / अंगी असणारा तो एकमेव सजीव असावा.
काल परवा दिवाळी अगदी आनंदाने, उत्साहाने, नयनरम्य असा दिव्यांचा असणारा सण सर्वांनी साजरा केला. या सणाचे विविध गुण, त्याच बरोबर या सणाविषयी असणाऱ्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विविध आख्यायिका त्यानिमित्ताने ऐकायला वाचायला आणि पाहायला सुद्धा मिळाल्या. यामध्ये सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात हातभार होता. अनेक चांगले संदेश देणारे मेसेजेस मला वाचायला मिळाले. दिवाळीत साजरे होणाऱ्या प्रत्येक दिवसाचे स्थान किंवा महत्व काही निराळेच असते.
प्रत्येक गावात हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी संदेश मात्र एकच असतो. आपला वैचारिक दृष्टीकोन अंधकाराकडून प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाणे. आजची तरुण पिढी वाया गेली आहे, किंवा त्यांना काही समजत नाही. असे मानणाऱ्यांची संख्या आज देखील समाजात प्रचंड प्रमाणात पहावयास मिळते ती याच सणाच्या निमित्ताने. अशी विचारसरणी बाळगणाऱ्या व्यक्ती त्यांनी ठरवलेल्या चौकटीत राहूनच विचार मांडत असतात हे स्पष्ट जाणवते.
मागील वर्षी दिवाळीत ज्याप्रमाणे अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन साजरी केली गेली. त्याचप्रमाणे किंवा त्याहून अधिक प्रमाणात यावर्षी भर पडलेली दिसली. ज्या व्यक्तींना दिवाळी साजरी करता येत नाही त्यांच्या बरोबर अनेक व्यक्तींनी दिवाळी साजरी केल्याचे फोटो, बातम्या, व्हिडीओ पाहायला मिळाल्या. वर्षातील एखादा दिवस आपण त्यांना मदत करतो हि भावना चांगली आहे. त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. परंतु त्यांचे कायम स्वरूपी बदल घडविणे हि काळाची गरज आहे, तरच आपण ज्या अर्थाने हा दिवस साजरा केला तो सत्कारणी लागेल.
काही दिवसापूर्वी अशाच कोणी एका मित्रांनी एक फोटो मला पाठवला होता. तो फोटो पाहून मन अगदी सुन्न झाले. त्या फोटोमध्ये एक महिला पर्यटनाच्या निमित्ताने एका गावात गेली होती. त्यावेळी तिला त्या गावात कुपोषित बालक पहावयास मिळाले. तिने स्वत:कडे असणारा खाऊ त्या कुपोषित बालकाला दिला आणि पाणी पाजत आहे असा तो फोटो होता. शारीरिक दृष्ट्या कमकुवत असून सुद्धा त्या लहान मुलाच्या जगण्याची इछ्या त्या महिलेला जाणवली असावी. बदल घडला पाहिजे कोणी तरी बदल घडवेल अशा बोल घेवड्या व्यक्तीची समाजात खूप मोठी संख्या वाढत आहे.
महिलेने त्याला दत्तक घेतले असावे किंवा त्याची पालन पोषण करण्याची कायमची जबाबदारी घेऊन त्यामध्ये बदल घडवण्याची तीव्र इच्छा मनी बाळगली असावी. त्या कुपोषित असणाऱ्या मुलाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी तिने स्वीकारली असावी. काही वर्षानंतरचा त्याच महिलेचा फोटो आणि त्याच कुपोषित बालकाचा फोटो हि पाहायला मिळाला मला विश्वासच बसला नाही. ते बालक अगदी शारीरिक आणि त्याच बरोबर मानसिक दृष्ट्या तंदरुस्त असल्याचा फोटो होता. पूर्वी कुपोषित दिसणारे बाल आणि आता तंदरुस्त दिसणारे बाल यांचा फोटो आज मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर फिरत आहे.
बदल हा घडत नाही तर तो घडवावा लागतो. फक्त एक दिवस कार्य करून तो घडत नाही तर त्यासाठी निरंतर कार्यरत रहावे लागते. एक दिवस कार्य करून थोडीशी प्रसिद्धी मिळवायची हि भावना मुळासकट उखडून टाकायला हवी. वायफळ चर्चा करत बसण्यात वेळ दवडण्यापेक्षा हा बदल घडवण्यास सुरुवात केली तर खऱ्या अर्थाने आपण खूप मोठा बदल घडवू शकतो. खरच त्या महिलेला माझा मनापासून सलाम. आणि तिने केलेल्या बदलाची सुरुवात आपण देखील करू शकतो यासाठी हा सर्व लेखनाचा आटापिटा....
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०