Monday, December 30, 2019

परिवार एकता दिन...


परिवार एकता दिन
आज इंग्रजी वर्षातील शेवटचा दिवस वर्षा अखेर म्हणून सर्वजण आपापल्या परीने साजरा करताना पहावयास मिळतात. या सरत्या वर्षाने आपल्याला काय दिले? आणि येणारे नवीन वर्ष काय घेऊन येणार? असा प्रश्नांची एक शृंखला अनेक व्यक्तींच्या पुढे उभा असते. चालू वर्षामध्ये घडलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांच्या आठवणी, अनुभव मनी बाळगून या वर्षाला निरोप दिला जातो. 
आज या घडीला आपण कोणत्याही व्यक्तीला एक प्रश्न करून पहा तो म्हणजे, “या सरत्या वर्षाने दिलेले सुखद आणि दु:खद अनुभव सांगा.” असा प्रश्न केला तर ज्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक दृष्टीकोन ठासून भरलेला असतो तो व्यक्ती या सरत्या वर्षाला नक्कीच वाईट अनुभव देणारे वर्ष म्हणून सांगतो त्याच बरोबर या वर्षभरात घडलेल्या अनेक वाईट किंवा दु:खद प्रसंगाचा पाढाच वाचायला सुरु करतो. प्रसंगी काही व्यक्ती तर बोलतात कि आता पर्यंतच्या जगण्यातील सर्वात वाईट आणि क्लेशदायक वर्ष म्हणजे हे सरते वर्ष होय.
परंतु ज्या व्यक्तींच्या मध्ये सकारात्मक दृष्टीकोन असतो त्या व्यक्ती सरत्या वर्षामध्ये घडलेल्या चांगले प्रसंग त्याच बरोबर अनेक सकारात्मक घडलेल्या गोष्टी नक्कीच सांगतात. वर्षभरात स्वत:मध्ये झालेले चांगले बदल त्याच बरोबर त्यांच्या हातून घडलेल्या चांगल्या कार्याची माहिती देतील. कदाचित याच चांगल्या कार्यामुळे सरत्या वर्षातील अनुभव उराशी बाळगून नवीन येऊ घातलेल्या वर्षामध्ये आपण नक्की काय करणार आहोत हे देखील मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सांगतील.
या सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील सदस्य सोबत किंवा संपूर्ण परिवारासोबत रहावे. तसेच किमान या वर्षभरामध्ये झालेल्या चांगल्या आठवणी, प्रसंग, घटना, त्याच बरोबर परिवारातील सर्व सदस्यांच्या मधील चांगले गुणांना उजाळा द्यावा. जेणे करून येणारे नवीन वर्ष प्रत्येक सदस्याला उत्साहाने आनंदाने तसेच सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन जगता येईल असा अनुभव या शेवटच्या दिवशी दिला पाहिजे.
परिवारातील एकता तसेच एकतेचे महत्व याच दिवशी समजून सांगितले पाहिजे. सरत्या वर्षभरात आपण परिवारातील एकता कशा प्रकारे जोपासली आणि त्याचा फायदा अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाताना कशा प्रकारे झाला. याची देखील उजळणी करावी. जेणे करून येणारी नवीन पिढीला परीवारात्तील एकतेचे महत्व समजू शकेल. अनेक लहान मोठ्या समस्या असतील किंवा चांगले कार्य असेल त्यावेळी परिवारातील सदस्यांची होणारी मदत लक्षात ठेवली पाहिजे. परिवारातील प्रत्येक सदस्याची भूमिका आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे सर्वांच्या लक्षात येईल. 
आपल्या परिवारासोबत आजचा वर्षअखेर सर्वांनी सोबत घालवावा. आणि येणारे नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने प्रेमाने आणि कुटुंबातील व्यक्तीसोबत करावे. यामुळे परिवारातील प्रत्येकामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल. त्याचा फायदा जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जाताना नक्कीच होईल.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    इमेल – mangeshvkoli@gmail.com

Saturday, December 28, 2019

प्रसिद्ध ऑर्थोपेडीक तज्ञ “डॉ. सतीशकुमार पाटील” यांचा “यशाचा मार्ग” या पुस्तकासाठी शुभ संदेश....


-: शुभ संदेश :-

मा. श्री. मंगेश कोळी हे पायोस हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क अधिकारी तसेच माझ्या साहित्याचे टंकलेखक व दुरुस्तीचे काम अव्याहतपणे, न थकता करीत असतात. त्यांचा मुळचा पिंड साहित्यिक आहे. आजवर त्यांची यशोमंदिर, यशोशिखर, यशोदीप, विचारवृक्ष ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तसेच व्यक्तिमत्व विकासासंदर्भात प्रत्येक वर्षी दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. त्यांनी स्वत: M.A. (Psychology)चे शिक्षण पूर्ण केले आहे. परिसरात अनेक ठिकाणी Motivational Speech म्हणजेच प्रेरक भाषणे देत असतात. त्यांच्या भाषणांचा हजारो तरुण वर्गावर सकारात्मक परिणाम झाला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून श्री. मंगेश कोळी हे “यशाचा मार्ग” हे प्रेरक पुस्तक घेऊन येत आहेत. या पुस्तकामध्ये सकारात्मक विचारसरणी, वेळेचे नियोजन, स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक विचारावर विजय, उत्साही विचार, आत्मविश्वास, प्रशंसा, प्रत्येक क्षणाचा विचार कसा करावा, प्रबळ इच्छाशक्ती या व अनेक विषयावर थोड्याच शब्दात पण चिंतणीय विचार प्रकट केले आहेत. हे वाचून सर्वांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निश्चित भरली जाईल. याबद्दल मला  अगदी मनापासून खात्री आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर सकारात्मकतेचे नवीन अंकुर, बीज तुमच्यात पेरले जाईल. याबद्दल मी नि:शंक आहे. श्री. मंगेश कोळी यांच्या भावी लेखन प्रपंचास मन:पासून शुभेच्छा...

डॉ. सतीशकुमार पाटील.

Wednesday, December 25, 2019

सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा “यशाचा मार्ग”

सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा “यशाचा मार्ग”
         माझे मित्र मंगेश विठ्ठल कोळी यांनी नेहमीप्रमाणे ह्या पुस्तकाची प्रकाशनापूर्वी एक प्रत अवलोकनार्थ दिली. तेव्हाच खरा “यशाचा मार्ग” दृष्टीपथात आला, लेखनाची प्रेरणा मिळाली. एखाद्या धन्वंतरीजवळ कोणत्याही असाध्य वाटणार्‍या व्याधीवर रामबाण मात्रा असावी त्याप्रमाणे प्रत्येक मनोव्याधी ग्रस्तावर अचूक उपाय या पुस्तकातून सापडतो. मंगेश यांचा सूक्ष्म अभ्यास, मानव जीवनात सर्वांगीण विकास व संस्कृतीचे भान ठेवून अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. ही परिवर्तनाची दिशाच ठरावी. 
व्यक्तिपरत्वे, प्रसंगपरत्वे विविध उपायांनी यशस्वितेकडे आत्मविश्वासाने जाण्याचा मार्ग प्रकाशमान होतो. मानवरूपी खडकाळ महासागरात दीपस्तंभाचे जे कार्य असते तसे यशाचा प्रशस्त मार्ग निर्माण केला आहे. अनेक साधू-संत, थोर महात्मे यांच्या जीवनातील प्रसंग, काव्य, अभंग, प्रहसने यांचा तसेच अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत यांनी सांगितलेले सिद्धांत, तत्त्व यांचा पुरेपूर उपयोग करून ह्या पुस्तकाचे एक आगळे रूप वाचकांपुढे ठेवण्यात मंगेश नक्कीच यशस्वी झाले आहेत.
विषय अनेक, ग्रंथ अनेक, ग्रंथकारही अनेक, आपले आयुष्य अल्प, वेळ थोडा, बुद्धी बेताची. काय करावे, काय शिकावे, कोणाकडे जावे? अभ्यास, योग्य सराव, परिवर्तनातील बदल अशा द्विधा अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी काय करू नये याची योग्य निदान या पुस्तकाच्या माध्यमातून मंगेश कोळी आत्मविश्वासाने करतात. धैर्य आणि संयम मिळविण्यासाठी काय करावे?
संत कबीर म्हणतात - 
कारज धीरे होत है, काहे होत अधीर |
सयम पाय तरुवर फले,केतक सीचो नीर ||
योग्य काळ आल्याशिवाय कोणतेही कार्य घडून येत नाही. योग्य काळ येईपर्यंतची आकुलता किंवा अधीरता व्यर्थ असते. वृक्षांना कितीही पाणी घातले तरी फळ यायचे तेव्हाच येणार! मनुष्य सुखासाठी आपल्या स्वभावभूत गुण विकासाकडे तितके लक्ष देत नाही जितके तो बाह्य भोगोपभोगाची साधने गोळा करण्याकडे देतो. मंगेश यांच्या सांगण्याचा अर्थ आणि हेतू यांचा सूज्ञ वाचक यांचा नक्कीच विचार करतील. 
खरे सांगू का? सुखाने हुरळून आणि दुःखाने होरपळून व्याकूळ होण्यापेक्षा विवेकशील बनून दोन्ही प्रसंगी समतोल असणे अधिक श्रेयस्कर ठरत नाही का?
मंगेश म्हणतात -
चांगले कार्य करीत रहा म्हणजे त्याचे फल आनंद, सुख, मान-सन्मान, यश:कीर्ती या स्वरुपात मिळत राहणारच. हा निसर्गाचा नियम आहे हे विसरू नका.
प्रसन्नेन सदा भाव्य विषन्नेन न कदाचन |
विषाद-परीभूतात्मा सर्वत्र परीभूयते ||
माणसाने नेहमी प्रसन्नचित्त, हसत मुख असले पाहिजे. मागे संसार आहे, संस्था आहे, जबाबदार्‍या आहेत, अडचणी आहेत हे सगळे खरे! पण त्या सर्वातून पार पडताना खेळकर आणि आनंदीवृत्तीची गल्लत होऊ देता कामा नये. मला सांगा - संतापून तरी काय फायदा? ही आदळआपट, हा आरडाओरडा, हा त्रागा, हा संताप, ही निराशा, ही उदासीनता, उव्दिगनता कशासाठी? निष्कारण स्वत:ही दु:खी व्हावयाचे व संबंधित व्यक्तीचाही आनंद घालवून बसायचे.
माझे ऐका - 
अप्रसन्नता ही वांझोटी आहे, सार्‍या विद्या-कला, सारे ज्ञान-विज्ञान, सगळा ब्रह्मानंद जन्म घेतात केवळ या प्रसन्नते पोटी. मंगेश कोळी हा यशाचा मार्ग, चिंतन मनन करून कळकळीने-तळमळीने आपल्यासाठी प्रकाशात आणत आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळेल असा मला आत्मविश्वास आहे. हे पुस्तक प्रकाशनामागे प्रकाशक आणि त्यांचे कुटुंबिजन अत्यंत परिश्रमाने झटले, यासर्वाच्या परिश्रमाचे हे सुंदर सुगंधित फुल आज उमलत आहे. त्याचे हृदयापासून स्वागत करूया.
-      प्रा. प्रवीणकुमार वैद्य. (प्राध्यापक, लेखक, समीक्षक)
पुस्तकाचे नाव – यशाचा मार्ग
लेखकाचे नाव – श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
मूल्य – २००/-
प्रकाशन – कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
संपर्क – ९०२८७१३८२०, ०९९७५८७३५६९

Monday, September 30, 2019

नऊ रंगाच्या साड्या कशासाठी??

नऊ रंगाच्या साड्या कशासाठी??
आज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत.
चार पाच महिलांनी दुरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क केला व एक विचारणा केली की "नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात आणि देवीची व नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडिया द्वारे प्रसारीत होत आहेत. हे सत्य आहे का?"
काही महिलांनी तर नऊ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले - गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते दागीने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते याचेही मेसेज आपणास आले आहेत असे सांगीतले. धर्मशास्त्रात असे काही दिलय का? असे विचारले.
गरबा व दांडिया खेऴ हाच देवीला आवडतो व तो खेऴलात कि "लक्ष्मी प्राप्त" होईल अशाही चर्चा होताहेत. यात सत्यता आहे का? धर्मशास्त्रात हे दिलय का? असा प्रश्न आज मातृवर्ग विचारतोय.  
मुंबई येथील महिलेने सांगीतले कि त्यांच्या ऑफीस मध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या व त्याला अनुसरुन मँचींग बांगड्या कानातले वगैरे अलंकार घालावेत असं ठरतेय.  "मी गरीब आहे. नवरा सतत आजारी असतो. मी एवढा खर्च करु शकत नाही तेव्हा मी काय करु ? देवीचा कोप होईल का माझ्या कुटुंबावर?"  हा प्रश्न ऐकुन मात्र मी हादरलोच व मनाशी ठाम ठरवले की यावर एक लेख द्यावाच.
चार वेद, चार उपवेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे व उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती व दुर्गा उपासनेचे ग्रंथजवऴपास साठ स्मृतिग्रंथ यांत कोठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परीधान करा  अस दिलेले नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परीधान करा. स्वच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम असे दिले आहे. जे तुमच्या जवऴ अलंकार असतील ते घाला. त्यांत मँचींग हवंच अस नाही.
मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरुन हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केलाय व त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बिभत्सपणा आलाय. 
प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. उदा.महाराष्ट्रात "घटस्थापना " ही प्रधान असते . त्याच सोबत अखंड नंदादिप, त्रिकाऴ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी पूजन, कुमारीका पूजन व भोजन व माऴा बांधणे इत्यादी पध्दतीने नवरात्र होते. ललीता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होम हवन, सरस्वती आवाहन पूजन असेही धार्मिक विधी महाराष्ट्र व गोवा प्रांतात असतात.
कर्नाटकात दसरा मोठा असतो.  कच्छ - सौराष्ट्र - गुजराथ प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करुन रात्री जागरण, गरबा तसेच होम हवन वगैरे पध्दतीने हा उत्सव करतात. पश्चिम बंगालमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.
इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात - सरमिसळ करतात व नवीनच पध्दत निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो व त्यात देवीची उपासना हा सर्वात महत्त्वाचा व मुख्य भागच नसतो.
प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट असते - परंपरा असतात, त्या जपल्याच  पाहिजे. अन्यथा काही वर्षांनी आपली मुले व नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा दांडिया खेऴणे एवढाच घेतील. मातृशक्तीचा उत्सव हा त्यांना कऴणारच नाही. माझे आचार, विचार, संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा मला पडणार नाही. नेमकी हिच नस या इव्हेंट व मार्केटिंग कंपन्यांनी जाणली आहे. यात काहीहि झाले तरी लाभ झाला पाहिजे.
एखाद्या गरीब भगिनीला हे "हाय फाय" नवरात्र जमणार नाही. ती देवी पूजन करणार नाही. म्हणजे हऴुहऴु ती नास्तिक होईल. श्रीमंती, धर्मशिक्षणाचा अभाव व मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या "डिजे व गरबा दांडियाला"  नवरात्र समजतील कारण यांनाही नवरात्र म्हणजे देवी उपासना हे माहितीच नाहीय. यांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल.
थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल व याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदू समाजच कारणीभूत आहे.
काही वर्षांपूर्वी "डे "संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा  "गिफ्ट वस्तुंच्या कंपन्या व ग्रिटिंग कार्ड कंपन्या " आपल्या देशात आल्या तेव्हापासून हे "डे "च खूऴ डोक्यात शिरलय. चॉकलेट डे,वेलेंटाईन डे, रोज डे वगैरे. या दिवसांत करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे कि मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगाव लागते पण हे "डे " मात्र ते पक्के लक्षात ठेवतात.
गोकुळाष्टमी ही राजकीय पुढारी मंडळींच्या कृपेने अशीच "डिजे व मद्यमय "झाली आहे. किमान आईचा उत्सव असा होता कामा नये असे वाटतेय.
चंड मुंड, शुंभ निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारुन त्यांचा उत्पात शमन करुन जगदंबेने जी  विश्रांती घेतली त्याचा काऴ हा नवरात्र आहे. या युध्दाचा शिण घालवण्याकरता देवीने नृत्य केले असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युध्द करतच नाही - केवऴ नाचतो) 
या काळात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिन्ही रुपांतील देवीची सेवा करणे. आपल्या परंपरेनुसार नंदादिप, माऴ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडुन सरस्वतीची उपासना ही विद्या व बुध्दि करता करुन घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरता महालक्ष्मी उपासना करावी व शत्रू संहार सामर्थ्यप्राप्ती करता महाकालीची उपासना करावी.
मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिऴवुन उत्तम मार्गाने धन जोडणे व छेडछाड करणार्या बदमाशांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे या करता देवीचे माहात्म्य व पराक्रम वाचावेत तसेच ऐकावेत. आज काऴाची ही गरज आहे. हिरॉईनसारखे नाचण्यापेक्षा महाकाली सारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरच्या चिन्नमा, जिजाबाईं सारखा पराक्रम दाखवण्याची ही वेऴ आहे व आज गरज त्याचीच आहे. नाचणारे खूप झालेत पण पराक्रमी मात्र कमी होताहेत.
.
तेव्हा या मार्केटिंग व इव्हेंट फंड्यांना बऴी न पडता सात्विकपणे आनंदाने आपल्या परिस्थितीनुरुप जगदंबेची सेवा करा व देवीची कृपा प्राप्त करावी हि विनंती.
वरील माहितीत काही चुकीचे असेल तर क्षमस्व!
(वरील पोस्ट मी लिहिलेली नाही, पोस्ट मार्मिक व प्रेरणादायी आहे. म्हणून आपल्याला पाठवत आहे.)
-   मंगेश विठ्ठल कोळी.
-   मो. ९०२८७१३८२०
-   ईमेल mangeshvkoli@gmail.com

(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Sunday, September 29, 2019

स्त्रीत्वाला सलाम...

स्त्रीत्वाला सलाम
तू नऊ दिवस नऊ रंग परिधान केलेस किंवा नाही केलेस तरी आम्ही हे कबूल करतो की तू आहेस म्हणून आमचं रंगहीन आयुष्य रंगीत होतं! 
केवळ शास्त्रात सांगितलंय म्हणून नाही तर त्यानिमित्ताने वर्षभर कपाटात पडून राहणाऱ्या जरीच्या साड्या बाहेर पडून तुला उत्साहाने नेसायला मिळतात हे आम्ही नाकारू शकत नाही! 
दांडिया खेळलीस किंवा नाही खेळलीस तरी आम्ही हे नाकारू शकत नाही की आमच्या आयुष्याचा खेळ केवळ तू आयुष्यात असण्याने सुखकर होतो! 
तू नऊ दिवस उपवास कर किंवा उठता बसता उपवास कर तरी आम्हाला हे माहिती आहे की आमची उपासमार होऊ नये म्हणून तू आयुष्यभर तुझ्या जीवाचं रान करतेस!
तू घट बसव किंवा तुझ्या देवीला फुलांनी सजव पण आमचं आयुष्य मात्र तूच सजवलं आहेस!
तू दिवा लाव किंवा पणती लाव पण या विश्वाच्या निर्मितीपासून तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात प्रकाश आहे!
थोडक्यात काय तर...
तूच धरती आहेस,
तूच आकाश आहेस,
तूच सुरुवात आहेस,
आणि शेवटही तूच आहेस!
तुझ्याच कुशीत जन्माला येऊन तुझ्याच कुशीत विसावून निर्धास्तपणे आयुष्य जगणाऱ्या माझा तुझ्यातील स्त्रीत्वाला सलाम.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Friday, September 27, 2019

घटस्थापना म्हणजे काय?


*घटस्थापना म्हणजे काय?*
एक आधुनिक शेतकऱ्यांची प्रयोगशाळा आहे. काही वर्षांपूर्वी विज्ञान प्रयोग शाळा उपलब्ध नव्हत्या. तरी सुद्धा भारतातील शेतकरी राजा होता. त्याचे हे उत्तम उदाहरण.
आपल्या शेतातील माती आणायची व ती एका मातीच्या भांड्याच्या कडेला ठेवायची. त्या मातीच्या भांड्यात आपल्या शेतात असणारे पाणी भरायचे. जेणेकरून तो ओलावा मातीमध्ये टिकून राहिला पाहिजे. जे बियाणे आपल्याला शेतात रब्बी हंगामात पेरायचे आहे त्या बियाणांचे विविध प्रकार असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारची बी-बियाणे त्या मातीत रूजवायची व नऊ दिवस निरीक्षण केले जायचे. 
या नऊ दिवसामध्ये ज्या बी-बियाण्यांची वाढ उत्तम असेल, ते बियाणे आपल्या शेतात लावण्यासाठी अत्यंत योग्य आहे हे लक्षात यायचे. काही वर्षांपूर्वी उत्तम बी-बियाणे तपासणीसाठी लॅब किंवा अत्याधुनिक प्रयोगशाळा नव्हत्या. मग ही पद्धत आत्यंतिक उपयुक्त आणि प्रभावी होती. याचा संबंध कोणत्याही धर्म व जातींशी नाही तर तो शेतकऱ्यांशी आहे.
खूप वर्षांपूर्वी सुद्धा आपला देश सर्व देशापेक्षा खूप पुढे होता, मग आज का मागे आहे थोडंसं आत्मपरीक्षण करावे लागेल. आपल्याकडील बदललेले निसर्ग चक्र पूर्व पदावर येण्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. आपण ही आपल्याकडून प्रयत्न करायला हवे. एवढीच हा लेख लिहिण्याच्या मागची माफक अपेक्षा आहे.
*- मंगेश विठ्ठल कोळी,* 9028713820

Friday, September 20, 2019

मग थकवा येणारच....


मग थकवा येणारच!
साधारण ४०वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवी वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूटासाठी खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता.
गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की तांब्या-पितळेची भांडी असायची. खाली मांडी घालून जेवायला बसत असत. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. चणे,फुटाणे शेंगदाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही.  कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात?
कपडे हातानंच घासावे लागत, धुवावे लागत. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. माणसं शक्यतो पायी चालत, सायकल वापरत. शाळेचा प्रवास पायी असायचा. सकाळ-संध्याकाळ ग्लासभर दूध प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी असायचेच.
जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स पाहत पाहत ! रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत.
या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही ! आयुष्यं आता इतक गतिमान नव्हत, पुष्कळ संथ होत. पण, त्यामुळं थकवा नव्हता. लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचाहे तत्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळंच, त्यांना आयुष्य जगता आलं.  राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं. आज आपल आयुष्यं नुसत धावपळ करण्यातच जातय..!
लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. हेवेदावे, रूसवेफुगवे होते, पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. दारांना कुलुपं नव्हती. शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच. त्यात प्रेमही होतं आणि रितही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं. धीर वाटायचा.
आज प्रायव्हसीच्या नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, सहकार्य काय असत हे फक्त बोलण्यात येत आहे परंतु प्रत्येक्षात वेगळाच काही तरी दिसत आहे. वागण्यात आणि बोलण्यात तारतम्य दिसत नाही, आयुष्य नैराश्याने ग्रासल्यासारखे झाले आहे. "काही वर्षांपूर्वी माणसं पैसा वापरात होती आणि माणसं जपत होती." परंतु आताच्या धावपळीच्या आणि स्टॅण्डर्ड दिखावेगिरीच्या नादाला बळी पडून, "माणसं पैसा जपत आहेत आणि माणसं वापरात आहेत." जो व्यक्ती वापराचा आहे त्याचा वापर संपला, की त्याची किंमत ठेवत नाहीत.  मग तर थकवा येणारच !
- मंगेश विठ्ठल कोळी. मो.- 9028713820 (My WhatsApp No.)
(वरील पोस्ट मी लिहिलेली नाही, परंतु शेवटच्या काही ओळी मी लिहिलेल्या आहेत. पोस्ट प्रेरणादायी आहे. म्हणून आपल्याला पाठवत आहे.)

Wednesday, August 28, 2019

माझा खेळ, माझा विकास.

माझा खेळ, माझा विकास.
आज क्रीडा दिनानिमित्ताने बालपणी खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांचा दीर्घ परिणाम जीवनावर कशा पद्धतीने होत असत याची माहिती देण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. खालील काही खेळांच्यामुळे आज अनेक मोठ मोठी संकटांना मी सहजपणे सामोरे जाऊ शकतो. त्यातून मार्ग काढून योग्य ते ध्येय गाठू शकतो. शारीरिक मानसिक बौद्धिक विकास होण्यास चालना मिळू शकते. आपण खालील खेळाचा अवलंब करून मुलाच्या क्षमता विकास होण्यास हातभार लावूया.
कंचे – काही वर्षापूवी हा खेळ खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय होता. जमिनीवर गोल करून किंवा अनेक गोट्या एकत्र करून ठेवल्या जायच्या त्याच्या भोवतीने एक सीमारेषा आखली जायची. त्या सीमारेषेमध्ये असणाऱ्या असंख्य गोट्यामधून एका गोटीला नेम धरून आपल्या ताकद असणाऱ्या बोटाच्या सहायाने आपल्या हातात असणाऱ्या गोटीने बाजूला केली जायची. रिंगण करून त्यात बऱ्याच गोट्या ठेवल्या जायच्या व कोणतीही गोटी उडवणार हे निश्चित करून नेम धरून तिच गोटी उडवायची. गोटी उडवल्यास ती गोटी ज्याने उडवली, त्याची व्हायची अशा प्रकारचा हा खेळ असायचा. या खेळामुळे लहान मुलांच्या बुद्धीचा विकास होत होता. लक्ष देवून लक्ष गाठण्याचा गुण यातून आपोआप शिकला जायचा आणि त्याचा उत्तम परिणाम जीवनावर होत असे.
खडे उचलणे – हा खेळ साधारणपणे मुली जास्त प्रमाणात खेळत असायच्या. या खेळात गारगोट्या, कंचे, खडे आदींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जायचा. या सर्व वस्तू पाच, सात किंवा नऊ या स्वरुपात वापरल्या जायच्या. या वस्तू जमिनीवर टाकल्या नंतर एक एक करत वर फेकायच्या व झेलायच्या. त्यानंतर एक खडा वरती फेकल्यानंतर दोन खडे उचलायचे. कोणत्याही वस्तूचा वापर करून हा खेळ खेळला जात असल्याने परिस्थितीशी जुळवून कुशलतेचे धडे मिळायचे. या खेळामुळे हवेत फेकलेल्या वस्तू झेलायचे आणि हवेत एखादी वस्तू फेकल्यानंतर ती खाली येई पर्यंत खालच्या वस्तू गोळा करून घ्यायच्या. यामुळे वेग वेळ आणि चपळाईचा उत्तम कौशल्य अंगी बाळगण्यास मदत होत होती.
चंपूल – घराघरात खेळला जाणारा हा खेळ पाटाच्या उलट्या बाजूला खेळला जायचा. पाटाच्या उलट्या बाजूला खडूच्या सहायाने लहान लहान चौकोन आखले जायचे. (त्याला घर म्हणायचे) कवड्या किंवा चिंचोळ्याचे (चिंचेच्या बिया) दोन भाग करून त्याचादाणे म्हणून वापर केला जायचा. या खेळत कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार स्पर्धक सहभागी गहू शकत होते. मिळालेल्या अंकातून आपली गोटी फिरवून समोरच्या स्पर्धकाची गोटी बाद करायची असा धडे देणारा हा खेळ असायचा. या खेळामुळे आपल्या शरीरात डावपेच हा गुण अधिक प्रमाणात न कळत रुजला जायचा.
लगोरी – या खेळत गोल आकाराची लाकडी तुकडे अथवा फुटलेली कवले, फरशीचे तुकडे यांचा वापर केला जात असे. ज्या मुलांच्याकडे चेंडू नव्हते ती मुले कापडाचा चेंडू करत असत. चेंडूने एकमेकांवर रचलेल्या लाकडी अथवा फरशीच्या तुकड्यावर मारला जायचा. दूर गेलेला चेंडू प्रतिस्पर्धीने धरून मारेपर्यंत पडलेले तुकडे पुन्हा एकमेकांवर रचावे लागत असत. सोप्या खेळातून मुलांना कामच्या नियोजनाचे धडे मिळत होते. त्याच बरोबर एखादे काम किती लवकर पूर्ण करता येते याचे वेळेचे नियोजन करणारा विशेष गुण शिकायला मिळायचा.
चिपरी – हा खेळ बहुतांश मुलीच खेळत असत. खडूने किंवा लाकडाच्या कोळशाने जमिनीवर सात किंवा आठ चौकोण आखले जायचे. फरशीचा अथवा दगडाचा तुकडा (त्यालाच चिपरी म्हणतात) डोक्यावरून टाकून अथवा पहिल्या चौकोणात टाकून एका पायावर उभे राहून पायाच्या अंगठ्याने फरशी अथवा कवल याचा तुकडा पुढच्या चौकोणात ढकलला जायचा. हा खेळ अॅक्यूप्रेशरवर आधारित होता. यातून मुलींना सादृढता तर मिळत होतीच त्याचबरोबर जिमनॅस्टीकचे धडेही मिळत असत. या मुळे लहानपणीच शारीरिक विकास उत्तम होत असे.
कुरघोडी – एका टीममधील तीन ते चार स्पर्धक भिंतीला पकडून एकमेकांच्या सहायाने कंबरेला पकडून घोडी करत असत. दुसऱ्या टीमने घोडी झालेल्या या टीमवर धावत येवून पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धकापर्यंत उडी मारून त्याह्य्चा पाठीवर बसावे लागे. टप्याटप्याने सर्व स्पर्धक उडी मारत असत. उडी यशस्वी न ठरल्यास दुसऱ्या टीमला घोडी व्हावे लागत असे. या खेळातून मुलांना वजन पेलण्याची तसेच ध्येय गाठण्याचा पाठ मिळत होता. या क्रीडा प्रकारामुळे शारीरिक सादृढता वाढीस चालना मिळत असे.
उडाण टप्पू – हा खेळ अंगणात, मैदानात, खुल्या जागेत खेळला जायचा. खाली बसून जमिनीवर पायावर पाय, त्यावर हात आणि नंतर अंगठे पकडून उभे राहिल्यानंतर त्याच्या पाठीवर उंच उडी मारावी लागत असे. असा प्रकार टप्याटप्याने पूर्ण उभे राहून केवळ मान झुकवून वरून उडी मारेपर्यंत सुरु राहायचा. जो प्रतिस्पर्धी उडी मारण्यात अयशस्वी ठरत असे त्याला जमिनीवर बसून हा सर्व प्रकार करावा लागे. उंच उडी, धावत येऊन उंची लक्षात घेऊन उडी मारावी लागत असल्यामुळे या खेळातून शारीरिक क्षमतांचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होत होती.
खुपसणी – हा खेळ साधारत: पावसाळ्यात चार ते पाच महिने खेळला जायचा. अणकुचीदार टोक असलेली लोखंडी सळीच्या तुकड्याचा वापर या खेळत केला हात असे. रस्त्यालगत असलेल्या चिखलात ही सळी फसवली जायची. जो पर्यंत सळी मातीत खुपसल्यानंतर पडत नाही, तो पर्यंत मुले पुढे पुढे जात असत. एकदा सळी पडली की तेथून प्रतिस्पर्धीला चिखल तुडवत, जेथून खेळ सुरु झाला त्या जागेपर्यंत पळत यावं लागत असे. या खेळामुळे योग्य अंदाज बांधणी हा गुण शिकायला मिळत असे.
विठू दांडू – हा भारतातील प्राचीन खेळ आहे. असे म्हणतात या खेळातून इंग्रजांनी क्रिकेट सुरु केले. दांडूने विटी कोलायची. कोललेली विटी प्रतिस्पर्धीने झेलायची झेलता नाही आली तर जिथे विटी पडली आहे तिथून ती दांडूला मारावी लागायची. विटी दांडूला लागल्यास खेळाडू बाद होत असे. जर विटी दांडूला लागली नाही तर दांडूने तीन वेळा विटीला हवेत उडवून दांडूने मारून टोलवली जात असे. हा खेळ पूर्णपणे मैदानावर खेळला जायचा. या खेळातून मुलांना अचूकतेचे प्रशिक्षण मिळत असे. या खेळातून मुलांची बौद्धिक क्षमताही वाढत असायची.
लपंडाव – या खेळात कितीही मुल-मुली सहभागी होऊ शकत असत. डाव असलेला सोडून इतरांनी ठरवून दिलेल्या जागेपर्यंत लपायचे. ज्या मुलावर डाव आला असेल त्याने दहा वीस तीस... असे शंभरपर्यंत म्हणत. मी आलो रे... ची आरोळी देत प्रत्येकाला शोधून काढायचे. दरम्यान लपलेल्या दुसऱ्या मुलाने त्याच्या पाठीवर थाप मारल्यास त्याला पुन्हा एकदा इतरांना शोधायचे काम करावे लागे. या खेळातून मुलाची शोध प्रवृत्तीस वाव मिळत असे.
आज हे सर्व खेळ खेळणारी मुले मुली अगदी बोटावर मोजण्याइतपत दिसतात. अनेक मुले मुली लहानपणी वेगवेगळ्या गॅजेट अडकून पडलेली दिसतात. गॅजेटचा वापर फक्त आणि फक्त कामासाठी न राहता ते आत अनेकांचे व्यसन होत असल्याचे चित्र समाजात आहेत पाहतो. यामुळे मुलांच्यामध्ये ताणताणाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. छोट्याछोट्या अपयशाने मुले स्वत:चे आयुष्य संपवत आहेत, आत्महत्या करत आहेत. याचा येणाऱ्या भावी पिढीवर वितरीत परिणाम होणार आहे. आजच्या पालकांना माझी विनंती आहे की आपणही गॅजेटचा वापर कमीत कमी करून आपल्या पाल्याबरोबर अधिकाधिक वेळ देऊन वरील प्रकारचे खेळ खेळा व त्यांच्यातील विविध शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक गुणकौशल्यांचा विकास करण्यास हातभार लावा.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Sunday, August 25, 2019

आठवणीतील बहीण...

आठवणीतील बहीण.
रक्षाबंधनच्या निमित्ताने मला माझ्या बहिणीची आठवण झाली. आज सकाळपासूनच तिच्या बद्दलच्या माझ्या आठवणी मनात येत होत्या. लहान असताना काही घटना अशा घडल्या आहेत, ज्या जीवनात कदाचित कधीही न विसरण्यासारख्या आहेत. अनेक कारणांमुळे मला बहिणीची आठवण येत असते. रक्षाबंधन असो किंवा इतर कोणतेही, भाऊ बहिणीचे संबंध दृढ करणाऱ्या कोणत्याही गोष्टी असोत. मी तिला कधीही विसरू शकत नाही.
आज देखील असाच एक प्रसंग माझ्या बाबतीत घडला, त्यामुळे तिची आठवण झाली. रात्री मी ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला जाणार होतो. नेहमीप्रमाणे ऑफिसमधील कामे संपवून, रात्रीच्या महालक्ष्मी एक्स्प्रेस (कोल्हापूर ते मुंबई) रेल्वेने मी मुंबईला जाणार होतो. मी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनला आलो. स्टेशनवर पोहोचल्यावर पाहिले माझ्यासारखे अनेक प्रवासी तिकडे रेल्वे येण्याची वाट पाहत उभा होते. रेल्वे येण्यासाठी आणखी थोडा अवधी होता. परंतु माझ्या मनात बहिणीच्या आठवणीचे अनेक विचार मला शांत बसू देत नव्हते. असे म्हणतात की, ‘मनात विचारांनी गर्दी नसतील तर माणूस गर्दीत सुद्धा शांत राहू शकतो आणि मनात विचार असतील तर माणूस एकटा असून देखील विचारांच्या गर्दीत अडकून पडतो.’ अशी अवस्था माझी झाली होती.
बहिणीची आज आठवण मला क्षणोक्षणी येत होती. तिच्या विचारामध्ये मी एवढा गुंतलो होतो की मी कुठे, कोणासोबत, कशासाठी उभा आहे. याचे देखील भान हरपून उभा होतो. माझ्या जवळपास कोणकोण आणि कायकाय आहे, याचे देखील भान मला नव्हते. अचानक रेल्वेच्या हॉर्नचा आवाज आला आणि मी भानावर आलो.
मी रेल्वेत चढलो, अगोदरच बुकिंग केले होते. त्यामुळे माझी जागा राखीव होती. मी जागेवर जाऊन बसलो. रेल्वे सुरु झाली. थोड्या वेळाने पुन्हा तिच्या बरोबर बालपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. त्यात मी पूर्ण डुंबून गेलो. थोड्या वेळातच मिरज स्टेशन आले.
माझ्या सीटच्या अगदी पुढच्या सीटवर एक मुलगी, तिची आई आणि वडिल यांच्या सोबत येऊन बसली. साधारणत: २२-२३ वर्षाची असेल. रेल्वे पुन्हा सुरु झाली. माझ्या समोर बसलेली मुलगी पाहिली. तिच्या हालचाली पाहिल्या. ती रेल्वेत बसल्यापासून तिच्या आई वडिलांना अनेक प्रश्न विचार होती. तिची आई मात्र तिच्या प्रश्नांची उत्तरे देऊन देऊन कंटाळली होती. परंतु तिचे वडील मात्र कोणत्याही प्रकारचा राग व्यक्त न करता, न कंटाळता, न थकता तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. तिच्या मनातील विचार शांत करण्याचा प्रयत्न करत होते. हा सर्व प्रसंग मी माझ्या पाहत होतो.
माझ्या समोर बसलेली मुलगी म्हणजे माझी बहीणच आहे, असे मला वाटू लागले. लहानपणी कोठेही प्रवास करण्याचा योग आला की, माझ्या वडिलांना असेच प्रश्न विचारून माझी बहीण भांबावून सोडायची. माझे वडील तिच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असायचे.
माझ्या समोर बसलेली ती मुलगी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग होती. मी तिच्याकडे पाहिले लांब काळेभोर केस, त्यावर भरपूर तेल लावलेले, दोन वेण्या बांधलेल्या, वेणीला लाल रंगाच्या कापडी रिबन बांधलेली. उंच, रुंद आणि मोठे कपाळ, दाट आणि कोरीव भुवया, मोठे टपोरे डोळे, डोळ्यात काजळ, सुंदर नाक, गोरे गुबगुबीत गाल, नाजूक ओठ, त्याखाली चेहऱ्याला शोभेल अशी हनुवटी, अंगात फुलाफुलांचा ड्रेस, पायात चप्पल, आणि तोंडातून अनेक प्रश्नांची सतत चालू असलेली विचारणा तिच्या या वागण्यामुळे जणू माझी बहिणच माझ्या समोर आहे, असे मला वाटते. ती सुद्धा अशाच प्रकारची दिव्यांग, आभासी देवाने जन्माला घातले, परंतु आयुष्य जगणे किती कठीण असते, हे पावलो पावली जगताना समजते.
समोर बसलेल्या मुलीचे वडील तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. ती मुलगी प्रत्येक मिनिट, दोन मिनिटाला वेगवेगळे प्रश्न विचारात होती. तिचे वडील न दमता, न थकता तिच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तरे देऊन तिला समाधानी करण्याचा प्रयत्न करत होते.
तिच्या या हालचाली आणि हावभावाने मला माझी बहीण आठवली. ती सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारून माझ्या वडिलांना विचारचक्रात अडकवत असायची. माझे वडील मात्र शांतपणे तिच्या प्रश्नाची उत्तरे देत होते.
मी कदाचित दुसरी-तिसरीला असेल. मी दररोज नेहमीप्रमाणे शाळेत गेलो होतो. दुपारची वेळ होती, जेवणाची सुट्टी झाली. सगळे मिळून शाळेत जेवलो. पुन्हा शाळेची भरण्याची बेल वाजली. आम्ही वर्गात गेलो, थोडा वेळाने आमच्या शेजारचे काका माझ्या वर्गाबाहेर दिसले. त्यांनी माझ्या गुरुजींना वर्गाबाहेर बोलावले. त्या दोघांच्यामध्ये काही तरी संभाषण झाले. गुरुजी परत वर्गात आले.
माझ्याकडे पाहत मला म्हणाले, ‘तुला घरी जायचे आहे, तुमचे शेजारचे काका तुला घ्यायला आले आहेत.’ तस मी माझे दप्तर घेतले आणि काकांच्या सोबत घरी जायला बाहेर पडलो.
घर जसजसे जवळ आले तसेतसे माणसांची गर्दी दिसू लागली. मला काही समजत नव्हते. माझ्या ओळखीचे आणि आमचे नातेवाईकही दिसले. हे सगळे अचानक का आले आहेत? असा प्रश्न मला पडला. मी थोडा पुढे गेलो, कोणी तरी मोठ मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आला. सगळीकडे रडारड सुरु होती. मला काही कळेनाच नक्की काय झाले आहे? त्या गर्दीतून वाट काढत मी पुढे गेलो.
पुढचे चित्र पाहिले आणि मनाला मोठा धक्का बसला. माझ्या बहिणीच्या कानात असणारा सुगंधी कापसचा तुकडा, आज तिच्या नाकात घातलेला पाहिला. मी माझ्या वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांनी खूप काही गमावल्याचे चित्र होते. आमच्या कुटुंबातील कधीही न भरून निघणारी हानी झाली होती. या गोष्टीला आज अनेक वर्षे लोटली आहेत. परंतु माझ्या बहिण्याच्या आठवणी जशाच्या तशा आठवतात. तिच्या आठवणीने आज देखील डोळे पाणावतात. लहानपणी भावभावनांचा खेळ समजत नव्हता, परंतु आज सर्व समजत आहे. माझी बहीण माझ्या सोबत नाही. हेच माझे दुर्दैव.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Friday, August 16, 2019

दिखावेगिरी कशाला?

दिखावेगिरी कशाला?
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. निसर्गाने पुन्हा एकदा आपल्या रौद्र रूपाचे दर्शन दिले. संपूर्ण मानव जातीच्या अहंकाराला उन्मळून ठेवण्याची ताकद फक्त आणि फक्त निसर्गामध्येच असल्याचे सिद्ध केले. कृष्णा, पंचगंगा, गोदावरी या प्रमुख नद्याबरोबर अनेक छोट्या मोठ्या नद्यांना महापूर आला होता. या महापुरामुळे अनेक गावे पाण्याने वेढली तसेच काही गावे संपूर्ण पाण्याखाली गेली होती.
विविध त्रासाने कंटाळलेला बळीराजा थोडाशा पावसाने सुखावला होता. नवीन आत्मविश्वास उरी बाळगून बळीराजाने शेतामध्ये विविध पिकांची लावण केली होती. परंतु या महापुरामुळे मानवाला शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच व्यावहारिकदृष्ट्या कधीही न भरून निघणारी हानी झाली. पशु, पक्षी व शेतातील पिके त्याचबरोबर अनेकांचे संपूर्ण संस्कार उद्वस्त होऊन गेले.
या भयावह पूर परिस्थितीपासून वाचण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. या मदतीच्या हाताबरोबर त्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारचे छुपे राजकारण, राजकीय, सामाजिक आणि अहंकारी फायदा घेणाऱ्या अनेक मंडळीची डोकीवर निघाली. आपण पूरग्रस्तांना जी मदत करतो, म्हणजे या आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींवर एका प्रकारचे उपकारच करतो आहे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर व्यक्त होताना दिसतो. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अनेकांनी या आपत्तीचा फायदा देखील घेतला आहे आणखी घेत आहेत. ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांना मदत करताना फोटो काढले, सेल्फी काढली व ती प्रिंट मिडिया तसेच फेसबुक, व्हाट्सअप्प, इंस्टाग्राम व इतर ऑनलाईन प्रसिद्धीच्या माध्यमातून अपलोड केली. त्यांच्यासाठी माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट आज आपणापर्यंत पाठवत आहे.
एकदा श्रीकृष्णाने त्याच्या समोरच्या दोन टेकड्याचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला..
हे सगळे सोने गावकऱ्यांना वाटून टाक,
पण अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावकऱ्यांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.
पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.
मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. 
दिवस रात्र काम चालू होते.
अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.
पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.
लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.
आता अर्जून अगदी दमून गेला होता.
पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. 
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!
आता यापुढे मी काम करू शकत नाही. 
मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की,
या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या...
पण अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्याना बोलवले आणि सांगितले,
या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. 
एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.
लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला.
हा विचार आपल्या मनात का आला नाही? तो भयंकर अस्वस्थ झाला. 
कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला...
अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास..!
तू गर्वाने प्रत्येक गावकऱ्याला सोने वाटू लागलास.
जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास..!  
कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.
त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.
आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.
थोडक्यात म्हणजे देणगीच्या बदल्यात, मदत केलेल्याच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, शाबासकी द्यावी, धन्यवाद द्यावेत, अशी अपेक्षा ठेवणे हे कधीच निरपेक्ष दान नसते. अशावेळी तुम्ही जिंकून देखील हरलेले असता.
मग एखाद्याला मदत करत असताना स्वत:ची प्रसिद्धीचे लागलेले व्यसन केव्हा सुटणार आहे कोणास ठाऊक?
हा संदेश सद्य स्थितीस योग्य वाटला म्हणून यावर थोडस लिहाव अस वाटलं. या महापुरात स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवणाऱ्या एका ही भारतीय जवानांनी स्वत:चा सेल्फी काढलेला मी पाहिला नाही. कारण ते निरपेक्ष भावनेने कार्य करत आहे. अशा असंख्य लोकांना ज्यांनी कार्य मानवता, कर्तव्य, सामाजिक बांधिलकी अशा भावनेने केले त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे.
-      मंगेश विठ्ठल कोळी.
-      मो. ९०२८७१३८२०
-      ईमेल – mangeshvkoli@gmail.com
-      (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.