Monday, September 30, 2019

नऊ रंगाच्या साड्या कशासाठी??

नऊ रंगाच्या साड्या कशासाठी??
आज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत.
चार पाच महिलांनी दुरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क केला व एक विचारणा केली की "नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात आणि देवीची व नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडिया द्वारे प्रसारीत होत आहेत. हे सत्य आहे का?"
काही महिलांनी तर नऊ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले - गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते दागीने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते याचेही मेसेज आपणास आले आहेत असे सांगीतले. धर्मशास्त्रात असे काही दिलय का? असे विचारले.
गरबा व दांडिया खेऴ हाच देवीला आवडतो व तो खेऴलात कि "लक्ष्मी प्राप्त" होईल अशाही चर्चा होताहेत. यात सत्यता आहे का? धर्मशास्त्रात हे दिलय का? असा प्रश्न आज मातृवर्ग विचारतोय.  
मुंबई येथील महिलेने सांगीतले कि त्यांच्या ऑफीस मध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या व त्याला अनुसरुन मँचींग बांगड्या कानातले वगैरे अलंकार घालावेत असं ठरतेय.  "मी गरीब आहे. नवरा सतत आजारी असतो. मी एवढा खर्च करु शकत नाही तेव्हा मी काय करु ? देवीचा कोप होईल का माझ्या कुटुंबावर?"  हा प्रश्न ऐकुन मात्र मी हादरलोच व मनाशी ठाम ठरवले की यावर एक लेख द्यावाच.
चार वेद, चार उपवेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे व उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती व दुर्गा उपासनेचे ग्रंथजवऴपास साठ स्मृतिग्रंथ यांत कोठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परीधान करा  अस दिलेले नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परीधान करा. स्वच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम असे दिले आहे. जे तुमच्या जवऴ अलंकार असतील ते घाला. त्यांत मँचींग हवंच अस नाही.
मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरुन हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केलाय व त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बिभत्सपणा आलाय. 
प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. उदा.महाराष्ट्रात "घटस्थापना " ही प्रधान असते . त्याच सोबत अखंड नंदादिप, त्रिकाऴ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी पूजन, कुमारीका पूजन व भोजन व माऴा बांधणे इत्यादी पध्दतीने नवरात्र होते. ललीता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होम हवन, सरस्वती आवाहन पूजन असेही धार्मिक विधी महाराष्ट्र व गोवा प्रांतात असतात.
कर्नाटकात दसरा मोठा असतो.  कच्छ - सौराष्ट्र - गुजराथ प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करुन रात्री जागरण, गरबा तसेच होम हवन वगैरे पध्दतीने हा उत्सव करतात. पश्चिम बंगालमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.
इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात - सरमिसळ करतात व नवीनच पध्दत निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो व त्यात देवीची उपासना हा सर्वात महत्त्वाचा व मुख्य भागच नसतो.
प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट असते - परंपरा असतात, त्या जपल्याच  पाहिजे. अन्यथा काही वर्षांनी आपली मुले व नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा दांडिया खेऴणे एवढाच घेतील. मातृशक्तीचा उत्सव हा त्यांना कऴणारच नाही. माझे आचार, विचार, संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा मला पडणार नाही. नेमकी हिच नस या इव्हेंट व मार्केटिंग कंपन्यांनी जाणली आहे. यात काहीहि झाले तरी लाभ झाला पाहिजे.
एखाद्या गरीब भगिनीला हे "हाय फाय" नवरात्र जमणार नाही. ती देवी पूजन करणार नाही. म्हणजे हऴुहऴु ती नास्तिक होईल. श्रीमंती, धर्मशिक्षणाचा अभाव व मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या "डिजे व गरबा दांडियाला"  नवरात्र समजतील कारण यांनाही नवरात्र म्हणजे देवी उपासना हे माहितीच नाहीय. यांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल.
थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल व याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदू समाजच कारणीभूत आहे.
काही वर्षांपूर्वी "डे "संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा  "गिफ्ट वस्तुंच्या कंपन्या व ग्रिटिंग कार्ड कंपन्या " आपल्या देशात आल्या तेव्हापासून हे "डे "च खूऴ डोक्यात शिरलय. चॉकलेट डे,वेलेंटाईन डे, रोज डे वगैरे. या दिवसांत करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे कि मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगाव लागते पण हे "डे " मात्र ते पक्के लक्षात ठेवतात.
गोकुळाष्टमी ही राजकीय पुढारी मंडळींच्या कृपेने अशीच "डिजे व मद्यमय "झाली आहे. किमान आईचा उत्सव असा होता कामा नये असे वाटतेय.
चंड मुंड, शुंभ निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारुन त्यांचा उत्पात शमन करुन जगदंबेने जी  विश्रांती घेतली त्याचा काऴ हा नवरात्र आहे. या युध्दाचा शिण घालवण्याकरता देवीने नृत्य केले असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युध्द करतच नाही - केवऴ नाचतो) 
या काळात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिन्ही रुपांतील देवीची सेवा करणे. आपल्या परंपरेनुसार नंदादिप, माऴ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडुन सरस्वतीची उपासना ही विद्या व बुध्दि करता करुन घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरता महालक्ष्मी उपासना करावी व शत्रू संहार सामर्थ्यप्राप्ती करता महाकालीची उपासना करावी.
मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिऴवुन उत्तम मार्गाने धन जोडणे व छेडछाड करणार्या बदमाशांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे या करता देवीचे माहात्म्य व पराक्रम वाचावेत तसेच ऐकावेत. आज काऴाची ही गरज आहे. हिरॉईनसारखे नाचण्यापेक्षा महाकाली सारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरच्या चिन्नमा, जिजाबाईं सारखा पराक्रम दाखवण्याची ही वेऴ आहे व आज गरज त्याचीच आहे. नाचणारे खूप झालेत पण पराक्रमी मात्र कमी होताहेत.
.
तेव्हा या मार्केटिंग व इव्हेंट फंड्यांना बऴी न पडता सात्विकपणे आनंदाने आपल्या परिस्थितीनुरुप जगदंबेची सेवा करा व देवीची कृपा प्राप्त करावी हि विनंती.
वरील माहितीत काही चुकीचे असेल तर क्षमस्व!
(वरील पोस्ट मी लिहिलेली नाही, पोस्ट मार्मिक व प्रेरणादायी आहे. म्हणून आपल्याला पाठवत आहे.)
-   मंगेश विठ्ठल कोळी.
-   मो. ९०२८७१३८२०
-   ईमेल mangeshvkoli@gmail.com

(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Sunday, September 29, 2019

स्त्रीत्वाला सलाम...

स्त्रीत्वाला सलाम
तू नऊ दिवस नऊ रंग परिधान केलेस किंवा नाही केलेस तरी आम्ही हे कबूल करतो की तू आहेस म्हणून आमचं रंगहीन आयुष्य रंगीत होतं! 
केवळ शास्त्रात सांगितलंय म्हणून नाही तर त्यानिमित्ताने वर्षभर कपाटात पडून राहणाऱ्या जरीच्या साड्या बाहेर पडून तुला उत्साहाने नेसायला मिळतात हे आम्ही नाकारू शकत नाही! 
दांडिया खेळलीस किंवा नाही खेळलीस तरी आम्ही हे नाकारू शकत नाही की आमच्या आयुष्याचा खेळ केवळ तू आयुष्यात असण्याने सुखकर होतो! 
तू नऊ दिवस उपवास कर किंवा उठता बसता उपवास कर तरी आम्हाला हे माहिती आहे की आमची उपासमार होऊ नये म्हणून तू आयुष्यभर तुझ्या जीवाचं रान करतेस!
तू घट बसव किंवा तुझ्या देवीला फुलांनी सजव पण आमचं आयुष्य मात्र तूच सजवलं आहेस!
तू दिवा लाव किंवा पणती लाव पण या विश्वाच्या निर्मितीपासून तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात प्रकाश आहे!
थोडक्यात काय तर...
तूच धरती आहेस,
तूच आकाश आहेस,
तूच सुरुवात आहेस,
आणि शेवटही तूच आहेस!
तुझ्याच कुशीत जन्माला येऊन तुझ्याच कुशीत विसावून निर्धास्तपणे आयुष्य जगणाऱ्या माझा तुझ्यातील स्त्रीत्वाला सलाम.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Friday, September 27, 2019

घटस्थापना म्हणजे काय?


*घटस्थापना म्हणजे काय?*
एक आधुनिक शेतकऱ्यांची प्रयोगशाळा आहे. काही वर्षांपूर्वी विज्ञान प्रयोग शाळा उपलब्ध नव्हत्या. तरी सुद्धा भारतातील शेतकरी राजा होता. त्याचे हे उत्तम उदाहरण.
आपल्या शेतातील माती आणायची व ती एका मातीच्या भांड्याच्या कडेला ठेवायची. त्या मातीच्या भांड्यात आपल्या शेतात असणारे पाणी भरायचे. जेणेकरून तो ओलावा मातीमध्ये टिकून राहिला पाहिजे. जे बियाणे आपल्याला शेतात रब्बी हंगामात पेरायचे आहे त्या बियाणांचे विविध प्रकार असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारची बी-बियाणे त्या मातीत रूजवायची व नऊ दिवस निरीक्षण केले जायचे. 
या नऊ दिवसामध्ये ज्या बी-बियाण्यांची वाढ उत्तम असेल, ते बियाणे आपल्या शेतात लावण्यासाठी अत्यंत योग्य आहे हे लक्षात यायचे. काही वर्षांपूर्वी उत्तम बी-बियाणे तपासणीसाठी लॅब किंवा अत्याधुनिक प्रयोगशाळा नव्हत्या. मग ही पद्धत आत्यंतिक उपयुक्त आणि प्रभावी होती. याचा संबंध कोणत्याही धर्म व जातींशी नाही तर तो शेतकऱ्यांशी आहे.
खूप वर्षांपूर्वी सुद्धा आपला देश सर्व देशापेक्षा खूप पुढे होता, मग आज का मागे आहे थोडंसं आत्मपरीक्षण करावे लागेल. आपल्याकडील बदललेले निसर्ग चक्र पूर्व पदावर येण्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. आपण ही आपल्याकडून प्रयत्न करायला हवे. एवढीच हा लेख लिहिण्याच्या मागची माफक अपेक्षा आहे.
*- मंगेश विठ्ठल कोळी,* 9028713820

Friday, September 20, 2019

मग थकवा येणारच....


मग थकवा येणारच!
साधारण ४०वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवी वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूटासाठी खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता.
गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की तांब्या-पितळेची भांडी असायची. खाली मांडी घालून जेवायला बसत असत. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. चणे,फुटाणे शेंगदाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही.  कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात?
कपडे हातानंच घासावे लागत, धुवावे लागत. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. माणसं शक्यतो पायी चालत, सायकल वापरत. शाळेचा प्रवास पायी असायचा. सकाळ-संध्याकाळ ग्लासभर दूध प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी असायचेच.
जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स पाहत पाहत ! रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत.
या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही ! आयुष्यं आता इतक गतिमान नव्हत, पुष्कळ संथ होत. पण, त्यामुळं थकवा नव्हता. लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचाहे तत्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळंच, त्यांना आयुष्य जगता आलं.  राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं. आज आपल आयुष्यं नुसत धावपळ करण्यातच जातय..!
लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. हेवेदावे, रूसवेफुगवे होते, पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. दारांना कुलुपं नव्हती. शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच. त्यात प्रेमही होतं आणि रितही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं. धीर वाटायचा.
आज प्रायव्हसीच्या नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, सहकार्य काय असत हे फक्त बोलण्यात येत आहे परंतु प्रत्येक्षात वेगळाच काही तरी दिसत आहे. वागण्यात आणि बोलण्यात तारतम्य दिसत नाही, आयुष्य नैराश्याने ग्रासल्यासारखे झाले आहे. "काही वर्षांपूर्वी माणसं पैसा वापरात होती आणि माणसं जपत होती." परंतु आताच्या धावपळीच्या आणि स्टॅण्डर्ड दिखावेगिरीच्या नादाला बळी पडून, "माणसं पैसा जपत आहेत आणि माणसं वापरात आहेत." जो व्यक्ती वापराचा आहे त्याचा वापर संपला, की त्याची किंमत ठेवत नाहीत.  मग तर थकवा येणारच !
- मंगेश विठ्ठल कोळी. मो.- 9028713820 (My WhatsApp No.)
(वरील पोस्ट मी लिहिलेली नाही, परंतु शेवटच्या काही ओळी मी लिहिलेल्या आहेत. पोस्ट प्रेरणादायी आहे. म्हणून आपल्याला पाठवत आहे.)