Wednesday, April 29, 2020

सुटता सुटेना लोभ दिखावेगिरीचा...

काही महिन्यापासून संपूर्ण जगाला कोरोना विषाणूच्या आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. मानव निर्मित विषाणूमुळे पुन्हा एकदा आपल्या रौद्र रूपाचे दर्शन केले आहे. संपूर्ण मानव जातीच्या अहंकाराला उन्मळून ठेवण्याची ताकद घातक विषाणूमध्येच असल्याचे सिद्ध केले. या विषाणूमुळे अनेक देश व तेथील सामाजिक, आर्थिक व्यवस्था लयास गेली आहे.
विविध त्रासाने कंटाळलेला मानव आता नवीन आजाराला सामोरा जात आहे. प्रत्येक वेळी नवीन आत्मविश्वास उरी बाळगून सकारात्मकतेने जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु या कोरोना विषाणूमुळे मानवाला शारीरिक,  मानसिक,  आर्थिक तसेच व्यावहारिकदृष्ट्या कधीही न भरून निघणारी हानी होत आहे. पशु, पक्षी व शेतातील पिके त्याचबरोबर अनेकांचे संपूर्ण संस्कार उद्वस्त होऊन जात आहेत.
कोरोना विषाणूच्या भयावह परिस्थितीपासून वाचण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. कोणी मास्क वाटप करत आहेत. कोणी सॅनिटायझर वाटप करत आहेत, तर कोणी अन्न धान्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत. या मदतीच्या हाताबरोबर त्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारचे छुपे राजकारण, राजकीय, सामाजिक आणि अहंकारी फायदा घेणाऱ्या अनेक मंडळीची डोकीवर निघ. आपण आपत्ती ग्रस्तांना जी मदत करतो, म्हणजे या आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींवर एका प्रकारचे उपकारच करतो आहे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर व्यक्त होताना दिसतो. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अनेकांनी या आपत्तीचा फायदा देखील घेतला आहे, आणखी घेत आहेत. ज्यांनी ज्यांनी आपत्ती ग्रस्तांना मदत करताना फोटो काढले, सेल्फी काढली व ती प्रिंट मिडिया तसेच फेसबुक, व्हाट्सअप्प, इंस्टाग्राम व इतर ऑनलाईन प्रसिद्धीच्या माध्यमातून अपलोड केली. त्यांच्यासाठी माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट आज आपणापर्यंत पाठवत आहे.
एकदा श्रीकृष्णाने त्याच्या समोरच्या दोन टेकड्याचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला..
हे सगळे सोने गावकऱ्यांना वाटून टाक,
पण अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावकऱ्यांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.
पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.
मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.
दिवस रात्र काम चालू होते.
अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.
पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.
लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.
आता अर्जून अगदी दमून गेला होता.
पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!
आता यापुढे मी काम करू शकत नाही.
मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की,
या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या...
पण अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्याना बोलवले आणि सांगितले,
या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत.
एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.
लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला.
हा विचार आपल्या मनात का आला नाही? तो भयंकर अस्वस्थ झाला.
कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला...
अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास..!
तू गर्वाने प्रत्येक गावकऱ्याला सोने वाटू लागलास.
जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास..! 
कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.
त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.
आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.
थोडक्यात म्हणजे देणगीच्या बदल्यात, मदत केलेल्याच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, शाबासकी द्यावी, धन्यवाद द्यावेत, अशी अपेक्षा ठेवणे हे कधीच निरपेक्ष दान नसते. अशावेळी तुम्ही जिंकून देखील हरलेले असता.
मग एखाद्याला मदत करत असताना स्वत:ची प्रसिद्धीचे लागलेले व्यसन केव्हा सुटणार आहे कोणास ठाऊक?
हा संदेश सद्य स्थितीस योग्य वाटला म्हणून यावर थोडस लिहाव अस वाटलं. या आजारात स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वंसेविका हे खऱ्या अर्थाने ते निरपेक्ष भावनेने व कार्य दक्षतेने काम करत आहे. अशा असंख्य लोकांना ज्यांचे कार्य मानवता, कर्तव्य, सामाजिक बांधिलकी अशा भावनेने करत आहेत त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे.
-      मंगेश विठ्ठल कोळी.
-      मो. ९०२८७१३८२०
-      ईमेल – mangeshvkoli@gmail.com

-      (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Saturday, April 25, 2020

यशाचा मार्ग - मंगेश विठ्ठल कोळी..


यशाचा मार्ग_ मंगेश विठ्ठल कोळी ‌..
‌एक अप्रतिम पुस्तक म्हणजे यशाचा मार्ग होय. मी तर म्हणेन हा नुसता मार्ग नव्हे तर राजमार्ग आहे आणि जे कोणी या पुस्तकाचे वाचन मनन करेल तो निश्र्चितच एक सकारात्मक ऊर्जा घेऊन प्रेरित होईल व ध्येयवेडा झपाटल्याप्रमाणे आपले इच्छित ध्येय साध्य करेल यात शंका नाही.
‌एक तरुण उमदं व्यक्तीमत्व असणारे मंगेश विठ्ठल कोळी सर एक मानसतज्ञ आहेत आणि एक आदर्श मार्गदर्शक सुध्दा आहेत. त्यांनी आपल्या लेखणीतून ७४ प्रकारचे छोटे छोटे सल्ले दिलेले आहेत. जे वाचताना माणूस प्रेरणा घेतल्याविना राहत नाही असं मला वाटतं कारण प्रत्त्येक गोष्टीचे त्यांनी सूक्ष्म अतिसूक्ष्म रितीने विचार मांडलेत आणि अतिशय महत्त्वपूर्ण शब्दांतून समजावण्याचा प्रयत्न ही केलेला आहे.
‌वेळेचे नियोजन कसं असावं, चौकसवृत्ती कशी वृध्दींगत करावी, लोभ कसा टाळावा, सकारात्मक विचार कसे घ्यावेत आणि इतरांच्यासाठी जगताना सुध्दा स्वत: साठी कसं जगावं. याचंही त्यांनी छान शब्दांकन केलेलं आहे. डी-अडचणी तर प्रत्येकालाच असतात पण त्या वरही मात कशी करावी. चारित्र्यवान कसं जगावं ही आणि सूख म्हणजे काय? हे सांगताना सूखाचे सॅशे असं सांगून त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून कसा आनंद मिळवावा हे सांगितले आहे.
"ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुध्दा वाया घालवू नये." आणि "ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालवू नये" असे ते म्हणतात विचारातून प्रगतीकडे या लेखातून पुढे ते असही म्हणतात की, "चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतात."
‌प्रत्येक लेखानंतर त्यांनी एक सुविचार लिहिलेला आहे आणि त्यातूनही त्यांनी उत्तमरित्या समूपदेशनाचेच कार्य केलेले आहे. ते म्हणतात, "कोणी कौतुक करो अथवा टिका लाभ तुमचाच.. कौतुक प्रेरणा देते, तर टिका सुधारण्याची संधी. ‌म्हणजे माणसाने खचून न जाता नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार करावा असं ते म्हणतात. म्हणजे आजकाल जे मानसिकदृष्टया कमजोर पडता आहेत. त्याचे प्रमाण कमी होईल व नवं चैतन्याचा उगम होईल असं ते म्हणतात. ‌चांगल्या वाईटाचे उदाहरण देताना ते राजाचोर असं म्हणतात. माणसाने मन, भावना आणि विचारांवर काबू ठेवावं असं ते म्हणतात.
‌शेवटी जाता जाता सांगावंस वाटतं की, एक आदर्श समंत्रक, एक आदर्श गुरू आणि सच्चा मार्गदर्शक कसा असावा तर या सरांच्यासारखा असावा. कारण त्यांच्या विचारांची उंची एखाद्या उच्च कोटीच्या प्रज्ञावंतालाही लाजवेल अशी आहे. सरांनी व्यक्तीगत मलाही कित्येकदा मार्गदर्शक करुन एक नवी सकारात्मकतेची ऊर्जा दिलीय आणि कवितासागरचे प्रकाशक डॉ. सुनिल दादा पाटील व मुद्रितशोधिका संजिवनी दीदी आणि विचारांचा अभेद्यबाण प्रिन्स यांच्या मार्गदर्शनाला माझा मनापासून सलाम. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन इतकं छान विचारांचे मोती जनमानसांत पसरवत आहात. असेच कार्य वृध्दींगत होवो ही सदिच्छा...
कवयित्री - सौ. मनिषा वराळे, धरणगुत्ती
(कवयित्रींना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.)

Tuesday, April 21, 2020

व्यसन : चांगले-वाईट


गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी एकमेव उपाय म्हणून प्रत्येक देशाचे शासन लॉकडाऊन या पर्यायाचा अवलंब करत आहे. लॉकडाऊनचा विचार करता जिवंत राहण्यासाठी घरी राहणे सुरक्षित आहे. त्याचबरोबर कोरोना हा विषाणू “शाप की वरदान” या संभ्रमावस्थेमध्ये व्यक्ती आहेत. हा आजार झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.
परंतु याची दुसरी बाजू विचारात घेतली तर ती सकारात्मक आहे. लॉकडाऊनमुळे या अगोदरच्या काळात एवढा कालावधी कुटुंबाला देणे प्रत्येकाला शक्य होत नव्हते. अनेक व्यक्तींना स्वत:च्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, तसेच विविध नवनवीन कला गुण शिकण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. या कलागुणांचा भविष्यात सर्वांना नक्कीच फायदा होणार आहे. अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण सहज करू शकतो. उगाचच भीती मनात बाळगत होतो आता अनेक व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढला असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.
अनेक परिवार किंवा व्यक्तीचे संसार व्यसनाधीनतेमुळे उघड्यावर आले होते. शासनाच्या या लॉकडाऊनमुळे बऱ्याच प्रमाणात व्यसनाधीनतेवर सुद्धा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आता सहज व्यसनासाठी उपलब्ध होणाऱ्या गोष्टी मिळत नाहीत. अनेकजण व्यसनातून बाहेर पडल्याचे चित्र समाजामध्ये दिसत आहे. घरामध्ये राहून स्वत:चे कुटुंब, कुटुंबातील व्यक्तींचे महत्व प्रत्येकाला समजत आहे. व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकल्यामुळे चांगल्या गोष्टीपासून दूर लोटलेल्या व्यक्ती आता चांगले गुणकौशल्य आत्मसात करताना दिसत आहेत.
मानसशास्त्रीय अभ्यासक सांगतात की, “कोणतीही व्यसनी व्यक्ती पहिल्याच दिवशी व्यसनी होत नाही.” प्रथम त्या व्यक्ती एखादी गोष्ट करून पाहतात. महिन्यातून एकदा किंवा दोन वेळा व्यसन करतात, त्यानंतर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा करतात. त्यावेळी त्या व्यक्तीने समजावे की, आता आपल्याला त्या गोष्टीची सवय होत चालली आहे. पुढे-पुढे ती गोष्ट प्रत्येक दिवशी केली जाते किंवा दिवसातून वारंवार केली जाते. त्या गोष्टीची असलेली सवयीचे रुपांतर व्यसनात होते. ‘एखादी सवय सोडणे सोपे असते, परंतु व्यसन सोडणे अवघड आहे.’
सलग २१ दिवस केलेली कोणतीही गोष्ट ही प्रथम सवय बनते आणि नंतर त्याचे व्यसन होते. मग ती चांगली किंवा वाईट असेल. भगवान महावीर म्हणतात, *“हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे, परंतु एक व्देष दूर करणे फार कठीण आहे.”* व्यसन चांगल्या गोष्टींचे असेल तर सामान्य व्यक्ती सर्वश्रेष्ठ होते, परंतु व्यसन हे वाईट गोष्टीचे असेल तर सर्वश्रेष्ठ व्यक्तीसुद्धा अति सामन्यातील सामान्य होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: ठरवायचे आहे की, ‘व्यसन करताना चांगल्या गोष्टीचे करायचे की वाईट गोष्टीचे....’
-     मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Friday, April 17, 2020

क्रयशक्ती जपून ठेवा...

काही दिवसापूर्वी सर्वांचे जीवन अगदी धावत्या मशीनप्रमाणे सुरु होते. या मशीन रुपी जगण्याला कोरोना रुपी विषाणूचा भला मोठा अडथळा लागला आहे. मार्च महिन्याच्या शेवटी-शेवटी केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली. राज्य शासनाने सुद्धा त्याला पाठींबा देत सर्वच ठिकाणचे शासकीय, निमशासकीय, तसेच खाजगी (अत्यावश्यक सेवा वगळता) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. जनतेला आवाहन केले गेले जिथे आहात तिथेच रहा. घरीच राहण्याचा आदेश दिला. या आदेशाचे पालन सर्वच स्तरावर करण्यात आले. कोरोना आजारावर एकमेव उपाय ‘विलगीकरण’ म्हणजे एकमेकापासून किमान एक मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
असो, परंतु या संचारबंदी पूर्वीच्या काळात मानवाला सतत व्यस्त राहण्याची एक लावलेली सवय त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढलेली क्रयशक्ती खूप गतिमान झाली होती. अचानक संचारबंदी लागू केल्यामुळे घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस अनेक व्यक्तींनी कुटुंबाबरोबर मनसोक्त वेळ घालवत आनंद लुटत आहेत. परंतु या कालावधीमध्ये नवीन काही तरी शिकण्याची संधी मिळाली आहे हे विसरून चालणार नाही.
धावपळीच्या काळात अनेक गोष्टीवर आपण इतरांच्यावर अवलंबून राहतो. (उदा. बाहेरून घरी आल्यावर अनेकदा पाणी द्या, चहा द्या किंवा इतर अनेक गोष्टी ज्या आपण सहज करू शकतो आशा गोष्टी करत नाही. काही व्यक्ती मग त्या स्त्री असो वा पुरुष घरात असणाऱ्या व्यक्तींना काही काम नसते असे म्हणत असतात.) आता या संचारबंदीच्या काळात अनेक व्यक्तीची क्रयशक्ती प्रचंड प्रमाणात कमी होत आहे. ही क्रयशक्ती जपून ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा ही संचारबंदी उठेल तेव्हा पूर्वीसारखे आपणाला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्थरावर तंदरुस्त असणे आवश्यक आहे.
मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार असे सांगितले जाते की, ‘सलग एकवीस दिवस ज्या क्रिया केल्या जातात, त्याची मानवाच्या शरीराला सवय लागते आणि अशी सवय ही हळूहळू व्यसनात रुपांतरीत होते.’ एखादी सवय सोडणे सोपे आहे, परंतु लागलेले व्यसन सोडणे फार कठीण आहे. भविष्यात आळशीपणा, निवांतशीरपणा, निरूत्साहीपणा, घरी राहणेची सवय किंवा कामात होणारी चालढकल ही मानवाच्या भविष्याला घातक ठरते हे नक्की. यावर एक सुंदर उदाहरण द्यावेसे वाटते.
एकदा संपूर्ण जगामध्ये वाढलेल्या दृष्टचक्राला कंटाळेलेले वरूणराजा (पाऊस) सर्वांना शाप देतात की, ‘पुढील एक तप (बारा वर्षे) पाऊस पडणार नाही.’ त्यांची ही आकाशवाणी सर्वजण ऐकून खूप निराश होतात. नैराश्याचे प्रमाण वाढते. अनेक शेतकरी शेतात जाण्याचे सोडून देतात. पाऊस पडणार नसेल तर शेतात जाऊन तरी काय उपयोग? असा प्रश्न अनेकांच्या समोर उभा असतो.
एक शेतकरी कंटाळून जंगलात आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जातो. जंगलात खूप आतमध्ये गेल्यावर त्याला पहावयास मिळते की, एक मोर त्याच्या लहान पिलांना नृत्य शिकवत असतो. हे नृत्य शिकवत असल्याचे तो शेतकरी पाहतो.
मोर त्याच्या पिल्लांना नृत्य शिकवत असताना त्यातील एक पिल्लू मोराला प्रश्न विचारते, ‘जर पाऊसच पडणार नसेल तर आम्ही हे नृत्य शिकून काय उपयोग?’
त्यावर तो मोर त्याला म्हणातो, “एक लक्षात ठेव वरुणराजाने सांगितले आहे. एक तपानंतर म्हणजे बारा वर्षांनी पाऊस पडणार आहे. कायमचाच पडणार नाही असे नाही.’ तुम्ही जर आता नृत्य करण्याची सवय ठेवली नाही, तर कदाचित तुम्ही ते कायमस्वरूपी विसरून जाल आणि बारा वर्षानंतर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तुम्हाला नृत्य करता येणार नाही. म्हणून नियमितपणे नृत्याचा सराव करणे आवश्यक आहे.”
मोर आणि त्याच्या पिलाचे संभाषण शेतकरी ऐकतो. त्या शेतकऱ्यामध्ये आशावादी किरण निर्माण होतो. आत्महत्या करण्याचा विचार सोडून तो लगबगीने घरी परत येतो. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सोबत घेतो. शेतीतील साहित्य सोबतीला घेऊन शेतात पूर्ण कष्टाने काम करण्यास सुरुवात करतो. काम सुरु करताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्ती त्याला तोच प्रश्न विचारतात जो मोराच्या पिलाने मोराला विचारलेला होता.
‘पुढील बारा वर्ष पाऊस पडणार नाही तर शेतात काम करून काय उपयोग?’
तेव्हा तो शेतकरी मोर आणि त्याचे पिलू यांच्यातील संवाद सांगतो. त्याचे कुटुंबीयसुद्धा सकारात्मक ऊर्जेने काम करण्यास सुरुवात करतात. शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे कष्ट पाहून वरुणराजाचे मन भरून येते आणि पाऊस पडतो. त्यापुढे सर्व गोष्टी हळूहळू पहिल्यासारख्या होण्यास सुरुवात होते.
नेहमी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्या जवळ काय आहे किंवा नाही? यापेक्षा आपल्या जवळ असणारी क्रयशक्ती शाबूत/सुरक्षित ठेवली पाहिजे. उत्तम भविष्य घडविण्यासाठी स्वत:मध्ये क्रयशक्ती असणे फार महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा.
-     मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com

(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅपफेसबुकट्विटरब्लॉगटेलिग्रामइन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Sunday, April 12, 2020

मी जिंकणारच...

आपण जिंकणारच आहोत. आपण कोल्हापूरी आहोत, आपण नेहमीच लढलो आहोत आणि विपरीत परिस्थितीवर मात करत आलेले आहोत, आपण नेहमीच जात-पात-धर्म या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत केलेली आहे. आपण चांगल्या गोष्टींना नेहमीच डोक्यावर घेतलेले आहे..! गेल्या वर्षी आलेल्या महापूर संकटामधून सावरत असतानाच हे आणखी एक संकट आले आहे. पण घाबरायचं नाही.. लढायचं आहे. 
सध्याच्या परिस्थितीत अनेक लोक, अनेक प्रकारे भडक भाषा वापरून आपल्याला भीती घालतील, सध्या सर्वत्र एक गोष्ट नको तितकी आणि वारंवार दाखवली जाते आहे ती म्हणजे, कोरोना नंतर येणारी संभाव्य आर्थिक मंदी..! ही भीती वरवर पाहता खरी वाटत असली तरी काही गोष्टी निश्चित पणे विचारात घ्याव्या लागतील. मी कुणी अर्थतज्ज्ञ नव्हे तर एक सामान्य कोल्हापूरकर आहे. आणि मला नेहमीच सकारात्मक विचार करायला आवडतं.
याबतीत मला जे वाटतं ते मी इथे सांगणार आहे, अनेकांना ते कदाचित पटणार नाही. पण याबाबतीत कुणी वाद घालू नयेत, कारण ही वेळ वाद घालण्याची नव्हे तर आपण या विपरीत परिस्थितवर कशी मात करायची आहे याबाबत उपाय करण्याची आहे. 
भारत एक शेतीप्रधान देश आहे, म्हणजे आपली अर्थव्यवस्था सुरुवातीपासूनच बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून आहे. कोरोना संकट गेल्यावर शेतीवर याचा विपरीत असा परिणाम होणार नाही. शेती मधून १२ महिने पिकं घेतली जातात आणि त्याचे सुयोग्य व्यवस्थापन केले जाते शेतीचे एक अर्थचक्र आहे जे नेहमीच फिरत असते. हा पॅराग्राफ लिहिताना, आताच टीव्ही वर बातमी पाहिली की शेतकरी आणि शेतमजूर यांना लोकडाऊन मधून वगळण्यात आलेले आहे (ABP न्यूज मराठी) त्यामुळे शेतीमधून जे अर्थकारण फिरते आहे त्यावर नकारात्मक परिणाम नक्कीच होणार नाही. 
सरकारी-निम सरकारी कर्मचारी यांच्यावर देखील या संकटाचा विपरीत परिणाम होणार नाही. हो, अवेळी पगार हा एक तात्पुरता परिणाम जाणवू शकेल. राहिला प्रश्न खाजगी नोकरी, छोटे-मोठे उद्योग करणारे लोक, कारखानदार, हॉटेल्स, पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक इत्यादी. 
यामध्ये रिझर्व्ह बँकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बँकांनी आपल्या कर्जदारांना तीन मासिक हप्ते जूनपासून भरण्याची मूभा दिलेली आहे. म्हणजे इकडे देखील एक सपोर्ट मिळाला. परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर कदाचित हा सपोर्ट वाढवला जाण्याची विनंती केली जाऊ शकते. छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यांना पॅकेज देण्याची आग्रही मागणी होऊ लागलेली आहे. आणि ही मागणी मान्य झाली तर तिकडे देखील एक सपोर्ट मिळेल. उद्योजकांना मोठी झळ न बसता त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेक लोकांच्या नोकऱ्या वाचतील. 
पर्यटन व्यवसायावर याचा दूरगामी परिणाम होऊ शकेल पण भारतात जर लवकर परिस्थिती आटोक्यात आली तर देशांतर्गत पर्यटन वाढू शकेल, आणि त्याचा परिणाम हा नक्कीच चांगला असेल कारण आपला पैसा आपल्याच देशात असेल. 
यापुढे भारत हा अनेक बाबतीत एक प्रमुख निर्यातदार देश म्हणून उदयास येईल. आताच आपण हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेसह प्रगत देशांना निर्यात केले. 
नुकतेच अनेक आंतरराष्ट्रीय मोठ्या कंपन्या चीन सोडून भारतात येण्याचे संकेत देत आहेत..!
शिवाय आपण आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे आत्ता आज देखील एकमेकांना शक्य तितकी मदत करत आहोतच जे इतर देशांत अपवादाने पहायला मिळते. हा आपला सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे.
अनेक सेलिब्रिटीच नव्हे तर अनेक सामाजिक संस्था, सामान्य लोक या संकट काळात प्रचंड मदत करतायत. आपण सर्वांनी केलेली थोडीफार आणि यथाशक्ती बचत ही आज कामाला येते आहे. पाश्चात्य देशात आणि आपल्यात हा देखील एक मोठा फरक आहे. तिकडे लोक पैसे साठवून ठेवत नाहीत. एकमेकांना मदत करणे / शेजार धर्म हे अपवादात्मक आहे. त्यांची खाण्या-पिण्याची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. प्रतिकारशक्ती आपल्यापेक्षा खूपच कमी आहे म्हणून इतके नकारात्मक परिणाम तिकडे दिसतायत.
आपली प्रतिकारशक्ती, आपली माणुसकी, शेतीप्रधान अर्थव्यवस्था, मदत करण्याची प्रवृत्ती, लोकशाही, खाण्या-पिण्याच्या सवयी, बचतीची सवय या सगळ्या गोष्टी आपल्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका. लढण्याची तयारी ठेवावी, नकारात्मक लेख, बातम्या याकडे फारसे गांभीर्याने पाहू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. अशी लै वादळं आल्यात आणि गेल्यात, भ्याचं न्हाई, आपण जिंकणारच..! 
आपला फोकस हा नेहमी सोल्युशन्स कडे असावा, प्रॉब्लेमकडे नव्हे..! आपण नेमकं उलट करतो आणि आयुष्यात दुःखी होतो..! 
आणि सर्वात महत्वाचे.. या काळात प्रशासन, पोलिस दल, डॉक्टर्स, आरोग्य सेवक, महानगरपालिका कर्मचारी, प्रशासक आणि आपल्यासाठी जीवाची बाजी लावून जे जे लोक  लढतायत त्यांना १००% सहकार्य करणे हाच आपला आजचा माणुसकीचा धर्म आहे. जर हे केलेत तर आपण लवकरच या मधून बाहेर येऊन आपलं रुटीन सुरू करू शकू..! 
तेव्हा पुन्हा सांगतो, कोरोना नंतर येणाऱ्या आर्थिक मंदीचा बाऊ करून त्याकडे लक्ष वेधलं जातंय आपलं, फेकून द्या ते निगेटिव्ह विचार, लढायचं पण जिंकण्यासाठीच..! प्रत्येकाने ठरवा.. 'मी जिंकणारच
(हा लेख माझा नाही, लेखातून सकारात्मक ऊर्जा मिळेल असे वाटते म्हणून सर्वांना पाठवत आहे.)
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-   मो. ९०२८७१३८२०
-   ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Saturday, April 4, 2020

या कोरोनाला हरवू...



लहानपणी एक वाक्य ऐकायला मिळाले. ते जसेच्या तसे आज ही माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जसेच्या तसे कोरलेले आहे, ते म्हणजे माणसाची प्रगती कोण रोखू शकते? त्याचे उत्तर होते ‘माणूसचं.’ आज देखील तशीच स्थिती आपल्या समाजात घडताना दिसते आहे. संपूर्ण जगाला कोरोना या विषाणूने कवटाळले आहे. दिवसेंदिवस हा विषाणू मोठ्या प्रमाणात फोफावताना दिसत आहे. हा विषाणू कोणाची जात, धर्म, पंत, वंश, गरीब, श्रीमंत अथवा कोणत्या देशाचा व्यक्ती आहे हे पाहून वार करत नाही. परंतु या विषाणूला कशा प्रकारे रोखू शकतो. त्यासाठी संपूर्ण जगभरातील विविध शास्त्रज्ञ अभ्यास करून उपाययोजना शोधण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.
आपल्या देशात देखील कोरोना विषाणूचा काही दिवसात मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत हा प्रसार फारच कमी आहे. परंतु आपल्या देशात आणखी मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूपासून बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू नये. यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत. त्याला जनतेने सहकार्य करणे आवश्यक आहे. शासन स्तरावर ज्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यापाठीमागे अनेक शास्त्रीय कारणे असतात. अनेक तज्ज्ञ व्यक्ती त्यावर काम करत आहेत. त्या व्यक्ती कोणी बाहेरच्या नाहीत आपल्याच देशातील आहेत. कदाचित आपल्या घरातील, परिसरातील, गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील आहेत हे विसरू नका. त्याचा अभिमान बाळगायला हवा.
काही प्रमाणात लॉकडाऊन केल्याचा फायदा पुढील उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
जंगलात जेव्हा वणवा पेटतो. तेव्हा सगळे प्राणी सैरावैरा पळायला लागतात. सगळीकडे नुसती पळापळ चालू असते. त्यामध्ये वाघ, सिंह, चित्ता, माकड इत्यादी चपळ प्राणी वाऱ्याच्या वेगाने पळत सुटतात. परंतु वणवा मात्र कुणालाच सोडत नाही, संपूर्ण जंगल भस्मसात करून सोडतो. सर्व प्राणी जळून खाक होतात. पण तुम्हाला माहीत आहे काय? त्याच जंगलात असा पण एक प्राणी आहे. ज्याला वव्याचा अजिबात फरक पडत नाही. त्याला थोडी देखील जा पोहचत नाही. डोकं चक्रावले ना.. तर होय, त्याच जंगलात असा पण एक प्राणी आहे. ज्याला जंगलातील वव्याचा काहीही फरक पडत नाही. तो प्राणी म्हणजे उंदीर होय. कारण जेव्हा वणवा पेटतो, तेव्हा तो त्याच्या घरात म्हणजे बिळात असतो. म्हणून त्याला जरा वणव्याची जा पोहचत नाही.
कोरोना रुपी वणवा सध्या आपल्या मानवी जंगलात पेटला आहे. आपल्याला वाघ, सिंह, चित्ता होऊन काही फायदा नाही. त्यापेक्षा उंदीर व्हा आणि आपल्या (बिळात) घरात रहा. स्वतःला आणि आपल्या परिवाराला, समाजाला, देशाला सुरक्षित ठेवण्यास सहकार्य करा.
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध आव्हाने केली आहेत. त्यांच्या या आव्हानाला अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. आरे एवढा पण मुख्यमंत्री यांचा द्वेष करू नका. मुख्यमंत्री काय राज्याचे दुश्मन नाहीत.
जागतिक आरोग्य संघटना आहे. तिच्या प्रवक्त्याने प्रेस काँफरेन्समध्ये सांगितले आहे. भारताचे कोरोना विरोधात प्रयत्न चांगलेच नाहीत तर तुलनेने सर्वात उत्तम आहेत.
अनेकांनी 'मुख्यमंत्री म्हणजे समस्या', हेच चित्र रंगवले आहे. पण आज कोरोनाला 'मुख्यमंत्री' उत्तर आहे. मुख्यमंत्री काय आहे, हे सर्वांना दिसतं आहे. मुख्यमंत्री द्वेषाने प्रश्न सुटणार नाही.
राज्य शासन विविध उपाययोजना करून कोरोना विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी "ब्रेक द चेन" ही घोषणा देत राज्य शासनाने शक्य तेवढ्या व्यक्तींना घरी थांबून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात जंगल पेटले. खूप मोठे संकट त्या देशावर आले. त्यांनी काय केले माहितीये काय? सगळे लोक एकत्र येत देवाला सामूहिक प्रार्थना केली. कडक उन्हाळ्यात पाऊस पडला व आग विझली. हा प्रयोग होता. पण केलाच ना प्रयोग आणि तो यशस्वी झाला. 
आपण सर्वांनी शासनाला सहकार्य करावे त्याच बरोबर "माझे कुटुंब, माझी जबाबदारी", "माझे मास्क, माझी जबाबदारी", "मास्क नाही, प्रवेश नाही" अशा प्रकारच्या घोषणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.  कोरोना विषाणूपासून वाचूया, आनंदाने जीवन जगूया....
(लेखातील काही वाक्यांसाठी संदर्भ इंटरनेटचा घेतला आहे.)
-     मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.