Sunday, May 31, 2020

'कृष्ण' समजून घेताना...

*कृष्ण*,
नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव,
प्रत्येक शब्द हा जोडाक्षर,
जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण,
पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा,
जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा,
दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण,
सातवा अवतार प्रभू राम,
*राम* ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ, मर्यादेत,
म्हणून *मर्यादा पुरुषोत्तम*,
रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही,
तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले, त्याच्यावर टीका केली,
मग पुढच्या अवतारात प्रभू ने सर्व मर्यादा ओलांडल्या,
करा काय करायचं ते,
जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा,
कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये,
कृष्ण म्हणजे *श्रीमदभगवद्गीता*,
जीवनाचं सार,
प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला,
जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं,
गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला,
म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती, कृष्ण 8 वर्षाचा होऊ पर्यंत,
जे राधा आणि कृष्णविषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा 8 वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी,
ईतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचं नांव कृष्णाशी कायमचं जोडलं गेलं,
किंबहुना तीचं प्रेम इतकं नितळ, निस्सीम, निर्मळ होतं की तिचं नांव कायमचं कृष्णाच्या आधी लागलं,
कृष्ण-राधे कोई ना केहता, केहते राधे-शाम,
जनम जनम के फेर मिटाता एक राधा का नाम,
असं हे राधा आणि कृष्णाचं प्रेम,
किंबहुना प्रेमाचं दुसरं नांव म्हणजेच राधा व कृष्ण,
कृष्णाला 16 हजार 108 बायका,
त्याचा ही इतिहास,
ज्यांना त्याने मुक्त केलं त्या म्हणू लागल्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्याचा स्वीकार केला,
अन नुसता स्वीकारच नाही केला त्या प्रत्येकी सोबत त्याच्या सुख दुःखात सहभागी होता,
आज काही महाभाग म्हणतात कृष्णाने इतक्या बायका केल्या तर आम्हाला काय हरकत आहे,
अरे त्याने आग लागलेली 50 गावे गिळून टाकली होती,
तू जळता एखादा कोळसा गिळून दाखव की आधी मग कृष्णाची बरोबरी कर,
मी आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही समजण्यात खरी मजा,
त्या साठी गीता समजून घेणं महत्वाचं,
गीतेमध्ये काय नाही?
तर गीतेत सर्व आहे,
जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळेल,
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जीवन शास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं,
यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजतं,
अर्जुन या भूतलावर असा एकमेव मानव झाला जो या नाशवंत देहासह स्वर्गात 5 वर्षे राहिला व शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं,
या देशासह स्वर्गात जाता येत नाही पण अर्जुन एकमेव जो 5 वर्षे तिथे राहिला,
म्हणजे अर्जुनाची योग्यता काय आहे ते समजतं,
त्या अर्जुनाच्या डोळ्यांवर आलेलं मोह,माया याचं पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली,
गीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे हे आधी कृष्णाने आधीचे 9 अध्याय पाहिलं,
त्याची तयारी करून घेतली,
मग पुढे खरा गूढार्थ सांगितला,
विश्वरूप दाखवतांना सुद्धा त्याला
आधी दिव्य दृष्टी दिली,
त्याची तयारी करून घेतली,
मग त्याला दाखवलं की सर्व काही करणारा मीच आहे,
तू फक्त निमित्तमात्र आहेस,
असा हा कृष्ण,
त्याच्या विषयी किती सांगावं अन किती नको,
तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो, जास्त आवडतो,
त्याला जितकं समजून घेऊ तितकं कमीच,
त्याच तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार,
ते समजून घेतलं की जीवन समजलं,
जीवन सफल झालं,
मनुष्य जीवनमुक्त झाला,
अशा या कृष्णाला वंदन,
*श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,*
*हे नाथ नारायण वासुदेव,*
*प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,*
*मुकुंद विष्णू भगवन नमस्ते*!!!

श्री कृष्णाला *समजून* घेण्यासाठी आपणाला श्री कृष्ण परमात्मा बुद्धी प्रदान करो हीच प्रार्थना.

(वरील लेख मी लिहिलेला नाही, वाचनास उत्तम आहे म्हणून पाठवत आहे.)

Wednesday, May 27, 2020

*Withdrawal होता आलं पाहिजे.*

आजच्या या तणावाच्या काळात सुद्धा अनेकजण मुक्तपणे जगण्याचा आनंद घेत आहेत. असे जगणे पाहून अनेक संकुचित बुद्धी असणारे लोक त्यांच्या अल्प विचार सारणीने नावे ठेवण्याचे काम करतात. हे देखील पाहायला मिळते. खरं तर माणसाने कोणत्याही परिस्थितीत मनासारखे जगणे हेच तर खरे जीवन आहे.

सहज, 'मित्रांशी बोलतांना निघालेल वाक्य' परंतु नंतर जेव्हा त्यावर विचार केला कायं खोट आहे?
जीवनासाठी ज्यांना हे करता येतं ते किती आनंदी जीवन जगतात, ज्यांना करता येत नाही ते गुंत्यात अडकुन गुंता वाढवून जगणं दुःखद करून घेतात.

साधं उदाहरण घ्या ना 'मुलाच लग्न झाल्यावर सुन घरात येते 'तरी आपण हयातीत उभ्या केलेल्या संसारातुन थोडं सैल होत नाही. हिंदी सिनेमात दाखवतात ना, सासूबाई आपल्या पदराला असलेली चावी सुनेला देत ,"बेटी अब तुम्हे संभालना है" असं हसत म्हणते मेलोड्रामाटीक असलं तरी जमलं पाहिजे.
*withdrawal होता आल पाहिजे.*

लग्न झाल्यावर मुलगी सासरी येते, ती कधिही माहेरच्यांना विसरू शकत नाही. नेहमीच तिचं मन आठवणीत रमलेलं असतं. पण त्यासोबतच माहेरची अस्मिता आणि सासरची जबाबदारी पेलवावी लागते.
कमी जास्त होणारच म्हणून प्रत्येक गोष्ट माहेरी सांगून संतूलन बिघडवायचं नसतं, तर माहेरी जे मिळालं ते इथे मिळेलच असे नाही, म्हणून तुलना करून दुःखी व्हायच नसतं.
 *तर थोडं-थोडं withdrawal व्हायचं असतं.*  

नोकरीत असणारे आपल्या कर्तव्यालाच प्रमाण मानून अतिमहत्वकांक्षेपोटी छोट्या- छोट्या आनंदाला मुकतात.   
सेवानिवृत्ती तर अटळ आहे, पण मन मात्र निवृत्ती स्वीकारत नाही.       

अधिकार गाजविण्याची वृत्ती निवृत्तीनंतरही कायम राहते इथेच माणूस फसतो. *Accept, Adjust आणि Avoid* जमतंच नाही, मन:स्थिती बिघडून शरीर आजाराच माहेरघर बनायला सुरवात होते, त्यासाठी *withdrawal होता आल पाहिजे.*

बऱ्याचदा आपल्याला खूप संधी मिळतात आपण स्वतःचा असा ग्रह करुन घेतो की माझ्याशिवाय दुसरं हे करू शकत नाही.

अशीपण वेळ येते जेव्हा ती संधी दुसऱ्याला मिळते व आपण जळफडाट करतो. पण आपण आपलं योगदान विसरून जातो, आपण केलेली कामगिरी विसरून स्वतःला केवळ त्रास करून घेतो, आज आपण आहोत उद्या कोणीतरी असेल, बघुन स्वीकार करता आलं पाहिजे. *withdrawal होता आलं पाहिजे.*

कधी-कधी असेही असते आपण पात्रं असूनही बऱ्याच गोष्टी आपल्या वाट्याला येत नाही. याचा अर्थ असा नाही की, आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायचा, ज्याला ते मिळाले त्याचं कौतूक करता आलं पाहिजे. *withdrawal होता आलं पाहिजे.*
त्याची रेषा लहान करायची नसते, तर आपली रेषा मोठी करायची असते.
*Withdrawal होणं म्हणजे निवृत्त होणे नव्हे, अलिप्त होणं ही नव्हे तर थोडं स्वतःला move करणं व जिवनाचा आनंद घेणं होय.*

"गुंत्यात पडून आयुष्य रंगहीन करण्यापेक्षा, गुंता सोडवून उमेदीन जगता येणं फार कठीण नाही."
एखाद्या प्रसंगी आपल्याला कितीही बोलावसं वाटलं, राग व्यक्त करावासा वाटला तरी शांत राहायला जमलं पाहिजे, प्रत्येक वेळी बोलणचं महत्वाच नसतं तर *Neutral पणं राहता आलं पाहिजे.*
 *त्यासाठी थोडं थोडं withdrawal होता आलं पाहिजे.*

आयुष्याचं प्रत्येक वळण खूप सुंदर आहे. त्या प्रत्येक वळणावर थोडं थांबता आलं पाहिजे, वयाचा प्रत्येक टप्पा भरभरून जगता आला पाहिजे तरच आपण आनंदी राहू.

"आपलं व्यक्तिमत्त्व घडवणं आपल्याच हातात असतं." जगावे  असं की तुम्हाला बघून इतरांना तुमच्यासारखं जगावं वाटेल. तुमचं नाव निघताच तुम्हाला भेटायची, तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा होईल. तुम्हाला कुणाला सोडून जायची इच्छा होणार नाही.
आणि हो गेला तरी दुःख करत बसायचं नाही, काही नात्यांचं आयुष्यही तेवढचं असतं. जे आपल्या जवळ आहे त्यात आनंद माना, जे सोडून गेलं ते आपलं नव्हतं म्हणून त्यावर जास्त विचार करू नका.

*पण त्यासाठी थोडं थोडं withdrawal होता आलं पाहिजे*

घरी रहा, सुरक्षित रहा, स्वतः आनंदी रहा, इतरांनाही आनंदी ठेवा.

-     मंगेश विठ्ठल कोळी.
-     मो. ९०२८७१३८२०
-     ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Wednesday, May 20, 2020

मी थँक्यू म्हणतो अन तुम्ही....



आज जगामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे थँक्यू. माणूस खूप व्यस्त आणि मोठ्या प्रमाणावर सेल्फिश झाला आहे. मला काही तरी मिळालेच पाहिजे या स्वार्थी आशेनेच इतरांना मदत करतो. स्वत:ची आवड, छंद विसरून फक्त तणावाचे जीवन जगत आहे. स्वत: आत्मपरीक्षण करून पहा, दिवसभरात मदत करणाऱ्या किती व्यक्तींना थँक्यू म्हणतो. लक्षात येईल की, काही बोटावर मोजण्या व्यक्तींनाच वरच्या मनाने किंवा मनाविरुद्ध थँक्यू म्हणण्याचे प्रमाण वाढत आहे.
परक्या व्यक्तींनी मदत केली तर लगेच थँक्यू म्हटले जाते. घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा दिवसभर काम करतो त्याठिकाणी थँक्यू म्हणत नाही. थँक्यू योग्य वेळी म्हटले पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो, नाहीतर न म्हणालेले बरे. असे म्हणतात की, “उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायासारखा असतो.” त्याचप्रमाणे “उशिरा म्हणालेले थँक्यू सुद्धा न म्हणाल्यासारखे असते.” परिवारामध्ये थँक्यू शब्दासाठी अनेकांचे मने आसुसलेली असतात. तरीसुद्धा त्यांना आपण थँक्यू म्हणत नाही.
जीवन शांतपणे जगण्यासाठी दोनच गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे, ‘माफ करा त्यांना ज्यांना आपण कधी विसरू शकत नाही.’ दुसरे म्हणजे, ‘विसरून जावा त्यांना ज्यांना आपण माफ करू शकत नाही.’
येथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आहे. ही गोष्ट आहे एका व्यक्तीची. जो व्यक्ती ऑफिसमध्ये काम करत असतो. काम खूप असल्याने नेहमी ताणतणावात जीवन जगत असतो. घरी आल्यावर सर्व राग घरातील व्यक्तींवर, मुलावर व बायकोवर काढत असतो, त्यांच्याशी भांडत असतो. त्यामुळे घरातील व्यक्तींना कळत नव्हते की, ह्यांना नक्की काय झाले आहे.
दिवसभर त्याला वाटत होते की, आपण ‘जिवंत असो किंवा नसो’ काही फरक पडत नाही. पै-पाहुण्यांचे फोन येत होते. त्यांच्याशी तो व्यवस्थित बोलत नव्हता. ऑफिसमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. हीच गोष्ट त्याला सारखीसारखी तणाव निर्माण करत होती. या गोष्टींचा परिमाण म्हणून त्याला असे वाटू लागते की, ‘आपण कशासाठी जगतो आहोत, हेच त्याला कळत नव्हते.’
तो व्यक्ती खूप नकारात्मक विचार करत होता, तो स्वत: ला नेहमी कोसत होता, घरातील सर्व खर्च मला बघावा लागतो, काढलेले लोनचे हप्ते मलाच भरावे लागतात, इतर सर्व कामे मलाच करावे लागतात. मग ती ऑफिसमधील असो वा घरातील असो. त्यामुळे त्याच्यामध्ये एक नकारात्मक विचारातून न्यूनगंड निर्माण झाला होता.
आजच्या जीवन पद्धतीने तो कंटाळला होता. एकदा त्याचा मुलगा त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, ‘पापा होमवर्क करण्यासाठी मदत करा.’ त्यावेळी त्याने दिवसभरातील राग त्या मुलावर काढला आणि त्याला स्वत:पासून पळवून लावले.
पुढे तो मुलाला म्हणाला, ‘मी काय तुझा होमवर्क करण्यासाठी बसलो नाही, मला खूप कामे आहेत.’
मुलगा शांतपणे निघून स्वत:च्या रूममध्ये जातो. थोड्या वेळानंतर त्या व्यक्तीचा राग शांत झाला. तो मुलाच्या रूममध्ये गेला आणि मुलगा नक्की काय म्हणत आहे. हे तरी पाहूया असे त्याला वाटले. मुलाच्या रूममध्ये गेला. पाहिले तर मुलगा झोपला होता. होमवर्कची वही मुलाच्या अंगावर तशीच पडली होती. मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून अंगावरची वही काढून बाजूला ठेवू लागतो.
वही बाजूला ठेवता ठेवता त्याला वाटते. मुलाने नक्की काय लिहिले आहे ते तरी पाहूया. कोणत्या गोष्टीमध्ये मुलाला माझी मदत हवी होती. त्या वहीच्या पानाच्या सुरुवातीला लिहिले होते.
“ज्या गोष्टी आपणाला सुरुवातीला चांगल्या वाटत नाहीत, परंतु नंतर त्या चांगल्या वाटतात.” त्यावर त्या मुलाला निबंध लिहायचा होता. मुलाने काही ओळी लिहिल्या होत्या. तो व्यक्ती त्या ओळी वाचू लागला.
मुलाने लिहिले होते...
मी थँक्यू म्हणतो, “त्या फायनल परीक्षेला जी सुरुवातीला चांगली वाटत नाही, खूप अभ्यास करावा लागतो परंतु त्यानंतर सुट्ट्या पडतात, खूप खेळता येते.”
मी थँक्यू म्हणतो, “त्या कडू गोळ्यांना ज्या चवीला चांगल्या लागत नाहीत, परंतु नंतर आपण आजारातून बाहेर पडतो.”
मी थँक्यू म्हणतो, “त्या अलार्मच्या घड्याळाला जे आपल्याला सकाळी सकाळी उठवते. त्यानंतर आपल्याला कळते की, आपण जिवंत आहोत.
मी थँक्यू म्हणतो, “त्या देवाला ज्यांनी मला एवढे चांगले वडील दिलेत. जे सुरुवातीला चांगले वाटत नाहीत, माझ्यावर खूप रागावतात. परंतु नंतर मला बाहेर घेऊन जातात, फिरवतात, चॉकलेट आईसक्रिम, वेगेवेगळ्या खेळणी घेऊन देतात.”
पुढे जाऊन त्या मुलाने एक ओळ लिहिली होती.
मी थँक्यू म्हणतो, “त्या देवाला त्यांनी मला वडील दिले. कारण माझ्या एका मित्राला वडीलच नाहीत.”
वरील शेवटच्या ओळीने त्या व्यक्तीला हलवून सोडले. संपूर्ण शरीराला, मनाला सकारात्मक ऊर्जा निर्माण मिळाली. सर्व नकारात्मक विचार एकाच झटक्यात बाजूला गेल्याची भावना निर्माण झाली. तो व्यक्ती झोपेतून उठला, जीवनाचा खरा अर्थ समजला. तो स्वत:शीच बोलायला लागला. त्या मुलाने लिहिलेल्या गोष्टी बडबडू लागला.
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ घर आहे, काहींच्या जवळ घर सुद्धा नाही.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ बायको, चांगला मुलगा आहे, चांगले कुटुंब आहे. काहींच्या जवळ कुटुंबसुद्धा नाही.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ ऑफिस आहे, काम आहे, कामाचा ताण आहे. काहींच्या जवळ काम देखील नाही.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ अनेक गोष्टी आहेत, काहींच्या जवळ त्या देखील नाहीत.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “तुम्ही मला चांगले जीवन दिले आहे. पै-पाहुणे दिले, मित्र दिले. काहींच्या जवळ ते सुद्धा नसतात.”
त्या व्यक्तीला त्याच्या जीवनाचा खरा अर्थ लक्षात आला.
वरील गोष्टीवरून एक लक्षात येते की, या कोरोना आजाराने अनेक गोष्टी, अनेक दिवस आपण करत नव्हतो, त्या करण्यासाठी वेळ मिळाला आहे. आपल्यातील अनेक नकारात्मक विचार बदलून सकारात्मक विचार जोपासले पाहिजेत. ज्या गोष्टीविषयी जीवनात भीती, नकारात्मक भाव, न्यूनगंड होता तो बदलण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. आपल्यातील अनेक व्यक्ती परिवाराला वेळ देऊ शकत नव्हते, त्यांनी तो द्यावा. आपल्यातील शारीरिकदृष्ट्या असणारा कमकुवतपणा दूर करू शकतो. तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी या मिळालेल्या संधी बदल सर्वांनी एकमेकांना थँक्यू म्हणायला पाहिजे.
याही अडचणीच्या काळामध्ये जीवनाने आपल्याला जे दिले आहे, त्यात समाधान मानले पाहिजे. जे नाही त्याच्या पाठीमागे न धावता, जे आहे त्यात आनंद मानला पाहिजे. आनंदाने जे मिळाले आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. आपले जीवन मोठे केले पाहिजे. येथे प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांचे गाजलेले एक वाक्य लिहावेसे वाटते. “जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नाही...”
- श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
- ईमेल – mangeshvkoli@gmail.com
-      (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

Thursday, May 7, 2020

'मराठी' पाऊल पडावे पुढे...


सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य, देश तसेच जागतिक पातळीवर सर्वच देशांची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. अनेक ठिकाणी उसमारीची वेळ उद्भवत आहे. काही ठिकाणी जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजाची स्थिती तर फारच दयनीय आहे. प्रत्येकवेळी विविध संकटांना, समस्यांना, अडचणींचा सामना करत शेतकरी जगत आहे. कधीमधी शेतीमध्ये भरगोस पिकाचे उत्पादन होते, त्यावेळी बाजारभाव कोसळतो, हातातोंडला आलेले पिक नैसर्गिक किंवा मानवी निर्मित अडचणी निर्माण होऊन बळीराजाचे हात पुन्हा रिकामाच राहतो.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपल्या देशात मार्च महिन्याच्या शेवटी मा. प्रधानमंत्री यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. भविष्याचा विचार करून घेतलेल्या निर्णयाचा जनतेने तो स्वीकार केला. ‘घरी रहा, सुरक्षित रहा..’ ‘जेथे आहे, तेथेच सुरक्षित रहा.’ ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन केले जात आहे. केंद्राच्या धरतीवरच राज्यही लॉकडाऊन केले गेले. या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे सर्वच उद्योग, व्यवसाय तसेच जनजीवन ठप्प झाले.
‘सोशल डिस्टंसिंग’ हा एकमेवाद्वितीय उपाय म्हणून ‘कोरोना’ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखला जाईल. या हेतूने त्याची अंमलबजावणी केली गेली. अनेक ठिकाणी नोकरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याना ‘वर्क फ्रॉम होम’ या पद्धतीचा वापर करून काम पूर्ण केले जात आहे. ज्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम’ अशक्य आहे, तिकडच्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगितले गेले. काही ठिकाणी प्रवासाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे कर्मचारीवर्ग नोकरीवर जाऊ शकला नाही. काही ठिकाणी जिल्हाबंदी, गावबंदी असल्यामुळे नोकरीवर जाणाऱ्या अनेकांना घरीच रहावे लागले.
आज जवळपास दोन महिन्यानंतर राज्य शासनाने जनतेची होणारे ससेहोलपट, हालअपेष्टा, चिंता, भूकमारी, बेरोजगारी, तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक होणारे हाल पाहून राज्यात काही अंशी संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली. अनेक राज्यात अडकलेल्या व्यक्ती आपापल्या घरी जाण्यास मुभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या बढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक घरात, घरातील प्रत्येकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या मूळ गावी, घरी जाण्यास धडपडत आहे.
अनेक ठिकाणी अडकलेल्या व्यक्ती नोकरीच्या ठिकाणाहून घरी परतायची वाट पाहिली जात आहे. प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेऊन नागरिकांना आपापल्या राज्यात जाण्याचे नियोजन केले आहे. या संचारबंदीमुळे उद्योग, व्यवसाय, औद्योगिक वसाहतीमधील अडकलेला चाकरमाना वर्ग स्वत:च्या घरी परत जात आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
परंतु जेव्हा काही कालावधीनंतर ही संचारबंदी उठेल. ‘कोरोना’ विषाणू नष्ट होऊन सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल. त्यावेळी आज केली जाणारी नोकर कपात, किंवा स्वत:च्या राज्यात, घरी गेलेला कौशल्यपूर्ण चाकरमाना वर्ग त्याठिकाणी उपलब्ध होणे फारच कठीण होणार आहे. या सर्व गोष्टींचा फटका नक्कीच उद्योग, व्यवसाय आणि एकंदरीतच उत्पादकतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक दिवसापासून केली जाणारी ओरड म्हणजे, ‘परप्रांतीय व्यक्तींच्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाहीत?’ बाहेरच्या राज्यातील व्यक्ती काम व्यवस्थित करत नाहीत? त्याच्या फटका उत्पादनावर होत आहे? म्हणावा तेवढा फायदा मिळत नाही? अशा एक ना अनेक प्रश्नांची ओरड होत आहे.
भविष्यामध्ये आताच्या संचारबंदीचा वाईट परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज परप्रांतीय जनतेच्या नावाने आरडाओरड करणाऱ्या मुलांना, संचारबंदीमुळे नवीन संधी उपलब्ध होण्याच्या शक्यता ‘मराठी’ मुलांना निर्माण झाल्या आहेत. काही ठिकाणी मराठी मुलांना नोकर कपातीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. अनेक मोठमोठ्या व्यवसायाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी नाईलाजास्तव नोकर कपात करावी लागणार आहे. ज्या ‘मराठी’ मुलांना नोकर कपातीच्या संकटाना सामोरे जावे लागणार आहे. त्यांनी आपल्या योग्यतेनुसार किंवा कमी-अधिक प्रमाणात जी नोकरी, व्यवसाय, उद्योग किंवा इतर काहीही मिळेल, त्याचा स्वीकार करून उदरनिर्वाह करावा लागणार आहे. हे त्रिवार सत्य असण्याची शक्यता आहे.
आता ‘मराठी पाऊल पडावे पुढे...’ नाही तर बेरोजगारी, उपासमारची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा काही परप्रांतीय मुले येऊन त्यांच्या बुद्धिमत्तेवर नोकऱ्या मिळवतील. त्यावेळी ‘मराठी’ मुलांनी म्हणू नये. आमच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी पळवल्या किंवा इतर काही बोलणे हे चुकीचे ठरेल. निसर्गाने किंवा मानव निर्मितीने मिळालेल्या या संधीचे सोने मराठी मुलांनी करावे हीच इच्छा...
- श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
- ईमेल – mangeshvkoli@gmail.com
-      (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.