आपल्याकडे
अनेक लोकांनी प्रेरित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्माची गौतम बुद्धांनी
दिलेली शिकवण आचरणात आणल्याने आयुष्य नक्कीच सुखकर होते असे मानले जाते. बुद्ध
पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
बुद्ध
पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला बुद्धांची काही विचार सांगण्याचा प्रयत्न करत
आहे, जे व्यक्ती त्यांच्या विचारांचे आचरण करतात त्याची काटेकोरपणे अमलबजावणी
करतात त्यांना नक्कीच सत्याची वाट गवसते आणि अशाच व्यक्तींच्यामुळे आपला समाज
शिकून संघटीत होतो आणि संघर्ष करून न्यायाने मिळवतो. तुम्हीही ही शिकवण पाळली तर
तुमचं आयुष्य नक्की सुखकर होईल.
प्रत्येक
उजाडणारी पहाट दोन पर्याय घेवून येते, एक म्हणजे झोपून स्वप्न पहात रहा किंवा उठून
स्वप्नांचा पाठलाग करा. दोन्ही ही पर्याय सर्वांना मिळतात. एव्हाना प्रत्येक
क्षणाला वेळ बदलत असते. स्वतःला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक क्षणी नवीन काही
तरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यश मिळाले तर उत्तमच परंतु अपयश मिळाले तर
त्यातून मिळणारा अनुभव हा फक्त स्वतःचाच असेल. सतत नवनवीन प्रयत्न करत राहिले
पाहिजे. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. संकट कितीही मोठं असुद्या, फक्त
प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा, तुम्हाला जरूर यश मिळेल.
नेहमी
एक लक्षात ठेवले पाहिजे. “ज्याला धन कमवायचे आहे, त्याने कण सुद्धा वाया घालवू
नये.” “ज्याला ज्ञान कमवायचे आहे. त्याने क्षण सुद्धा वाया घालवू नये.” याचे एक उत्तम
उदारहण द्यायचे झाले तर, एकदा गौतम बुद्ध समुद्राच्या किनारी फिरण्यासाठी जातात.
तेथे त्यांना लाटेबरोबर किनार्यावर येणारे असंख्य मासे तडफडताना दिसतात. ते लगेचच
त्या माश्यांच्या मदतीला धावून जातात. लाटेबरोबर किनार्यावर येणारे तडफडणारे मासे
एकेक करून पुन्हा समुद्रात टाकत होते. त्याच वेळी दुसरी एक व्यक्ती किनार्यावर
फेरफटका मारत होती.
बुद्धांच्या
कृतीकडे पाहून त्याला हसायला आले. तो म्हणाला, ‘अरे, “तु हे काय करतो आहेस? असे
हाताने एकेक मासा पाण्यात टाकून काय मिळणार आहे? का स्वत:चा वेळ वाया घालवत आहेस? हे
ऐकूण बुद्धांनी त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत म्हणाले, ‘मला समाधान मिळेल,
परंतु ज्याच्यासाठी मी हे करत आहे, त्या माशांना याचा नक्कीच फायदा होईल.” काही
गोष्टी क्षुल्लक आणि छोट्या वाटतात. म्हणून त्या करणे टाळल्या जातात. परंतु
ज्याच्यासाठी आपण करत असतो, त्याच्यासाठी ती गोष्ट फार मोठी आणि महत्वाची असू
शकते. एक मात्र खरे आहे, “चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला
विरोधक हे असतात.”
या
उदाहरणातून एवढंच लक्षात घेतले पाहिजे. ‘आजचा एखादा चांगला विचार, उद्या कोणाचे
तरी उत्तम भविष्य घडवू शकतो.’ इतर व्यक्ती काय आणि कसा विचार करतात यापेक्षा आपण स्वत:
बद्दल कसा विचार करता हे महत्वाचे असते. फुलाला वाढायला ज्या प्रकारे सुर्य
किरणांची आवश्यकता असते, तसेच स्वतःच्या प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता
असते. आपल्या गुणवत्तेवर किंवा क्षमतांवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा मानू
नका. कारण, “लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही.”
बुद्ध
हे अतिशय शांत होते. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येक व्यक्तीला
प्रेरणा देणारा आहे. असे संत ज्यांनी समाजाला शांततेची शिकवण दिली. गौतम बुद्धांचे
विचार खास तुमच्यासाठी सांगण्याचा छोटासा माझा प्रयत्न आहे. गौतम बुद्धांचे
सुविचार अगदी शाळेपासून शिकवण्यात येतात. गौतम बुद्ध
विचार मांडल्यानंतर त्यांचे आचरण करण्यासाठी थोडे सुकर करून देण्याचा प्रयास आहे.
गौतम बुद्ध विचारांच्यामुळे आपल्याला रोजच्या आयुष्याला प्रेरणा मिळते. आयुष्याला
प्रेरणादायी ठरणारे असे काही गौतम बुद्धांचे विचार म्हणजे सत्यवाणीच अमृतवाणी आहे,
सत्यवाणीच सनातन धर्म आहे. सत्य, सदर्थ आणि
सधर्मावर संत सदैव दृढ असतात. असत्य बोलणारे नरक जिवंतपणी यातना भोगतात.
ज्याला
खोटं बोलायला लाज वाटत नाही, त्याचे साधूपण रिकाम्या
मटक्याप्रमाणे आहे. साधुतेचे एक थेंब देखील त्याच्या हृदयात नाही. सभेत, परिषदेत किंवा एकांतात कोणाशीही खोटे बोलू नये. खोटे बोलण्यासाठी दुसर्याला
भाग पडू नये. असत्य बोलण्यासाठी प्रोत्साहित करू नये. असत्याचा परित्याग केला
पाहिजे. जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम
ठरेल. मग जीत नेहमी आपलीच होणार, ही जीत तुमच्याकडून कोणीच
हिरावून घेऊ शकणार नाही. हजारो पोकळ शब्दांपेक्षा एकच चांगला शब्द योग्य आहे
ज्यामुळे शांती नांदेल. संतोष सर्वात मोठे धन आहे, निष्ठा
सर्वात मोठे संबंध आहे आणि आरोग्य सर्वात मोठे उपहार आहे. भूतकाळावर लक्ष देऊ नये,
भविष्याबद्दल विचार करू नये, आपले मन
वर्तमानावर केंद्रित करा. ज्याला हेतुपुरस्सर खोटं बोलण्यात लाज वाटत नाही,
ती व्यक्ती कुठलेही पाप करू शकते. म्हणून मनात ठरवून घ्यावे की मी
विनोद करताना देखील असत्य बोलणार नाही.
काही
लोक सांप्रदायिक मतांमध्ये पडून विविध प्रकाराचे तर्क प्रस्तुत करतात आणि सत्य -
असत्य दोन्ही मांडतात,
अरे पण सत्य तर जगात एकच आहे, अनेक नव्हे.
ध्यान करून ज्ञान मिळवता येते आणि ज्ञान नसेल तर माणूस अज्ञानी राहतो. आपण ह्या
गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात की कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील आणि
कोणत्या अडवून ठेवतील, म्हणून तेच निवडा जे तुम्हाला
ज्ञानाकडे, ध्येयाकडे घेऊन जातील. हे एक अंतिम सत्य आहे की द्वेषाचा अंत हा
द्वेषाने नाही तर प्रेमानेच संभव आहे. आपण जो आणि जसा विचार करू अगदी तसेच बनतो.
काय घडून गेलं यापेक्षा काय करायचं बाकी आणि काय करता येईल याकडे मी जास्त लक्ष
द्यावं. राग येणे ही समस्या नाही तर विचार आहे. जसा तुम्ही रागाचा विचार करणे
सोडून द्याल तसा तो सहज नाहीसा होईल. रागाला शांततेने जिंका, वाईटाला चांगल्याने जिंका आणि असत्याला सत्य बोलून जिंका. जे लोकं राग
येणाऱ्या विचारापासून स्वतःला मुक्त करतात, शांतता त्यांनाच
प्राप्त होते. जर तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्यांना
दुःख देऊ शकत नाही. आभाळासाठी पूर्व आणि पश्चिम दोन्ही सारखेच मात्र लोकं अश्या
गोष्टीमध्ये भेदभाव करतात त्यावर विश्वास देखील ठेवतात.
जर
तुम्ही रागावले तर तुम्हाला शिक्षा मिळणार नाही मात्र राग येणे हिच तुम्हाला खूप
मोठी शिक्षा आहे. तुम्ही कितीही चांगले विचार वाचा, बोला मात्र
जो पर्यंत तुम्ही त्यांना अमलात आणणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार
नाही. जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष
करणे सोडून द्या. जर तुम्ही तुमचा मार्ग नाही सोडला, त्यावरच
चालत रहाल तर निश्चितच तुम्ही तिथं पोहचाल जिथं तुम्हाला जायचं आहे. लहान लहान
नद्याच जास्त आवाज करतात, विशाल महासागर तर अगदी शांत असतात.
पूर्ण विश्वात असा एक पण व्यक्ती नाही जो तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम
करेल. तुम्ही बाहेर कितीही शांतता शोधा परंतु मिळणार ती तुम्हाला तुमच्या आतच
मिळणार आहे. जंगली प्राण्यापेक्षा आपण आपल्या कपटी आणि दुष्ट मित्रापासून जास्त
सावध रहा. जंगली प्राणी फक्त तुम्हाला शारीरिक हानी पोहचवू शकतो मात्र एखादा वाईट
मित्र तुम्हाला मानसिक हानीही पोहचवू शकतो. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा
आपल्याला सत्याचा विसर पडू शकतो. जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल त्यासाठी
तुम्हालाच मेहनत करावी लागेल, दुसऱ्यावर अवलंबून राहून ती
मिळणार नाही.
सूर्य, चंद्र आणि सत्य हे जास्त काळ लपून राहू शकत नाही. अंधारात चालण्यासाठी जशी
प्रकाशाची आवश्यकता असते तशीच जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते.
आरोग्य ही सर्वात चांगली भेट, समाधान हे सर्वात मोठं धन तर
विश्वास हे सर्वात चांगलं नातं आहे. आज आपण जे काही
आहोत, ते आपण जो विचार केला आणि त्यावर काम केलं त्याचाच
परिणाम आहे. जो वाईट विचार करेल आणि त्यावरच काम करेल त्याला नेहमी दुःखच मिळेल
याउलट जर चांगला विचार करून त्यावर काम केलं तर आनंद हा सावलीसारखा आपल्या सोबत
असेल. केवळ चांगला विचार करून, बोलून कुणी चांगलं ठरत नाही
तर त्या विचारांना अमलात आणून जगणारे चांगले असतात.
प्रत्येक
व्यक्ती आपल्या आरोग्यासाठी स्वतः जबाबदार असतो. आज या
कोरोना महामारीमध्ये स्वत: शासनाने सांगितले आहे की, “माझे कुटुंब माझी जबाबदारी”,
“मीच माझा आणि माझ्या समाजाचा जबाबदार आहे”, तसेच आपण प्राथमिक स्वरुपात स्वत:ची
जबाबदारी काळजी घेतली तर आपण समाज सुद्धा वाचवू शकतो. आनंद हा पैशाने विकत घेता
येत नाही तर आनंद हा आपण कसं अनुभवतो, इतरांसोबत कसा व्यवहार
करतो आणि इतरांशी कसं बोलतो यातून मिळतो. एक क्षण दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन हे पूर्ण विश्व बदलू शकतो.
जीवनाचा
सर्वात मोठा उद्देश हा स्वतःच्या जीवनाचा उद्देश माहिती करून घेणे असतो आणि
त्यानंतर पूर्ण समर्पण करून तो पूर्ण करण्यासाठी जीवन घालवणे. आनंद हा आपल्याजवळ
काय आहे यात नसून आपण काय देऊ शकतो यात आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल की
तुम्हाला इतर कुणी आनंद आणि दुःख देऊ शकतो तर ते हास्यास्पद असेल. इतरांवर विजय
मिळवणे यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे खूप मोठं आहे. जर एखाद्या समस्येचं समाधान
निघत असेल तर चिंता का करायची? आणि समाधान निघत नसेल तर चिंता करून
काहीच उपयोग होणार नाही.
ज्याप्रकारे
एखाद्या डोंगराला वाहत्या हवेने काहीच फरक पडत नाही अगदी तसंच एखाद्या बुद्धिमान
व्यक्ती प्रशंसा आणि निंदा यांनी तिळमात्रही विचलित होत नाही. या पूर्ण जगात एवढा
अंधार नाही की तो एका दिव्याचा प्रकाश विझवू शकेल. केवळ मनाला वाटते म्हणून माणूस
वाईट कृत्य करतो. जर त्या मनालाच परिवर्तित केलं तर सर्व वाईट कामं संपतील? जर तुमच्या आयुष्यात मायाळूपणा, दयाभाव नसेल तर
तुमचं जीवन अर्धवट आहे. आपणच आपल्या नशिबाचे लेखक आहोत. आपण जन्म एकट्यानेच घेतो
आणि मरतोसुद्धा एकटेच म्हणून स्वतःचा रस्ता स्वतः बनवा आणि त्यावरच चालत रहा.
आपल्याला उन्नतीसाठी आपल्यालाच काम करावं लागेल यासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून
नाही राहू शकत. आपलं असत्यवादी असणं हेच आपल्या अपयशाचं कारण असते.
या
लेखातून बुद्धांचे विचार मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी
जेवढे जमतील तेवढे विचार अवलंबून स्वत:चे जीवन अधिक सुखकर करावे एवढीच विनंती आहे.
धन्यवाद...
-
श्री. मंगेश विठ्ठल कोळी, शिरोळ.
मो.-
९०२८७१३८२०.