Friday, October 14, 2016

*वाचक बनविणारे व्यक्तीमत्व - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम*

   



  "वाट पाहत राहणाऱ्याला नेहमी तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणारा मागे सोडून देतो, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमच्या ध्येयाला एकनिष्ठ होणे गरजेचे आहे" असे म्हणणारे आणि संपूर्ण जगातील युवकांचे स्फुर्ती स्थान असणारे डॉ. अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम) यांचा जन्म दिवस. त्यांच्या जयंती निमित्त आज १५ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जात आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे "वाचाल तर वाचाल" याचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर ज्या व्यक्ती वाचन करतात त्यामुळे प्रगल्भ ज्ञान त्यांना मिळते आणि जे यश मिळते ते कशा पद्धतीने मिळाले आहे हे समजून घेता येते. डॉ. कलाम आपल्या भाषणांमध्ये एक गोष्ट नेहमी सांगत असत की, नेहमी यशस्वी व्यक्तींचे आत्मचरित्र किंवा लेख, भाषणे ऐकण्या-वाचण्यापेक्षा अपयशी व्यक्तींचे जीवनचरित्र किंवा त्यांना आलेला अनुभव यांचे वाचन किंवा भाषणे ऐकली पाहिजेत म्हणजे त्यांच्या हातून ज्या काही चुका झाल्या  त्या तुमच्या हातून घडू नये आणि यशस्वी होण्यास मदत होते.

      डॉ. कलाम यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यांचे वडील रामेश्वतरला येणार्यान यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला ने-आण करण्याचा व्यवसाय करीत होते. डॉ. कलाम यांचे प्राथमिक शिक्षण रामनाथपुरमला झाले. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच अचानक वडिलांचे निधन झाले. घरातील कर्त्या पुरूषाचे छत्र गमावल्याने त्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ लागल्या. गावात वर्तमानपत्रे विकून किंवा शाळा शिकत गावातील लहान-मोठी कामे करून पैसे कमविल होते. शाळेत असल्यापासूनच त्यांना गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयाची आवड निर्माण झाली. नंतर ते पदवीच्या शिक्षणासाठी तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये गेले. बी.एस्सी. पदवी घेतल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून पैसे दिले. एवढ्या कठिण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांची वाचनाची जी जिद्द होती ती कायम तेवत ठेवली. अनेक पुस्तके त्यांनी वाचली आणि स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणले. डॉ. कलाम नेहमी सांघिक कार्याला पाठबळ देत. ते नेहमी शाळेत शिकत असताना लहानपणी जेव्हा शाळेमध्ये पाढे पाठ करित असताना समुहाने आणि मोठ्या आवाजात एका सुरात म्हटल्यामुळे लवकर पाठ होत होते आणि दिर्घकाळ लक्षातही राहत होते.
     बालपण अथक परिश्रमांत व्यथित करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या राष्ट्राच्या राष्ट्रपती पदी निवड झालेले डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपध्दतीमुळे ते ‘सामान्यांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. भारत सरकारने त्यांना ‘पद्भूषण’, पद्मविभूषण आणि 1998 साली ‘भारतरत्न’ हा देशामधील सर्वोच्च किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पुढील वीस वर्षात होणार्यार विकसित भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील होते. "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" अशा पध्दतीचे व्यक्तिमत्व. वाचनाबरोबर रुद्रविणा वाजविण्याचा आणि मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉ. कलाम हे नेहमी विद्यार्थी वर्गाला उत्तमोत्तम मार्गदर्शन करण्याचे काम करत होते. त्यांनी स्वतः सिध्द करीत असताना काही महत्त्वाची वाक्ये आत्मसात करून घेतली. त्यामुळे एवढे मोठे यश संपादन करु शकले. मेहनत, सातत्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आदर्श शिखरापर्यंत जाऊन पोहचले आहेत.

      डॉ. कलाम आपल्या भाषणामध्ये तरूणांना प्रोत्साहित करीत असताना काही वाक्ये नेहमी सांगत होते की, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम स्वप्न पाहिले पाहिले. 
1)  स्वप्न असे नसायला पाहिजे की जे झोपेत पाहता येऊ शकते. स्वप्न असे असायला हवे की तुमची झोप उडून जाईल. 
2) नेहमी स्वतःमधील, समाजामधील किंवा देशातील चांगले गुण स्वीकारले पाहिजे. 
3) कोणत्याही व्यक्तिला यशस्वी होण्यासाठी कठीण गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यानंतर मिळणारे यश खऱ्या अर्थाने आनंद देऊन जाते. 
4) नेहमी आकाशाकडे पहावे म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात संपूर्ण ब्रम्हांड तुमच्यासाठी अनुकूल आहे, जो स्वप्न पाहतो व मेहनत करतो तो नेहमी यशस्वी होतो. 
5) तुम्ही नेहमी स्वतंत्र रहायला हवे. नाही तर तुम्हाला कोणीही आदर देणार नाही. 
6) तुम्हाला जर भ्रष्टाचार मुक्त आणि सुंदर देश घडवायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा हे कार्य फक्त तीन व्यक्तीच करू शकतात आणि त्या म्हणजे वडील, आई आणि गुरू. 
7) एक चांगले पुस्तक हजार मित्रांच्या बरोबरीचे असेल पण एक चांगला मित्र एका ग्रंथालयाएवढा मोठा असतो. 
8) जीवनात कठीण प्रसंग आपल्याला बर्बाद करण्यासाठी येत नाही तर आपल्यामधील दडलेले सामर्थ्य आणि शक्ती बाहेर काढण्यासाठी येतात. 
9) कठीण प्रसंगाला असे सांगा की तुम्ही त्याच्यापेक्षा कठिण आहात. 
10) तुमचा आत्मविश्वाास वाढेल आणि कसल्याही प्रकारचे संकट आले तरी त्यातून मार्ग काढू शकाल.
     प्रत्येकाला यशस्वी बनविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वीनम्र अभीवादन...

मंगेश विठ्ठल कोळी. शिरोळ
९०२८७१३८२०.

1 comment: