Wednesday, June 3, 2020

शिवाजी : नुसतच जय जय..

गेली साडे तीनशे वर्षे शिवाजी महाराजांच्या बाबत अनेक इतिहास संशोधक, जाणकार व्यक्ती, शिवाजी महाराजांच्या बद्दल अभ्यास करण्याऱ्या व्यक्ती यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आलो आहे. त्याचप्रमाणे स्वत:ला पटेल, रुचेल, आवडेल अशा प्रकारे शिवाजी महाराज समजून घेतले जातात. परंतु शिवाजी महाराजांचा खरा इतिहास नक्की काय? त्यावर विविध अभ्यासकांचे एकमत आहे असे कुठेही वाचनास मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या बद्दल ठामपणे सांगणे आताच्या काळात शक्य नाही.
याचे एक चांगले उदाहरण द्यायचे झाले तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रचे दैवत मानणाऱ्या, अनेकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. आपण ती आनंदाने उत्साहाने साजरी केली. परंतु दुर्दैव हे आहे की, एकाच माणसाची जयंती आज तीन-तीन वेळा साजरी केली जात आहे. (तिथीप्रमाणे, परंपरेप्रमाणे, तारखेप्रमाणे) महाराजांच्या जयंतीला मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या गेल्या. सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी जयंतीच्या मिरवणुकीमध्ये स्वत: शिवाजी महाराजांचे वारस समजणाऱ्या व्यक्ती बिनधास्तपणे वाटेल तशा गाण्यावर, संगीतावर, वाटेल तशा पद्धतीने नृत्य करताना दिसल्या. शरीरावर शिवाजी महाराजांचा पेहराव केलेला पहिला. परंतु आचरणात मात्र खूप मोठ्या प्रमाणावर विरोधाभासही जाणवला. हा एक प्रकारचा शिवाजी महाराजांचा अपमानच म्हणावा लागेल.
असो. आज पुन्हा तिच गोष्ट आपणाला दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. वरील गोष्टीं पुन्हा होऊ नयेत. एवढीच माफक अपेक्षा आहे. 
'हिंदू धर्मरक्षक' म्हणून शिवाजी महाराजांना बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की, याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता व ४४व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या.
अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजी महाराजांनासुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात. तशा त्या शिवाजी महाराजांनासुद्धा होत्या.
शिवाजी महाराजांच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचे. त्या परिस्थितीतही त्यांनी किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्यांनी किती प्रगतिशील पावले उचलली, राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्त्वाचे.
शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे ६ जून १६७४ रोजी झाला हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे. परंतु शिवाजी महाराजांचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला होता. तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणत: तीन महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीस झाला होता.
निश्चलपुरी गोसावी या नावाचा कुणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर १३ दिवसांनी शिवाजी महाराजांची थोर आई जिजाबाई यांचे निधन झाले होते. शिवाजी महाराजांचा सेनापती प्रतापराव गुर्जर वारला होता. शिवाजी महाराजांची एक पत्नी काशिबाई मृत्यू पावल्या होत्या. ह्या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून घडल्या असे या निश्चिलपुरीचे म्हणणे होते. त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते, त्यांना बळीचे दान दिले नव्हते. त्यामुळे ह्या आपत्ती ओढवल्या असे त्यांचे म्हणणे होते.
शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभिरू होते. त्या सर्वांना त्या काळातील जाणिवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या. त्यांनी निश्चिलपुरीचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला. पुन्हा उरल्यासुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दाने देऊन संतुष्ट केले गेले. ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या.३९ एकाच व्यक्तीचे दोन राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही.
अर्थात दोन दोन राज्याभिषेक करून आणि दोन दोन वेळा देवदेवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतर स्वत: शिवाजी महाराजांना जेमतेम सहा वर्षेच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले. काळाच्या व तत्कालीन जाणिवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या दोन राज्याभिषेकांकडे पाहायचे ऐवढेच तात्पर्य.
शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी प्रत्येकाने पाहायला हवी, आत्मसात करायला हवी. शिवाजी महाराजांना लहानपणी ज्यांनी ज्यांनी घडविले. त्या सर्वांच्या कष्टाचे फळ म्हणजेच ते शिवाजी पासून छत्रपती शिवाजी महाराज झाले. त्यांच्या अंगी असणारे विविध गुणकौशल्य आजच्या पिढीने आत्मसात केले पाहिजे. कोणतेही कार्य करत असताना त्याचे विविध पर्याय शोधले पाहिजेत. एक पर्याय चुकीचा ठरला तर दुसरा आणि दुसराही चुकीचा ठरला तर तिसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असावा. फक्त शिवाजी महाराज की, म्हटल्यावर “नुसतंच जय जय म्हणून काहीही उपयोग होत नाही, होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
(या लेखात ठळक केलेल्या ओळी गोविंद पानसरेलिखित शिवाजी कोण होता?” या पुस्तकातील आहेत.)
- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
- ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

9 comments:

  1. अप्रतिम विचार... शुभेछ्या

    ReplyDelete
  2. आपण नुसाता जय जयकार करावयाचे आणि मूळ संस्काराला विसरून जय जयकाराखाली आपलीच मिरवावयाचे. संपूर्ण लेख मंगेश सरांचा आपणास हेच सांगतो ,जयंती अथवा जयजयकार केले म्हणजे संपले असा अट्टहास कोणत्याही शिवभक्ताला शोबाणार नाही . छत्रपती शिवराय यांच्या जीवनशैली चा मूळ अभ्यास प्रत्येक जयंतीस नवा संकल्प देणारा असावा व त्याप्रमाणे सर्वच शिवभक्त त्याचा पाठपुरावा व अंगीकार करून वर्तन ठेवतील हीच हीच खरी शिवजयंती हीच खरी शिवजयंती

    ReplyDelete
  3. अतिशय वास्तव लेखन

    ReplyDelete
  4. खुप छान संदेश मंगेश सर जी

    ReplyDelete
  5. अप्रतिम 👌 🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏

    ReplyDelete