मंगेश विठ्ठल कोळी
Friday, September 26, 2025
उपवासाची गंम्मत..
उपवासाची गंम्मत*
काल मी एका ठिकाणी सामूहिक संवाद साधण्यासाठी गेलो होतो. तेथे महिला, पुरुष, लहान मुले, काही जाणकार मंडळी हि उपस्थित होत्या. विषय होता *आत्मपरीक्षण.* आपल्याला नक्की काय हवे आहे? ते कसे मिळवायचे? त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? त्यातून काय साध्य करायचे? आणि ते नेमकं कोणासाठी?
संवाद सुरुवात करत असताना एका व्यक्तीने मला प्रश्न केला उपवास करावा? उपवास करावा की नको? त्यावर मी काही बोलण्या अगोदर तेथील उपस्थित महिला मंडळींनी त्यावर चर्चा सुरु केली मी त्यांच्या चर्चा थांबवत बोललो.
काही दिवसांपूर्वीच मराठी महिन्यातील सर्वात जास्त उपवास असणारा श्रावण महिना संपला आहे. श्रावणात मोठ्या प्रमाणावर उपवास केले जातात. काही व्यक्ती तर अखंड श्रावण महिनाभर उपवास करतात तर काही जण फक्त श्रावणातील काही दिवस. (सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार) काहीजण वर्षभर आठवड्यातील एक दिवस तर काहीजण दोन दिवस नियमित उपवासाची सुरुवात करतात असो.
आता सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर पार पडताना दिसत आहे. यामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने देवीची उपासना करतो आहे. परंतु बऱ्याच जणांना मी पाहिले की अंधानुकरण करत देवीची उपसना करताना दिसतात. यामध्ये उपवास मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्यांच्या काही उपवास करण्याच्या गंमती येथे सांगत आहे.
पहिली महिला तिच्या ऑफिसमध्ये काम करते ती म्हणाली मी नऊ दिवस कडक उपवास करते पायात चप्पल देखील घालत नाही. मी तिला म्हणालो फारच कडक उपवास करता तुम्ही. मग इतर वेळी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना किंवा घरात सर्वत्र चप्पल घालून फिरता ते चालतं का तुम्हाला? त्यावर त्या महिलेकडे उत्तर मिळाले नाही.
दुसरी महिला म्हणाली सर मी फक्त फळे खाऊन उपवास करत आमच्याकडे दुसरं काही खाल्लेलं चालत नाही. मी म्हणालो खूप छान. दररोज किमान एक फळ खाण शरीराला उत्तम असते. परंतु तुम्ही नवरात्र उत्सवाच्या एक-दोन दिवस अगोदर दिवसातून दोन-तीन वेळा व्हेज-नॉनव्हेज पोटभरून खाल्लं कारण दहा दिवस खाता येणार नाही त्याचं काय? यावर त्या महिलेकडे उत्तर नव्हते.
तिसरी महिला म्हणाली सर आम्ही घरात देवीदेवता यांची गाणी लावतो संपूर्ण गल्लीत आवाज असतो आमच्या गाण्याचा. त्यावर मी म्हणालो या शारदीय नवरात्र उत्सवात देवी नऊ दिवस तपस्चर्या करत आहे. जो म्हैशासूर नावाचा राक्षस वेगवेगळी रूपे घेत आहे. तो नक्की कोठे आणि कोणत्या रूपात आहे हे शोधत आहे. अशा वेळी शांततामय वातावरण असायला हवे असे मला वाटते? या प्रश्नवार देखील त्या महिलेकडे उत्तर नव्हते.
आता तर या नऊ दिवसात दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची नवीनच प्रथा सुरु झाली आहे. त्या रंगाचे कपडे घालण्यासाठी घरात वादविवाद सुरु आहेत. एखादा दिवस त्या रंगाचे कपडे घालण्यासाठी नाही मिळाले तर इतरांकडून उसणवार करून किंवा उसणे पैसे घेऊन किंवा उसणे कपडे घेऊन घेतले जातात. आणि यदा कदाचित एखाद्या वेळी अमुक एका रंगाचे कपडे नाही मिळाले तर संपूर्ण दिवस महिला अशांत, चिडचिड, रागराग करत आहेत. ज्या घरात शांत वातावरणात देवीची पूजा व्हायला हवी तिकडे जर अशी अशांतता असेल असेल तर कसे चालेल.
वरील काही उदाहरणावरून मला उमजत नाही की आपल्याला स्वतः नक्की हवं आहे तरी काय? हेच अनेकांना माहित नाही. आपण खरंच आतापासून स्वतः नक्की काय हवे आहे याचे *आत्मपरीक्षण* करणे गरजेचे आहे असे मला कटाक्षाने वाटते. समाजात, इतरांना दाखवण्यासाठी जे काही अंधानुकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे ते कोठे तरी थांबायला हवे. एवढीच माफक अपेक्षा येथे व्यक्त करून माझ्या लेखाला पूर्णविराम देतो.
*-श्री. मंगेश कल्पना विठ्ठल कोळी.*
मु. पो. ता. शिरोळ.
जि. कोल्हापूर
*मोबाईल- 9028713820*
=========================*~
Saturday, July 12, 2025
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण, १२ किल्ल्यांना युनेस्कोचे मानांकन..
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण, १२ किल्ल्यांना युनेस्कोचे मानांकन
शिवछत्रपतींनी लोककल्याणासाठी गडकोटांचा आधार घेऊन निर्मिलेले स्वराज्य हा गाभा पकडून सांस्कृतिक वारसा या श्रेणीत येणाऱ्या व स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या महाराष्ट्रातील 11 जसे रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला व तामिळनाडूतील 1 जिंजी अशा १२ किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा मानांकन मिळविण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने तयार केला होता. युनेस्कोद्वारा जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करताना “अद्वितीय वैश्विक मूल्य” (Outstanding Universal Value ) हा निकष अतिशय महत्त्वाचा ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी व रक्षणासाठी भौगोलिक स्थितीचा उत्तम वापर करून अनेक किल्ल्यांची उभारणी केली. तसेच अनेक अस्तित्वात असलेले किल्ल्यांची पुनर्बांधणी करून त्याचा युक्तीने वापर केला. महाराष्ट्रातील किल्ले हे त्यांच्या भव्य स्थापत्यकलेसाठी ओळखले जातात. हे किल्ले राजकीय, लष्करी, व सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे होते. नैसर्गिक दुर्गमतेचा अतिशय उत्तम वापर या किल्ल्यांच्या उभारणीमध्ये केलेला दिसून येतो. सह्याद्रीचा अत्यंत कुशलतेने आणि रणनीतीपूर्वक वापर करून किल्ल्यांची उभारणी केली. राजकीय आणि लष्करी नियंत्रण प्रस्थापित ठेवण्यासाठी किल्ल्यांचे मजबूत संरक्षण जाळे तयार केले. हे किल्ले उंचावरील दुर्गम स्थानी असल्यामुळे शत्रूला सहज गाठता येत नसत. सह्याद्रीतील दाट अरण्ये, दऱ्या, आणि घाटांचा उपयोग करून गनिमी कावा युद्धतंत्र वापरले. सह्याद्रीची उंची आणि गुंतागुंतीच्या भौगोलिक रचनेमुळे शत्रू सैन्याला या भागात चढाई करणे अवघड जाई. शत्रूला थेट न दिसणाऱ्या दरवाज्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना व किल्ल्यांचे माची स्थापत्य (Machis or Machi Architecture) हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत. स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्यांवर आढळणारे माची स्थापत्य जगभरातील कोणत्याही किल्ल्याच्या रचनेत दिसून येत नाही. माचीस अनेक वेळा तटबंदी, बुरूज, दरवाजे आणि खंदकांनी सुरक्षित केलेले असते. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. या वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय वैश्विक मूल्यांमुळे या किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून स्वीकारले गेले आहे.
हे घडून येण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या पुढाकाराने हा प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, भारत सरकार यांच्याकडे सादर केला होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून संपूर्ण भारतातून 2024-२५ या वर्षाकरिता त्यांना प्राप्त आलेल्या 7 प्रस्तावांपैकी ५ प्रस्ताव मा. प्रधानमंत्री कार्यालय, भारत सरकार यांना सादर केले होते. त्यात महाराष्ट्राची कातळ शिल्पे व मराठा लष्करी स्थापत्य हे प्रस्ताव होते. सदर 5 प्रस्तावातून मराठ्यांचे लष्करी स्थापत्य या प्रस्तावाची मा. पंतप्रधान कार्यालयाद्वारे निवड करण्यात आली. राजस्थान मधील किल्ल्यांना याच प्रकारे युनेस्कोचे मानांकन मिळविण्याचे अनुभव असलेल्या डॉ.शिखा जैन, वास्तुविशारद यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली व डॉ. तेजस मदन गर्गे, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा प्रस्ताव साकार झाला.
मा .महानिदेशक, भारतीय पुरातत्त्व व सर्वेक्षण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांनी युनेस्कोकडे हा प्रस्ताव पाठविण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य केले. नवी दिल्ली येथे जुलै २०२४ मध्ये झालेल्या युनेस्कोच्या ४६ व्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनातील अधिकारी, गड संवर्धन समितीचे सदस्य व विद्यापीठातील तज्ज्ञानी पूर्वतयारी म्हणून आपला सहभाग नोंदविला होता. मानांकनाच्या प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्याकरिता ICOMOS तज्ज्ञ श्री. ह्वाजोंग ली (दक्षिण कोरिया) यांनी ऑक्टोबर, २०२४ या दरम्यान प्रस्तावित १२ किल्ल्यांना भेट दिली. सदर भेटीदरम्यान जिल्हाधिकारी (पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक,रायगड, विल्लुपुरम, ) व वन विभाग यांनीही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.
श्री. देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी केंद्र शासनाकडे तसेच राष्ट्रीय आणि देशोदेशीच्या राजदूतांशी संपर्क करून मानांकन मिळावे यासाठी जागतिक स्तरावर पाठपुरावा केला.श्री. एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व श्री.अजित पवार, मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व पाठबळ मिळाले. ॲड. आशिष शेलार मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली व तांत्रिक सादरीकरण करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या शिष्टमंडळात श्री. विकास खारगे, मा. अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य; श्री. विशाल शर्मा, राजदूत तथा भारताचे स्थायी प्रतिनिधी, युनेस्को आणि श्री. हेमंत दळवी, उपसंचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय हे ३ सदस्य होते. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि सातत्यपूर्ण पाठबळामुळे स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा नामांकन मिळविण्याच्या प्रस्तावास मानांकन मिळणे शक्य झाले आहे. श्री. विकास खारगे, मा. अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य यांनी प्रत्येक पातळीवर भाग घेऊन वेळोवेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधला. या प्रस्तावास युनेस्कोचे मानांकन मिळणे हे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त जनता ते मा. पंतप्रधान, भारत सरकार अशा सर्वांच्या परिश्रमाचे व सद्भावनेचे फलित आहे असे म्हणता येईल. युनेस्कोच्या दर्जामुळे संरक्षण, पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. स्थानिक किल्ले सुरक्षित ठेवणे, भारताचा वारसा जागतिक पटलावर आणणे, आणि जागतिक विशेषज्ञता-संशोधनात सहभागी होणे, या अनेक कारणांसाठी उपयुक्त ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्गसंपदा म्हणजे केवळ वास्तुशिल्पाचा नमुना नाही, तर तो महाराष्ट्राच्या शौर्याचा, आणि रयतेच्या कल्याणार्थ झटणाऱ्या संस्कृतीचा वारसा आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन मिळाले, अख्ख्या महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
***
Saturday, June 21, 2025
इच्छामरण - पुस्तक परीक्षण
इच्छामरण या शब्दाचे अर्थ आपल्या मनात वेळेनुसार बदलणाऱ्या भावना, विचार यावर आधारलेला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका डॉ. सुनीता चव्हाण यांनी लिहिलेले "इच्छामरण" हा कथासंग्रह वाचनास मिळाला. सर्व प्रथम मी त्यांच्या या पहिल्या कथासंग्रहाला शुभेच्छा देतो.
इच्छामरण हा कथासंग्रह वाचत असताना लेखिका डॉ. सुनीता चव्हाण यांची मुखपृष्ठ कथा वाचली. अतिशय सुंदर कथा. प्रत्येक घरातील आणि घरातील प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावभावना स्पष्टपणे मांडण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत. या कथेतील स्त्रीच्या भावना, तिने आईवडिलांचे घर सोडून इतर परक्या म्हणजेच नवऱ्याचे घरात लग्न करून आल्यावर ज्या काही अपूर्ण असणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्याची धावपळ, आणि या धावपळीत स्वतः ला विसरून सर्वांसाठी अहोरात्री कष्ट करणारी स्त्री जेंव्हा अनेक वर्ष सातत्याने राबत असते आणि काही वेळा तिला विचारले जाते की तू या घरासाठी काय केले आहे किंवा मुलं मोठी झाल्यानंतर विचारतात तू माझ्यासाठी काय केले आहे. या प्रश्नांची उत्तरे कोणत्याही स्त्री कडे नसतात. इच्छामरण या कथेतील नाईका सुद्धा याच प्रश्नाच्या भोवती तिची विचार शृंखला असताना दिसते. परंतु लेखिकेने या कथेसाठी लिहिलेले प्रसंग हे जर कोण्या चांगल्या एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी झाले तर नक्कीच त्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी नक्कीच देऊ इच्छितो.
"चकवा" याकथेत लेखिकेने आजचा सर्वात मोठ्या प्रश्नाला स्पर्श केला आहे. आज तृतीयपंथी व्यक्ती, ट्रान्सजेंडर होऊ पाहणाऱ्या किंवा ज्या व्यक्ती पुरुष आहेत परंतु त्यांच्यामध्ये स्त्रीच्या भावना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशा व्यक्तींना आज देखील आपला समाज स्वीकार करत नाही. अशा व्यक्तींच्या मनातील विचार लेखिकेने स्पष्ट आणि परखड पणे मांडले आहेत. या कथेतील पात्र जेव्हा पुरुषांकडून स्त्री कडे वळते त्यांचा भावभावना कोणत्या असू शकतात, त्या स्वीकारताना कोणकोणत्या प्रकारचा त्रास होतो हे निर्भीड पणे लेखिका मांडण्यात यशस्वी झाल्या आहेत.
"माऊ" याकथेतून लेखिका डॉ. सुनीता चव्हाण यांचे मुक्या प्राण्यांच्या भावना सूंदर पद्धतीने मांडल्या आहेत. जसे मनुष्य एकमेकांच्या पासून दूर होतात. त्याच प्रमाणे एखादा प्राणी सुद्धा दूर होताना कोणत्या हाल अपेष्टा सहन करत असेल याचे वर्णन केले आहेत. आपल्याला प्रिय असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी आपण आपले सर्वस्व पणाला लावून त्याची काळजी घेतो. त्याच प्रमाणे माऊ याकथेतील नाईका त्या मांजराची काळजी घेते आहेत. असे म्हणतात की माणसापेक्षा मुक्या प्राण्यांना लावलेला जीव, त्यांच्या बाबत असणारे प्रेम ते प्राणी कधीही विसरत नाहीत. याचाच प्रत्येय ही कथा वाचताना येतो.
त्याच बरोबर लेखिका डॉ. सुनीता चव्हाण यांच्या या कथासंग्रहतील जमीन दुभंगते तेव्हा, बाप, अदालबदली, जरा विसावू या वळणावर, आणि ती बाबा झाली, दोघी दोघी, मुक्ती, एकदा हळवं पत्र, संस्काराचा पारिजातक या कथा सुद्धा खूप सुंदर आहेत. सर्व कथासंग्रह वाचत असताना असे लक्षात येते की प्रसिद्ध कवायत्री च्या भावना विचार लेखनाच्या पद्धतीने कथा वाचत असताना वाचकाचे मन खिळवून ठेवणच्या शाब्दिक ताकद निसर्गाने त्या परमेश्वराने डॉ. सुनीता चव्हाण यांना उपजतच देणगी स्वरूपात दिली आहे. याचा वापर लेखिकेने समाजातील ज्वलंत प्रश्न तसेच निराधार व्यक्ती, प्राणी यांच्यासाठी खर्ची करावी असे मला वाटते. पुढील लेखणीला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा..
श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
मु. पो. ता. शिरोळ.
जि. कोल्हापूर
मो. 9028713820
Monday, February 10, 2025
कधीतरी स्वतःसाठी
*आनंदात रहायचे असेल तर. कमी बोला. इतरांच्या खोचून टोचून बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. दिखावा करू नका, की दुसर्यांना मी असा मी तसा सांगण्यात वेळ घालवू नका. तुमच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा.*
*स्वतःला आत्मसन्मान नक्किच द्या. तुम्ही कुणासाठी नाही, पण स्वतःसाठी खुप अनमोल अमूल्य आहात. हे पक्के लक्षात घेऊन जगणे गरजेचे आहे.सतत त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू नका.त्यात कोणीही इंटरेस्ट घेत नाही..सगळे माझ्यासारखेच वागले पाहिजेत हा हट्ट सोडा.तुम्ही सर्व जगावर कार्पेट घालू शकत नाहीत. हा, पणं स्वतच्या पायात नक्की चप्पल घालू शकतात.*
*मेडीटेशन, अध्यात्म, व्यायाम ह्या गोष्टी तुमच्या शरीराला टॉनिक आहे त्याचा कंटाळा करू नका. प्रत्येक गोष्टीत काहीना काही भावार्थ असतो. व्यायाम तब्येत शेवट पर्यंत ठणठणीत ठेवते. अध्यात्म तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवायला शिकवतो. मेडीटेशन तुमचा राग लोभ मद मोह मत्स ह्यावर नियंत्रण ठेवायला शिकवते. मुलांकडून फार अपेक्षा ठेऊ नका त्यांच्या आणि आपल्या पिढीत फार मोठा फरक असतो आणि तो कधीच मॅच होणार नाही ही भावना ठेवा म्हणजे अपेक्षांचे ओझे त्यांच्या बाबतीत रहाणार नसते.काळानुसार गरजा व्यक्ती बदलत जातात. अगदी साधे उदाहरण 2000 ची नोट जी पूर्वी आपण फार जपून ठेवली आता रस्त्यात पडली तरी कोणी उचलणार नाही. कारण काळानुरूप त्याचे महत्व कमी झाले.
*नाती कितीही जवळची असली तरी वेळ आली की लोक काढता पाय घेतातच. आपण रामायण महाभारत वाचतो ते दुसरे तिसरे काहीही नसून जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. रामासारखा पती असून देखील सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. भर सभेत द्रौपदी वस्त्रहरण झाले एव्हढे सर्व समोर आपली लोक असूनदेखील द्रौपदीला वाचवायला प्रत्यक्ष नारायणा ह्यांना यावे लागले. केवळ तिच्या एका चींधीने श्रीकृष्णाने तिची लाज राखली. त्यामुळे सत्ययुग, द्वापार युगातील ही एकवचनी लोक असूनदेखील असे दाखले दिसतात तर कलयुगात आपण अपेक्षा कुणासाठी आणि का ठेवायची.*
*लोकांकडे, नको त्या आठवणी, नाते संबंध फार चर्वीचरन करत बसू नका. जास्त लक्ष न देता, आपले जगणे कसे छान होईल हे बघा.*
*मी माझ्या रोजच्या जीवनात खूप छान छान सकारात्मक बदल घडवून आणले आहेत का? याचा अभ्यास केला पाहिजे.*
*तेच ते पुन्हा पुन्हा बोलणे विचार करणे माझ्याकडून होते का. आणि त्यात मी स्वतःला गुरफटून घेतले का? त्यातून माझे काढून घ्यायला, काय केले पाहिजे. हेही कळणे तितकेच महत्वाचे आहे.*
*अहो उद्याचा दिवस आपला आहे की नाही ह्याचा भरवसा नाही. मग कशासाठी मनाला त्रास देऊन जगत रहायचे. दिलखुलास मनमोकळे जगणे, म्हणजेच आपणच आपले फुलत राहणे होय.*
*ह्यामुळे ताणतणाव कमी होऊन, मनाची अवस्था आनंदित राहते. कधीच स्वतःला दुर्लक्षित करू नका. तुम्ही खूप महत्त्वाची व्यक्ति आहात. स्वतःला सक्षम बनवा. आदर करा स्वतःचा. कुणा दुसर्याची गरजच पाडणार नाही.*
*दुसर्याने तुमची स्तुती केली तरीही हुरळून जाऊ नका, आणि दुर्लक्ष, तिरस्कार केलत तरीही मनाला लावून घेऊ नका. त्यात आपल्याला आपले अनमोल आयुष्याचे अजिबात दिवस घालवायचे नाहीत, भारी जगायला आपण आपला चेहरा नेहमी हसरा ठेवा, त्यातून तुमच्या मनाचे प्रतिबिंब उठून दिसते...*
*हसायला फार पैसे लागत नाहीत. त्यात अजिबात कंजूषी करू नका.*
*रोज सकाळी उठून जसे जमेल तसे मस्त व्यायामाने सुरुवात करा. दिवसभर चांगली एनर्जी टिकून राहते.*
*वेळ नाही वेळ नाही, ही नुसती पळवाट असते. वेळ मिळत नसतो. तो काढावा लागतो.*
*उपवास शरीराला चांगला. तसेच मनाला आनंदी, फ्रेश ठेवायचे असेल तर. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नको तो विचारांचा गुंता, त्यात अडकायचे नसते. मानस शास्त्र असे सांगते की दिवसाला तुमच्या डोक्यात 80 हजार विचार येतात.जर तुम्ही सगळेच घेऊन बसलात तर जगणे हराम होईल.*
*आपली आण, बाण, शान आपणच आहोत हे लक्षात घेऊन जगणे सुरू ठेवले की मग फारसे काही जाणून बुजून करावेच लागत नाही, की नको ते प्रश्न फारसे डोक्यात पिंगा घालत नाहीत.*
*परमेश्वराची आठवण स्मरनात राहू द्या. केवळ आणि केवळ तोच तरून नेणारा आहे. फक्त आपला त्यावर विश्वास पाहिजे. देव कधीही कुणाचे चांगले किंवा वाईट करत नाही. मनुष्य आपल्या कर्मानेच चांगले वाईट दिवस आणतो. देव कुठे माझ्याकडे लक्ष देतो असे म्हणून त्याच्यावर अविश्वास दाखवू नका किंवा त्याला टाळू नका. कितीही पैसा प्रॉपर्टी आली तरी सगळे इथेच सोडून जायचे आहे ही जाणीव ठेवली की मग अहंकार आपोआप गळून पडतो. ख-या गरजवंताला नक्की मदत करा. आपण फक्त शंभर वर्षाच्या लिजवर इथे आलो अहोत हे लक्ष्यात ठेवले तर मीपणा निघून जातो, आणि आयुष्याचे सोने झाल्याशिवाय रहात नाही.*
*दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.*
*आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यांना मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, लोकांपासुन सावध व दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.*
🙏🌹🙏🌹🙏🌺🙏🌹🙏🌹
Thursday, March 7, 2024
Sunday, January 14, 2024
Sunday, September 18, 2022
Subscribe to:
Comments (Atom)
















