छत्रपती
शिवाजी महाराज कि जय, राजे पुन्हा जन्माला या, एकच धून ६ जून, राजे तुमची आम्हाला
गरज आहे, महाराजांचा नाद करायचा नाही, एकच राजा शिवाजी राजा.... अशा प्रकारची
वाक्य असणारे मोठ-मोठे डिजिटल फलक आज सकाळी ऑफिसला जाताना दिसले. त्यातून माझ्या
लक्षात आले की, उद्या ६ जून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन
आहे. शेकडो वर्षानंतर सुद्धा मराठी माणसाच्या मनात असलेली छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या विषयीचा आदर तिळमात्रही कमी झालेली नाही. हे पाहून अभिमान वाटतो
महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही तर ते एक
सर्वोच्च स्थान आहे. फक्त नाव घेताच अनेकांच्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण
झाल्याचे जाणवते.
मित्रांनो
सध्या महाराष्ट्रभर एक स्टाइल खूपच जोरदार दिसत आहे आणि ती म्हणजे छत्रपती
शिवरायांचा गेटअप. जागोजागी छत्रपतींसारखी दाढी-मुछ आणि कपाळावर चंद्रकोर ठेवलेले
तरूण नजरेस येत आहेत. त्याच बरोबर अनेक तरुणीसुद्धा स्वत:च्या कपाळावर चंद्रकोर
टिकली किंवा कुंकू लाऊन स्वत: जिजामातासारख्या दिसण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु बऱ्याच
लोकांना ही गोष्ट खटकत असेल पण मी मात्र अशा तरूण-तरुणींचे कौतुक करतोय. उगाच चित्रविचित्र
स्टाइलपेक्षा राजांची आणि जिजाऊची आठवण करून देणारी स्टाइल मलातरी खूप आवडली.
पण
विचार करायला लावणारी गोष्ट अशी की, ज्या वेगाने महाराजांच्या दिसण्याच अनुकरण
करीत आहोत? काय त्याच वेगाने त्यांच्या विचारांचही अनुकरण करणार आहोत? खरतर महाराजांनाही तेच आवडले असते. महाराज हे गुणांची खाण
होते. जसे हिरे, माणिक, मोती अमुल्य असतात तसे शिवाजी महाराजांचे विचार आहेत.
त्यांच्या एका तरी गुणावर चालण्याचा नुसता प्रयत्न जरी केला तरी आयुष्याच सोनं
झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांसारखा गेटअप करणाऱ्या तरूणांना विनंती आहे की,
नुसताच गेटअप करून फिरू नका. शिवचरीत्र नक्कीच वाचा कारण महाराज त्याच्या गेटअपमुळे
महान नव्हते. ते त्याच्या कर्तृत्वाने महान होते.
एखाद्या
पदावर नियुक्ती झाली की, त्या पदाच्या जबाबदाऱ्यासुद्धा पेलता आल्या पाहिजेत.
कोणतीही संधी रिकामी येत नाही त्याच्या बरोबर जबाबदारी ही असतेच. महाराजांचा गेटअप
करतांना नैतिक जबाबदाऱ्या येतात. निदान सामाजिक जीवन जगतांना तरी सांभाळल्या
पाहिजेत. विचार करा महाराजांचा गेटअपमधील तरूण मुलींची छेड काढू लागले तर? मारामाऱ्या करू लागले तर? आई-वडीलांना
शिव्या घालू लागले तर? दारू पिऊन रस्तावर लोळू लागले तर? आणि तरुणीही भर चौकात सिगारेट ओढू लागल्या तर? महाराजांच्या जीवाला किती वेदना
होतील. आज एक असाच महाराजांचा गेटअप केलेला तरूण मला जाताना दिसला. हुबेहूब शिवरायच.
पहाताच क्षणी महाराजांची आठवण व्हावी असा. मला तो खूप आवडलाही त्याला तसं मी
म्हणालो. परंतु पुढे काय?
पूर्ण
दिवसभर तोंड गुटख्यानं भरलं होतं नंतर मावा, सिगारेट आणि बिअरची आँर्डर देतांना
त्याला जेव्हा बघितलं तेव्हा काळजात एक वादळ उठलं. अनेक जण भ्रमंती करण्यासाठी
गडकिल्ल्यांवर जातात एन्जॉय करतात आपल्या जवळ असणाऱ्या दारूच्या बाटल्या पिऊन
तिकडे फोडतात आणि त्याच बाटलीच्या काचेने गडावरील झाडावर स्वत:चे आणि प्रियसीचे
नाव कोरतात जे कोणी तंबाखू खातात ते स्वत:च्या जवळ असणाऱ्या चुन्याचा वापर गडावरून
दगडावर नाव लिहिण्यासाठी वापर करतात. तर एकीकडे गडकिल्ले साफसफाई करणारे तरूणही
नजरेस पडत आहेत. म्हणूनच सांगतो मित्रांनो तुमच्या शिवप्रेमाला सलाम पण सार्वजनिक
ठिकाणी जबाबदारीने वागा. विनंती आहे की, महाराजांचा गेटअप हा चेष्टेचा, मस्करीचा, थट्टेचा विषय होऊ देऊ नका. महाराजांना
दुखावण्याच किंवा त्यांनी केलेल्या कर्तृत्वाला कोठेही धक्का लागेल असे काम आपल्या
हातून होऊ देऊ नका.
जय
भवानी, जय शिवाजी.....
अगदी बरोबर बोलास भाऊ👌
ReplyDelete🚩जय शिवराय🚩