Tuesday, June 13, 2017

महाराष्ट्री असल्याचा फक्त गर्व नको......



आज ऑफिसमधून घरी पायी चालत जात असताना मी आणि माझा मित्र मराठी माणसाबद्दल बोलत चाललो होतो. मी माझ्या मित्राला मराठी माणसाचे कौशल्य, त्याच्या अंगभूत असणाऱ्या गुणांविषयी सांगत होतो. त्याचे मात्र अवगुण आणि स्वत:च्या गुणांची ओळख नसणाऱ्या मराठी माणसाबद्दल बोलणे सुरु होते. त्यातील काही गोष्टी मला देखील पटल्या. बोलत बोलत चर्चगेट रेल्वे स्टेशन केंव्हा आले हे मला समजलेच नाही. आम्ही एकमेकाला उद्या ऑफिसला भेटण्याचे प्रोमिस करून निरोप घेतला. आमच्यामधील संभाषण संपले हे खरे, परंतु त्याच्याशी बोलताना जे अवगुण त्याने सांगितले त्याचा काही काळातच प्रत्येय येईल असे वाटले नव्हते.
मी त्याच विचारात मग्न होऊन चर्चगेट रेल्वे स्थानकात दाखल झालो. नेहमीप्रमाणेच आजची खूप वरदळ पहावयास मिळाली. आता वर्दळीची मला सवय झाली आहे. जाता-जाता एक मराठी माणूस दिसला. तो मोबाईलवर कोणाला तरी मोठमोठ्याने बोलत होता. त्याचे संभाषण संपल्यावर चालत जात असतानाच मी त्याला विचारले तुम्ही कोणत्या गावचे? त्यावर पहिला शब्द तो म्हणाला जय महाराष्ट्र.. मी ही मानेने त्याला होकार दिला. पुढे विचारले कोणत्या गावाचे? त्यावर तो म्हणाला, मी साताऱ्याचा आहे. त्याने विचारले काय झाले? मी म्हणालो, भाषा वेगळी वाटली म्हणून विचारले. रेल्वे लागायला आणखी काही मिनिट बाकी होते त्याच्याशी माझे पुढचा संवाद सुरूच होते.
आमचे संवाद सुरु असतानाच त्याव्यक्तीने जवळ असलेले चिप्सचे पॅकेट काढले आणि खाऊ लागला. मला ही खाणार का? म्हणून विचारले. मी नको म्हणून सांगितले. बोलता-बोलता तो म्हणाला की, आजकाल मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातील खूप व्यक्ती राहतात. त्यामुळे मुंबई खूप गहाण अस्वच्छ होत चालली आहे. त्याचे हे बोलणे ऐकत असतानाच रेल्वे प्लॉट फॉर्म क्रमांक २ वर येत असल्याचे कानावर पडले. त्याने हातातील रिकाम्या चीप्सचा कागद रेल्वेच्या पटरीवर टाकला आणि तोंड पुसत पुढे गेला. हातानेच मला जातो असा इशारा केला. मी स्मितहास्य करून मानेने त्याला होकार दिला. प्लॉट फॉर्मवर रेल्वे लागली मी रेल्वेमध्ये बसलो रेल्वे सुरु झाली.
चर्चगेटमधून बाहेर पडून पहिला थांबा मरीन लाईन्स येथे रेल्वे थांबली. पाच व्यक्ती माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांचे संभाषण सुरु झाले. त्यावरून मला समजले की, हे सर्व गुजराती आहेत. काही वेळ गेल्यानंतर त्यातील एका व्यक्तीने सर्वाना चॉकलेट दिले. सर्वजण खात होते आणि चॉकलेटचे कागद एका व्यक्तीकडे असणाऱ्या पिशवीत टाकत होते. मी हे सर्व पाहत असताना थोड्या वेळापूर्वी भेटलेला आणि स्वत:ला महाराष्ट्री मानणाऱ्या व्यक्तीचे वागणे माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. थोड्या वेळाने रेल्वे लोअर परेलला पोहोचली. त्या गुजराती व्यक्तीपैकी एकाने पुन्हा एकदा सर्वाना चॉकलेट खायला दिले. त्यातील एका व्यक्तीने चॉकलेट खाऊन कागद खिडकीतून बाहेर टाकला.
सर्वांनी कागद टाकण्यासाठी त्यातील एका व्यक्तीने पिशवी पुढे केली. सर्वांनी त्यात कागद टाकले परंतु त्या व्यक्तीने सांगितले की, मी चुकून बाहेर टाकला. तेंव्हा त्यातील एका व्यक्तीने त्याला शिक्षा केली. ती म्हणजे स्वत: कान पकडून सर्वांची माफी मागून दोन वेळा उठबस करायची. त्या व्यक्तीने स्मितहास्य करून मान्य करत सर्वांची माफी मागितली. हे सर्व घडत असताना माझ्या मनात अनेक प्रश्नाचे वादळ उठत होते. आपण स्वत: महाराष्ट्री, मराठी असल्याचे गर्वाने सांगतो आणि आपली वागणूक ही महाराष्ट्राला आणखी खराब करणारी असेल तर त्याचा काय उपयोग? मराठी असो वा गुजराती कोणता ही व्यक्ती असो स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून सुरु व्हायला हवी असे मला वाटते. दुसरा कसा वागतो? मग मी का वागू नये? असे विचार आता दूर लोटले पाहिजेत. तरच आपण प्रगती घडवू शकतो. अन्यथा फक्त “बोलायचे एक आणि करायचे एक” असे होईल.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

No comments:

Post a Comment