Friday, June 9, 2017

आनंद लुटता आला पाहिजे...

उन्हाळ्याच्या त्रासाने वणवण फिरणारे सर्व सजीव प्राण्यांना ओढ लागते ती पावसाची. गेली ४-५ वर्षापासून निसर्गाची अनियमितता लक्षात घेता सर्वच ऋतूमान बदलल्याचे जाणवते. या बदलणाऱ्या ऋतूचक्राला नक्की कोण जबाबदार असेल? या प्रश्नांचे उत्तर शोधणे म्हणजे समुद्रातील सिंपल्यामध्ये मोती शोधण्यासारखा तसा काही प्रकार आहे. चातक पक्षाला लागलेली तहान फक्त आणि फक्त पावसाचे पाणीच भागवू शकते. बदलणाऱ्या निसर्गाकडे पाहताना असे जाणवते की, भूतलावर सजीवसृष्टीचा ऱ्हास होईल की काय अशा प्रकारचे वातावरण निर्माण होत आहे. काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ पाहण्यात आला होता त्यामध्ये भविष्य काळातील एक चित्र दाखवले होते ते म्हणजे जर जीवंत राहायचे असेल तर स्वत:च्या पाठीवर ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन चालावे लागेल.
बदलणाऱ्या ऋतूचक्राला मानव कंटाळवाण्या नजरेने किंवा निराशाजनकतेने पाहत आहे. थंडी खूप वाढली तरी ती मानवाला सहन होत नाही किंवा जास्ती प्रमाणात उन्हाचा त्रास देखील मानवाला नकोसा वाटत आहे. उन्हाळ्याने त्रासलेल्या मानवाला पावसाची सुरुवात खूप आल्हादायक वाटते. परंतु स्वत:च्या खोलीत बसून खिडकीतून किंवा दाराच्या उंबऱ्यावर बसून पावसाचा अनुभव घेण्यात आजची पिढी आनंद मनात आहे. याचे कारण ही तेवढे मजेशीर आहे. टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या अनेक जाहिराती ज्यामध्ये पावसाळ्यात भिजल्याने किटाणू किंवा पावसात भिजल्याने कशा पद्धतीने पसरतात हे दाखवले जाते. त्यापासून वाचण्यासाठी अमुक साबण किंवा हँड वॉश वापरावा असे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज सकाळी पावसाचा अनुभव घेण्यासाठी बाहेर पडलो. पावसाचा मुक्तपणे आनंद घेत मस्त भिजत चालत जात असताना अचानक काही मुले दिसले. त्यांना पाहून मी तिकडेच थांबलो. तीन-चार मुले एका लहान डबक्यामध्ये खेळ खेळत असताना दिसले. खूप आनंदाने चिखल पाण्याची उधळण चालली होती. त्यातील एक मुलगा तर इतर मुलांच्या अंगावर उड्या मारून खेळताना दिसला. एका छोट्याशा डबक्यातील पाणी आणि त्याच क्षणी आकाशातून मुसळधार पडणारा पाऊसाचा मुक्तपणे आनंद घेत होते. हे सर्व दृश पाहून मनात विचार आला कि, कोणीही प्रत्येक ऋतूचा आनंदाने आगमन आणि स्वीकार करतो काही मानव तेवढे त्याला अपवाद आहे.
मानव मुक्तपणे करू शकणाऱ्या गोष्टीसुद्धा करत नाही. याचे कारण म्हणजे त्याला स्वत:ला जास्त दिवस जगायचे असते. (मानवाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जीवन मोठे असले पाहिजे, लांबलचक नाही.) मग जास्त उन्हात गेल्यावर शरीराला त्रास होतो. एकीकडे पावसात जास्त भिजले की, किटाणूचा त्रास होतो असे आपण येणाऱ्या पिढीला सांगत आहे. आणि दुसरीकडे आपण लहानपणी केलेल्या गंमती, मौज, मजा, मस्तीच्या क्षणाच्या कहाणी किंवा अनुभव आनंदाने सांगत असतो. ज्याप्रमाणे निसर्गाच्या बदलाचा स्वीकार करून त्याचा आनंद लुटताना दिसले. त्याप्रमाणे आज लहान मुलेमुली दिसत नाहीत किंवा तरुण-प्रौढ व्यक्तीसुद्धा दिसत नाहीत. मानवाने प्रत्येक ऋतूचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे, त्याला मुक्तपणे अनुभवता आला पाहिजे तरच जीवन सुखी समृद्धी होईल. सुखी जीवनाचा शोध घेण्यापेक्षा जे जीवन आहे त्यात सुख शोधले पाहिजे असे माझे मत आहे. आपणास काय वाटते जरूर खाली कमेंटमध्ये लिहावे ही विनंती...
-    मंगेश विठ्ठल कोळी.
मो. ९०२८७१३८२०

8 comments:

  1. Replies
    1. वा...खरंय की आपण निसर्गापासून दूर चाललोय. या लेखानं त्याची उत्तमपणे जाणिव करून दिलीय.

      Delete
  2. Replies
    1. खरचं लहान लहान सुखांना आपण मुकतोय आणि मुलांनाही अनुभवू देत नाहीत वाचनीय लेख

      Delete
  3. खरंच आहे... खूप छान

    ReplyDelete
  4. आहे त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा हा संदेश मिळाला 👌👌💐💐

    ReplyDelete