सर्वप्रथम
सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाचे सर्वांनी आपापल्या परीने
स्वागत केले. काही व्यक्तींनी या वर्षाचे फक्त कॅलेंडर बदलून स्वागत केले तर काही
व्यक्तींनी एकमेकांना शुभेच्छा. देऊन स्वागत केले असेल. नवीन वर्षात आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींची काही चांगले गुण
अंगीकारण्याचा प्रयत्न करणारे नवीन संकल्प करीत किंवा काही व्यक्तींनी स्वत:
समाजातील घडणाऱ्या बदलाचे विविध स्वरूप लक्षात घेऊन स्वत:मध्ये नेमके कोणते बदल
घडवायला हवेत याची चाचपणी करून अनेक गोष्टींची यादी तयार केली असेल आणि भविष्यात
या यादीमधील एक एक उत्तमोत्तम गुण अंगीकारण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल असाही
संकल्प केला असेल. यामुळे कदाचित विचारांना नवी दिशा मिळून संपूर्ण आयुष्य बदलून
जाईल.
काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यात जे काही जातीपातीचे
वातावरण निर्माण झाले होते अशामुळे आपल्याकडे असणाऱ्या तरुण पिढीवर आणि एकूणच
त्यांच्या विचारसरणीवर कोणता परिणाम होतो
आहे याकडे कोणीही लक्ष देत नाही. मुठभर राजकारणी लोक स्वत:च्या स्वार्थासाठी
आजच्या तरुण पिढीच्या मनात जातीपातीचे विचार रुजवून त्याचा निवडणुकीसाठी वापर करत
आहेत. परंतु या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अशा घटनांमध्ये तरुण पिढीने कितपत
सहभागी व्हावयाचे हे ज्याचे त्याने ठरवावे. तरुण पिढीला जातीयवादी तत्वांचे विचार
मनात पेरून त्यांना भडकावण्याचे काम केले जात आहे. आपण सर्वांनी सोशल मिडीयाच्या
माध्यमातून पाहिले असेल की, या सर्व प्रकरणामध्ये शालेय स्तरातील मुले आणि कॉलेज
मधील तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात आणि सक्रीय सहभाग होता.
आज आपला देश हा तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो. देशाची
एक अव्दितीय शक्ती म्हणून तरुण पिढीकडे पाहिले जाते. अशा काही घटनांच्यामुळे तरुण
पिढीच्या विचारावर आणि एकंदरीतच त्याच्या व्यावहारिक, मानसिक, सामाजिक विचार
क्षमता यावर होणारा परिणाम हा देशाच्या भविष्यासाठी घातकच आहे. या तरुण पिढीच्या
विचारांना कोणती दिशा द्यायला हवी? कोणती दिशा द्यायला नको? त्याच बरोबर तरुण पिढीच्या
भविष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असेल? यावर विचारवंतानी तसेच प्रत्येक
पालकांनी जरूर विचार करायला हवा. कोणत्याही घटनेचा परिपूर्ण अभ्यास करून अशा वाईट
घटना, कृत्य करणाऱ्या आणि भविष्यात करू पाहणाऱ्या विचारांना वेळीच ठेचून काढले
पाहिजे. तरुण पिढीच्या मनातील विचारांना चांगली दिशा, उत्तमोतम विचार मनात
त्यांच्या विचारांना नवी दिशा देण्याची हीच खरी वेळ आहे.
-
मंगेश विठ्ठल कोळी, मो. ९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment