Wednesday, January 10, 2018

युवांची विचारसरणी......


१२ जानेवारी ‘स्वामी विवेकानंद’ यांची जयंतीनिमित्त.....
आज २१ व्या शतकातील युवा देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. त्याचे कारण हि तसेच आहे, आपल्या देशात युवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या देशात मोठ्या प्रमाणावर युवा असतील तो देश कमी कालावधीत मोठे यश प्राप्त करू शकतो, हे सर्वाना माहीत आहे. या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनामध्ये अनेक युवक स्वतःचा आत्मविश्वास आणि बऱ्याच अंशी स्वतःच्या मुक्त विचारसरणीला विसरत चाललेले आहेत. दिखाव्यांच्या किंवा आताच्या घटनेचा भविष्यात कोणता परिणाम होईल या गोष्टींचा विचार न करता धावत असल्याचे दिसून येते. समाजामध्ये संघर्ष निर्माण करू पाहणाऱ्या अपप्रवृत्ती यांच्यावर अंध विश्वास ठेऊन आजचा युवा वर्ग भांबावल्यासारख्या परिस्थितीमध्ये अडकून पडला आहे. अशावेळी योग्य ज्ञान, सकारात्मक दृष्टीकोन आणि जीवनाची योग्य वाट पकडण्यासाठी प्रत्येकाला स्वामी विवेकानंद आणि त्यांचे उत्तम विचारदेखील आठवत असतील. तरुणाचे स्फूर्तीस्थान म्हणून स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिले जाते.
जगातील अनेक विचारवंतांनी स्वामीजींना "Positive Man" असे संबोधले आहे. नोबेल पारितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर म्हणतात की, 'स्वामींकडे सर्वच सकारात्मक गोष्टी आहेत', सकारात्मक गोष्टींमध्ये प्रचंड स्फूर्ती आणि आत्मविश्वास असतो, परंतु स्वामी विवेकानंद म्हणतात, “ज्या व्यक्तीकडे सकारात्मक विचारांचा भक्कम पाया नाही त्या व्यक्तींच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच तर भक्कम असेल असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही.” त्यामुळेच सकारात्मक विचार असून चालत नाही तर प्रत्येकाला आपल्या ध्येयाची निश्चिती सुद्धा करता आली पाहिजे. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिक घट्ट होतो, तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. स्वामी म्हणतात, एखादे ध्येय पूर्ण करण्यासाठी दहा चुका होत असतील तरी चालेल, पण एक चूक दहा वेळा होऊ नये” याकडे आपले लक्ष असले पाहिजे. यातून आपल्याला एवढे सांगता येईल की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. परंतु ध्येयाची निवड देखील तेवढीच महत्त्वाची असते. आपण कोणत्या समाजात राहतो कोणत्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्याच्या आपल्या समाजामध्ये असणाऱ्या बालकांवर कोणता परिणाम होईल याची पूर्ण जाणीव असायला हवी.
आजच्या युवापिढीने स्वतःच्या जीवनामध्ये केवळ इच्छा बाळगणे योग्य नाही तर निश्चित ध्येय ठरवून ते पूर्ण करण्याकडे पाऊले टाकायला हवीत. “अडचणी असताना पळून जाणे म्हणजे, अजून अडचणी ओढावून घेणे होय.” जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळण्यासाठी तर अडचणी असतात. कोणतीही अडचण ही एकटी येत नाही त्याच्या पाठीमागे एक सुवर्ण संधी देखील असते फक्त त्या संधीचा फायदा कसा घेतो यावर आपले यश अवलंबून असते. “अडथळे नसलेली वाट कशाचेही नेतृत्व करु शकत नाही.” सर्व गोष्टीना पुरुन उरणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्टच. ‘अडचणीवर मात करताना मार्ग नाहीत असे कधीच होत नाही, मार्ग शोधताना अपयश येते हे खरे.’ 
“कोणतेही काम फक्त संपवण्यासाठी करु नका, तर ते काम स्वतःच्या आणि समाजाबरोबर राज्याच्या व देशाच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वेड लागल्याशिवाय त्याची निर्मिती होत नाही. “सर्वात प्रथम स्वत:सारखे होण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला जग जिंकता येईल.” प्रत्येक दिवसाची सुरुवात आनंदाने, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून करायला हवी. प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक वेळेला महत्व द्यायला हवे. कारण एकदा गेलेली वेळ परत कधीच मिळत नाही. वेळ ही वाहत्या पाण्यासारखी असते एकदा स्पर्श केलेले पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा स्वत: बरोबरच समाजावर आणि येणाऱ्या नवीन पिढीवर कोणता परिणाम होईल याचा विचार करून योग्य निर्णय घ्या तुम्ही जरूर यशस्वी व्हाल. 
युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....
-       मंगेश विठ्ठल कोळी. मो. ९०२८७१३८२०

8 comments:

  1. मंगेश कोळी यांची सुंदर विचारांची ऊत्क्रुष्ट मांडणी.
    श्रीनिवास शेंडे

    ReplyDelete
  2. अतिशय छान सरजी

    ReplyDelete
  3. खुप छान लेखन👌👍💐💐 खुप खुप शुभेच्छा💐💐

    ReplyDelete
  4. खुप छान लेखन .

    ReplyDelete