बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो
सर्वांनी मान्य केला पाहिजे. आपल्याला माहीत आहे, वाहते पाणी नेहमी स्वच्छ आणि
निर्मळ राहते. त्याप्रमाणेच काळानुसार मानवाने स्वत:मध्ये बदल घडवून घेतले
पाहिजेत. शिक्षण क्षेत्रात देखील आपण पाहतो की, खूप मोठ्या
प्रमाणावर बदल होत आहेत पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायाभिमुख आणि आधुनिक शिक्षण
सुद्धा खूप मोलाचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशातील विद्यापीठांतून शिकवले
जाणारे बीए आणि बीएसस्सी पदवी अभ्यासक्रम सध्याच्या हायटेक युगात अनुपयोगी ठरत
असून ते बंद करून त्या जागी प्रभावी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्याचा हायटेक प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाने
(यूजीसी) आणला आहे.
यापुढे देशभरात बॅचलर ऑफ व्होकेशनल
एज्युकेशन (बी. व्होक) हा पदवी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. या नव्या डिग्री
कोर्सचा अभ्यासक्रम उद्योगजगताच्या मागणीनुसार तयार केला जाणार आहे. बीए आणि बीएस्सी हे विद्यापीठात शिकवले जाणारे पदवी
अभ्यासक्रम सध्याच्या हायटेक युगात रोजगार मिळवून देण्यास सक्षम नसल्याचा दावा
यूजीसीने केला आहे. त्यातून केवळ कारकूनच तयार होत आहेत. त्याऐवजी संगणक युगाशी
नाते जोडणारा आणि प्रचलित उद्योगधंद्यासाठी सक्षम कर्मचारी तयार करणारा बी.व्होक.
हा अभ्यासक्रम येत्या काही वर्षांत बीए आणि बीएस्स्सी या अभ्यासक्रमांची जागा घेणार
आहे.
भविष्यात देशातील महाविद्यालयांना ते
राबविणारे अभ्यासक्रम पायाभूत सुविधा, शिकविल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणि संशोधनात्मक
उपक्रम राबविण्याची क्षमता पाहूनच शैक्षणिक अनुदान दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या
भवितव्यासाठी शिक्षण संस्थांना अधिकाधिक जबाबदार बनविण्याचा यूजीसीचा हेतू आहे. बी.
व्होक हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम येत्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात देशातील २००
महाविद्यालयांत सुरू केला आहे. त्यानंतर पुढच्या १० वर्षांत तो देशभरातील सर्व
अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांत शिकविण्यासाठी समाविष्ट करण्याची घोषणा
यूजीसीने केली आहे.
सध्याच्या हायटेक युगात उद्योगक्षेत्राचा
चेहरामोहराच बदलला आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाला बीए आणि बीएस्सी या
केवळ पदवी अभ्यासक्रमांबाबत फेरविचार करावाच लागेल. कारण या पदव्यांच्या बळावर
नोकऱ्याच मिळत नाहीत हे भीषण वास्तव आहे. बी.ए. आणि बी.एस्सी हे अभ्यासक्रम आता कालबाहय़ झाले असून, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ते बंद करण्याची तयारी चालवली आहे. नव्या
अभ्यासक्रमांना बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन कोर्स या नावाने ओळखले जाईल.
उद्योगविश्वाच्या मागणी व गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. बी.ए., बी.एस्सी.तून बेरोजगारांची फौज तयार होत होईल.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल होत असून,
सुधारित श्रेयांकाधारित श्रेणी पद्धतीचा (सीबीजीएस) वापर होणार आहे.
यानुसार बीए, बीकॉम आणि बीएस्सी या पारंपरिक अभ्यासक्रमासाठी
अंतर्गत २५ गुणांची परीक्षा रद्द होत आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आता थेट
१०० गुणांची परीक्षा द्यावी लागेल. मात्र स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी
अंतर्गत परीक्षा सुरूच राहणार आहे. पारंपरिक अभ्यासक्रमासाठी २५ गुणांची अंतर्गत
परीक्षा होत असे. यात १५ गुण तोंडी परीक्षा, तर वर्तणूक व
उपस्थिती यांचे अनुक्रमे ५-५ गुण दिले जात. यापुढे हे गुण रद्द होणार आहेत. यामुळे
या गुणांमध्ये महाविद्यालयात होणारे गैरप्रकार बंद होतील.
पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या प्रश्नपत्रिका आता
विद्यापीठाकडून तयार केल्या जाणार आहेत. याचबरोबर २०१६-१७ला पदवीच्या प्रथम
वर्षांला नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. विद्यापीठाने सर्व शाखांचे अभ्यासक्रम
बदलण्याचे ठरविले आहे. कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविताना
विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगार संधी लाभाव्यात यासाठी विद्यापीठाकडून
पहिल्यांदाच शेवटच्या सत्रात प्रत्यक्ष प्रकल्प ही संकल्पना राबविली जाणार आहे. या
नवनवीन संकल्पामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणपूर्ण केल्यानंतर लवकरच रोजगाराची संधी
उपलब्ध होणार आहे.
-
मंगेश विठ्ठल कोळी
-
मो. ९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment