Monday, December 30, 2019

परिवार एकता दिन...


परिवार एकता दिन
आज इंग्रजी वर्षातील शेवटचा दिवस वर्षा अखेर म्हणून सर्वजण आपापल्या परीने साजरा करताना पहावयास मिळतात. या सरत्या वर्षाने आपल्याला काय दिले? आणि येणारे नवीन वर्ष काय घेऊन येणार? असा प्रश्नांची एक शृंखला अनेक व्यक्तींच्या पुढे उभा असते. चालू वर्षामध्ये घडलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांच्या आठवणी, अनुभव मनी बाळगून या वर्षाला निरोप दिला जातो. 
आज या घडीला आपण कोणत्याही व्यक्तीला एक प्रश्न करून पहा तो म्हणजे, “या सरत्या वर्षाने दिलेले सुखद आणि दु:खद अनुभव सांगा.” असा प्रश्न केला तर ज्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक दृष्टीकोन ठासून भरलेला असतो तो व्यक्ती या सरत्या वर्षाला नक्कीच वाईट अनुभव देणारे वर्ष म्हणून सांगतो त्याच बरोबर या वर्षभरात घडलेल्या अनेक वाईट किंवा दु:खद प्रसंगाचा पाढाच वाचायला सुरु करतो. प्रसंगी काही व्यक्ती तर बोलतात कि आता पर्यंतच्या जगण्यातील सर्वात वाईट आणि क्लेशदायक वर्ष म्हणजे हे सरते वर्ष होय.
परंतु ज्या व्यक्तींच्या मध्ये सकारात्मक दृष्टीकोन असतो त्या व्यक्ती सरत्या वर्षामध्ये घडलेल्या चांगले प्रसंग त्याच बरोबर अनेक सकारात्मक घडलेल्या गोष्टी नक्कीच सांगतात. वर्षभरात स्वत:मध्ये झालेले चांगले बदल त्याच बरोबर त्यांच्या हातून घडलेल्या चांगल्या कार्याची माहिती देतील. कदाचित याच चांगल्या कार्यामुळे सरत्या वर्षातील अनुभव उराशी बाळगून नवीन येऊ घातलेल्या वर्षामध्ये आपण नक्की काय करणार आहोत हे देखील मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सांगतील.
या सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील सदस्य सोबत किंवा संपूर्ण परिवारासोबत रहावे. तसेच किमान या वर्षभरामध्ये झालेल्या चांगल्या आठवणी, प्रसंग, घटना, त्याच बरोबर परिवारातील सर्व सदस्यांच्या मधील चांगले गुणांना उजाळा द्यावा. जेणे करून येणारे नवीन वर्ष प्रत्येक सदस्याला उत्साहाने आनंदाने तसेच सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन जगता येईल असा अनुभव या शेवटच्या दिवशी दिला पाहिजे.
परिवारातील एकता तसेच एकतेचे महत्व याच दिवशी समजून सांगितले पाहिजे. सरत्या वर्षभरात आपण परिवारातील एकता कशा प्रकारे जोपासली आणि त्याचा फायदा अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाताना कशा प्रकारे झाला. याची देखील उजळणी करावी. जेणे करून येणारी नवीन पिढीला परीवारात्तील एकतेचे महत्व समजू शकेल. अनेक लहान मोठ्या समस्या असतील किंवा चांगले कार्य असेल त्यावेळी परिवारातील सदस्यांची होणारी मदत लक्षात ठेवली पाहिजे. परिवारातील प्रत्येक सदस्याची भूमिका आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे सर्वांच्या लक्षात येईल. 
आपल्या परिवारासोबत आजचा वर्षअखेर सर्वांनी सोबत घालवावा. आणि येणारे नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने प्रेमाने आणि कुटुंबातील व्यक्तीसोबत करावे. यामुळे परिवारातील प्रत्येकामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल. त्याचा फायदा जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जाताना नक्कीच होईल.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    इमेल – mangeshvkoli@gmail.com

1 comment:

  1. जगाच्या नाकाशात आपल्या देशाचे नाव भारताच राहिल याचि काळजी नाव्या वर्षात घ्या

    ReplyDelete