Wednesday, December 25, 2019

सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा “यशाचा मार्ग”

सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा “यशाचा मार्ग”
         माझे मित्र मंगेश विठ्ठल कोळी यांनी नेहमीप्रमाणे ह्या पुस्तकाची प्रकाशनापूर्वी एक प्रत अवलोकनार्थ दिली. तेव्हाच खरा “यशाचा मार्ग” दृष्टीपथात आला, लेखनाची प्रेरणा मिळाली. एखाद्या धन्वंतरीजवळ कोणत्याही असाध्य वाटणार्‍या व्याधीवर रामबाण मात्रा असावी त्याप्रमाणे प्रत्येक मनोव्याधी ग्रस्तावर अचूक उपाय या पुस्तकातून सापडतो. मंगेश यांचा सूक्ष्म अभ्यास, मानव जीवनात सर्वांगीण विकास व संस्कृतीचे भान ठेवून अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. ही परिवर्तनाची दिशाच ठरावी. 
व्यक्तिपरत्वे, प्रसंगपरत्वे विविध उपायांनी यशस्वितेकडे आत्मविश्वासाने जाण्याचा मार्ग प्रकाशमान होतो. मानवरूपी खडकाळ महासागरात दीपस्तंभाचे जे कार्य असते तसे यशाचा प्रशस्त मार्ग निर्माण केला आहे. अनेक साधू-संत, थोर महात्मे यांच्या जीवनातील प्रसंग, काव्य, अभंग, प्रहसने यांचा तसेच अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत यांनी सांगितलेले सिद्धांत, तत्त्व यांचा पुरेपूर उपयोग करून ह्या पुस्तकाचे एक आगळे रूप वाचकांपुढे ठेवण्यात मंगेश नक्कीच यशस्वी झाले आहेत.
विषय अनेक, ग्रंथ अनेक, ग्रंथकारही अनेक, आपले आयुष्य अल्प, वेळ थोडा, बुद्धी बेताची. काय करावे, काय शिकावे, कोणाकडे जावे? अभ्यास, योग्य सराव, परिवर्तनातील बदल अशा द्विधा अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी काय करू नये याची योग्य निदान या पुस्तकाच्या माध्यमातून मंगेश कोळी आत्मविश्वासाने करतात. धैर्य आणि संयम मिळविण्यासाठी काय करावे?
संत कबीर म्हणतात - 
कारज धीरे होत है, काहे होत अधीर |
सयम पाय तरुवर फले,केतक सीचो नीर ||
योग्य काळ आल्याशिवाय कोणतेही कार्य घडून येत नाही. योग्य काळ येईपर्यंतची आकुलता किंवा अधीरता व्यर्थ असते. वृक्षांना कितीही पाणी घातले तरी फळ यायचे तेव्हाच येणार! मनुष्य सुखासाठी आपल्या स्वभावभूत गुण विकासाकडे तितके लक्ष देत नाही जितके तो बाह्य भोगोपभोगाची साधने गोळा करण्याकडे देतो. मंगेश यांच्या सांगण्याचा अर्थ आणि हेतू यांचा सूज्ञ वाचक यांचा नक्कीच विचार करतील. 
खरे सांगू का? सुखाने हुरळून आणि दुःखाने होरपळून व्याकूळ होण्यापेक्षा विवेकशील बनून दोन्ही प्रसंगी समतोल असणे अधिक श्रेयस्कर ठरत नाही का?
मंगेश म्हणतात -
चांगले कार्य करीत रहा म्हणजे त्याचे फल आनंद, सुख, मान-सन्मान, यश:कीर्ती या स्वरुपात मिळत राहणारच. हा निसर्गाचा नियम आहे हे विसरू नका.
प्रसन्नेन सदा भाव्य विषन्नेन न कदाचन |
विषाद-परीभूतात्मा सर्वत्र परीभूयते ||
माणसाने नेहमी प्रसन्नचित्त, हसत मुख असले पाहिजे. मागे संसार आहे, संस्था आहे, जबाबदार्‍या आहेत, अडचणी आहेत हे सगळे खरे! पण त्या सर्वातून पार पडताना खेळकर आणि आनंदीवृत्तीची गल्लत होऊ देता कामा नये. मला सांगा - संतापून तरी काय फायदा? ही आदळआपट, हा आरडाओरडा, हा त्रागा, हा संताप, ही निराशा, ही उदासीनता, उव्दिगनता कशासाठी? निष्कारण स्वत:ही दु:खी व्हावयाचे व संबंधित व्यक्तीचाही आनंद घालवून बसायचे.
माझे ऐका - 
अप्रसन्नता ही वांझोटी आहे, सार्‍या विद्या-कला, सारे ज्ञान-विज्ञान, सगळा ब्रह्मानंद जन्म घेतात केवळ या प्रसन्नते पोटी. मंगेश कोळी हा यशाचा मार्ग, चिंतन मनन करून कळकळीने-तळमळीने आपल्यासाठी प्रकाशात आणत आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळेल असा मला आत्मविश्वास आहे. हे पुस्तक प्रकाशनामागे प्रकाशक आणि त्यांचे कुटुंबिजन अत्यंत परिश्रमाने झटले, यासर्वाच्या परिश्रमाचे हे सुंदर सुगंधित फुल आज उमलत आहे. त्याचे हृदयापासून स्वागत करूया.
-      प्रा. प्रवीणकुमार वैद्य. (प्राध्यापक, लेखक, समीक्षक)
पुस्तकाचे नाव – यशाचा मार्ग
लेखकाचे नाव – श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
मूल्य – २००/-
प्रकाशन – कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
संपर्क – ९०२८७१३८२०, ०९९७५८७३५६९

2 comments:

  1. छान लेख प्रसन्नता सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा

    ReplyDelete