Sunday, June 7, 2020

जे मनात, तेच तोंडात....

आपल्या मराठीमध्ये अनेक चांगल्या म्हणी उपलब्ध आहेत. बऱ्याच म्हणी आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे हे कमीतकमी शब्दामध्ये सांगण्याचे काम करतात. जसे की, "ढवळ्या शेजारी बांधला पोहळा वाण नाही पण गुण लागला." "जे मन चिंती ते वैरी पण न चिंती." अशा प्रकारच्या म्हणी उच्चारताच आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते.
आपल्या आजूबाजूला जे वातावरण असते तसेच आपण घडत असतो. हे सर्वांनी ठाऊक आहे. आपण ज्या व्यक्तींच्या सानिध्यात राहतो किंवा बराच वेळ ज्या ठिकाणी काम करतो, त्याचा परिणाम आपल्या वागण्यातून, बोलण्यातून दिसून येतो. ज्या व्यक्तींच्या सानिध्यात आपण वावरतो त्यांचे बोलणे, चालणे, वागणे, त्यांचा मानसिक, वैचारिक परिणाम आपल्यावर देखील होतो. एखादी मुलगी सतत मुलांच्यामध्ये वावरत असेल तर मुलांच्या तोंडातून निघणारे शब्द त्या मुलीच्या तोंडातून आपसूकच बाहेर पडतात. (मग त्या शिव्या असोत, दादागिरी असो, उलट, उद्धट बोलणे असो वा इतर.) काही ठिकाणी मुलांच्या बाबतीत ही मुलींच्या वातावरणात राहिल्यास त्यांच्या तोंडातून येणारे अनेक शब्द मुलांच्या तोंडातून बाहेर पडतात. (मंजुळ आवाज, हावभाव, इतर.)
मानसशास्त्र सांगते की, आपल्या संगत आणि सोबत कोणाची आहे, यावर आपली वैचारिक शक्ती निर्माण होते. आपल्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन निर्माण होत असतो. ते कसे हे आपण पुढील उदाहरणातून पाहूया.
एक बांगड्या विकणारे काका होते. गावोगावी फिरून बांगड्या विकायचे. त्यांच्याकडं एक मोठी बांबूची टोपली होती. टोपली डोक्यावर घेऊन इकडून तिकडे जायचे. त्यामध्ये ते बांगड्या अशा पद्धतीने रचायचे की वरचे कापड काढल्यावर सर्व प्रकारच्या बांगड्या ग्राहकांना दिसायच्या. हळूहळू बांगड्यांची विविधता वाढू लागली आणि टोपलीचा आकार वाढू लागला. आता सगळी विविधता त्या टोपलीत मावेना म्हणून त्यांनी एक गाढवी विकत घेतली. तिच्या पाठीवर ठेवता येईल अशी रचना बनवली. बांगडीवाले काका आणि राणी नाव ठेवलेली त्यांची गाढवी गावोगावी फिरताना दिसू लागले. यामध्ये असलेला सर्वात गमतीचा भाग म्हणजे काकांचे राणीशी चाललेले संभाषण. 
पुढे दगड दिसला तर ते म्हणायचे," राणी बेटी, पुढे दगड आहे, थोडे बाजूने चाल."
कधी ती खूपच हळू चालू लागली तर म्हणायचे," अग राणी, थोडे लवकर पाय उचल, गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाहत आहेत."
राणी कधी वेगाने जाऊ लागली, जे फारच क्वचित व्हायचे तर म्हणायचे," काय बेटी, आज काय हरीण झालीस का? जरा जपून पाय टाक. बांगड्या फुटतील ना!" ते इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात ते काय गाढवीला कळत असेल का याचे आश्चर्य सर्वांना वाटायचे.
एक दिवस एका आजीने त्यांना असे बोलत चालताना पाहिले आणि विचारले, "बाकीचे जे लोक गाढव पाळतात, ते हातात काठी ठेवतात, अधूनमधून गाढवाला मारतात, शिव्या देतात, ओरडतात हे आम्ही पाहिले आहे. पण गाढवीला राणी बेटी म्हणणारे, इतके गोड बोलणारे तुम्ही पहिलेच दिसता. असे कसे काय?"
"आजी, तुम्हाला सांगू का? माझा व्यवसाय आहे बांगड्या विकण्याचा आणि भरण्याचा. माझा संबंध येतो मुली आणि बायकांशी. मी जर राणीला गाढवी म्हणायला लागलो, शिव्या द्यायला लागलो तर माझ्या तोंडात तेच शब्द बसतील. एकदा कुठलाही शब्द आपल्या तोंडात बसला तर अनवधानाने तो कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही. मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील. मी चुकून असा शब्द गावातल्या मुलींशी, सूनांशी, बायकांशी बोललो तर गावकरी माझे काय करतील? म्हणून मी माझ्या तोंडातून कधीच चुकीचा शब्द येवू देत नाही. माझ्या तोंडाला, मनाला अशा शब्दांची सवयच लागू देत नाही."
ही गोष्ट फक्त धंद्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त, आवश्यक आहे. आपण कोणतेही शब्द उच्चारत असताना ते शब्द आपल्या फक्त तोंडात असतात असे नाही तर ते आपल्या मनात, विचारात खोलवर कायमचे कोरलेले असतात. आणि कोणत्या तरी अशाच वेळ अनावधानाने ते बाहेर पडतात आणि आपली ओळख कायमची तशीच होते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोण आहेत, त्यांचा वैचारिक आणि मानसिक दृष्टिकोन काय आहे हे नक्की पहा. काही व्यक्ती चुकीच्या वाटत असतील तर त्यांच्यापासून थोडंस दूर राहा. म्हणजे आपला दृष्टिकोन आपोआपच बदलले.
- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. 9028713820
- ईमेल mangeshvkoli@gmail.com

6 comments:

  1. खुप छान...!आपल्या बोलण्यावर आजूबाजूच्या वातावरणचा खूपच परिणाम होतो...

    ReplyDelete
  2. Very true �� there is power in the words

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Best sir आपले विचारच खूप सुंदर आहेत म्हणूनच आपले लेखन प्रभावशाली होते

    ReplyDelete