Wednesday, February 8, 2017

विधान भवन ग्रंथालय

     आज मुंबईमध्ये येऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले होते. 26 जानेवारीच्या पूर्व संध्येला मंत्रालय इमारती बरोबरच विधान भवन इमारत सुद्धा आकर्षक रोषणाईने उजळून निघाले होते. विधान भवन इमारत बाहेरून पाहिली तर एक अजरामर कला कुसरतेचा अलौकिक नमुनाच आहे. इमारतीचे देखणे रूप आणि अवाढव्यपणा सर्वांनाच भुरळ घालतो. मला ही बाहेरून पाहिल्यानंतर आतमध्ये जाऊन पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. मुंबईत असे पर्यंत एकदा तरी ही इमारत, त्यामध्ये चालणारे कामकाज जवळून पाहण्याची तीव्र इच्छा आज पूर्ण झाली.

      विधान मंडळ सचिवालयमध्ये असणाऱ्या ग्रंथालयाबद्दल खूप काही गोष्टी ऐकल्या होत्या. तिकडे असणाऱ्या पुस्तकांची अनेक अधिवेशन काळात बऱ्याच आमदारांच्या भाषणामध्ये या ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या पुस्तकातून वेळोवेळी संदर्भ घेतलेला ऐकला होता. त्याच बरोबर अनेक व्यक्ती संशोधन करण्यासाठी आणि संदर्भासाठी या ग्रंथालयातील पुस्तकांचा उत्तम पद्धतीने उपयोग केला जातो. असे समृद्ध ग्रंथालय पाहण्याची उत्सुकता वाढली होती. मी स्वतः लिहिलेली पुस्तके या ग्रंथालयात असावे अशी खूप वर्षांपासूनची इच्छा होती.

      स्वतः लिहिलेली पुस्तके घेऊन विधान भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करत असताना येथील सुरक्षेची जबाबदारी असणारे प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित काळजीपूर्वक तपासून पाठवत होते. त्या पद्धतीने माझीही तपासणी झाली. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पाचव्या मजल्यावर असणारे भव्यदिव्य आणि आटोपशीर पद्धतीने ठेवलेल्या पुस्तकांना पाहून कोणत्याही वाचकाला समाधान मिळेल. ग्रंथालयामध्ये तांत्रिक सहायक श्री. नि.ब. वडनेरकर सरांना भेटलो. त्यांना सांगितले की, मी स्वतः लिहिलेली *यशोमंदिर* आणि *यशोशिखर* विधान भवनाच्या या ग्रंथालयामध्ये भेट द्यावयाची संकल्पना सांगितली.

      वडनेरकर सरांनी माझी विनंती मान्य केली. त्याचबरोबर ग्रंथालय फिरून पाहता येईल का? असा प्रश्न करताच त्यांनी आनंदी चेहऱ्याने होकार दिला. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला हि मिळालेली संधी ग्रंथालयातील असणाऱ्या पुस्तकांची पाहणी करण्यास सुरुवात केली. या ग्रंथालयामध्ये 80 हजारांहून अधिक पुस्तकांची संख्या असणारे, प्रत्येक विषयाशी संबंधित असणाऱ्या पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे. तसेच विषयानुसार पुस्तकांची मांडणी, दिशा आणि पुस्तकांची मांडणी केलेले फलक, योग्य ती बैठक आणि प्रत्येक पुस्तकावरती विधी मंडळ ग्रंथालयाचे लेबल त्याच्यावर चिकटवलेले होते. त्या प्रत्येक पुस्तकाची नोंदणी असणारे क्रमांक स्पष्टपणे दिसत होते आणि त्या क्रमांकाची नोंद चोखपणे ठेवलेली होती. कोणतेही पुस्तक वाचकाला वाचण्यासाठी दिले जात असताना त्या व्यक्तीच्या नावाची नोंद हि घेतली जाते. आजपर्यंत मी पाहिलेल्या ग्रंथालयातील हे खूप भव्यदिव्य असे आहे.

      ग्रंथालय फिरून सर्व पुस्तकांवर नजर फिरवत असताना मंत्रमुग्ध झालो होतो. बऱ्याच वर्षांपूर्वी फक्त नावे ऐकली होती ती पुस्तके येथे पाहून मनाला अत्यानंद झाला. थोडा वेळ ती पुस्तके चालण्यात स्वतः मग्न झालो. एक एक पाऊल पुढे चालताना या समृद्ध, भव्यदिव्य, आटोपशीर मांडणी केलेली पुस्तके मनात घर करून राहत होती. शेवटी वेळे अभावी मी तिकडून बाहेर पडत असताना जड अंतकरणाने विधी मंडळ ग्रंथालयाचा निरोप घेतला. मी शरीराने तिकडून बाहेर पडलो असलो तरी माझ्या मनात अजून हि तिकडच्या पुस्तकांची छायाचित्रे ताजीतवानी आहेत. माझ्या जीवनातील अविस्मरणीय असा आजचा दिवस ठरला.

- श्री. मंगेश विठ्ठल कोळी
९०२८७१३८२०

No comments:

Post a Comment