Friday, December 8, 2017

हम दो.. हमारे दो..


“हम दो, हमारे दो” हे शब्द कानावर पडताच अनेकांना कुटुंब नियोजनाची आठवण येते. काही वर्षापूर्वी देशाची वाढती लोकसंख्या पाहता शासनाने कुटुंब नियोजनाचे महत्व पटवून देत, ‘हम दो, हमारे दो’ या ब्रीद वाक्य तयार करून जनतेमध्ये कुटुंब नियोजन बाबत जागरूकता निर्माण केली. त्यानंतर देशामध्ये पोलिओ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने याच दोनचा पुन्हा वापर केला. त्यावेळी “दो बुंद जिंदगी के” हे ब्रीद वाक्य जनतेच्या मनावर रुजवत पोलिओ रोगाबद्दलची जनजागृती केली. याच वाक्यांचा जनतेच्या मनावर आणि एकंदरीत समाज परिवर्तनात उत्तम परिणाम दिसून आला.
अनेक प्रकारच्या जाहिरातींच्या बाबतीत ‘दो’ किंवा ‘दोन’ या शब्दला अनन्य साधारण महत्व आहे. याची अनेक उदाहरणे पहायला, ऐकायला मिळतात. ‘दोन वस्तू घेतले तर एक वस्तू फ्री’, किंवा एखाद्या ‘महागड्या वस्तूवर दोन छोट्या वस्तू फ्री’, ‘दोन साबणावर पेन फ्री’ वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या जाहिरांतीचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. छोट्या-छोट्या सवलतीतील सूट मिळवण्यासाठी अनेक वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच बरोबर आता ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अशा ऑनलाईन खरेदीसाठी महिन्यातील किंवा आठवड्यातील दोन-चार दिवस विशेष सूट दिली जाते.
आज समाजात ‘दोन’ या अंकाला चांगले दिवस आले आहेत. समाजातील प्रत्येक घराघरापर्यंत ‘दोन’चे महत्व वाढले आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा आता याची जणू सवई जडत चालल्या आहेत. अनेक घरात पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, घरातील वस्तूपासून ते गाडीपर्यंत ‘दोन’ ही संख्या वाढत आहे. कुटुंब नियोजनासाठी वापरले जाणारे ‘हम दो, हमारे दो’ हे वाक्य आता कुटुंबातील प्रत्येकाचे व्यसन होत आहे. पूर्वी कोठे तरी एक फोन असायचा मात्र सर्व माणसे एकमेकांशी जोडलेली असायची. परंतु आता घरातील प्रत्येकाकडे मोबाईल फोन उपलब्ध झाले आहेत.
घरातील एका व्यक्तीकडे ‘दोन’ मोबाईल आहेत असे चित्र आहे. परंतु प्रत्येक जण आता ‘दोन’ सीमकार्ड असणाऱ्या मोबाईल फोन असल्याशिवाय मोबाईल विकत घेत नाही. परंतु त्याची स्वत:ला असणारी गरज ओळखली पाहिजे. आज नवरा आणि बायको, आई-वडील आणि पाल्य यांच्यामधील सुसंवाद कमी झाल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. आज माणसापेक्षा मोबाईलवर जास्त अवलंबून राहण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. प्रत्येकाचा मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचा आहेत. त्याचे चार्जर वेगळे आहेत. हे ठीक आहे, परंतु मोबाईल चार्ज करण्यासाठी असणाऱ्या जागासुद्धा प्रत्येकाने फिक्स केल्या आहेत. जेवताना मोबाईल जवळ असावा, घरात सर्वांशी बोलताना मोबाईल जवळ असावा, एवढेच काय रात्री झोपताना नवरा बायकोच्यामध्ये मोबाईल ठेवलेले असतात.
मोबाईल ही काळाची गरज नक्कीच आहे, परंतु आज त्याचे व्यसन झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. याचा एकंदरीत मानवाच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. झोप पूर्ण न होणे, नैराश्य येणे, त्याच बरोबर अनेक आजारांना जवळ करण्यासाठी मोबाईल कारणीभूत ठरत आहे. हे सर्वाना कळत आहे, परंतु “कळत पण वळत नाही” या म्हणी प्रमाणे सर्वांचे वर्तन चालले आहे. याचा नक्कीच येणाऱ्या नवीन पिढीवर विपरीत परिणाम होईल. हा परिणाम टाळण्यासाठी मोबाईल ही फक्त गरज म्हणून वापरा त्याचे व्यसन होऊ देऊ नका.
आज मुलांच्या शाळेतील शिक्षणसुद्धा ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे लहान वयातच त्यांच्या हातात मोबाईल दिले जात आहेत. या मोबाईलवर मिळणाऱ्या शिक्षणाचा उपयोग वास्तववादी आयुष्यात कितपत होईल? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळ ठरवेल. ऑनलाईन शिक्षण पद्धतीला माझा विरोध नाही परंतु त्यापासून भविष्यातील उद्भवणाऱ्या असंख्य, असपष्ठ, विकारातून त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम याविषयी मनात खूपच भीतीदायक वातावरण निर्माण झालेले अनेक पालक मला समुपदेशन करताना भेटत आहेत. अनेक पालकांचा शिक्षण व्यवस्थे वरील विश्वास उडत चालला आहे. अनेक ठिकाणी या ऑनलाईन हम दो हमारे दो चा परिणाम खूपच वाईट होताना दिसतो आहे. यासर्व गोष्टींवर लवकरात लवकर उपाय निघून सर्वांचे मानसिक, शारीरिक, वैचारिक आयुष्य सुखकर होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या लेखणीला थोडी विश्रांती देतो...
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

3 comments:

  1. मंगेशजी उत्तम लिहिले आहेत . आज मोबाईलचे दुष्परिणाम जाणूनही कोणी त्या बद्दल बोलताना दिसणार नाहीत कारण आजचा दिवस आठवडा , महिना आणि वर्ष साजरे कार्यकगे आहे . बाकी चर्चा नको आहे . उत्तम मांडणी झेलीत अभिनंदन .
    प्राचार्य डॉ दीपक देशपांडे भिलवडी . 💐💐

    ReplyDelete