पेट्रो मिलिमाव हा रशियात सायबेरिया ह्या भागाच्या एक कोपऱ्यात राहणारा ८३
वर्षाचा एक जख्ख म्हातारा आहे. त्या गावात
आणि संपूर्ण जगात त्याची भाषा बोलणारा संपूर्ण पृथ्वीवरचा तो एकमेव मनुष्य आहे.
बोआ स्र ही अंदमान बेटावर राहणारी एक महिला. बोआचं २०१० साली निधन झालं. बोआ 'जेरु' नावाची भाषा
बोलायची. तज्ज्ञांच्या मते जेरु ही अंदमान बेटावर अनेक वर्षांपासून बोलली जाणारी
आणि जगातली सर्वात जुनी भाषा होती. होती म्हणायचं कारण म्हणजे ती भाषा फक्त बोआला
येत असे आणि बोआच्या निधनानंतर आता संपूर्ण विश्वात ह्या भाषेचा जाणकार कुणीही
राहिला नाहीये.
स्पूकान नावाची एक जमात आहे. हे स्पूकान म्हणजे अमेरिकेच्या मूलनिवासी
लोकांपैकी एक. वॉशिंग्टनजवळ स्पूकान व्हॅली ह्या भागात ही जमात वास्तव्य करून आहे.
त्यांची 'सलिश' नावाची भाषा आहे. आजमितीला जगात ही सलिश भाषा सहजपणे बोलणारे फक्त ५ ते ६ लोकं
शिल्लक आहेत.
जगभरात दुर्गम भागात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांची ही प्रातिनिधिक उदाहरणं
आहेत.
भाषांच्या बाबतीत काही काही आकडे फार सुरस आहेत.
आजमितीला जगभरात ६५०० ते ७००० भाषा आणि बोली आहेत. २००१ च्या माहितीनुसार
संपूर्ण भारतात १२२ प्रमुख आणि १५०० च्या आसपास इतर बोली भाषा होत्या. थोडक्यात
जगाच्या २० ते २५ टक्के भाषेतले संवाद भारतीय बोलींमध्ये होतात.
नायजेरिया हा एक छोटासा देश. ह्या देशात ३६ राज्य आहेत आणि ह्या ३६
राज्यांमध्ये जवळपास ५५० वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात.
पापा न्यू गिनी हाही असाच छोटासा प्रदेश. ह्या प्रदेशात तब्बल ८०० वेगवेगळ्या
भाषा अथवा बोली आहेत.
ही आणि अशी अनेक प्रकारची आकडेवारी प्रांतवार भाषावार काढता येऊ शकेल.
अभ्यासकांच्या मते जगाच्या लोकसंख्येच्या ५०% जनता इंग्रजी, मंडारीन, हिंदी, स्पॅनिश अश्या
प्रमुख समजल्या जाणाऱ्या ५० भाषा बोलते तर उर्वरीत ५० टक्के जनतेचा संवाद उरलेल्या
६९५० भाषांमध्ये होतो.
आकडेवारी म्हणून आज सात एक हजार भाषा अस्तित्वात असल्या तरी भाषांचे संशोधन
करणाऱ्यांनी केलेलं भविष्यकथन फारसं आश्वासक नाही. उलट ते फार धोकादायकच आहे. आज
ज्या वेगाने भाषा किंवा बोली नष्ट होताहेत त्या वेगाने येत्या नव्वद वर्षात
जगातल्या ९०% बोली नष्ट झालेल्या असतील. म्हणजे इसवीसन २११० मध्ये जगात फक्त ६००
भाषा शिल्लक राहिल्या असतील. साधं गणित वापरलं तर दर महिन्याला कमीतकमी पाच
बोलीभाषा गतप्राण झाल्याशिवाय हे शक्य नाही. आणि ती फक्त भिती नाहीये, खरोखरच तसं होत
आहे. पहिल्या तीन परिच्छेदात दिलेली उदाहरणं त्याचंच द्योतक आहे.
शास्त्रज्ञांनी मांडलेलं ह्या पुढचं विचार करायला लावणारं भविष्य म्हणजे
इसवीसन ३००० साली जगात फक्त इंग्लिश, मंडरीन आणि
स्पॅनिश ह्या तीनच भाषा शिल्लक असतील. इतर ६९९७ भाषा कदाचित संग्रहालयात सापडतील.
हा लेख ज्या मराठी भाषेत आहे ती भाषा, जी आपण भारतात
वावरताना सर्रास वापरतो ती हिंदी भाषा, आपल्या
अनेकांची लाडकी संस्कृत किंवा उर्दू ह्याही कागदावर जुन्या हस्तलिखिताप्रमाणे धूळ
खात पडल्या असतील. जापनीज, कोरियन, मलय, पुष्तु, स्वाहिली, डच, जर्मन, पोलिश, बर्मीज, इटालियन, फ्रेंच ह्या आणि अश्या अनेक भाषा लयाला गेलेल्या असतील. बोलींपासून लुप्त
होण्याची झालेली सुरवात हळूहळू भाषांनाही ग्रस्त करुन टाकेल.
भाषा का नष्ट होतात?
सर्वसामान्य मनुष्य उपजीविका शोधण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडतो. कधी इतर
राज्यांत, कधी इतर देशांत स्थलांतरीत होतो. बऱ्याचदा तिथेच स्थाईक होतो. मग नवीन येणारी
पिढी नवी भाषा स्वीकारते. एक दोन पिढ्या आदली आणि पुढची अश्या दोन्ही भाषा बोलतात.
नंतरच्या पिढ्या मात्र नवीन भाषेत रुळतात. हे स्थलांतर देशांमध्ये होत असलं तर
मातृभाषेशी संबंध उरत नाही. एका कुटुंबाची भाषा बदलते आणि मग अश्या समूहांचीसुद्धा
भाषा बदलून जाते.
अनेक भाषा लिखित स्वरूपात नसतात, त्यांची स्वतः
ची अशी लिपी नसते. ती भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नीटशी पोहोचत नाही. मग
त्या भाषांचे कोणतेही अवशेष उरत नाहीत. सिंधी हे असं उदाहरण आहे. सिंधीसाठी अरेबिक
आणि गुरुमुखी ह्या लिपी वापरल्या जातात. मात्र आजकाल महाराष्ट्रात सिंधी ही
देवनागरीत शिकवली जाते. पिढी दर पिढी हा बदल होत राहतो आणि भाषा हळूहळू नाहीशी
होते.
सध्या जगभरात इंग्रजीचा अतिवापर हे भाषा अस्तंगत होण्याचं एक प्रमुख कारण
मानलं जातंय. आजच्या तारखेला जगभरात २०० कोटी लोकं इंग्रजी शिकताहेत. ह्या
सर्वांच्या बोलीभाषा एक दिवस इंग्रजी गिळंकृत करेल अशी भिती काही शास्त्रज्ञांना
आहे.
आपल्याला मान्य होवो वा न होवो विज्ञानाचे,आजच्या घडीला
आर्थिक प्रगतीचे, उच्च शिक्षणाचे दरवाजे पाश्चात्य देशात उघडताहेत. क्रमवारीत अत्युच्च असलेली
विद्यापीठं इंग्लंड किंवा अमेरिकेत आहेत. त्यामुळे नवीन पिढीसमोर इच्छा असो वा नसो
इंग्रजी शिकण्यावाचून पर्याय राहत नाही. नवीन पिढी ही इंग्रजी फार लवकर शिकते आणि
मग एकेक करून एकेक मनुष्य आपल्या मातृभाषेपासून दुरावला जातो.
जो प्रभाव आज भारतात इंग्रजीचा आहे तोच शेजारच्या पाकिस्तानात मंडारीनचा होऊ
लागला आहे. चीनच्या प्रभावाखाली येणाऱ्या पाकिस्तानात मंडारीन ही पाकिस्तानी बोली
भाषांना मारक ठरायला सुरवात झालीय.
भाषा का जिवंत रहाव्यात?
भाषा हे कधीही फक्त संवादाचं माध्यम नसतं, भाषा ही अनेक
पिढ्यांच्या सृजनशीलतेचं प्रतीक असते. अनेक पिढ्यांनी आपल्या ज्ञानाद्वारे, आपल्या
अनुभवाद्वारे त्यात यथाशक्ती भर घातलेली असते. ती ती बोली समृद्ध केलेली असते.
भाषांच्या अंगाखांद्यावर त्या त्या समाजाची स्वतःची संस्कृती वाढलेली असते.
त्या संस्कृतीला स्वतःची अशी ओळख त्या भाषेने मिळालेली असते. भाषा लयाला जाऊ
लागल्या की हळूहळू संस्कृती लयाला जाऊ लागते. सोपं उदाहरण म्हणजे इंग्रजांनी
भारतात शिक्षण चालू करताना सर्वप्रथम इंग्रजी भाषा रुजवली. मातृभाषेतले विचार कमी
व्हायला लागले की संस्कृतीशी असलेली नाळ तुटायला वेळ लागत नाही.
भाषेत त्या त्या समाजाचं अनेक पिढ्यांनी मिळवलेलं ज्ञान जतन केलेलं असतं. अनेक
पिढ्यांचा अनुभव भाषेच्या एका धाग्याने बांधलेला असतो. भूगोलाचं, निसर्गाचं, इतिहासाचं
ज्ञान त्या त्या समूहाने वर्षानुवर्षे
सांभाळलेलं असतं. भाषेसोबत तेही नाहीसं व्हायला लागतं.
सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक भाषेला आपलं असं एक वेगळी साहित्यिक मूल्य
असतं. प्रत्येक भाषेचं सौंदर्य असतं, तिची नजाकत
असते. त्या त्या भाषांमध्ये निर्माण होणाऱ्या साहित्याने त्या भाषेचं सौंदर्य अधिक
खुलत जातं. वर्षानुवर्षे त्या साहित्यात अनेक पिढ्यांमधल्या अनेक लेखकांनी भर
घालून ते साहित्य समृद्ध केलेलं असतं.
सुषमा स्वराज्याचं एक भाषण ऐकण्यात आलं होतं.
त्यात त्यांनी एका संस्कृत नाटकाचा उल्लेख केलाय. नाटकात राजकुमाराच्या
ओठाला बाण लागून तो घायाळ होतो. नाटककाराने राजकुमाराच्या तोंडचे त्यापुढ्चे सर्व
संवाद एकही ओष्ठय शब्द न वापरता लिहिलेत. हे त्या भाषेचं सौंदर्य आहे. फ्रेंच आणि
इटालियन भाषांमध्ये गेयता आहे, ते त्या भाषांचं सौंदर्य आहे. उर्दू भाषेतला आब हे तिचं सौंदर्यस्थळ आहे, स्कॉटिश
लोकांचे इंग्रजीचे उच्चार वेगळे असतात, हे त्या भाषेचं
सौंदर्य आहे. पुलंनी जॉर्ज बरनॉड शॉचं पिग्मॅलियन अनुवादित करून ती फुलराणी
लिहिलं. एखादा अनुवाद तितकाच ताकदीचा होणं हे त्या भाषेचं सौंदर्य आहे आणि एखादा
अनुवाद करून मूळ भावना तितक्याच ताकदीने मांडल्या जात नसतील तर तेही मूळ भाषेचं
सौंदर्यस्थळ मानायला हवं.
हे ज्ञान, सौंदर्य टिकवण्यासाठी भाषा टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे.
भाषा कशा टिकवाव्या?
जागतिक किंवा स्तरावर सर्वसाधारणपणे ज्यांचा व्यापार, ज्यांची
अर्थव्यवस्था त्यांची भाषा हे सोपं समीकरण अस्तित्वात असतं. ज्या ब्रिटिशांनी जगावर
राज्य केलं त्यांची भाषा आज जगावर राज्य करते आहे.
ह्या व्यापारात भारत ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे खरंतर ग्राहकांची भाषा
जगाने बोलायला हवी. प्रत्यक्षात मात्र चित्रं उलट दिसतं. इंग्रजीच्या वेडापायी
ग्राहक विक्रेत्याची भाषा बोलताना दिसतात. चीनमध्ये ह्या उलट परिस्थिती आहे. तिथली
भाषा इतरांनी शिकायला सुरुवात केली आहे. आज चीनमध्येही इंग्रजी शिक्षणावर तितकाच
भर आहे. मात्र त्यासोबत चीन आपली भाषा सोडणार नाही, हेही खरेच.
इंग्रजी ह्या भाषेवर आक्षेप नाही, मात्र ह्यापायी
मातृभाषेपासून आपण लांब होत चालले आहोत.
ज्ञानाला कोणतीही भाषा नसते, असं मानलं जातं. परंतु इतर भाषांच्या
दुर्दैवाने आज विज्ञान हे इंग्रजीतच उपलब्ध आहे. इतर भाषांसाठी हे मारक आहे. हे
ज्ञान इतर भाषांमध्येही उपलब्ध झाल्यास इतर भाषाही टिकून राहातील.
हिब्रू भाषेच्या संवर्धनासाठी ज्यूंनी इस्राएलमध्ये केलेले प्रयत्न हे सरकारी
पातळीवर केल्या जाणाऱ्या उपक्रमाचं एक उत्तम उदाहरण आहे.
आर्थिक, जागतिक, व्यापारी वा सरकारी पातळीचा विचार बाजूला ठेवून कौटुंबिक पातळीवर आपण
भाषासंवर्धनासाठी काय करू शकतो हे फार महत्त्वाचं आहे.
संवर्धनाबाबतीत ऑस्ट्रेलियातल्या एका बेटाचं उदाहरण वाचायला मिळालं. ह्या
बेटावर फक्त चारशे लोकं राहतात आणि ते दहा वेगवेगळ्या भाषा बोलतात. तरीही त्यांची
भाषा शाबूत आहे कारण नवीन पिढीत पालक त्यांच्याशी त्याच भाषेत बोलतात. त्यांना
मातृभाषाच शिकवली जाते. आपसूक त्यांची भाषा तग धरून आहे.
भाषा कोणतीही असो घरी वा समाजात वावरताना आपल्या मातृभाषेत संवादाचा अट्टहास
असणं हे वैयक्तिक पातळीवर फार महत्त्वाचं आहे. भाषा आपोआप एखाद्या कोपऱ्यातून
लयाला जात नसते. तिची सुरवात आपल्या घरातून होते. त्यामुळे शिक्षण इंग्रजीत असलं
तरी घरी बोलताना आपलीच भाषा बोलण्याची जागरूकता पालकांनी दाखवायला हवी.
भारतात इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांशी घरी फक्त इंग्रजीतच बोललं जावं असा
अट्टाहास अनेक ठिकाणी अनेक शाळा आणि शिक्षक करत असतात. त्यायोगे मुलांचं इंग्रजी
सुधारण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा असतो. मात्र भाषाशास्त्रज्ञाना ह्या संशोधनात कुठेही पुरावा
अथवा तथ्य आढळलं नाहीये, ह्याची पालकांनी नोंद घ्यायला हवी.
दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये मुलांशी संवाद साधल्यास ती मुलं गोंधळून जातील
अशीही भीती व्यक्त केली जाते. मात्र छोट्या मुलांचा मेंदू हा एकापेक्षा जास्त भाषा
शिकण्यासाठी तयार(डिझाइण्ड) असतो. त्यामुळे ह्या भीतीलाही कुठेही आधार नाही.
शास्त्रज्ञांच्या मते एकापेक्षा जास्त भाषा बोलता येणाऱयांचा मेंदू जास्त
प्रगत होत असतो. शिवाय प्रश्नाचं निराकरण (प्रॉब्लेम सॉलविंग) करण्याची त्यांची
क्षमता इतरांपेक्षा अधिक चांगली असते.
एका भाषेतून सहजपणे दुसऱ्या भाषेत बोलायला सुरुवात करतो तेंव्हा त्याला
शास्त्रज्ञ इंग्रजीत 'कोड स्वीचिंग' म्हणतात. हे स्वीचिंग एकापेक्षा जास्त भाषा शिकणाऱ्या मुलांचा मेंदू अधिक
प्रगत करतं.
भारतीयांच्या सुदैवाने आपल्या कानावर एकापेक्षा जास्त भाषा कायम पडत असतात.
आपली मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी ह्या असतातच. त्यासोबत अनेकदा आपण शाळेत संस्कृत शिकतो.
मराठी लोकांना गुजराती, कोकणी शिकायला सोपी जाते. तामिळ, मल्याळम हे
एकमेकांच्या भाषेत सहज बोलतात. बंगाली आणि आसामी एकाच भाषेत एकमेकांशी नीट बोलू
शकतात. कन्नड आणि तेलगू ह्यांनाही एकमेकांच्या भाषा येत असतात. त्यामुळे मेंदूच्या
प्रगतीसाठी उपयोगी बहुभाषिकत्व आपल्याकडे फार सहज उपलब्ध आहे. त्यामुळे निदान
भारतीयांनी तरी एकमेकांशी भारतीय भाषांमध्येच संवाद साधायला हवा.
नवीन पिढ्यांसोबत नवीन शोध महत्वाचे असतात. मात्र भाषेच्या बाबतीत हे चक्र उलट
फिरताना दिसतंय. भाषा अधिक समृद्ध होण्याऐवजी लयाला जात आहेत.
आज अमेरिकेन लोकसंख्येच्या केवळ १९-२० टक्के लोकं एकापेक्षा जास्त भाषा
बोलतात. भारतात सुदैवाने अजूनही बरीच चांगली परिस्थिती आहे. पण भारतीयांचं
इंग्रजीचं आकर्षण असंच कायम राहिलं आणि घरात मातृभाषेऐवजी इंग्रजीचा सर्रास वापर
चालू राहिला तर आपल्याकडेही हीच गत व्हायला वेळ लागणार नाही.
भाषा सांभाळताना प्रेमाने राखली तर भाषेचे संवर्धन आपसूक होईल. अस्मिता
असण्यापेक्षा प्रेम असणं हे महत्त्वाचं आहे कारण अस्मिता ही दुराभिमानाकडे घेऊन
जाते, तर प्रेमात सृजनशीलता असते.
जगभरातील वैविध्य जतन करताना विविध भाषा राखल्या जाणं, हेही तितकंच
महत्वाचं आहे.
वेगवेगळ्या भाषांचं गोडधोडाने भरलेलं पंचपक्वान्नांचं, चौरस आहार
असलेलं सहज उपलब्ध असणारं पान नाकारून आपण सकाळ संध्याकाळ फक्त ब्रेड बटरचाच आग्रह
धरत राहिलो तर होणारं नुकसान आणि कर्मदारिद्र्य आपलंच असेल, हे लक्षात
ठेवायला हवं.
- सारंग लेले, आगाशी.
- श्री. मंगेश
विठ्ठल कोळी.
मो.- 9028713820 (My WhatsApp No.)
(वरील पोस्ट मी
लिहिलेली नाही, परंतु शेवटच्या काही ओळी मी लिहिलेल्या
आहेत. पोस्ट प्रेरणादायी आहे. म्हणून आपल्याला पाठवत
आहे.)