Friday, February 21, 2020

"महाराष्ट्र" चाललाय कोठे???


काही दिवसापूर्वीचे महाराष्ट्रातील वातावरण पाहिलं तर येणारा भविष्यकाळ अतिशय चिंताजनक, दु:खदायक, मानसिक विकृतीचा येईल असे मला वाटते. समाजातील दुषित होत चाललेलं वातावरण आणि सूड घेण्याच्या वाढती मानसिकता ही कुटुंबाच्या, समाजाच्या अन राज्याच्या हिताची आहे, असे वाटत नाहीत. घराबाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती पुन्हा घरामध्ये सुरक्षितपणे येईल, याची खात्री देता येत नाही. त्यातल्या त्यात महिलांच्या बाबतीत गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या वाईट, दुर्दैवी, लाजिरवाण्या गोष्टी आपण सर्वांनी ऐकल्या, पाहिल्या असतीलच. नक्की कसे वागावे, कसे जगावे, धोरणे कोणती असावी? ध्येय कोणते असावे? याचाच विसर पडला असल्याचे सुस्पष्ट जाणवत आहे.
काही दिवसांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येऊन ठेपली आहे. जयंती मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरी केली जाईल. जयंती साजरी करू नये, या मताचा मी नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार, कल्पक बुद्धी, अंगी असणारी विविध कौशल्ये किती आचरणात आणतात? असा प्रश्न विचारला तर अनेकांचे उत्तर ‘शून्य’ असे येईल. अनेक ठिकाणी भव्य, दिव्य मिरवणूका काढल्या जातील, मोठा कर्णकर्कश आवाज, त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांना लाजवेल अशा प्रकारचे गाणी, संगीत सर्वत्र ऐकायला, पाहायला मिळाले. त्या संगीताच्या तालावर लाज वाटावी अशी वेड्यावाकड्या शारीरिक हालचाली करून नाचणारी तरुणाई पाहिली की मला एक प्रश्न पडतो. तो म्हणजे, “छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन चूक तर नाही केली ना?”
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये कोणत्याही स्त्रीच्या अब्रूला धोका नव्हता. महिला सुरक्षित होत्या. काही ठिकाणी अपवादात्मक स्त्रीच्या अब्रूला काही इजा पोहचली तर महाराज कोणाचीही गय न करता कठोरातील कठोर शिक्षा सुनावत होते आणि त्याची अंमलबजावणी लगेच केली जात होती. हा खऱ्या अर्थाने केला जाणारा न्याय म्हणावा लागेल. (रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे.) रयतेला न्यायावरती एक जबर निष्ठा होती. म्हणून रयत शिवकार्यात आनंदाने सहभागी होत होती.
आजच्या गोर गरीब रयतेच्या लेकी-सुनांवर खेडोपाडी अन शहरांतसुद्धा अत्याचार अन बलात्कार होतात, पण शिवाजीचा वारसा सांगणारे अन उठल्या सुटल्या शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हात-पाय तोडायचे सोडा, कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा ‘मालदार’ तितक्या लवकर त्याची सुटका होते? का अटकच होत नाही?
स्वत:च्या नातेवाईकांच्या अन अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरूण घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचं नाव घ्यायला लागता तर त्याच शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे, शिवाजी आठवावा तो यासाठी.
२१व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील ‘पुरोगामी’, ‘न्यायी’ महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात अन बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करणाऱ्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जयजयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत, म्हणून सांगत फिरतात. समजा शिवाजी आज आला तर या शिवभक्तांचे काय करील?
शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला – रयतेला – आपले वाटत होते. खरं म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरविण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती? ज्या राज्यातील प्रजेला - सामान्य प्रजेला - बहुसंख्य प्रजेला - बहुजनाला हे राज्य आपले आहे असे वाटते, तर राज्य उत्तम समजावे.
आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो. या लोकशाही राज्यातील प्रजेला, बहुसंख्य – सर्वसामान्य प्रजेला हे राज्य आपले वाटते का? आपल्या देशात जे काही चालले आहे, ते आपल्यासाठी चालले आहे, असे बहुसंख्य जनतेला वाटते का? मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर “नाही” असे आहे. लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे, आपल्यासाठी चालले आहे असे वाटत नाही. ही त्यामागील सत्य भावना आहे.
आज या लोकशाही राज्यात आपण स्वच्छ, स्वतंत्र, मुक्त, सुरक्षित, आचार-विचार करू शकतो का? याचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’ हेच आहे. आपणाला जर मोठा बदल घडवायचा असेल, तर जिथे अन्याय होतो तेथे पेटून उठले पाहिजे. बोगस अफवा, आश्वासनांना बळी न पडता जे बोलले जाते ते घडते आहे का? याची चौकसबुद्धीने विचारणा करायला हवी. जे कोणाचे हात अन्याय करण्यासाठी उठतील त्याचे हात शरीरापासून कलम केले पाहिजेत. आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये अन्याय करणाऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा आणि तिही ताबडतोब झाली पाहिजे. म्हणजे पुढे कोणी अन्याय करण्याअगोदर शंभर वेळा विचार करेल. असे माझे प्रामाणिक मत आहे. तरच आपण नवा बदल घडवू शकतो, बदलता महाराष्ट्र घडवू शकतो.
(या लेखात ठळक केलेल्या ओळी “गोविंद पानसरे” लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकातील आहेत.)
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

10 comments:

  1. खुप सुंदर लिखाण. जनमानसातील तळमळ

    ReplyDelete
  2. श्री मंगेश होळी अत्यंत उत्तम असा लेख आपण लिहिला आहे याबाबतीत चारशे वर्षात आपल्या राज्यात एकही नाव घ्यावा असा नरपुंगव निर्माण झालेला नाही छत्रपती हे एकमेव छत्रपती त्यांचं आदर्श सोडून द्या पण एक टक्का अनुकरण जरी सत्ताधाऱ्यांनी केलं तरी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल भ्रष्टाचारमुक्त होईल न्याया तीत राज्य होईल अशा सर्व गोष्टी होणे शक्य आहे पण आज राज्यकर्ते केवळ छत्रपतींचे नाव मत मिळवण्यासाठी वापरतात ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे मंगेशी पुनश्च आपले अभिनंदन सुंदर लेख लिहिला आहे संपर्कात राहुयात प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी तालुका पलुस जिल्हा सांगली मंगेश कोळी वर नाव चुकलेला असल्यामुळे पुन्हा नाव लिहिले आहे

    ReplyDelete
  3. खूप छान लेख लिहला आहे मंगेश सर 🙏🏻

    ReplyDelete
  4. अतिशय मार्मिक लेख

    ReplyDelete
  5. अतिशय मार्मिक लेख

    ReplyDelete