Wednesday, March 11, 2020

मन सशक्त करा...



हा लेख लिहिण्या पाठीमागे कारण म्हणजे काल माझ्या जीवनात घडलेली घटना.
आज बऱ्याच दिवसानंतर मी माझ्या आतील अंतर्मनाची इच्छा शक्तीला जागरूक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा झालो. तेव्हा आतापासून पुढील जीवनात एक गोष्ट नक्की शिकलो आणि ती कायम आजमावणार आहे. आपले मन जोपर्यंत हार मनात नाही तो पर्यंत आपण प्रयत्न करणे सोडायचे नाही. आणखी एक गोष्ट काल मला चांगली शिकायला मिळाली ती म्हणजे आपल्या अंतर्मनावर इतर बाहेरच्या शक्तीचा, विचारांचा किंवा व्यक्तींचा तोपर्यंत परिणाम होत नाही जो पर्यंत आपले मन सशक्त आहे.
काल दिवसभर कामाचा ताणतणाव मोठ्या प्रमाणावर होता. सायंकाळी खूप थकल्यासारखे वाटत होते. सर्व काम आटोपून घरी निघण्याच्या तयारीत असताना आमच्या ऑफिसमधील विविध स्पर्धांचे आयोजन करणारे सर माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की आपल्या ऑफिस मध्ये सुरु असणाऱ्या कॅरमच्या स्पर्धेमध्ये आज माझी आणि माझ्या पार्टनरचा सामना आज खेळायचा आहे. खर तर मी आज खूप थकलो होतो परंतु आमच्या ऑफिसच्या डीन व त्यांच्या पार्टनर सोबत आम्हाला आजच सामना खेळणे आवश्यक होते.
मी माझ्या हातातील उरलेले थोडेसे काम पूर्ण केले आणि सामना खेळण्याच्या ठिकाणी गेलो. तिकडे सर्व तयारी झाली होती. ऑफिसच्या डीन बरोबर सामना खेळायचा म्हणून माझ्या मनात थोडीशी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सामन्याला सुरुवात झाली. काही डाव खेळल्यानंतर माझ्यातील न्यूनगंड वाढू लागला. समोर असणाऱ्या आणि सहजपणे सोंगट्या जाणाऱ्या सुद्धा मला व्यवस्थित खेळता येईनात. माझ्या लक्षात आले की माझ्यातील न्यूनगंड चांगलाच वाढला आहे.
खूप वेळ आमचा सामना चालू होता. आता सामना चांगलाच रंगला होता. एकदा डाव कसाबसा आम्ही जिंकलो की मनाला थोडसा आधार वाटायचा. ऑफिसच्या डीनचा सामना आहे म्हटल्यावर सामना पाहणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर होती. त्याच बरोबर कोणत्या पद्धतीने खेळायचे याचे सल्ले व मार्गदर्शन करणाऱ्यांची संख्या देखील होती. आमच्यापेक्षा डीनचा संघाला सपोर्ट करणाऱ्यांची संख्या खूप होती. सामना सुरु होऊन जवळपास एक तास ओलांडून गेला होता. माझ्यातील नकारात्मक भाव चांगलाच वाढला होता. आपण हा सामना जिंकू की नाही याची मनाला बोचणी सुरु झाली.
थोड्या वेळात कोणीतरी डीनला विचारले की सर तुम्ही चहा घेणार का?
सर हो म्हणाले.
मला वाटले हीच ती संधी आहे. जी आपल्यातील वाढता न्यूनगंड, नकारात्मक भाव कमी करेल. मी माझ्या जागेवरून उठलो, फ्रेश झालो. पाच मिनिट त्या खेळापासून आणि तिकडच्या वातावरणापासून थोडासा अलिप्त झालो. एका ठिकाणी एकांतात आलो आणि मानसशास्त्रातील मीच अनेकदा इतरांना सांगितलेली गोष्ट मला आठवली. ती म्हणजे, “जोपर्यंत तुमचे मन सशक्त आहे, तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही.” हे वाक्य मी मनातील मनात पाच सहा वेळा स्वत:ला सांगितले. माझ्यामध्ये वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला.
तो आत्मविश्वास सोबत घेऊन पुन्हा सामना खेळण्यासाठी बसलो. डीनच्या संघाला सपोर्ट करणाऱ्यांच्या संख्येत आता प्रचंड वाढ झाली होती आणि ही वाढ होणे साहजिकच आहे हे मी स्वत:ला समजावून सांगितले. “आपण जोपर्यंत जिंकत नाही, तोपर्यंत आपण हरलो नाही.” हे वाक्य आठवले आणि त्याच पद्धतीने पुन्हा सामना खेळायला सुरुवात केली. प्रचंड ताणतणावाच्या वातावरणात सुरु असणाऱ्या सामन्यात मी आणि माझा पार्टनर आम्ही दोघे एकटे पडलो होतो. परंतु माझे मन सशक्त असल्यामुळे माझ्यावर बाहेरील कोणत्याही गोष्टींचा परिणाम होत नव्हता हे मला आतून जाणवू लागले. मग मी सशक्त मनाने पुढील सामना खेळण्यास सुरुवात केली. जिंकण्यासाठी शेवटीच संधी आहे मी माझ्या मनाला ठणकावून सांगितले आणि कोणताही तणाव न घेता मी तो सामना खेळलो. त्या सामन्यामध्ये आम्ही विजयी ठरलो. तेव्हा मला स्वत:ला एक प्रकर्षाने जाणीव झाली. आपले मन जर सशक्त असेल तर बाहेरील कोणत्याही वातावरणाचा, न्युनगंडाचा, नकारात्मक विचार बोलणाऱ्यांचा आपल्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपले मन नेहमी सशक्त ठेवा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.


2 comments: