तुम्ही गुरु नावाचा चित्रपट पाहिला आहे का? धीरूभाई अंबानींच्या जीवानावरील चित्रपट प्रत्येक उद्योजकाने पाहावा व त्यातील काही डायलॉग बारकाईने समजून घ्यावेत. *“जब लोग तुम्हारे खिलाफ बोलने लगे,* *समझ लो तरक्की कर रहे हो,”* *“अगर पैसा बन सकता है, तो मैने बनाया है,”* *“किस बात से नाराज हो आप लोग,* *मेरी तरक्कीसे या मेरी तरक्की के तेजी से?”* *“मै बापू नहीं हूँ, मै बस अपना धंदा करना जानता हूँ,”* *“मुझे गोल्फ खेलना नही आता, घोडे की रेस भी नहीं खेलता हूँ,* *मैं अपने धंदे का मजबूत खिलाडी हूँ”* हे सर्व डायलॉग धीरूभाईंच्या जीवनचरित्र व विचारसरणीवर आधारित आहेत.
ज्याला आयुष्यात यशस्वी उद्योजक व्हायचे आहे व पैसा कमवायचा आहे, त्यांनी त्या तत्त्वज्ञानाचा (फिलॉसॉफी) अभ्यास करून समजून घेतले पाहिजे. एखाद्या, समाजात, राज्यात, भाऊबंधकीत, नातेवाईकात एखादा जण यश संपादन करतो, पैसा कमवतो, नाव कमवतो, गाड्या घेतो, बंगले बांधतो तेव्हा अशा व्यक्तीबद्दल त्याचे जवळचेच लोक जे आज मागे पडलेले असतात ते वाईट बोलायला सुरू करतात. त्याच्या वैयक्तिक किंवा व्यवसायिक गोष्टी शोधून काढून त्याबद्दल चहाड्या, चुगली, गॉसिप करतात. हे होत त्यांच्या वैफल्यातून, कारण आपल्यातीलच एकजण इतका पुढे निघून गेला व आपण मागे पडलो हे त्यांना सतत बोचत असते.
स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी यशस्वी माणसावर टीका करणे हा सोपा व फुकटचा मार्ग हे लोक स्वीकारतात. जेव्हा तुमच्याबद्दल असे लोक वाईट बोलायला लागतात. तेव्हा तुम्ही आनंद साजरा करा, कारण तुम्ही जीवनात जबरदस्त यशस्वी होत आहात याचा तो शुभसंकेत आहे. जर तुम्ही इतरांबद्दल त्यांच्या पाठीमागे वाईट बोलत असाल, तर तत्काळ स्वत:चे विचार तपासा, कारण हा गुण स्वतःच्या प्रगतीला इतका बाधक आहे, की विचार करण्याच्या दृष्टीने तुम्ही आंधळे झालेले असता. जेव्हा तुम्ही यशस्वी व्यक्तीकडे संपूर्ण सकारात्मक दृष्टीने बघाल, तेव्हाच त्याचे गुण तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. जो वेगाने प्रगती करतो तो समाजातील पारंपरिक बाबींना छेद देतो. रूढी, परंपरा बासनात टाकल्यामुळे लोक त्याच्यावर टीका करतात. तुम्ही काही नवीन कराल तेव्हा लोक तुम्हाला वेड्यात काढतील; पण हे लक्षात ठेवा वेडेच इतिहास घडवतात शहाणे तर वाचतात.
*‘लोग तो कहेंगे लोंगो का काम है कहना’* एखाद्या क्षेत्रात जर पैसा असेल, तर तो तुम्ही कमवलाच पाहिजे. जणू काही तो तुम्ही तुमचा हक्कच समजायला हवा. चांगले चाललेल्याच्या घरात लोक काड्या टाकतात. समाजाचा जास्त विचार करत बसला तर आयुष्य बाराच्या भावात गेलेच म्हणून समजा.
(वरील लेख मी लिहिलेला नाही, प्रेरणादायी आहे म्हणून आपणास पाठवत आहे.)