Sunday, July 12, 2020

"मानसिक शक्ती" जपून ठेवा.

     आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांमधून आपल्याला आपली मानसिक शक्ती निर्माण करण्यास मदत मिळत असते. परंतु बऱ्याच वेळा आपल्याकडून चुकून किंवा काही व्यक्तींच्या बाबतीत जाणीवपूर्वक मानसिक खच्चीकरण करण्याची अनेकांची सवय असते. या सवयीमुळे स्वतः च्या आणि इतरांच्या नजरेतून आपल्या विषयीचे मत मतांतर निर्माण होत असते. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे हे.
     थंडीचे दिवस होते, डिसेंबरचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवातीचा काळ असावा. हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, "तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?"
     तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे." अब्जाधीश म्हणाला, "थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो."
     थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील." अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला.
     सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला. परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता.
   अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिले होते, “साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती. परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली."
     जर आपण एखाद्याला दिलेला शब्द, आश्वासन, वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या गरीब, लाचार व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो. कोणाच्याही भावनांशी, अपेक्षांशी खेळू नका. एखाद्याच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तरी ठीक आहे, परंतु समोरच्या व्यक्तीला अपेक्षेवर ठेवू नका.
- मंगेश विठ्ठल कोळी.
मो.- 9028713820

7 comments:

  1. खुप छान विचार आहेत मंगेश भाऊ

    ReplyDelete
  2. जेवणाच आमंत्रण जेवल्यावर खर...मधुकर ..नाशिक अधिकारी

    ReplyDelete
  3. खुप छान विचार

    ReplyDelete
  4. खरं आहे. आपण सहज म्हणतो... करायचं होतं पण जमलं नाही. तेव्हा हे ज्याच्यासाठी असतं त्याला वेदना होतात. इतकं का अवघड असतात अशी कामे. ठरवलं तर चुटकीसरशी आवरती जातात...छान विचार मांडला. धन्यवाद!... अभिनंदन!!

    ReplyDelete