आज समुपदेशन करीत असताना एक खूप सुंदर गोष्टींचा शोध मला लागला. एक सुशिक्षित व्यक्ती ज्याच्याकडे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असून सुद्धा त्याचे मन मात्र उदास, खिन्न, निरुत्साही, नैराशेच्या छायेत गुरफटून गेले होते. आपण या नैराश्य रुपी संकटातून कधीच बाहेर पडू शकणार नाही, इतपत त्याची मानसिकता झाली होती. त्याच्या कोण्या मित्राने उत्तम समुपदेशक म्हणून माझे नाव त्याला सुचवले होते म्हणून तो माझ्याकडे आला होता. मी ठरवून दिलेल्या वेळेस आम्ही माझ्या समुपदेशनाच्या खोलीमध्ये भेटलो. भेटल्यानंतर सुरुवातीच्या संभाषणातून त्याचे नैराश्येने ग्रासलेले मन मला जाणवले. त्या व्यक्तीने स्वतःचा भूतकाळ, स्वतःची पार्श्वभूमी सांगितली. त्यातून त्या व्यक्तीने खूप प्रगती केल्याचे मला जाणवले. परंतु ती व्यक्ती मनापासून सुखी, आनंदी वाटत नव्हती. त्याचे एक कारण माझ्या लक्षात आले. भेटायला आलेली व्यक्ती शारीरिक दृष्ट्या सदृढ होती. भौतिक सर्व सुख देणाऱ्या वस्तू त्याच्याकडे होत्या. परंतु अंतर्मन सुखी नव्हते, याची त्या व्यक्तीला पुरेपुर जाणीव होती. उदासीनता, खिन्न झालेले मनाचे आनंदात, उत्साहात कसे रूपांतर करायचे हा प्रश्न घेऊन माझ्याकडे आली होती.
मी त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्या. मी त्यावरील उपाययोजना सांगण्यास सुरुवात केली. मी जसजसे त्याच्या मनाचे समाधान करत गेलो तसतसे त्याचे नैराशेच्या गर्द छायेत असणारे मन ताजेतवाने, आनंदी, उत्साही होऊ लागले. शेवटी मी त्या व्यक्तीला माझ्या वाचनात आलेलं उदाहरण सांगितले. ते उदाहरण असे की...
एका गावात फुटबॉलचा सामना चालू होता. लोकं, प्रेक्षक खेळाचा आनंद लुटत होते. तेव्हा रस्त्याने जाणारा एक व्यक्ती. काय झाले म्हणून उत्सुकतेने त्यात सामील झाला आणि पाहू लागला. तर खेळाडू फुटबॉल लाथेने मारत मैदानात टोलवाटोलवी करत होते.
त्या व्यक्तीला आश्र्चर्य वाटले. हे लोकं त्या चेंडूला लाथेने का मारत असतील बरे!
नाराजी व्यक्त करत त्याने जवळच्या एका जाणकारांना विचारले.
हे सर्व लोकं त्या चेंडूला का मारत आहेत? त्याची काय चूक आहे?
तो जाणकार व्यक्ती म्हणाला, त्या चेंडूची एकच चूक आहे की तो आतून पोकळ आहे.
जर तो चेंडू आतून भक्कम असता तर, या लोकांची काय बिशाद आहे त्याला लाथेने मारायची..!
आज माझ्या समोर बसलेल्या त्या व्यक्तीची हीच अवस्था झाली आहे. समाज बाह्यांगाने, भौतिक सुखाने तो भक्कम दिसत होता. त्यासाठी तो सतत कार्यरत होता. परंतु स्वतःच्या आत्मिक, मानसिक सुखपासून दूर गेला होता. परंतु तो भौतिक सुखाच्या मागे लागून तो आतून पोखरला गेला होता. त्यामुळेच आज ती व्यक्ती मानसिक दृष्ट्या कमकुवत होत चालली होती. आतून मजबूत व्हायला हवे. तरच आपण सुखी होऊ शकतो याची जाणीव मी त्याला करून दिली.
सर्व समुपदेशनाच्या शेवटी मला समजले की, आपल्या समाजामध्ये जवळपास सर्वच व्यक्तींना अशा समुपदेशनाची गरज आहे.
वरील उदाहरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात त्याचा वापर केला तर कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्याचे बळ, शक्ती ही इतर कोणाच्यात नसून ती फक्त आणि फक्त स्वतः मध्ये असते. हा आत्मविश्वास जरूर निर्माण होईल. याची मला नक्कीच खात्री आहे.
- श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. 9028713820