Sunday, November 15, 2015

बालदिनानिमित्त पालकांशी मुक्त संवाद

बालदिना निमित्त पालकांशी मुक्त संवाद
आज 14 नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. नेहरूंना लहान मुले विशेष प्रिय असायची त्यांना ज्या-ज्या वेळी रिकामा वेळ मिळत असे त्यावेळी ते मुलांशी गप्पा, गोष्टी, त्याच बरोबर त्याना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असत. याच कारणाने भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली. नेहरूनी  अनेक अनाथ तसेच आर्थिक दृष्या दुर्बल असणार्‍या लहान मुलांना मदत करून त्यांचे भविष्य उज्ज्वल बनविले आहे. परंतु आजची लहान पिढी ज्या प्रमाणे वाढत आहे त्याचा विचार करता त्यांचे भविष्य खूपच विदारक असल्याचा स्पष्ट होते. त्यासाठी काही उपाय योजना करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात या संदर्भातील हा छोटासा प्रयत्न आहे.
मराठीमध्ये एक म्हण आहे, ’’लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, आकार देईल तसा तो घडत असतो. ‘ परंतु या सिमेंटच्या जंगलामध्ये या मातीच्या गोळ्याची स्पर्धा वाढती आहे. त्याला स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर स्वतःला नारळाप्रमाणे कठिण बनवून जीवन जगता आले पाहिजे. म्हणजे बाहेरची कितीही संकटे आली तरी देखील सर्व संकटांना सामोरे जावून स्वतःला सिद्ध करून त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. आणि स्वतःच्या अंर्तमनातील ठरविलेले ध्येय पूर्ण करता आले पाहिजे. नारळ ज्याप्रमाणे वरून कठिण दिसत असला तरी देखील त्यातील पाणी आणि खोबरे यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नारळाला कठिण रहावे लागते त्याच प्रमाणे आज पालकांनी ज्या-ज्या वेळी आपले मुल चुकिच्या दिशेने जात असेल त्यावेळी त्याला रोखून थोडेसे कठिण निर्णय घेवून त्याच्या अंतर्गत असलेले ध्येय स्वच्छ आणि त्याच्यामधील आत्मविश्‍वास वाढविण्याचा प्रयत्न करायला हवा.
या वाढत्या महागाईमुळे कुटुंबातील आई-वडिलांना नोकरी किंवा व्यवसाय करणे गरजेचे झाले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या दहा-वीस वर्षामध्ये खूप बदल झाले आहेत. काहीशी अस्तीत्वात असलेली एकत्र कुटुंब पद्धती नाश पावत चालल्याचे दिसून येत आहे. आज पालक समाजाच्या दिखावेपणामुळे किंवा समाज काय म्हणेल त्यावर मोठ्या प्रमाणावर विशेष लक्ष केंद्रीत करून समाजात मान, प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी वाटेल ते करायला तयार झाले आहेत. परंतु घरामध्ये असणार्‍या मातीच्या गोळ्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळच उरत नाही. समाजात प्रतिष्ठा मिळण्यासाठी चाललेली धडपड स्वतःचे त्याच बरोबर कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य हरपून बसत आहे. त्याचा परिणाम मानसिक ताणतणाव वाढत आहे.
आज पालकांच्या अजवी अपेक्षा वाढत चालल्या आहेत समाजाला काय हवे, काय नको यापेक्षामुळे घरातील मातीच्या गोळ्या शारीरिक तसेच मानसिक दबाव टाकला जातो. अनेक पालक आपल्या मुलाची तुलना नेहमी इतरांशी करतात परंतु त्या मातीच्या गोळ्याचे एक स्वतंत्र अस्तित्व निमार्ण होऊ शकते याकडे मात्र साफ दुर्लक्ष होत असते. असे म्हणतात की, ‘‘नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की, हवी असलेली माणसे गमावण्याची वेळ येते.‘ आणि हे तितकेच तथ्य आहे. अनेक पालकांच्या अशाच अपेक्षांचे प्रमाण आज समाजामध्ये वाढत चालल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.
घरातील मातीच्या गोळ्याच्या तुम्ही आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या पाठी लागला आहात परंतु त्याच्या शारीरिकतेचा त्याच बरोबर मानसिक स्वस्थ्याकडे दुर्लक्ष होत आहे. इतर काय म्हणतील किंवा इतरांच्या काय अपेक्षा आहेत अशा गोष्टींचा अनेक पालक विचार करतात. काही दिवसांपर्वी एक पालकाने चार लाखांची नवी गाडी घेतली घरी आले. घरामध्ये त्यांचा मातीचा गोळा वाट पाहत होता. सहा वर्षाचा मातीचा गोळा वडिल नवी गाडी घेवून आल्याचे पाहताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला गाडी पाहून तो आनंदाने उड्या मारू लागला. त्याच्या बरोबर सर्व कुटुंबमध्ये आनंदाचे वातावरण होते. नव्या गाडीमध्ये सर्वजण फिरायला जाण्याचा बेत ठरला. वडिल घरातील सामान गाडीत ठेवत होते. त्या मातीच्या गोळ्याने एक चांगला कोचीचा दगड हातात घेतला नुकतच शाळेत जावू लागलेल्या त्या मातीच्या गोळ्याने नव्या गाडीवर त्या कोचीच्या दगडाने काहीतरी लिहित होते. तेवढ्यात वडिल घरातून पाहतात आता कोठे नवी गाडी आणली आहे आणि ती खराब करत आहे हे पाहताच वडिलांचा राग अनावर झाल्याने त्यांच्या हातातील वस्तूने जोरात त्या मुलाच्या हातावर मारतात ते मुल रडायला लागते. काय झाले म्हणून घरातील सर्वजण धावत येतात तसे पाहतात तर काय मुलाचा हात गाडीवर होता आणि हातात तसाच कोचीचा दगड होता हात पूर्ण रक्ताने माखला होता. पटकन कोणी तरी त्या मुलाला उचलून दवाखान्यात घेवून जातात तिकडे गेल्यावर समजते की, हातावर झालेल्या आघातामुळे मुलाचा हात कायमचा निकामी झाला आहे हात मनगटातून कापावा लागला. नंतर थोड्या वेळाने वडिलांनाही वाईट वाटले ते गाडी जवळ गेले आणि पाहिल मुल काय करत होते ते पाहून वडिल मोठमोठ्याने रडू लागले कारण त्या मुलाने त्या गाडीवर लिहिले होते, माझे पपा. एका वस्तूसाठी पोटच्या गोळ्याचा हात गमावून बसल्याची चिंता त्या वडिलांना सतत सतावत होती. स्वतःच्या मुलापेक्षा जर आपणाला इतर वस्तू जास्त प्रिय वाटत असतील तर यापेक्षा दुर्भाग्य काय म्हणता येईल.
अशा अनेक घटना आज समाजामध्ये घडत आहेत याची कारणे काय आणि त्यावरील उपाय काय या सर्व प्रश्‍नांची उत्तरे म्हणजे त्यांच्यावर घडत असणारे संस्कार. चांगले संस्कार घडविण्यासाठी लागणारी माणसे असायला हवीत. या संगणकीय युगात पालकांनी स्वतःच्या पाल्यासाठी दिवसामधील किमान एक तास वेळ काढायला हवा. त्याच बरोबर आज परकीय संस्कृती प्रमाणे मी, माझी बायको आणि मुल अशा पद्धतीची कुटुंब संस्कृती वाढत चालली आहे. संस्कार देणारे आजी-आजोबा त्यांचे मिळणारे प्रेम हरवत चालले आहे. आपण कितीही पैसे दिले तरी देखील चांगले संस्कार कधीही विकत घेवू शकत नाही. असे संस्कार मनामध्ये रूजवायला लागतात.
आजच्या बालदिनापासूनच प्रत्येक पालकांनी स्वतःच्या मातीच्या गोळ्याशी दररोज मुक्त संवाद साधला पाहिजे. त्याला येणार्‍या अडचणी, त्याच बरोबर वेगवेगळ्या समस्या, या सर्वांवरील उपाय यासाठी वेळ द्यायला हवा. तरच आपली पुढची पिढी चांगली, सुसंस्कृत आणि उत्तम मानसिक स्वास्थ्य असणारी घडवू शकतो. बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा....

No comments:

Post a Comment