दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण सबंध भारत देशातच नव्हे तर जगात जेथे जेथे भारतीय आहेत, तेथे तेथे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतोे. दिपावली या नावावरूनच हा दिव्यांचा उत्सव आहे हे कळून येते. दिवाळी म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून उजेडाकडे आणि दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा असा एक क्षण म्हणायला काहीच हरकत नाही.
महाराष्ट्रात दिवाळी आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजे वसूबासर पासून सुरू होते. वसूबासर या दिवशी गाय आणि वासरू यांची आरती ओवाळून पूजा केली जाते. त्यानंतर पुढचा दिवस म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशीस याला आपण धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व सांगणार्या वेगवेगळ्या कथा आहेत. त्यापैकी ही एक कथा. हेम राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्यूमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनातील सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्यूमुखी पडण्याचा शाप असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवती-भवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालामध्ये मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्प रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने आणि दिव्यांच्या प्रकाशाने दिपून जातात. त्यामुळे यम परत फिरुन आपल्या यमलोकात जातो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचविले जातात. म्हणूनच या दिवसास ‘यम दीपदान’ असे ही संबोधतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात आणि त्या दिव्यास नमस्कार करतात याने अपमृत्यू टळतो अशी कथा आहे.
पुढचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी आश्विन कृष्ण चतुर्दशीस म्हणजेच नरक चतूर्दशी या दिवशी नरकासूराचा वध झाल्याने दृष्टतेचा नाश हेच प्रतीक मानले जाते. सर्व जण पहाटे उठून सुर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करतात. त्यामुळे स्वतःमधील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्याटन होते व आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होवून आत्मज्योत प्रकाशित होईल. आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. या दिवशी बळी नावाचा राक्षस पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, स्वच्छता करण्यासाठी लागणारी केरसूणी सुद्धा लक्ष्मी मानून पूजा केली जाते.
दिवाळीचा पुढचा दिवस म्हणजे पाडवा. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. बळी राजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळी राज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्विकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटा भोवती रांगोळी काढून पत्नी पतीला ओवाळते. दिवाळीचा शेवटचा आणि महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा असतो. तेव्हा बीजेच्या कोरी प्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो! ही त्या मागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधूभावनेची कल्पना जागृत होते. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस. समाजात सर्व पुरूष वर्ग स्त्रीला भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेवून त्यांना अभय देतात व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील तो दिवस म्हणजे दिवाळीतील भाऊबीज पूजनाचा दिवस होय.
‘‘जीवंत जोवर मानवजाती, जीवंत जोवर मंगलप्रीती,
अखंड तोवर राहिल तेवत, दिपावलीच्या मंगल पणती,
दीप ऊजळो तुमच्या दारी, लक्ष्मी नांदो तुमच्या घरी,
आरोग्य लाभो तुमच्या देही, सुख, समाधान व शांती
नांदो तुमच्या घरी हेची चिंतन देवा चरणी’’
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...!!!
No comments:
Post a Comment