माझा खेळ, माझा विकास.
आज क्रीडा दिनानिमित्ताने बालपणी खेळल्या
जाणाऱ्या विविध खेळांचा दीर्घ परिणाम जीवनावर कशा पद्धतीने होत असत याची माहिती
देण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. खालील काही खेळांच्यामुळे आज अनेक मोठ मोठी
संकटांना मी सहजपणे सामोरे जाऊ शकतो. त्यातून मार्ग काढून योग्य ते ध्येय गाठू
शकतो. शारीरिक मानसिक बौद्धिक विकास होण्यास चालना मिळू शकते. आपण खालील खेळाचा
अवलंब करून मुलाच्या क्षमता विकास होण्यास हातभार लावूया.
कंचे – काही वर्षापूवी हा खेळ खूप प्रसिद्ध आणि
लोकप्रिय होता. जमिनीवर गोल करून किंवा अनेक गोट्या एकत्र करून ठेवल्या जायच्या
त्याच्या भोवतीने एक सीमारेषा आखली जायची. त्या सीमारेषेमध्ये असणाऱ्या असंख्य
गोट्यामधून एका गोटीला नेम धरून आपल्या ताकद असणाऱ्या बोटाच्या सहायाने आपल्या
हातात असणाऱ्या गोटीने बाजूला केली जायची. रिंगण करून त्यात बऱ्याच गोट्या ठेवल्या
जायच्या व कोणतीही गोटी उडवणार हे निश्चित करून नेम धरून तिच गोटी उडवायची. गोटी
उडवल्यास ती गोटी ज्याने उडवली, त्याची व्हायची अशा प्रकारचा हा खेळ असायचा. या
खेळामुळे लहान मुलांच्या बुद्धीचा विकास होत होता. लक्ष देवून लक्ष गाठण्याचा गुण
यातून आपोआप शिकला जायचा आणि त्याचा उत्तम परिणाम जीवनावर होत असे.
खडे उचलणे – हा खेळ साधारणपणे मुली जास्त
प्रमाणात खेळत असायच्या. या खेळात गारगोट्या, कंचे, खडे आदींचा वापर मोठ्या
प्रमाणावर केला जायचा. या सर्व वस्तू पाच, सात किंवा नऊ या स्वरुपात वापरल्या
जायच्या. या वस्तू जमिनीवर टाकल्या नंतर एक एक करत वर फेकायच्या व झेलायच्या.
त्यानंतर एक खडा वरती फेकल्यानंतर दोन खडे उचलायचे. कोणत्याही वस्तूचा वापर करून
हा खेळ खेळला जात असल्याने परिस्थितीशी जुळवून कुशलतेचे धडे मिळायचे. या खेळामुळे
हवेत फेकलेल्या वस्तू झेलायचे आणि हवेत एखादी वस्तू फेकल्यानंतर ती खाली येई
पर्यंत खालच्या वस्तू गोळा करून घ्यायच्या. यामुळे वेग वेळ आणि चपळाईचा उत्तम
कौशल्य अंगी बाळगण्यास मदत होत होती.
चंपूल – घराघरात खेळला जाणारा हा खेळ पाटाच्या
उलट्या बाजूला खेळला जायचा. पाटाच्या उलट्या बाजूला खडूच्या सहायाने लहान लहान
चौकोन आखले जायचे. (त्याला घर म्हणायचे) कवड्या किंवा चिंचोळ्याचे (चिंचेच्या बिया)
दोन भाग करून त्याचादाणे म्हणून वापर केला जायचा. या खेळत कमीत कमी दोन व जास्तीत
जास्त चार स्पर्धक सहभागी गहू शकत होते. मिळालेल्या अंकातून आपली गोटी फिरवून
समोरच्या स्पर्धकाची गोटी बाद करायची असा धडे देणारा हा खेळ असायचा. या खेळामुळे
आपल्या शरीरात डावपेच हा गुण अधिक प्रमाणात न कळत रुजला जायचा.
लगोरी – या खेळत गोल आकाराची लाकडी तुकडे अथवा
फुटलेली कवले, फरशीचे तुकडे यांचा वापर केला जात असे. ज्या मुलांच्याकडे चेंडू
नव्हते ती मुले कापडाचा चेंडू करत असत. चेंडूने एकमेकांवर रचलेल्या लाकडी अथवा
फरशीच्या तुकड्यावर मारला जायचा. दूर गेलेला चेंडू प्रतिस्पर्धीने धरून मारेपर्यंत
पडलेले तुकडे पुन्हा एकमेकांवर रचावे लागत असत. सोप्या खेळातून मुलांना कामच्या
नियोजनाचे धडे मिळत होते. त्याच बरोबर एखादे काम किती लवकर पूर्ण करता येते याचे
वेळेचे नियोजन करणारा विशेष गुण शिकायला मिळायचा.
चिपरी – हा खेळ बहुतांश मुलीच खेळत असत. खडूने
किंवा लाकडाच्या कोळशाने जमिनीवर सात किंवा आठ चौकोण आखले जायचे. फरशीचा अथवा
दगडाचा तुकडा (त्यालाच चिपरी म्हणतात) डोक्यावरून टाकून अथवा पहिल्या चौकोणात
टाकून एका पायावर उभे राहून पायाच्या अंगठ्याने फरशी अथवा कवल याचा तुकडा पुढच्या
चौकोणात ढकलला जायचा. हा खेळ अॅक्यूप्रेशरवर आधारित होता. यातून मुलींना सादृढता
तर मिळत होतीच त्याचबरोबर जिमनॅस्टीकचे धडेही मिळत असत. या मुळे लहानपणीच शारीरिक
विकास उत्तम होत असे.
कुरघोडी – एका टीममधील तीन ते चार स्पर्धक
भिंतीला पकडून एकमेकांच्या सहायाने कंबरेला पकडून घोडी करत असत. दुसऱ्या टीमने
घोडी झालेल्या या टीमवर धावत येवून पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धकापर्यंत उडी मारून
त्याह्य्चा पाठीवर बसावे लागे. टप्याटप्याने सर्व स्पर्धक उडी मारत असत. उडी
यशस्वी न ठरल्यास दुसऱ्या टीमला घोडी व्हावे लागत असे. या खेळातून मुलांना वजन
पेलण्याची तसेच ध्येय गाठण्याचा पाठ मिळत होता. या क्रीडा प्रकारामुळे शारीरिक
सादृढता वाढीस चालना मिळत असे.
उडाण टप्पू – हा खेळ अंगणात, मैदानात, खुल्या
जागेत खेळला जायचा. खाली बसून जमिनीवर पायावर पाय, त्यावर हात आणि नंतर अंगठे
पकडून उभे राहिल्यानंतर त्याच्या पाठीवर उंच उडी मारावी लागत असे. असा प्रकार
टप्याटप्याने पूर्ण उभे राहून केवळ मान झुकवून वरून उडी मारेपर्यंत सुरु राहायचा.
जो प्रतिस्पर्धी उडी मारण्यात अयशस्वी ठरत असे त्याला जमिनीवर बसून हा सर्व प्रकार
करावा लागे. उंच उडी, धावत येऊन उंची लक्षात घेऊन उडी मारावी लागत असल्यामुळे या
खेळातून शारीरिक क्षमतांचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होत होती.
खुपसणी – हा खेळ साधारत: पावसाळ्यात चार ते पाच
महिने खेळला जायचा. अणकुचीदार टोक असलेली लोखंडी सळीच्या तुकड्याचा वापर या खेळत
केला हात असे. रस्त्यालगत असलेल्या चिखलात ही सळी फसवली जायची. जो पर्यंत सळी
मातीत खुपसल्यानंतर पडत नाही, तो पर्यंत मुले पुढे पुढे जात असत. एकदा सळी पडली की
तेथून प्रतिस्पर्धीला चिखल तुडवत, जेथून खेळ सुरु झाला त्या जागेपर्यंत पळत यावं
लागत असे. या खेळामुळे योग्य अंदाज बांधणी हा गुण शिकायला मिळत असे.
विठू दांडू – हा भारतातील प्राचीन खेळ आहे. असे
म्हणतात या खेळातून इंग्रजांनी क्रिकेट सुरु केले. दांडूने विटी कोलायची. कोललेली
विटी प्रतिस्पर्धीने झेलायची झेलता नाही आली तर जिथे विटी पडली आहे तिथून ती
दांडूला मारावी लागायची. विटी दांडूला लागल्यास खेळाडू बाद होत असे. जर विटी
दांडूला लागली नाही तर दांडूने तीन वेळा विटीला हवेत उडवून दांडूने मारून टोलवली
जात असे. हा खेळ पूर्णपणे मैदानावर खेळला जायचा. या खेळातून मुलांना अचूकतेचे
प्रशिक्षण मिळत असे. या खेळातून मुलांची बौद्धिक क्षमताही वाढत असायची.
लपंडाव – या खेळात कितीही मुल-मुली सहभागी होऊ
शकत असत. डाव असलेला सोडून इतरांनी ठरवून दिलेल्या जागेपर्यंत लपायचे. ज्या मुलावर
डाव आला असेल त्याने दहा वीस तीस... असे शंभरपर्यंत म्हणत. मी आलो रे... ची आरोळी
देत प्रत्येकाला शोधून काढायचे. दरम्यान लपलेल्या दुसऱ्या मुलाने त्याच्या पाठीवर
थाप मारल्यास त्याला पुन्हा एकदा इतरांना शोधायचे काम करावे लागे. या खेळातून
मुलाची शोध प्रवृत्तीस वाव मिळत असे.
आज हे सर्व खेळ खेळणारी मुले मुली अगदी बोटावर
मोजण्याइतपत दिसतात. अनेक मुले मुली लहानपणी वेगवेगळ्या गॅजेट अडकून पडलेली दिसतात.
गॅजेटचा वापर फक्त आणि फक्त कामासाठी न राहता ते आत अनेकांचे व्यसन होत असल्याचे
चित्र समाजात आहेत पाहतो. यामुळे मुलांच्यामध्ये ताणताणाव मोठ्या प्रमाणावर वाढत
आहे. छोट्याछोट्या अपयशाने मुले स्वत:चे आयुष्य संपवत आहेत, आत्महत्या करत आहेत.
याचा येणाऱ्या भावी पिढीवर वितरीत परिणाम होणार आहे. आजच्या पालकांना माझी विनंती
आहे की आपणही गॅजेटचा वापर कमीत कमी करून आपल्या पाल्याबरोबर अधिकाधिक वेळ देऊन
वरील प्रकारचे खेळ खेळा व त्यांच्यातील विविध शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक
गुणकौशल्यांचा विकास करण्यास हातभार लावा.
- मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार
मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर,
ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम
चॅनेलवर फॉलो करू शकता.