Sunday, August 25, 2019

आठवणीतील बहीण...

आठवणीतील बहीण.
रक्षाबंधनच्या निमित्ताने मला माझ्या बहिणीची आठवण झाली. आज सकाळपासूनच तिच्या बद्दलच्या माझ्या आठवणी मनात येत होत्या. लहान असताना काही घटना अशा घडल्या आहेत, ज्या जीवनात कदाचित कधीही न विसरण्यासारख्या आहेत. अनेक कारणांमुळे मला बहिणीची आठवण येत असते. रक्षाबंधन असो किंवा इतर कोणतेही, भाऊ बहिणीचे संबंध दृढ करणाऱ्या कोणत्याही गोष्टी असोत. मी तिला कधीही विसरू शकत नाही.
आज देखील असाच एक प्रसंग माझ्या बाबतीत घडला, त्यामुळे तिची आठवण झाली. रात्री मी ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला जाणार होतो. नेहमीप्रमाणे ऑफिसमधील कामे संपवून, रात्रीच्या महालक्ष्मी एक्स्प्रेस (कोल्हापूर ते मुंबई) रेल्वेने मी मुंबईला जाणार होतो. मी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनला आलो. स्टेशनवर पोहोचल्यावर पाहिले माझ्यासारखे अनेक प्रवासी तिकडे रेल्वे येण्याची वाट पाहत उभा होते. रेल्वे येण्यासाठी आणखी थोडा अवधी होता. परंतु माझ्या मनात बहिणीच्या आठवणीचे अनेक विचार मला शांत बसू देत नव्हते. असे म्हणतात की, ‘मनात विचारांनी गर्दी नसतील तर माणूस गर्दीत सुद्धा शांत राहू शकतो आणि मनात विचार असतील तर माणूस एकटा असून देखील विचारांच्या गर्दीत अडकून पडतो.’ अशी अवस्था माझी झाली होती.
बहिणीची आज आठवण मला क्षणोक्षणी येत होती. तिच्या विचारामध्ये मी एवढा गुंतलो होतो की मी कुठे, कोणासोबत, कशासाठी उभा आहे. याचे देखील भान हरपून उभा होतो. माझ्या जवळपास कोणकोण आणि कायकाय आहे, याचे देखील भान मला नव्हते. अचानक रेल्वेच्या हॉर्नचा आवाज आला आणि मी भानावर आलो.
मी रेल्वेत चढलो, अगोदरच बुकिंग केले होते. त्यामुळे माझी जागा राखीव होती. मी जागेवर जाऊन बसलो. रेल्वे सुरु झाली. थोड्या वेळाने पुन्हा तिच्या बरोबर बालपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. त्यात मी पूर्ण डुंबून गेलो. थोड्या वेळातच मिरज स्टेशन आले.
माझ्या सीटच्या अगदी पुढच्या सीटवर एक मुलगी, तिची आई आणि वडिल यांच्या सोबत येऊन बसली. साधारणत: २२-२३ वर्षाची असेल. रेल्वे पुन्हा सुरु झाली. माझ्या समोर बसलेली मुलगी पाहिली. तिच्या हालचाली पाहिल्या. ती रेल्वेत बसल्यापासून तिच्या आई वडिलांना अनेक प्रश्न विचार होती. तिची आई मात्र तिच्या प्रश्नांची उत्तरे देऊन देऊन कंटाळली होती. परंतु तिचे वडील मात्र कोणत्याही प्रकारचा राग व्यक्त न करता, न कंटाळता, न थकता तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. तिच्या मनातील विचार शांत करण्याचा प्रयत्न करत होते. हा सर्व प्रसंग मी माझ्या पाहत होतो.
माझ्या समोर बसलेली मुलगी म्हणजे माझी बहीणच आहे, असे मला वाटू लागले. लहानपणी कोठेही प्रवास करण्याचा योग आला की, माझ्या वडिलांना असेच प्रश्न विचारून माझी बहीण भांबावून सोडायची. माझे वडील तिच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असायचे.
माझ्या समोर बसलेली ती मुलगी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग होती. मी तिच्याकडे पाहिले लांब काळेभोर केस, त्यावर भरपूर तेल लावलेले, दोन वेण्या बांधलेल्या, वेणीला लाल रंगाच्या कापडी रिबन बांधलेली. उंच, रुंद आणि मोठे कपाळ, दाट आणि कोरीव भुवया, मोठे टपोरे डोळे, डोळ्यात काजळ, सुंदर नाक, गोरे गुबगुबीत गाल, नाजूक ओठ, त्याखाली चेहऱ्याला शोभेल अशी हनुवटी, अंगात फुलाफुलांचा ड्रेस, पायात चप्पल, आणि तोंडातून अनेक प्रश्नांची सतत चालू असलेली विचारणा तिच्या या वागण्यामुळे जणू माझी बहिणच माझ्या समोर आहे, असे मला वाटते. ती सुद्धा अशाच प्रकारची दिव्यांग, आभासी देवाने जन्माला घातले, परंतु आयुष्य जगणे किती कठीण असते, हे पावलो पावली जगताना समजते.
समोर बसलेल्या मुलीचे वडील तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. ती मुलगी प्रत्येक मिनिट, दोन मिनिटाला वेगवेगळे प्रश्न विचारात होती. तिचे वडील न दमता, न थकता तिच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तरे देऊन तिला समाधानी करण्याचा प्रयत्न करत होते.
तिच्या या हालचाली आणि हावभावाने मला माझी बहीण आठवली. ती सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारून माझ्या वडिलांना विचारचक्रात अडकवत असायची. माझे वडील मात्र शांतपणे तिच्या प्रश्नाची उत्तरे देत होते.
मी कदाचित दुसरी-तिसरीला असेल. मी दररोज नेहमीप्रमाणे शाळेत गेलो होतो. दुपारची वेळ होती, जेवणाची सुट्टी झाली. सगळे मिळून शाळेत जेवलो. पुन्हा शाळेची भरण्याची बेल वाजली. आम्ही वर्गात गेलो, थोडा वेळाने आमच्या शेजारचे काका माझ्या वर्गाबाहेर दिसले. त्यांनी माझ्या गुरुजींना वर्गाबाहेर बोलावले. त्या दोघांच्यामध्ये काही तरी संभाषण झाले. गुरुजी परत वर्गात आले.
माझ्याकडे पाहत मला म्हणाले, ‘तुला घरी जायचे आहे, तुमचे शेजारचे काका तुला घ्यायला आले आहेत.’ तस मी माझे दप्तर घेतले आणि काकांच्या सोबत घरी जायला बाहेर पडलो.
घर जसजसे जवळ आले तसेतसे माणसांची गर्दी दिसू लागली. मला काही समजत नव्हते. माझ्या ओळखीचे आणि आमचे नातेवाईकही दिसले. हे सगळे अचानक का आले आहेत? असा प्रश्न मला पडला. मी थोडा पुढे गेलो, कोणी तरी मोठ मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आला. सगळीकडे रडारड सुरु होती. मला काही कळेनाच नक्की काय झाले आहे? त्या गर्दीतून वाट काढत मी पुढे गेलो.
पुढचे चित्र पाहिले आणि मनाला मोठा धक्का बसला. माझ्या बहिणीच्या कानात असणारा सुगंधी कापसचा तुकडा, आज तिच्या नाकात घातलेला पाहिला. मी माझ्या वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांनी खूप काही गमावल्याचे चित्र होते. आमच्या कुटुंबातील कधीही न भरून निघणारी हानी झाली होती. या गोष्टीला आज अनेक वर्षे लोटली आहेत. परंतु माझ्या बहिण्याच्या आठवणी जशाच्या तशा आठवतात. तिच्या आठवणीने आज देखील डोळे पाणावतात. लहानपणी भावभावनांचा खेळ समजत नव्हता, परंतु आज सर्व समजत आहे. माझी बहीण माझ्या सोबत नाही. हेच माझे दुर्दैव.
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

4 comments: