Friday, August 16, 2019

दिखावेगिरी कशाला?

दिखावेगिरी कशाला?
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. निसर्गाने पुन्हा एकदा आपल्या रौद्र रूपाचे दर्शन दिले. संपूर्ण मानव जातीच्या अहंकाराला उन्मळून ठेवण्याची ताकद फक्त आणि फक्त निसर्गामध्येच असल्याचे सिद्ध केले. कृष्णा, पंचगंगा, गोदावरी या प्रमुख नद्याबरोबर अनेक छोट्या मोठ्या नद्यांना महापूर आला होता. या महापुरामुळे अनेक गावे पाण्याने वेढली तसेच काही गावे संपूर्ण पाण्याखाली गेली होती.
विविध त्रासाने कंटाळलेला बळीराजा थोडाशा पावसाने सुखावला होता. नवीन आत्मविश्वास उरी बाळगून बळीराजाने शेतामध्ये विविध पिकांची लावण केली होती. परंतु या महापुरामुळे मानवाला शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच व्यावहारिकदृष्ट्या कधीही न भरून निघणारी हानी झाली. पशु, पक्षी व शेतातील पिके त्याचबरोबर अनेकांचे संपूर्ण संस्कार उद्वस्त होऊन गेले.
या भयावह पूर परिस्थितीपासून वाचण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. या मदतीच्या हाताबरोबर त्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारचे छुपे राजकारण, राजकीय, सामाजिक आणि अहंकारी फायदा घेणाऱ्या अनेक मंडळीची डोकीवर निघाली. आपण पूरग्रस्तांना जी मदत करतो, म्हणजे या आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींवर एका प्रकारचे उपकारच करतो आहे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर व्यक्त होताना दिसतो. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अनेकांनी या आपत्तीचा फायदा देखील घेतला आहे आणखी घेत आहेत. ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांना मदत करताना फोटो काढले, सेल्फी काढली व ती प्रिंट मिडिया तसेच फेसबुक, व्हाट्सअप्प, इंस्टाग्राम व इतर ऑनलाईन प्रसिद्धीच्या माध्यमातून अपलोड केली. त्यांच्यासाठी माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट आज आपणापर्यंत पाठवत आहे.
एकदा श्रीकृष्णाने त्याच्या समोरच्या दोन टेकड्याचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला..
हे सगळे सोने गावकऱ्यांना वाटून टाक,
पण अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावकऱ्यांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.
पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.
मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. 
दिवस रात्र काम चालू होते.
अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.
पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.
लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.
आता अर्जून अगदी दमून गेला होता.
पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. 
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!
आता यापुढे मी काम करू शकत नाही. 
मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की,
या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या...
पण अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्याना बोलवले आणि सांगितले,
या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. 
एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.
लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला.
हा विचार आपल्या मनात का आला नाही? तो भयंकर अस्वस्थ झाला. 
कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला...
अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास..!
तू गर्वाने प्रत्येक गावकऱ्याला सोने वाटू लागलास.
जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास..!  
कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.
त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.
आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.
थोडक्यात म्हणजे देणगीच्या बदल्यात, मदत केलेल्याच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, शाबासकी द्यावी, धन्यवाद द्यावेत, अशी अपेक्षा ठेवणे हे कधीच निरपेक्ष दान नसते. अशावेळी तुम्ही जिंकून देखील हरलेले असता.
मग एखाद्याला मदत करत असताना स्वत:ची प्रसिद्धीचे लागलेले व्यसन केव्हा सुटणार आहे कोणास ठाऊक?
हा संदेश सद्य स्थितीस योग्य वाटला म्हणून यावर थोडस लिहाव अस वाटलं. या महापुरात स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवणाऱ्या एका ही भारतीय जवानांनी स्वत:चा सेल्फी काढलेला मी पाहिला नाही. कारण ते निरपेक्ष भावनेने कार्य करत आहे. अशा असंख्य लोकांना ज्यांनी कार्य मानवता, कर्तव्य, सामाजिक बांधिलकी अशा भावनेने केले त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे.
-      मंगेश विठ्ठल कोळी.
-      मो. ९०२८७१३८२०
-      ईमेल – mangeshvkoli@gmail.com
-      (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.


12 comments:

  1. खुपच छान अन् मार्मिक 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. Nice.
    मदतीचा फोटो काढणाऱ्या पर्यंत पोहचला पाहिजे.

    ReplyDelete
  3. खूप छान कथा आहे .इतिहास साक्षी आहे की की केवळ मी मी असे म्हणणारे लयास गेले आहेत. उदाहरणार्थ दुर्योधन ,कंस ,रावण या महाभागांना त्यांच्या आयुष्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. एवढेच नाही तर त्यांचे पूर्ण घराणेसुद्धा लयास गेले आहे .म्हणून केवळ मी हे सर्व काही केले, किंवा मीच सर्वश्रेष्ठ आहे माझ्यावाचून कुणाचेही काही अडत नाही ,मी असे केले मी तसे केले ,ही गर्वाची व अहंकाराची भाषा घातक आहे .निस्वार्थी व निरपेक्ष भावनेने केलेले कोणतेही कार्य अमर होते .त्याला प्रसिद्धीची गरज पडत नाही .खूप छान कथा.

    ReplyDelete
  4. खुपच मस्त....
    सत्य कधीही लपत नाही...तेव्हा...दिखावपणा काहीही कामाचा नाही....

    ReplyDelete
  5. खुपच मस्त....
    सत्य कधीही लपत नाही...तेव्हा...दिखावपणा काहीही कामाचा नाही....

    ReplyDelete