Saturday, April 25, 2020

यशाचा मार्ग - मंगेश विठ्ठल कोळी..


यशाचा मार्ग_ मंगेश विठ्ठल कोळी ‌..
‌एक अप्रतिम पुस्तक म्हणजे यशाचा मार्ग होय. मी तर म्हणेन हा नुसता मार्ग नव्हे तर राजमार्ग आहे आणि जे कोणी या पुस्तकाचे वाचन मनन करेल तो निश्र्चितच एक सकारात्मक ऊर्जा घेऊन प्रेरित होईल व ध्येयवेडा झपाटल्याप्रमाणे आपले इच्छित ध्येय साध्य करेल यात शंका नाही.
‌एक तरुण उमदं व्यक्तीमत्व असणारे मंगेश विठ्ठल कोळी सर एक मानसतज्ञ आहेत आणि एक आदर्श मार्गदर्शक सुध्दा आहेत. त्यांनी आपल्या लेखणीतून ७४ प्रकारचे छोटे छोटे सल्ले दिलेले आहेत. जे वाचताना माणूस प्रेरणा घेतल्याविना राहत नाही असं मला वाटतं कारण प्रत्त्येक गोष्टीचे त्यांनी सूक्ष्म अतिसूक्ष्म रितीने विचार मांडलेत आणि अतिशय महत्त्वपूर्ण शब्दांतून समजावण्याचा प्रयत्न ही केलेला आहे.
‌वेळेचे नियोजन कसं असावं, चौकसवृत्ती कशी वृध्दींगत करावी, लोभ कसा टाळावा, सकारात्मक विचार कसे घ्यावेत आणि इतरांच्यासाठी जगताना सुध्दा स्वत: साठी कसं जगावं. याचंही त्यांनी छान शब्दांकन केलेलं आहे. डी-अडचणी तर प्रत्येकालाच असतात पण त्या वरही मात कशी करावी. चारित्र्यवान कसं जगावं ही आणि सूख म्हणजे काय? हे सांगताना सूखाचे सॅशे असं सांगून त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून कसा आनंद मिळवावा हे सांगितले आहे.
"ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुध्दा वाया घालवू नये." आणि "ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालवू नये" असे ते म्हणतात विचारातून प्रगतीकडे या लेखातून पुढे ते असही म्हणतात की, "चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतात."
‌प्रत्येक लेखानंतर त्यांनी एक सुविचार लिहिलेला आहे आणि त्यातूनही त्यांनी उत्तमरित्या समूपदेशनाचेच कार्य केलेले आहे. ते म्हणतात, "कोणी कौतुक करो अथवा टिका लाभ तुमचाच.. कौतुक प्रेरणा देते, तर टिका सुधारण्याची संधी. ‌म्हणजे माणसाने खचून न जाता नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार करावा असं ते म्हणतात. म्हणजे आजकाल जे मानसिकदृष्टया कमजोर पडता आहेत. त्याचे प्रमाण कमी होईल व नवं चैतन्याचा उगम होईल असं ते म्हणतात. ‌चांगल्या वाईटाचे उदाहरण देताना ते राजाचोर असं म्हणतात. माणसाने मन, भावना आणि विचारांवर काबू ठेवावं असं ते म्हणतात.
‌शेवटी जाता जाता सांगावंस वाटतं की, एक आदर्श समंत्रक, एक आदर्श गुरू आणि सच्चा मार्गदर्शक कसा असावा तर या सरांच्यासारखा असावा. कारण त्यांच्या विचारांची उंची एखाद्या उच्च कोटीच्या प्रज्ञावंतालाही लाजवेल अशी आहे. सरांनी व्यक्तीगत मलाही कित्येकदा मार्गदर्शक करुन एक नवी सकारात्मकतेची ऊर्जा दिलीय आणि कवितासागरचे प्रकाशक डॉ. सुनिल दादा पाटील व मुद्रितशोधिका संजिवनी दीदी आणि विचारांचा अभेद्यबाण प्रिन्स यांच्या मार्गदर्शनाला माझा मनापासून सलाम. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन इतकं छान विचारांचे मोती जनमानसांत पसरवत आहात. असेच कार्य वृध्दींगत होवो ही सदिच्छा...
कवयित्री - सौ. मनिषा वराळे, धरणगुत्ती
(कवयित्रींना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.)

2 comments: