Wednesday, May 20, 2020

मी थँक्यू म्हणतो अन तुम्ही....



आज जगामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे थँक्यू. माणूस खूप व्यस्त आणि मोठ्या प्रमाणावर सेल्फिश झाला आहे. मला काही तरी मिळालेच पाहिजे या स्वार्थी आशेनेच इतरांना मदत करतो. स्वत:ची आवड, छंद विसरून फक्त तणावाचे जीवन जगत आहे. स्वत: आत्मपरीक्षण करून पहा, दिवसभरात मदत करणाऱ्या किती व्यक्तींना थँक्यू म्हणतो. लक्षात येईल की, काही बोटावर मोजण्या व्यक्तींनाच वरच्या मनाने किंवा मनाविरुद्ध थँक्यू म्हणण्याचे प्रमाण वाढत आहे.
परक्या व्यक्तींनी मदत केली तर लगेच थँक्यू म्हटले जाते. घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा दिवसभर काम करतो त्याठिकाणी थँक्यू म्हणत नाही. थँक्यू योग्य वेळी म्हटले पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो, नाहीतर न म्हणालेले बरे. असे म्हणतात की, “उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायासारखा असतो.” त्याचप्रमाणे “उशिरा म्हणालेले थँक्यू सुद्धा न म्हणाल्यासारखे असते.” परिवारामध्ये थँक्यू शब्दासाठी अनेकांचे मने आसुसलेली असतात. तरीसुद्धा त्यांना आपण थँक्यू म्हणत नाही.
जीवन शांतपणे जगण्यासाठी दोनच गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे, ‘माफ करा त्यांना ज्यांना आपण कधी विसरू शकत नाही.’ दुसरे म्हणजे, ‘विसरून जावा त्यांना ज्यांना आपण माफ करू शकत नाही.’
येथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आहे. ही गोष्ट आहे एका व्यक्तीची. जो व्यक्ती ऑफिसमध्ये काम करत असतो. काम खूप असल्याने नेहमी ताणतणावात जीवन जगत असतो. घरी आल्यावर सर्व राग घरातील व्यक्तींवर, मुलावर व बायकोवर काढत असतो, त्यांच्याशी भांडत असतो. त्यामुळे घरातील व्यक्तींना कळत नव्हते की, ह्यांना नक्की काय झाले आहे.
दिवसभर त्याला वाटत होते की, आपण ‘जिवंत असो किंवा नसो’ काही फरक पडत नाही. पै-पाहुण्यांचे फोन येत होते. त्यांच्याशी तो व्यवस्थित बोलत नव्हता. ऑफिसमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. हीच गोष्ट त्याला सारखीसारखी तणाव निर्माण करत होती. या गोष्टींचा परिमाण म्हणून त्याला असे वाटू लागते की, ‘आपण कशासाठी जगतो आहोत, हेच त्याला कळत नव्हते.’
तो व्यक्ती खूप नकारात्मक विचार करत होता, तो स्वत: ला नेहमी कोसत होता, घरातील सर्व खर्च मला बघावा लागतो, काढलेले लोनचे हप्ते मलाच भरावे लागतात, इतर सर्व कामे मलाच करावे लागतात. मग ती ऑफिसमधील असो वा घरातील असो. त्यामुळे त्याच्यामध्ये एक नकारात्मक विचारातून न्यूनगंड निर्माण झाला होता.
आजच्या जीवन पद्धतीने तो कंटाळला होता. एकदा त्याचा मुलगा त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, ‘पापा होमवर्क करण्यासाठी मदत करा.’ त्यावेळी त्याने दिवसभरातील राग त्या मुलावर काढला आणि त्याला स्वत:पासून पळवून लावले.
पुढे तो मुलाला म्हणाला, ‘मी काय तुझा होमवर्क करण्यासाठी बसलो नाही, मला खूप कामे आहेत.’
मुलगा शांतपणे निघून स्वत:च्या रूममध्ये जातो. थोड्या वेळानंतर त्या व्यक्तीचा राग शांत झाला. तो मुलाच्या रूममध्ये गेला आणि मुलगा नक्की काय म्हणत आहे. हे तरी पाहूया असे त्याला वाटले. मुलाच्या रूममध्ये गेला. पाहिले तर मुलगा झोपला होता. होमवर्कची वही मुलाच्या अंगावर तशीच पडली होती. मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून अंगावरची वही काढून बाजूला ठेवू लागतो.
वही बाजूला ठेवता ठेवता त्याला वाटते. मुलाने नक्की काय लिहिले आहे ते तरी पाहूया. कोणत्या गोष्टीमध्ये मुलाला माझी मदत हवी होती. त्या वहीच्या पानाच्या सुरुवातीला लिहिले होते.
“ज्या गोष्टी आपणाला सुरुवातीला चांगल्या वाटत नाहीत, परंतु नंतर त्या चांगल्या वाटतात.” त्यावर त्या मुलाला निबंध लिहायचा होता. मुलाने काही ओळी लिहिल्या होत्या. तो व्यक्ती त्या ओळी वाचू लागला.
मुलाने लिहिले होते...
मी थँक्यू म्हणतो, “त्या फायनल परीक्षेला जी सुरुवातीला चांगली वाटत नाही, खूप अभ्यास करावा लागतो परंतु त्यानंतर सुट्ट्या पडतात, खूप खेळता येते.”
मी थँक्यू म्हणतो, “त्या कडू गोळ्यांना ज्या चवीला चांगल्या लागत नाहीत, परंतु नंतर आपण आजारातून बाहेर पडतो.”
मी थँक्यू म्हणतो, “त्या अलार्मच्या घड्याळाला जे आपल्याला सकाळी सकाळी उठवते. त्यानंतर आपल्याला कळते की, आपण जिवंत आहोत.
मी थँक्यू म्हणतो, “त्या देवाला ज्यांनी मला एवढे चांगले वडील दिलेत. जे सुरुवातीला चांगले वाटत नाहीत, माझ्यावर खूप रागावतात. परंतु नंतर मला बाहेर घेऊन जातात, फिरवतात, चॉकलेट आईसक्रिम, वेगेवेगळ्या खेळणी घेऊन देतात.”
पुढे जाऊन त्या मुलाने एक ओळ लिहिली होती.
मी थँक्यू म्हणतो, “त्या देवाला त्यांनी मला वडील दिले. कारण माझ्या एका मित्राला वडीलच नाहीत.”
वरील शेवटच्या ओळीने त्या व्यक्तीला हलवून सोडले. संपूर्ण शरीराला, मनाला सकारात्मक ऊर्जा निर्माण मिळाली. सर्व नकारात्मक विचार एकाच झटक्यात बाजूला गेल्याची भावना निर्माण झाली. तो व्यक्ती झोपेतून उठला, जीवनाचा खरा अर्थ समजला. तो स्वत:शीच बोलायला लागला. त्या मुलाने लिहिलेल्या गोष्टी बडबडू लागला.
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ घर आहे, काहींच्या जवळ घर सुद्धा नाही.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ बायको, चांगला मुलगा आहे, चांगले कुटुंब आहे. काहींच्या जवळ कुटुंबसुद्धा नाही.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ ऑफिस आहे, काम आहे, कामाचा ताण आहे. काहींच्या जवळ काम देखील नाही.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “माझ्या जवळ अनेक गोष्टी आहेत, काहींच्या जवळ त्या देखील नाहीत.”
हे देवा मी थँक्यू म्हणतो, “तुम्ही मला चांगले जीवन दिले आहे. पै-पाहुणे दिले, मित्र दिले. काहींच्या जवळ ते सुद्धा नसतात.”
त्या व्यक्तीला त्याच्या जीवनाचा खरा अर्थ लक्षात आला.
वरील गोष्टीवरून एक लक्षात येते की, या कोरोना आजाराने अनेक गोष्टी, अनेक दिवस आपण करत नव्हतो, त्या करण्यासाठी वेळ मिळाला आहे. आपल्यातील अनेक नकारात्मक विचार बदलून सकारात्मक विचार जोपासले पाहिजेत. ज्या गोष्टीविषयी जीवनात भीती, नकारात्मक भाव, न्यूनगंड होता तो बदलण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. आपल्यातील अनेक व्यक्ती परिवाराला वेळ देऊ शकत नव्हते, त्यांनी तो द्यावा. आपल्यातील शारीरिकदृष्ट्या असणारा कमकुवतपणा दूर करू शकतो. तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी या मिळालेल्या संधी बदल सर्वांनी एकमेकांना थँक्यू म्हणायला पाहिजे.
याही अडचणीच्या काळामध्ये जीवनाने आपल्याला जे दिले आहे, त्यात समाधान मानले पाहिजे. जे नाही त्याच्या पाठीमागे न धावता, जे आहे त्यात आनंद मानला पाहिजे. आनंदाने जे मिळाले आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. आपले जीवन मोठे केले पाहिजे. येथे प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांचे गाजलेले एक वाक्य लिहावेसे वाटते. “जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नाही...”
- श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
- ईमेल – mangeshvkoli@gmail.com
-      (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

10 comments:

  1. Khup chan shabdat THANK YOU mandla ahe mast and thank you :)

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख..शब्दांकन खूपच सुंदर

    ReplyDelete
  3. खूप छान... पुरातन काळापासून जुनीजाणती माणसं सकाळी उठून सुर्याला हात जोडायची. तो thanks म्हणणाचाच प्रकार आहे.

    ReplyDelete
  4. अगदी सकारात्मक विचार देणारा लेख आहे खूप खूप थँक्यू

    ReplyDelete
  5. किती छान लेख,बरेच दिवसांनी असा लेख वाचायला मिळाला

    ReplyDelete