Thursday, May 7, 2020

'मराठी' पाऊल पडावे पुढे...


सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य, देश तसेच जागतिक पातळीवर सर्वच देशांची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. अनेक ठिकाणी उसमारीची वेळ उद्भवत आहे. काही ठिकाणी जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजाची स्थिती तर फारच दयनीय आहे. प्रत्येकवेळी विविध संकटांना, समस्यांना, अडचणींचा सामना करत शेतकरी जगत आहे. कधीमधी शेतीमध्ये भरगोस पिकाचे उत्पादन होते, त्यावेळी बाजारभाव कोसळतो, हातातोंडला आलेले पिक नैसर्गिक किंवा मानवी निर्मित अडचणी निर्माण होऊन बळीराजाचे हात पुन्हा रिकामाच राहतो.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपल्या देशात मार्च महिन्याच्या शेवटी मा. प्रधानमंत्री यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. भविष्याचा विचार करून घेतलेल्या निर्णयाचा जनतेने तो स्वीकार केला. ‘घरी रहा, सुरक्षित रहा..’ ‘जेथे आहे, तेथेच सुरक्षित रहा.’ ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन केले जात आहे. केंद्राच्या धरतीवरच राज्यही लॉकडाऊन केले गेले. या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे सर्वच उद्योग, व्यवसाय तसेच जनजीवन ठप्प झाले.
‘सोशल डिस्टंसिंग’ हा एकमेवाद्वितीय उपाय म्हणून ‘कोरोना’ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखला जाईल. या हेतूने त्याची अंमलबजावणी केली गेली. अनेक ठिकाणी नोकरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याना ‘वर्क फ्रॉम होम’ या पद्धतीचा वापर करून काम पूर्ण केले जात आहे. ज्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम’ अशक्य आहे, तिकडच्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगितले गेले. काही ठिकाणी प्रवासाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे कर्मचारीवर्ग नोकरीवर जाऊ शकला नाही. काही ठिकाणी जिल्हाबंदी, गावबंदी असल्यामुळे नोकरीवर जाणाऱ्या अनेकांना घरीच रहावे लागले.
आज जवळपास दोन महिन्यानंतर राज्य शासनाने जनतेची होणारे ससेहोलपट, हालअपेष्टा, चिंता, भूकमारी, बेरोजगारी, तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक होणारे हाल पाहून राज्यात काही अंशी संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली. अनेक राज्यात अडकलेल्या व्यक्ती आपापल्या घरी जाण्यास मुभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या बढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक घरात, घरातील प्रत्येकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या मूळ गावी, घरी जाण्यास धडपडत आहे.
अनेक ठिकाणी अडकलेल्या व्यक्ती नोकरीच्या ठिकाणाहून घरी परतायची वाट पाहिली जात आहे. प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेऊन नागरिकांना आपापल्या राज्यात जाण्याचे नियोजन केले आहे. या संचारबंदीमुळे उद्योग, व्यवसाय, औद्योगिक वसाहतीमधील अडकलेला चाकरमाना वर्ग स्वत:च्या घरी परत जात आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
परंतु जेव्हा काही कालावधीनंतर ही संचारबंदी उठेल. ‘कोरोना’ विषाणू नष्ट होऊन सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल. त्यावेळी आज केली जाणारी नोकर कपात, किंवा स्वत:च्या राज्यात, घरी गेलेला कौशल्यपूर्ण चाकरमाना वर्ग त्याठिकाणी उपलब्ध होणे फारच कठीण होणार आहे. या सर्व गोष्टींचा फटका नक्कीच उद्योग, व्यवसाय आणि एकंदरीतच उत्पादकतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक दिवसापासून केली जाणारी ओरड म्हणजे, ‘परप्रांतीय व्यक्तींच्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाहीत?’ बाहेरच्या राज्यातील व्यक्ती काम व्यवस्थित करत नाहीत? त्याच्या फटका उत्पादनावर होत आहे? म्हणावा तेवढा फायदा मिळत नाही? अशा एक ना अनेक प्रश्नांची ओरड होत आहे.
भविष्यामध्ये आताच्या संचारबंदीचा वाईट परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज परप्रांतीय जनतेच्या नावाने आरडाओरड करणाऱ्या मुलांना, संचारबंदीमुळे नवीन संधी उपलब्ध होण्याच्या शक्यता ‘मराठी’ मुलांना निर्माण झाल्या आहेत. काही ठिकाणी मराठी मुलांना नोकर कपातीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. अनेक मोठमोठ्या व्यवसायाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी नाईलाजास्तव नोकर कपात करावी लागणार आहे. ज्या ‘मराठी’ मुलांना नोकर कपातीच्या संकटाना सामोरे जावे लागणार आहे. त्यांनी आपल्या योग्यतेनुसार किंवा कमी-अधिक प्रमाणात जी नोकरी, व्यवसाय, उद्योग किंवा इतर काहीही मिळेल, त्याचा स्वीकार करून उदरनिर्वाह करावा लागणार आहे. हे त्रिवार सत्य असण्याची शक्यता आहे.
आता ‘मराठी पाऊल पडावे पुढे...’ नाही तर बेरोजगारी, उपासमारची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा काही परप्रांतीय मुले येऊन त्यांच्या बुद्धिमत्तेवर नोकऱ्या मिळवतील. त्यावेळी ‘मराठी’ मुलांनी म्हणू नये. आमच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी पळवल्या किंवा इतर काही बोलणे हे चुकीचे ठरेल. निसर्गाने किंवा मानव निर्मितीने मिळालेल्या या संधीचे सोने मराठी मुलांनी करावे हीच इच्छा...
- श्री. मंगेश विठ्ठल कोळी.
- मो. ९०२८७१३८२०
- ईमेल – mangeshvkoli@gmail.com
-      (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.

No comments:

Post a Comment