Saturday, July 31, 2021

“अण्णा भाऊ साठे" जयंतीनिमित्त....

 

अण्णा भाऊ साठे– अष्टपैलू व्यक्तिमत्व

अष्टपैलू व्यक्तिमत्व असा शब्द उच्चार करणे याचे खरे कारण म्हणजे जी व्यक्ती विविध क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी किंवा यशाच्या अति उच्च ठिकाणी असते त्यांच्या बाबतीत असा शब्द प्रयोग करत असताना आपण पाहतो. वडीलभाऊराव साठेआणि आईवालबाई साठे यांच्या पोटी जन्म घेतलेले “तुकाराम भाऊराव साठे” अर्थात “अण्णा भाऊ साठे” या टोपण नावाने ओळखले जातात.महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकलोककवी,लेखक आणि लोकप्रिय शाहीर अशी त्याची ख्याती होती आहे आणि यापुढे देखील असणार आहे. 

अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली.जातीने एका  दलित समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.

अण्णा भाऊ साठेहे नामांकित साहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले.

साठे पहिल्यांदा कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.  १९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती. भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.

साठे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य बौद्ध धर्माऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.

त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.”

अण्णा भाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरतर्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक आहे.

१ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने ४ रुपयाच्या खास टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले.पुण्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.

अण्णा भाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.

अण्णा भाऊ साठे यांचा पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.

मुंबईमधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे.

कोणत्याही व्यक्तीने जीवनात एकदातरी अण्णा भाऊ साठे यांची पुढील वाचनीय पुस्तके वाचलीच पाहिजेत असा माझा आग्रह आहे, याचे कारण देखील खास आहे जी व्यक्ती आळसावलेली आहे, मरगळलेली आहे, नैराश्याने ग्रासलेली आहे त्या व्यक्ती साठी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे नव संजीवनीचे काम करते. अकलेची गोष्ट, अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा, अमृत, आघात, आबी, आवडी, इनामदार, कापऱ्या चोर, कृष्णाकाठच्या कथा, खुळंवाडा, गजाआड, गुऱ्हाळ, गुलाम, चंदन,चिखलातील कमळ, चित्रा, चिरानगरची भुतं, नवती, निखारा, जिवंत काडतूस, तारा, देशभक्त घोटाळे, पाझर, पिसाळलेला माणूस, पुढारी मिळाला, पेंग्याचं लगीन, फकिरा, फरारी, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा,रूपा, बरबाद्या कंजारी, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, रानबोका, लोकमंत्र्यांचा दौरा, वारणेचा वाघ, वैजयंता, वैर, शेटजींचे इलेक्शन, संघर्ष, सुगंधा, सुलतान, कविता आणि माझा रशियाचा प्रवास इ. साहित्यापैकी किमान एक तरी पुस्तक प्रत्येकाने वाचावीत.

अण्णा भाऊ साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट पुढीलप्रमाणेवैजयंता, टिळा लावते मी रक्ताचा, डोंगरची मैना, मुरली मल्हारीरायाची, वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्याची तऱ्हा, फकिरा आपण सर्वांनी पाहिले असतील.

अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा...

-       श्री. मंगेश विठ्ठल कोळी.

-       मो.:- ९०२८७१३८२०


Monday, June 28, 2021

सेवेची गोष्ट....


गोष्ट वाचायचा आधी एक दीर्घ श्वास घ्या आणि या क्षणाचा अनुभव घ्या.
आमचे वडिलोपार्जित घर भोपाळ मध्ये होते आणि मी कामासाठी चेन्नई  येथे राहत होतो. अचानक एक दिवस घरून वडिलांचा फोन आला ताबडतोब निघून ये, महत्त्वाचे काम आहे. मी घाईघाईने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो व रिझर्वेशनचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे एकही जागा शिल्लक नव्हती.
समोरच्या प्लॅटफॉर्मवर ग्रँड ट्रंक एक्सप्रेस गाडी उभी होती, पण त्यातही बसायला जागा नव्हती. कोणत्याही परिस्थितीत घरी जायचे होते, त्यामुळे मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, समोरच्या साधारण श्रेणीच्या डब्यात घुसलो. मला असे वाटले की एवढ्या गर्दीत रेल्वेचा  टि.सी. काही बोलणार नाही.
डब्यात कुठे जागा मिळते का, हे बघण्यासाठी मी इकडे तिकडे बघितले. तर एक सज्जन गृहस्थ बर्थवर झोपले होते. मी त्यांना, "मला बसायला जागा द्या" म्हणून विनंती केली. ते सज्जन उठले, माझ्याकडे पाहुन हसले व म्हणाले, "काही हरकत नाही आपण येथे बसू शकता." 
मी त्यांना धन्यवाद दिले व तिथेच कोपऱ्यात बसलो. थोड्याच वेळात गाडीने स्टेशन सोडले व गाडी वेगाने धावू लागली. डब्यामध्ये प्रत्येकाला व्यवस्थित जागा मिळाली होती. प्रत्येकाने आपापले जेवणाचे डबे आणले होते, ते उघडून सर्वांनी जेवायला सुरुवात केली. डब्यामध्ये सर्वत्र जेवणाचा वास दरवळला होता. डब्यातील माझ्या सहप्रवाशाशी संवाद साधण्याची चांगली वेळ आहे असा विचार करून मी माझा परिचय करून दिला,  “माझ नाव आलोक आणि मी इस्रो ( ISRO ) मध्ये शास्‍त्रज्ञ आहे. आज अचानक मला गावी जावे लागत आहे, म्हणून या साधारण श्रेणीच्या डब्यात मी चढलो. अन्यथा मी ए.सी.डब्ब्याशिवाय प्रवास करत नाही.”
ते सज्जन गृहस्थ माझ्याकडे पाहून हसले व म्हणाले, “अरे वा ! म्हणजे माझ्या बरोबर आज एक शास्त्रज्ञ प्रवास करीत आहेत. ते म्हणाले, “माझ नाव जगमोहन राव आहे. मी वारंगळ येथे चाललो आहे. तिथे जवळच्या एका गावामधे मी राहतो. मी बऱ्याच वेळा शनिवारी घरी जातो.”
एवढे बोलून त्यांनी आपली बॅग उघडली व त्यातून आपला जेवणाचा डबा काढला व म्हणाले, “हे माझ्या घरचे जेवण आहे, तुम्ही घेणार का?”
माझ्या संकोची स्वभावामुळे, मी नकार दिला व माझ्या बॅग मधील सँडविच काढून, खाऊ लागलो.
खाताना मी मनाशीच विचार करीत होतो की, 'जगमोहन राव ' हे नाव मी कुठेतरी ऐकल्या सारखे वाटतेय, पण आठवत नाही.
काही वेळातच सर्व लोकांची जेवणे झाली व सगळे झोपण्याची तयारी करू लागले. माझ्या समोरच्या बर्थवर एक कुटुंब होते. आई वडील व दोन मोठी मुले होती. ते पण झोपण्याच्या तयारीला लागले आणि मी एका बाजूला बसून मोबाईल मधील गेम खेळू लागलो.
रेल्वे वेगात धावू लागली होती. अचानक माझे लक्ष समोरच्या बर्थवर झोपलेल्या 55 - 57 वर्षाच्या त्या सज्जन गृहस्थाकडे गेले, तर ते तळमळत होते व त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. त्यांचा परिवार घाबरून जागा झाला व त्यांना पाणी पाजू लागला. पण ते गृहस्थ बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मदतीसाठी मी जोराने ओरडलो, “अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. इमर्जन्सी केस आहे.”
पण रात्रीच्या वेळी स्लीपर श्रेणीच्या डब्यात डॉक्टर कुठला मिळणार? त्यांचा सारा परिवार त्यांची असहाय्य अवस्था पाहून रडायला लागला. तेवढ्यात माझ्या सोबतचे जगमोहन राव जागे झाले व त्यांनी मला विचारले, “काय झाले?”
मी त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. त्यांनी ताबडतोब आपली बॅग उघडली. त्यातून स्टेथोस्कोप काढला व त्या गृहस्थाला तपासू लागले. 
काही मिनिटातच त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरले, परंतु ते काही बोलले नाहीत. मात्र त्यांनी आपल्या बॅगेतून इंजेक्शन काढले आणि त्या गृहस्थाला छातीत इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांच्या छातीवर दाब देऊन, तोंडाला रुमाल लावून त्यांनी तोंडावाटे त्याला श्वास देण्यास सुरुवात केली. काही वेळातच, त्या श्वासोच्छ्वासामुळे त्या गृहस्थांचे तडफडणे कमी झाले.
नंतर जगमोहन रावांनी आपल्या बॅगमधील काही गोळ्या त्या गृहस्थांच्या मुलाला दिल्या व सांगितले, “तुम्ही घाबरू नका. तुमच्या वडिलांना गंभीर हार्ट अटॅक आला होता पण मी इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा धोका आता टळला आहे. त्यांना आता या गोळ्या द्या.”
त्या मुलाने आश्चर्याने विचारलं, “पण आपण कोण आहात?”
ते म्हणाले, “मी एक डॉक्टर आहे. मी एका कागदावर त्यांच्या तब्येतीची माहिती व औषध लिहून देतो.  कृपया तुम्ही पुढच्या स्टेशन वर उतरा व त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा.”
त्यांनी आपल्या बॅगमधून एक लेटर पॅड बाहेर काढले व लेटर पॅड वरील माहिती वाचल्यावर मला आठवले.
त्यावर छापले होते - डाॅ.जगमोहन राव, हृदय रोग तज्ञ, अपोलो हॉस्पिटल, चेन्नई.
आता मला आठवले की, काही दिवसांपूर्वी मी माझ्या वडिलांना अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता घेऊन गेलो होतो, तेव्हा डॉक्टर जगमोहन रावांबद्दल ऐकले होते. त्या हॉस्पिटल मधील, ते सर्वात हुशार व वरिष्ठ हृदयरोग तज्ञ होते. त्यांची अपॉइंटमेंट घेण्याकरिता कित्येक महिने लागत असत. मी आश्चर्यचकित नजरेने त्यांच्याकडे पहात होतो. एवढा मोठा डॉक्टर रेल्वेच्या साधारण डब्यातून प्रवास करीत होता. आणि मी एक छोटा शास्त्रज्ञ - मी ए.सी. शिवाय प्रवास करत नाही अशा बढाया मारत होतो. आणि हे एवढे असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व असूनही सामान्य माणसासारखे वागत होते!
एवढ्यात पुढचे स्टेशन आले व ते आजारी गृहस्थ आणि त्यांचा परिवार टि.सी.च्या मदतीने खाली उतरले.
रेल्वे पुन्हा सुरू झाली. मी उत्सुकतेने त्यांना विचारले, “डॉक्टर! आपण तर आरामात ए.सीच्या डब्यातून प्रवास करू शकला असता, मग या सामान्य डब्यातून प्रवास का करता ?”
ते हसून म्हणाले, "मी जेव्हा लहान होतो, गावाकडे राहत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की रेल्वेमध्ये विशेषतः सेकंड क्लासच्या डब्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे मी जेव्हा गावी जातो किंवा प्रवासाला जातो तेव्हा सामान्य डब्यातून प्रवास करतो. कारण कुणाला कधी डॉक्टरची गरज लागेल सांगता येत नाही. आणि मी डॉक्टर झालो ते लोकांची सेवा करण्याकरताच. आम्ही कोणाच्या उपयोगी पडलो नाही तर मग आमच्या शिक्षणाचा काय फायदा?"
नंतरचा प्रवास मी त्यांच्याशी गप्पा मारतच केला. पहाटेचे चार वाजले होते. वारंगल स्टेशन जवळ आले होते. ते उतरून गेले व बाकीचा प्रवास मी त्यांच्या सीटकडून येणाऱ्या सुगंधामध्ये न्हाऊन निघत पूर्ण केला. येथे एक महान माणूस बसलेला होता, जो हसत खेळत लोकांची दुःख वाटून घेत होता, प्रसिद्धीची हाव न बाळगता निरपेक्षपणे जनसेवा करीत होता.
आत्ता माझ्या लक्षात आले की डब्यात इतकी गर्दी असूनही हा सुगंध कसा काय जाणवत होता. तो सुगंध दरवळत होता त्या महान, असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आणि एका पवित्र मनाच्या आत्म्याचा, ज्याने माझे विचार आणि जीवन दोन्ही सुगंधित करून टाकले होते.
म्हणूनच तर, "जसे आम्ही बदलू, तसे जग ही आपोआपच बदलेल.”
(वरील लेखन मी केलेले नाही.)
   

Friday, June 4, 2021

दुसऱ्यांचे विचार...


        सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं, आणि ओवलेला दोरा संपला, तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा, दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

        पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं, दुसऱ्यानं तिसऱ्या साठी, जेणेकरुन वेळ आणि इंधनबचत व्हायचीच, पण गैरसोयही टाळता यायची.

       सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.

        आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं (नीट पुरवणी आत ठेऊन) निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो, शोधाशोध करावी लागत नाही.

       पाण्याची बाटली आपण रिकामी केली व लगेच भरुन फ्रीजमधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.

        बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं, ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.

       पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून/घासून ठेवायचे, हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.

       खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा  कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे, आपली टर्न आल्यावर संपल्या/बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.

      घर सगळयांचं असतं, 'सगळी जवाबदारी गृहिणीची' असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे.

       प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो, चुकीच्या सवयी लागतात.

       घर ही एक संस्था समजून घराची एक शैली, एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात, तसे घरातही काही नियम असले पाहिजेत, तरच त्याचं हाॅटेल होणार नाही. (खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच!)

      लाॅकडाऊनचा काळ ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत. काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर पुढं भविष्यात फायदा होईलच आणि नातीसुध्दा चांगली होतील. लहान मुलांना हे शिकवता येईल. 

      थोडं थांबून आपल्या नंतर येणाऱ्याचा विचार केला तर ही मदतीची साखळी सुरु राहील. मुख्य म्हणजे आपली वेळ येईल तेव्हा आपल्यालाही फायदे मिळतील.

टीप :- सदर लेख मी लिहिलेला नाही, सुंदर विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी आपणास वाचण्यासाठी उपलब्ध करत आहे.

Monday, May 24, 2021

गौतम बुद्धांचे विचार - सत्याची वाट

 

गौतम बुद्धांचे विचार - सत्याची वाट

आपल्याकडे अनेक लोकांनी प्रेरित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्माची गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याने आयुष्य नक्कीच सुखकर होते असे मानले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. 

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला बुद्धांची काही विचार सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जे व्यक्ती त्यांच्या विचारांचे आचरण करतात त्याची काटेकोरपणे अमलबजावणी करतात त्यांना नक्कीच सत्याची वाट गवसते आणि अशाच व्यक्तींच्यामुळे आपला समाज शिकून संघटीत होतो आणि संघर्ष करून न्यायाने मिळवतो. तुम्हीही ही शिकवण पाळली तर तुमचं आयुष्य नक्की सुखकर होईल.

प्रत्येक उजाडणारी पहाट दोन पर्याय घेवून येते, एक म्हणजे झोपून स्वप्न पहात रहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. दोन्ही ही पर्याय सर्वांना मिळतात. एव्हाना प्रत्येक क्षणाला वेळ बदलत असते. स्वतःला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक क्षणी नवीन काही तरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यश मिळाले तर उत्तमच परंतु अपयश मिळाले तर त्यातून मिळणारा अनुभव हा फक्त स्वतःचाच असेल. सतत नवनवीन प्रयत्न करत राहिले पाहिजे. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. संकट कितीही मोठं असुद्या, फक्त प्रयत्न आणि विश्‍वास कायम ठेवा,  तुम्हाला जरूर यश मिळेल.

नेहमी एक लक्षात ठेवले पाहिजे. “ज्याला धन कमवायचे आहे, त्याने कण सुद्धा वाया घालवू नये.” “ज्याला ज्ञान कमवायचे आहे. त्याने क्षण सुद्धा वाया घालवू नये.” याचे एक उत्तम उदारहण द्यायचे झाले तर, एकदा गौतम बुद्ध समुद्राच्या किनारी फिरण्यासाठी जातात. तेथे त्यांना लाटेबरोबर किनार्‍यावर येणारे असंख्य मासे तडफडताना दिसतात. ते लगेचच त्या माश्यांच्या मदतीला धावून जातात. लाटेबरोबर किनार्‍यावर येणारे तडफडणारे मासे एकेक करून पुन्हा समुद्रात टाकत होते. त्याच वेळी दुसरी एक व्यक्ती किनार्‍यावर फेरफटका मारत होती.

बुद्धांच्या कृतीकडे पाहून त्याला हसायला आले. तो म्हणाला, ‘अरे, “तु हे काय करतो आहेस? असे हाताने एकेक मासा पाण्यात टाकून काय मिळणार आहे? का स्वत:चा वेळ वाया घालवत आहेस? हे ऐकूण बुद्धांनी त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत म्हणाले, ‘मला समाधान मिळेल, परंतु ज्याच्यासाठी मी हे करत आहे, त्या माशांना याचा नक्कीच फायदा होईल.” काही गोष्टी क्षुल्लक आणि छोट्या वाटतात. म्हणून त्या करणे टाळल्या जातात. परंतु ज्याच्यासाठी आपण करत असतो, त्याच्यासाठी ती गोष्ट फार मोठी आणि महत्वाची असू शकते. एक मात्र खरे आहे, “चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतात.”

या उदाहरणातून एवढंच लक्षात घेतले पाहिजे. ‘आजचा एखादा चांगला विचार, उद्या कोणाचे तरी उत्तम भविष्य घडवू शकतो.’ इतर व्यक्ती काय आणि कसा विचार करतात यापेक्षा आपण स्वत: बद्दल कसा विचार करता हे महत्वाचे असते. फुलाला वाढायला ज्या प्रकारे सुर्य किरणांची आवश्यकता असते, तसेच स्वतःच्या प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते. आपल्या गुणवत्तेवर किंवा क्षमतांवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा मानू नका. कारण, “लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही.”

बुद्ध हे अतिशय शांत होते. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. असे संत ज्यांनी समाजाला शांततेची शिकवण दिली. गौतम बुद्धांचे विचार खास तुमच्यासाठी सांगण्याचा छोटासा माझा प्रयत्न आहे. गौतम बुद्धांचे सुविचार अगदी शाळेपासून शिकवण्यात येतात. गौतम बुद्ध विचार मांडल्यानंतर त्यांचे आचरण करण्यासाठी थोडे सुकर करून देण्याचा प्रयास आहे. गौतम बुद्ध विचारांच्यामुळे आपल्याला रोजच्या आयुष्याला प्रेरणा मिळते. आयुष्याला प्रेरणादायी ठरणारे असे काही गौतम बुद्धांचे विचार म्हणजे सत्यवाणीच अमृतवाणी आहे, सत्यवाणीच सनातन धर्म आहे. सत्य, सदर्थ आणि सधर्मावर संत सदैव दृढ असतात. असत्य बोलणारे नरक जिवंतपणी यातना भोगतात.

ज्याला खोटं बोलायला लाज वाटत नाही, त्याचे साधूपण रिकाम्या मटक्याप्रमाणे आहे. साधुतेचे एक थेंब देखील त्याच्या हृदयात नाही. सभेत, परिषदेत किंवा एकांतात कोणाशीही खोटे बोलू नये. खोटे बोलण्यासाठी दुसर्‍याला भाग पडू नये. असत्य बोलण्यासाठी प्रोत्साहित करू नये. असत्याचा परित्याग केला पाहिजे. जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग जीत नेहमी आपलीच होणार, ही जीत तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. हजारो पोकळ शब्दांपेक्षा एकच चांगला शब्द योग्य आहे ज्यामुळे शांती नांदेल. संतोष सर्वात मोठे धन आहे, निष्ठा सर्वात मोठे संबंध आहे आणि आरोग्य सर्वात मोठे उपहार आहे. भूतकाळावर लक्ष देऊ नये, भविष्याबद्दल विचार करू नये, आपले मन वर्तमानावर केंद्रित करा. ज्याला हेतुपुरस्सर खोटं बोलण्यात लाज वाटत नाही, ती व्यक्ती कुठलेही पाप करू शकते. म्हणून मनात ठरवून घ्यावे की मी विनोद करताना देखील असत्य बोलणार नाही.

काही लोक सांप्रदायिक मतांमध्ये पडून विविध प्रकाराचे तर्क प्रस्तुत करतात आणि सत्य - असत्य दोन्ही मांडतात, अरे पण सत्य तर जगात एकच आहे, अनेक नव्हे. ध्यान करून ज्ञान मिळवता येते आणि ज्ञान नसेल तर माणूस अज्ञानी राहतो. आपण ह्या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात की कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील आणि कोणत्या अडवून ठेवतील, म्हणून तेच निवडा जे तुम्हाला ज्ञानाकडे, ध्येयाकडे घेऊन जातील.  हे एक अंतिम सत्य आहे की द्वेषाचा अंत हा द्वेषाने नाही तर प्रेमानेच संभव आहे. आपण जो आणि जसा विचार करू अगदी तसेच बनतो. काय घडून गेलं यापेक्षा काय करायचं बाकी आणि काय करता येईल याकडे मी जास्त लक्ष द्यावं. राग येणे ही समस्या नाही तर विचार आहे. जसा तुम्ही रागाचा विचार करणे सोडून द्याल तसा तो सहज नाहीसा होईल. रागाला शांततेने जिंका, वाईटाला चांगल्याने जिंका आणि असत्याला सत्य बोलून जिंका. जे लोकं राग येणाऱ्या विचारापासून स्वतःला मुक्त करतात, शांतता त्यांनाच प्राप्त होते. जर तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही. आभाळासाठी पूर्व आणि पश्चिम दोन्ही सारखेच मात्र लोकं अश्या गोष्टीमध्ये भेदभाव करतात त्यावर विश्वास देखील ठेवतात.

जर तुम्ही रागावले तर तुम्हाला शिक्षा मिळणार नाही मात्र राग येणे हिच तुम्हाला खूप मोठी शिक्षा आहे. तुम्ही कितीही चांगले विचार वाचा, बोला मात्र जो पर्यंत तुम्ही त्यांना अमलात आणणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार नाही. जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष करणे सोडून द्या. जर तुम्ही तुमचा मार्ग नाही सोडला, त्यावरच चालत रहाल तर निश्चितच तुम्ही तिथं पोहचाल जिथं तुम्हाला जायचं आहे. लहान लहान नद्याच जास्त आवाज करतात, विशाल महासागर तर अगदी शांत असतात. पूर्ण विश्वात असा एक पण व्यक्ती नाही जो तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल. तुम्ही बाहेर कितीही शांतता शोधा परंतु मिळणार ती तुम्हाला तुमच्या आतच मिळणार आहे. जंगली प्राण्यापेक्षा आपण आपल्या कपटी आणि दुष्ट मित्रापासून जास्त सावध रहा. जंगली प्राणी फक्त तुम्हाला शारीरिक हानी पोहचवू शकतो मात्र एखादा वाईट मित्र तुम्हाला मानसिक हानीही पोहचवू शकतो. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला सत्याचा विसर पडू शकतो. जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल त्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागेल, दुसऱ्यावर अवलंबून राहून ती मिळणार नाही.

सूर्य, चंद्र आणि सत्य हे जास्त काळ लपून राहू शकत नाही. अंधारात चालण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तशीच जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते. आरोग्य ही सर्वात चांगली भेट, समाधान हे सर्वात मोठं धन तर विश्वास हे सर्वात चांगलं नातं आहे.  आज आपण जे काही आहोत, ते आपण जो विचार केला आणि त्यावर काम केलं त्याचाच परिणाम आहे. जो वाईट विचार करेल आणि त्यावरच काम करेल त्याला नेहमी दुःखच मिळेल याउलट जर चांगला विचार करून त्यावर काम केलं तर आनंद हा सावलीसारखा आपल्या सोबत असेल. केवळ चांगला विचार करून, बोलून कुणी चांगलं ठरत नाही तर त्या विचारांना अमलात आणून जगणारे चांगले असतात.

प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्यासाठी स्वतः जबाबदार  असतो. आज या कोरोना महामारीमध्ये स्वत: शासनाने सांगितले आहे की, “माझे कुटुंब माझी जबाबदारी”, “मीच माझा आणि माझ्या समाजाचा जबाबदार आहे”, तसेच आपण प्राथमिक स्वरुपात स्वत:ची जबाबदारी काळजी घेतली तर आपण समाज सुद्धा वाचवू शकतो. आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही तर आनंद हा आपण कसं अनुभवतो, इतरांसोबत कसा व्यवहार करतो आणि इतरांशी कसं बोलतो यातून मिळतो. एक क्षण दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन हे पूर्ण विश्व बदलू शकतो.

जीवनाचा सर्वात मोठा उद्देश हा स्वतःच्या जीवनाचा उद्देश माहिती करून घेणे असतो आणि त्यानंतर पूर्ण समर्पण करून तो पूर्ण करण्यासाठी जीवन घालवणे. आनंद हा आपल्याजवळ काय आहे यात नसून आपण काय देऊ शकतो यात आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल की तुम्हाला इतर कुणी आनंद आणि दुःख देऊ शकतो तर ते हास्यास्पद असेल. इतरांवर विजय मिळवणे यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे खूप मोठं आहे. जर एखाद्या समस्येचं समाधान निघत असेल तर चिंता का करायची? आणि समाधान निघत नसेल तर चिंता करून काहीच उपयोग होणार नाही.

ज्याप्रकारे एखाद्या डोंगराला वाहत्या हवेने काहीच फरक पडत नाही अगदी तसंच एखाद्या बुद्धिमान व्यक्ती प्रशंसा आणि निंदा यांनी तिळमात्रही विचलित होत नाही. या पूर्ण जगात एवढा अंधार नाही की तो एका दिव्याचा प्रकाश विझवू शकेल. केवळ मनाला वाटते म्हणून माणूस वाईट कृत्य करतो. जर त्या मनालाच परिवर्तित केलं तर सर्व वाईट कामं संपतीलजर तुमच्या आयुष्यात मायाळूपणा, दयाभाव नसेल तर तुमचं जीवन अर्धवट आहे. आपणच आपल्या नशिबाचे लेखक आहोत. आपण जन्म एकट्यानेच घेतो आणि मरतोसुद्धा एकटेच म्हणून स्वतःचा रस्ता स्वतः बनवा आणि त्यावरच चालत रहा. आपल्याला उन्नतीसाठी आपल्यालाच काम करावं लागेल यासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून नाही राहू शकत. आपलं असत्यवादी असणं हेच आपल्या अपयशाचं कारण असते. 

या लेखातून बुद्धांचे विचार मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी जेवढे जमतील तेवढे विचार अवलंबून स्वत:चे जीवन अधिक सुखकर करावे एवढीच विनंती आहे.

धन्यवाद...

- श्री. मंगेश विठ्ठल कोळी, शिरोळ.

मो.- ९०२८७१३८२०.


Thursday, March 25, 2021

स्वतःची भरीव साथ हवी.

 

आज समुपदेशन करीत असताना एक खूप सुंदर गोष्टींचा शोध मला लागला. एक सुशिक्षित व्यक्ती ज्याच्याकडे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असून सुद्धा त्याचे मन मात्र उदास, खिन्न, निरुत्साही, नैराशेच्या छायेत गुरफटून गेले होते. आपण या नैराश्य रुपी संकटातून कधीच बाहेर पडू शकणार नाही, इतपत त्याची मानसिकता झाली होती. त्याच्या कोण्या मित्राने उत्तम समुपदेशक म्हणून माझे नाव त्याला सुचवले होते म्हणून तो माझ्याकडे आला होता. मी ठरवून दिलेल्या वेळेस आम्ही माझ्या समुपदेशनाच्या खोलीमध्ये भेटलो. भेटल्यानंतर सुरुवातीच्या संभाषणातून त्याचे नैराश्येने ग्रासलेले मन मला जाणवले. त्या व्यक्तीने स्वतःचा भूतकाळ, स्वतःची पार्श्वभूमी सांगितली. त्यातून त्या व्यक्तीने खूप प्रगती केल्याचे मला जाणवले. परंतु ती व्यक्ती मनापासून सुखी, आनंदी वाटत नव्हती. त्याचे एक कारण माझ्या लक्षात आले. भेटायला आलेली व्यक्ती शारीरिक दृष्ट्या सदृढ होती. भौतिक सर्व सुख देणाऱ्या वस्तू त्याच्याकडे होत्या. परंतु अंतर्मन सुखी नव्हते, याची त्या व्यक्तीला पुरेपुर जाणीव होती. उदासीनता, खिन्न झालेले मनाचे आनंदात, उत्साहात कसे रूपांतर करायचे हा प्रश्न घेऊन माझ्याकडे आली होती.

मी त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्या. मी त्यावरील उपाययोजना सांगण्यास सुरुवात केली. मी जसजसे त्याच्या मनाचे समाधान करत गेलो तसतसे त्याचे नैराशेच्या गर्द छायेत असणारे मन ताजेतवाने, आनंदी, उत्साही होऊ लागले. शेवटी मी त्या व्यक्तीला माझ्या वाचनात आलेलं उदाहरण सांगितले. ते उदाहरण असे की...

एका गावात फुटबॉलचा सामना चालू होता. लोकं, प्रेक्षक खेळाचा आनंद लुटत होते. तेव्हा रस्त्याने जाणारा एक व्यक्ती. काय झाले म्हणून उत्सुकतेने त्यात सामील झाला आणि पाहू लागला. तर खेळाडू फुटबॉल लाथेने मारत मैदानात टोलवाटोलवी करत होते.

त्या व्यक्तीला आश्र्चर्य वाटले. हे लोकं त्या चेंडूला लाथेने का मारत असतील बरे!

नाराजी व्यक्त करत त्याने जवळच्या एका जाणकारांना विचारले.

हे सर्व लोकं त्या चेंडूला का मारत आहेत? त्याची काय चूक आहे?

तो जाणकार व्यक्ती म्हणाला, त्या चेंडूची एकच चूक आहे की तो आतून पोकळ आहे.

जर तो चेंडू आतून भक्कम असता तर, या लोकांची काय बिशाद आहे त्याला लाथेने मारायची..!

आज माझ्या समोर बसलेल्या त्या व्यक्तीची हीच अवस्था झाली आहे. समाज बाह्यांगाने, भौतिक सुखाने तो भक्कम दिसत होता. त्यासाठी तो सतत कार्यरत होता. परंतु स्वतःच्या आत्मिक, मानसिक सुखपासून दूर गेला होता. परंतु तो भौतिक सुखाच्या मागे लागून तो आतून पोखरला गेला होता. त्यामुळेच आज ती व्यक्ती मानसिक दृष्ट्या कमकुवत होत चालली होती. आतून मजबूत व्हायला हवे. तरच आपण सुखी होऊ शकतो याची जाणीव मी त्याला करून दिली.

सर्व समुपदेशनाच्या शेवटी मला समजले की, आपल्या समाजामध्ये जवळपास सर्वच व्यक्तींना अशा समुपदेशनाची गरज आहे.

वरील उदाहरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात त्याचा वापर केला तर कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्याचे बळ, शक्ती ही इतर कोणाच्यात नसून ती फक्त आणि फक्त स्वतः मध्ये असते. हा आत्मविश्वास जरूर निर्माण होईल. याची मला नक्कीच खात्री आहे.

- श्री. मंगेश विठ्ठल कोळी.

- मो. 9028713820

Monday, January 25, 2021

समज - गैरसमज...

तहान-भुकेने अगदी व्याकुळ घामाने चिंब झालेले तुम्ही  बऱ्या पैकी सावली असलेलं झाड शोधून आस-पास कुठे पाणी मिळतय का हे बघताय तेवढ्यात समोरच्या बिल्डिंग मधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्ती कडे तुमचं लक्ष जात आणि ती व्यक्ती तुम्हाला पाणी हवंय का विचारते !

त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल? त्या व्यक्ती बद्दल तुमचं मत काय होईल?

ती व्यक्ती मग  खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते , तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची 15 मिनटं तिथे कोणीही येत नाही !

आता तुम्हाला त्या व्यक्ती बद्दल  काय वाटेल?

हे तुमचं दुसरं मत असणार आहे?

थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते "सॉरी मला जरा उशीर झाला पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच  पाण्या ऐवजी लिंबू पाणी आणलं आहे ! "

आता तुमचं त्या व्यक्ती बद्दल मत काय आहे ?

तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येत की अरे ह्यात साखर अजीबातच नाहीये !

आता तुमचं त्या व्यक्ती बद्दल काय मत होईल?

तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊच काढते आणि म्हणते..

तुम्हाला चालत असेल नसेल आणि किती कमी जास्त गोड आवडत असेल हा विचार करून मी मुद्दामच आधी साखर घातली नाहीये !

आता तुमचं त्या व्यक्ती बद्दल काय मत झालं आहे?

मग विचार करा अवघ्या 15 -20 मिनिटात तुम्हाला तुमची मत, तुमचे आडाखे भरभर बदलावे  लागतायत.

अगदीच सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत क्षणात आपले विचार, आपली मतं तद्दन चुकीची ठरू शकतात तर मग कोणा बद्दल फारशी काहीच माहिती नसताना, ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहीत नसताना केवळ वरवर पाहून त्या बद्दल चुकीची समजूत करून घेणं  योग्य आहे का ?

जर नाही तर एखाद्या बद्दल गैरसमज करून घेण्या पेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणे योग्य नाही का ?

असं आहे की, जो पर्यंत कोणी तुमच्या अपेक्षे प्रमाणे वागतय तो पर्यंतच ते चांगले असतात नाहीतर वाईट ?

गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात तेव्हा "एकमेकांना समजून घ्या" म्हणजे जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत.

कोणाविषयी मत बनवताना घाई करु नये...!!