Wednesday, February 24, 2016

मन चंगा तो...

‘‘मन चंगा तो, कठौती मे गंगा’’ या महान संत रवि दास यांच्या वाक्याचे आज तागायत परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. स्वतःला जो ओळखतो तो इतरांनाही चांगल्या पद्धतीने ओळखतो.  मला काही दिवसांपूर्वी समुपदेशनासाठी एक फोन आला होता. फोनवर बराच वेळ बोलणे सुरू होते. बोलता बोलता तो म्हणाला, पंधरा-वीस वर्षांपूर्वी एक मित्र मला वाकडं बोलला ते अजून मनातून जात नाही. मला हसूच आलं. आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो. हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.
खरंतर आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो. कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात. आपल्या मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. अंगावर झुरळ आलं की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते. तसंच, आपल्याबाबत कुणी किळस वाटणारे शब्द वापरले तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत. आपला मेंदू म्हणजे काही गोडाऊन नाही की वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात.
जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण, आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू. जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नाही त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो. आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो. मेंदूला वाचा नसते. तो मुका असतो. त्याला काही कळत नाही. पण हृदयाला मन असते. त्याला तरी ते कळले पाहिजे.
काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात ती गोष्ट वेगळी. अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे. पण 90-95 टक्के गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.
मेंदू सृजनशील आहे. त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे. ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे. आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे. या पलीकडे काय असू शकते? लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले की त्यात तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते. मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे.
यावरून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की अनेकजणांची प्रगती ही इतर लोक काय म्हणतात किंवा इतरांना काय आवडते त्यानुसार जीवन जगत असतात. स्वतःचे मन उत्तम असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकता.

मुदत वाढ ???

आज आपण सर्व जण स्पर्धेच्या युगात आहोत. या युगात सतत कार्यरत राहिल्याशिवाय यश मिळत नाही असे प्रत्येकाचे मत आहे. परंतु सतत कार्यरत राहण्यापेक्षा योग्य वेळी थांबणे हेच खरे यश मिळवून देण्यासाठी गरजेचे असते. मग ते शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरी काहीही असो योग्य वेळी निर्णय घेणे आवश्यक असते. शिक्षणाच्या बाबतीत पाहायला गेले तर कोणते शिक्षण घेतले पाहिजे हे महत्वाचे आहे, त्याच बरोबर किती शिक्षण घ्यायचे यालाही काही मर्यादा असायला हव्यात. फक्त शिक्षण घेत राहिले आणि त्याचा उपयोग स्वतः च्या जीवनामध्ये करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर असे शिक्षण काय कामाचे त्याच बरोबर नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा अशीच अवस्था आहे. तुम्ही जो व्यवसाय करत आहात त्यामध्ये सर्व प्रकारच्या प्रयत्नांनी सुद्धा यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही घेत असलेले निर्णय चुकीचे आहेत हे लक्षात ठेवा.
जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर,
तुमच्या कामाची पद्धत बदला तुमचे तत्व नाही.
कारण झाड नेहमी आपली पान बदलतात मुळ नाही.
वरील वाक्याचा योग्य अर्थ ज्याला समजला आहे तो नक्की यशस्वी होऊ शकतो. काही दिवसांपासून पोलीस शिपाई पद भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि दोन दिवसापूर्वी अर्ज करण्याच्या मुदतीत आणि वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या अनेक मोठमोठ्या विभागामध्ये विविध पदांच्या भरती दरम्यान मुदत वाढीचे प्रकार होत असतात. परंतु ज्या विभागामध्ये अनेक उमेदवारांचे लक्ष लागून राहिलेले असते. अशाच पद भरतीच्या वेळी मुदत वाढ, वयोमर्यादेतील वाढ, किंवा इतर अनेक प्रकार वापरले जातात. याची नक्की काय कारणे असतील याचा कोणी गांभीर्याने विचार करत नाही. अशा विभागामध्ये आवश्यक असणार्‍या उमेदवारांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर अंतिम दिनांक सुद्धा प्रसिद्ध केली जाते. परंतु शेवटच्या दिवशी सांगितले जाते कि मुदत वाढ केली गेली आहे.
तो पर्यंत उमेदवारांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तरी सुद्धा मुदत वाढ का? असे प्रश्न चिन्ह निर्माण होतात. याची दोन करणे असू शकतील एक म्हणजे जे उमेदवार काही अडचणींमुळे अर्ज करू शकले नाहीत त्यांना मुदत वाढ देऊन अर्ज करण्याची संधी दिली जावी आणि दुसरी म्हणजे त्या विभागाची आर्थिक परिस्थिती पूर्ण झालेली नाही. एकास पाच अशी उमेदवारांची निवड पद्धत लागू करून त्यातील योग्यतो उमेदवार निवडला जातो. ऑनलाईन अर्जांची संख्या दररोज संबंधीत विभागाला समजत असते. तरी सुद्धा का म्हणून मुदत वाढ दिली जाते या प्रश्‍नाचे उत्तर अनुत्तीर्णच राहते. अर्ज करण्याची मुदत आणि त्याच बरोबर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते अंतिम निवड होई पर्यंतचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले जाते. परंतु आज पर्यंतच्या इतिहासात शासनाच्या भरती प्रक्रिया झाली नसल्याचे दुदैवी चित्र सर्वांच्या समोर उभे आहे. अर्ज करण्याच्या मुदत वाढीवर कोणाचाही आक्षेप नसतो, परंतु त्या मागील सत्य परिस्थितीची ही कोणी चौकशी करीत नाही. वेगवेगळ्या विभागामध्ये होणार्‍या पद भरती ही केव्हा ही योग्य ठरेल राज्य आणि केंद्र शासनाच्या प्रत्येक विभागाने पदभरती बाबतीत अंदाजित वेळापत्रकानुसार भरती प्रक्रिया राबविली तर नक्कीच उमेदवारांचा आत्मविश्‍वास वाढू शकेल.

Wednesday, February 17, 2016

मोफत पुस्तके वाचण्याची सुवर्ण संधी

मी व्यक्तिमत्व विकास या विषयावरती लिहिलेली पुस्तके खालील दिलेल्या लिंक वरती मोफत वाचण्यासाठी दिली आहेत. त्याचा लाभ तुम्हीही घ्या आणि इतराना ही वाचण्यास पाठवा. ही विनंती. 

पुस्तकाचे नाव :- विचारवृक्ष (स्वतंत्र विचारसरणी बनविणारे पुस्तक)
Kindly visit the following Link...

पुस्तकाचे नाव :- यशोदीप (करिअरच्या वाटा शोधण्यास मदत करणारे उपयुक्त पुस्तक)
Kindly visit the following Link...
http://www.readwhere.com/read/638629/Yashodeep

पुस्तकाचे नाव :- यशोशिखर (स्वताचे व्यक्तिमत्व घडवणारे पुस्तक)
Kindly visit the following Link
पुस्तकाचे नाव :- यशोमंदिर (यशाच्या शिखरापर्यंत पोहचवणारे पुस्तक)
Kindly visit the following Link...



प्रतिक्रिया कळवा.
माझे आणखीन आर्टीकल वाचण्यासाठी पुढील संकेत स्थळ पाहा.
Mob : - 9028713820 

सवय करून घ्या.

     तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये अनेक घटना घडत असतात मग त्यातील काही घटना मनासारख्या म्हणजेच पसंत पडणार्‍या तर काही मनाविरुद्ध म्हणजेच पसंत न पडणार्‍या हि असतील त्याकडे दुर्लक्ष केलेलेच चांगले. ज्यावेळी तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे एक आव्हान म्हणून पाहू लागत त्यावेळी तुमची प्रगती होत असते. परंतु एक लक्षात ठेवा जेंव्हा काही व्यक्ती तुमच्यातील अनेक चांगल्या गुणांची चेष्ठा, मस्करी, किंवा वायफळ गप्पा मारण्यासाठी विषय म्हणून घेत असतील किंवा तुम्ही करीत असलेल्या एखाद्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करीत असतील तेंव्हा तुमची प्रगती होत आहे हे जाणून घ्या. स्वतः ची प्रगती करायची असेल तर इतर लोक काय म्हणत आहेत याकडे दुर्लक्ष करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. अनेकांची प्रगती अशाच किरकोळ घटनांच्यामुळे थांबलेली असते. तुम्ही एखाद्या ध्येयाकडे जात असताना नेहमी तुमच्या बरोबर एक तरी हितचिंतक असणे आवश्यक आहे. कारण एखाद्या ठिकाणी तुम्ही गोंधळून गेलात तर तो तुम्हाला नक्कीच सावरण्यास मदत करेल. मग तो हितचिंतक तुमचे आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रीण कोणीही असो, पण बरोबर असणे आवश्यक असते. लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग होत नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणे ही खूप महत्वाचे आहे.
     जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. अनेक व्यक्तींना तुम्ही पाहता कि नेहमी अहंम उराशी बाळगून असतात. मी खूप कष्ट केले, माझ्यासारखं कोणी केलं नाही, मी इतरांसाठी चांगल्या गोष्टी केल्या, किंवा मी भविष्यात हे करणार ते करणार, पुढे असं होणार तसं होणार अशा वायफळ गप्पा करीत असतात. परंतु त्या दिशेने एक हि पाऊल पडताना दिसत नाही, आज जे काही ठरविलेले असते कदाचित उद्या काहीतरी वेगळं आणि नवीन विचार घेऊन पुन्हा दररोजच्या सारखे वायफळ बोलताना पाहतो. पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशी स्थिती असते. अशा व्यक्तींना वाटते कि कुणावाचूनमाझे काहीच आडत नाही. परंतु हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे ही सांगता येत नाही. एखादे काम नवीन व्यक्तीकडून पूर्ण करू शकता, परंतु जुन्या व्यक्तीची उणीव मात्र नक्कीच राहते हे विसरून चालत नाही.
     काल परवा माझ्या वाचनात आलेलं एक उदाहरण सांगतो, एका फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो. मी विचारले, ‘आज काय भाव आहे द्राक्षाच्या घडांचा?’ तो बोलला, ‘80 रूपये किलो’. जवळच सुट्टी द्राक्ष ठेवलेली होती. मी त्याला विचारले, ‘ह्यांचा काय भाव आहे?’ तो बोलला, ‘40 रूपये किलो’. मी त्याला विचारले
‘इतके कमी का?’ तो बोलला ‘साहेब, ही खुप चांगली द्राक्ष आहेत. पण आपल्या घडातुन तुटलेली आहेत.’
मी समजून गेलो आपल्या जवळच्यांच्या पासून वेगळे झाल्यावर आपली किंमत अर्ध्याहून कमी होऊन जाते. वरील उदाहरण खरे वाटते. कारण अनेकांना असे वाटते कि मी करीत असलेल्या कामाचे श्रेय फक्त आणि फक्त मी घेणार. परंतु त्यासाठी राबणारे हात अनेक असतात हे तो विसरतो. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हावयाचे असेल तर मात्र एकत्र राहून काम करण्याची सवय करून घ्या एकटे राहिलात तर तुमची प्रगती
होणार नाही. त्याचबरोबर तुमचे आयुष्य हे कापूर आहे. वापरले तरी संपते आणि नाही वापरले तरी संपते. त्यामुळे नेहमी वाईट बोलणार्‍या, तिरस्कार करणार्‍या व्यक्ती स्वतःच्या आसपास ठेवा. आपल्या मराठीमध्ये एक छान म्हण आहे, निंदा करणार्‍यांचे घर नेहमी बाजूला असावे म्हणजे स्वतः ची प्रगती मोजण्याची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही तुम्ही यशस्वी व्हाल.

टेक्स्टाईल पार्क देणार रोजगार

     गेल्या वर्ष भरात भारत देशाने सर्वच क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती करून संपूर्ण जगासमोर एक नवीन इतिहासच निर्माण करीत आहे. भारतातील वस्त्र निर्माण करणारी नगरी म्हणून ओळखली जाणारी इचलकरंजी तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वस्त्रउद्योग क्षेत्राला येणारा नवीन काळ हा खर्‍या अर्थाने सुजलाम सुफलाम करणारा असेल असे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात वस्रोउद्योग मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असताना आपण सर्वजण पाहत आहोत. नव्याने आकाराला येणार्‍या 12 टेक्स्टाईल पार्कमधून जवळपास अकरा लाख नवे रोजगार तयार होणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. स्वीडनचे पंतप्रधान यांनी वस्रोउद्योगात गुंतवणूक करण्यासाठी होकार दर्शविला आहे.
     काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या आणि कोठे कोठे गुंतवणूक करणे गरजेचे आहे त्याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला दिला. त्याचाच उपयोग उत्तम रीतीने करून ‘मेक इन इंडिया’ या नावाखाली वेगवेगळे आणि नवनवीन रोजगार निर्माण करण्याचे ध्येय उराशी बाळगून सर्वच नेते मंडळी तरुणाच्या हाताला काम कशा पद्धतीने देता येईल, याकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत.
     वस्त्रोद्योगात गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून उद्योजकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर शेती ते गारमेंट अशी वस्रोउद्योगाची साखळी नव्या पद्धतीने विणण्याची राज्य सरकार तयारी करत आहे कि काय असे स्पष्ट दिसत आहे. दर्जेदार कापसाच्या उत्पादनापासून ते गारमेंटपर्यंत ही साखळी असेल. जागतिक बाजारपेठेत ज्याला मागणी आहे अशा उत्पादनांना प्राधान्य देण्यात यावे. त्यासाठी राज्यात 12 टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येत आहेत.
या वेगवेगळ्या पार्कमधून तरुणाच्या हाताला काम मिळेल, त्याचबरोबर हे काम करण्यासाठी लागणारे कौशल्य आणि शिक्षण देणे ही काळाची गरज निर्माण होणार आहे. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर याचा विचार व्हावा, नवनवीन उद्योगामध्ये महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी त्यांना त्या-त्या प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.
     ज्या ठिकाणी असे टेक्स्टाईल पार्क उभे राहतील त्या जवळ राहणार्‍या तरुण तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे. येणार्‍या काळात राज्यातील वस्रोउद्योगाला चांगले भवितव्य आहे. राज्यात दुसर्‍या क्रमांकाचा असलेल्या या उद्योगाला भरभराट यावी यासाठी अनेक कंपन्यांशी करार करण्यात येत आहेत. त्याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रातील युवकांना होईल यात काही शंका नाही. येणार्‍या काळात महाराष्ट्राला ‘अच्छे दिन’ येणार हे चित्र आता स्पष्ट दिसू लागले आहे.

Wednesday, February 10, 2016

शिक्षक भरतीची आश्‍वासनेे

     गेल्या चार-पाच वर्षांपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर सुद्धा शिक्षक भरती केली गेली नाही. सन 2010 मध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक भरतीसाठी लागणारी पात्रता म्हणजेच सीईटी परीक्षा ही झालेली नाही. मग प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक भरती कशी काय होणार हा प्रश्‍न आजवर सुटलेला नाही. सन 2013 मध्ये राज्य शिक्षण विभागाने केंद्रीय स्तरावरील शिक्षक भरती पद्धतीचा अवलंब राज्य स्तरावर करण्याचे नियोजन आखले गेले. त्यानुसार राज्यामध्ये पहिली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी घेण्यात आली. परंतु या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेमधील विचारल्या गेलेल्या प्रश्‍नांमध्ये जमीन आसमानाचा फरक आढळून आला. सन 2014 मध्ये ही तशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. सन 2015 मध्ये होणारी परीक्षा ही 2016 मध्ये घेण्यात आली. पेपर एक हा परीक्षे आधीच फुटल्याचा धक्कादायक प्रकार सर्वांच्या समोर आला त्यामुळे ही परीक्षा पुन्हा काही दिवसांमध्ये घेण्याचा निर्णय राज्य शिक्षण विभागाने घेतला आहे.
     महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे विविध कार्यक्रमांच्या उपस्थिती दरम्यान शिक्षक भरती लवकरच करणार आहे असे आश्‍वासन दिले. परंतु त्याची कार्यवाही होताना दिसत नाही त्याच बरोबर दोन वर्षांपुर्वी राज्य शिक्षण विभागाने पट पडताळणी मोहिम हाती घेतली होती. त्यामधून राज्यातील अनेक शाळा तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे अतिरिक्त असल्याचे वास्तवादी चित्र सर्वांच्या समोर उभा राहिले. या अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत करणे गरजेचे आहे. तसेच पटसंख्या कमी असणार्‍या शाळांवर अजून काहीही कार्यवाहीचे फक्त आश्‍वासनच दिले जात आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही याची वेगवगेळी कारणे असू शकतील. काही दिवसांपुर्वी शिक्षणमंत्री मा. विनोद तावडे यांनी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी शिक्षक भरतीस परवानगी देणार असल्याचे आणखीन एक आश्‍वासन दिले आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांच्या भरतीवरील बंदी उठवली जाईल. शाळांच्या संच मान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यात येईल. रिक्त पदांवर तातडीने शैक्षणिक संस्थांना शिक्षक भरतीस परवानगी दिली जाईल. आंतरजिल्हा बदलीची मागणीही काही महिन्यांत पूर्ण होईल असे अश्‍वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे.
     राज्यात 1 मे 2012 पासून शिक्षकांच्या भरतीवर बंदी घालण्यात आली होती. उच्च न्यायालयाने मुंबईतील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रिक्त जागा भरण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. यावर शिक्षण विभागाने परिपत्रक काढून मुंबईतील शैक्षणिक संस्थांना जागा भरण्यास मान्यता दिली. रिक्त जागा केवळ मुंबईत नसून सर्व राज्यतही समस्या आहे. त्यामुळे भरतीवरील बंदी संपूर्ण राज्यातील शिथिल होणे गरजेचे आहे. इंग्रजी. गणित व विज्ञान शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने आदेश काढला होता कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती करु नये. परंतु शिक्षण विभाग नवीन आदेश काढणार असून शैक्षणिक संस्थांना रिक्त पदांवर शिक्षक भरती करण्यास परवानगी मिळणार आहे. अशी आशा आहे परंतु शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक (जीआर) 
जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत अशी आणखीन कित्येक आश्‍वासने मिळतील हा येणार्‍या काळात आपणास पहावयास मिळतील.

शांत रहा, शांतता राखा

    असे म्हणतात की, राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत होण्यासाठी. कारण शब्द येत असतात हृदयातून, पण अर्थ काढले जातात ते डोक्यातून. या प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये कित्येकदा किंवा मी तर म्हणेण की, प्रत्येक दिवसातून एकदातरी आपण इतरांच्यावर रागावत असतो. परंतु वेळ गेल्यानंतर आपण त्या व्यक्तीवर उगाचच रागावल्याची खंत आपल्या मनामध्ये जागी होती. नंतर तुम्ही पश्‍चाताप करून घेता अशी वेळ जर तुमच्या वर येऊ द्यायची नसेल तर शांत रहा आणि शांतता राखा तुमच्या बर्‍याच समस्या आपोआप सुटल्याची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल.
    एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते. अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही? लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला, हे सगळे सोने गावकर्‍यांमध्ये वाटून टाक.अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस. लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावकर्‍याला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे. आता अर्जून अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बस, आता यापुढे मी काम करू शकत नाही.
    मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या. लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकर्‍यांना बोलवले आणि सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही, या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.
    कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला, अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास. तू गर्वाने प्रत्येक गावकर्‍याला सोने वाटू लागलास. कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने शांत पद्धतीने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय. हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही. व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे. देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा न ठेवून शांत राहून केलेल्या कर्माने माणूस यशस्वी होतो.