Wednesday, February 24, 2016

मन चंगा तो...

‘‘मन चंगा तो, कठौती मे गंगा’’ या महान संत रवि दास यांच्या वाक्याचे आज तागायत परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. स्वतःला जो ओळखतो तो इतरांनाही चांगल्या पद्धतीने ओळखतो.  मला काही दिवसांपूर्वी समुपदेशनासाठी एक फोन आला होता. फोनवर बराच वेळ बोलणे सुरू होते. बोलता बोलता तो म्हणाला, पंधरा-वीस वर्षांपूर्वी एक मित्र मला वाकडं बोलला ते अजून मनातून जात नाही. मला हसूच आलं. आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो. हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.
खरंतर आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो. कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात. आपल्या मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. अंगावर झुरळ आलं की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते. तसंच, आपल्याबाबत कुणी किळस वाटणारे शब्द वापरले तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत. आपला मेंदू म्हणजे काही गोडाऊन नाही की वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात.
जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण, आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू. जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नाही त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो. आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो. मेंदूला वाचा नसते. तो मुका असतो. त्याला काही कळत नाही. पण हृदयाला मन असते. त्याला तरी ते कळले पाहिजे.
काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात ती गोष्ट वेगळी. अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे. पण 90-95 टक्के गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.
मेंदू सृजनशील आहे. त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे. ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे. आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे. या पलीकडे काय असू शकते? लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले की त्यात तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते. मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे.
यावरून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की अनेकजणांची प्रगती ही इतर लोक काय म्हणतात किंवा इतरांना काय आवडते त्यानुसार जीवन जगत असतात. स्वतःचे मन उत्तम असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकता.

No comments:

Post a Comment