नको चिंता उद्याची, नको स्मृती कालची, वेळ वाया दवडू नको, कदर कर तू या क्षणाची.
घडले काल जे घडायचे, होईल उद्या जे व्हायचे, हाच एक क्षण हाती तुझ्या, गमावल्यावर मग न रडायचे.
उद्या काही होणार नाही, काल गेले ते येणार नाही, आणि आज स्वस्थ बसला, तर काहीच तुझ्या हातून होणार नाही.
वरील ओळी प्रमाणे ज्याचे जीवन असते तो कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता खंबीरपणे उभा राहतो, आणि असे व्यक्तिमत्व बनविणे काही सोपी गोष्ट नाही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते. एखाद्याच्या सावलीत उभा राहून स्वतः ची सावली कधीच शोधता येत नाही, त्यासाठी स्वतः ला उन्हात उभे राहावे लागते. काल माझ्या मनात आले म्हणून व्हाट्सअप वरती बर्याच जणांना एक प्रश्न विचारला. तो म्हणजे आपण शिक्षण कशासाठी घेतो? या प्रश्नावर मोजक्याच व्यक्तींनी खूप छान आणि समर्पक वाटावीत अशी उत्तरे दिली. यातील काही उत्तरे तर प्रत्येकाला विचार करण्यास लावणारी होती तर काहींनी थट्टा म्हणून किंवा स्वतः च्या शिक्षणा बद्दल गंभीर नसल्यासारखी उत्तरे दिली. आज आपण काय शिकलो किंवा काय शिकत आहोत? या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या जवळ कदाचित आज नसतील. परंतु आज आपण काय करतो यावर स्वतः चा भविष्यकाळ अवलंबून असतो याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.कोणत्याही कार्याची सुरुवात हि त्या कार्यामध्ये यश मिळवून देईल कि नाही हे ठरवीत असते. आजचा दिवस कशा पद्धतीने तुमच्या जीवनात अविस्मरणीय ठरविला जाईल याचा विचार करणार्या व्यक्तींची संख्या खूपच थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याच्या बरोबर उलट म्हणजे आजचे कार्य उद्या कसे करता येईल असे वागणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तुम्हाला दररोज एक गोष्ट स्वतः च्या जवळपास जाणवत असेल ती म्हणजे कोणी एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करीत असेल तर त्या व्यक्तीला सकारात्मक पाठींबा देण्या ऐवजी त्या नवीन गोष्टीतील अडचणी किंवा नकारात्मक विचारच सांगितल्या जातात.
उदा,- एखादा लहान मुलगा सायकल शिकत असतो तेंव्हा त्याला पाठींबा देणारे कमी असतात परंतु सायकल चालविताना तू कशा प्रकारे पडशील, कोठे तरी अपघात घडेल, त्यातून तूला गंभीर जखमी होशील किंवा कायमच अपंगत्व येऊ शकेल. अशा अनेक गोष्टी रंगवून आणि वारंवार सांगितल्या जातात.
त्याच बरोबर आणखी एक उदा, म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास करीत असेल तर त्याच्या पालकांना ज्या वाईट सवयी अभ्यास करताना जडलेल्या असतात त्याच मुलांनाही ते न कळत लावतात. मुलाला एकदा वाचल्या नंतर लक्षात राहत हि असते, परंतु त्याचे पालक त्याला सांगतात कि दोन-तीन वेळा वाचल्याशिवाय तुझ्या लक्षात राहणार नाही. मग त्या विद्यार्थ्याला हि तशीच सवय लागते. या गोष्टी कोठे तरी थांबल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात आता पासूनच करायला हवी.
आजच्या दिवसापासूनच करायला हवी. आजचा दिवस जर तुम्ही वाया घालविला तर हा दिवस, हि गेलेली वेळ परत कधीच मिळणार नाही एवढेच लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने कोणता हि दिवस उजाडल्यावर स्वतः ला सांगितले पाहिजे कि आजचा दिवस माझा आहे आणि मी आज प्रत्येक कार्यात नक्कीच यशस्वी होईन.
No comments:
Post a Comment