Wednesday, March 30, 2016

कुछ लोग सोच मे ही....

     ‘‘कुछ लोग सोच मे ही जिंदगी बिता देते है’’ हे वाक्य आज अनेक व्यक्तींना लागू पडत आहे. त्याची आता अनेकांना सवय जडलेली दिसते. अनेक व्यक्ती फक्त विचारच करत बसतात किंवा दिवास्वप्ने रंगविण्यात त्यांना विशेष आनंद मिळत असतो. एखाद्या व्यक्ती विषयी निंदा करणे,  किंवा त्याच्या पाठीमागे त्याची चर्चा करणे असे करत असतात. परंतु निंदा किंवा चर्चा ही फक्त यशस्वी व्यक्तींच्याच वाट्याला येत असते. त्यामुळे अशा व्यक्तींकडे लक्ष न देता सतत आपण आपले चांगले कर्म करीत राहिले पाहिजे.
     आज सकाळी चहा घेत असताना रेडिओ ऐकत होते. त्यावर एक अतिशय सुंदर गीत लागले होते. कदाचित बर्‍याच जणांना ते माहित ही असेल. ‘‘एका तळ्यामध्ये अनेक लहान पिल्ले राहत असतात, त्यातील एक कुरूप असते.’’ अतिशय सुरेख दिसणारी अनेक बदके त्यामध्ये राहत असतात. त्या पिल्लापैकी कुरूप दिसणार्‍या पिलाची नेहमी निंदा केली जाते, त्याला कशातच समावून घेतले जात नाही ना खेळात, ना इतर कशातच. ते कुरूप दिसणारे पिल्लू खूप नाराज होते, दुःखी होते. आपल्याला कोणीही जवळ करत नसल्याचे दुःख त्याच्या मनामध्ये असते. एके दिवशी ते दुःखी होऊन त्या तळ्याच्या काठावरती बसलेले असते अचानक त्याची नजर पाण्यातील स्वतःच्या प्रतिबिंबाकडे जाते आणि ते पिल्लू खूप आनंदी, उत्साही होते, त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. कारण त्याच्या लक्षात येते की आपण इतर बदकांच्या पिल्लासारखे नाही तर आपण राजहंस आहेत. हे त्याला समजताच त्याच्यातील सर्व नैराश्य, भिती दूर होते आणि ते स्वतःला खूप भाग्यवान समजते.
     अशा पद्घतीचे जीवन अनेकांचे असते, स्वतः जवळ खूप काही असते परंतु अनेक व्यक्ती ह्या स्वतः जवळ नाही त्याच गोष्टींचे दुःखात असतात. आणि जवळ असणार्‍या असह्य गोष्टी सुद्धा ते विसरून जातात. वर्तमानामध्ये जी व्यक्ती जगायला शिकते तिचा भविष्यकाळ खूप सुंदर असतो. समाजात अनेक व्यक्तींना आपण पाहतो की, एखादा सण, उत्सव किंवा इतर समारंभ घडून गेल्यानंतर असे म्हणतात की, पुढच्या वेळी मी यापेक्षा चांगले करेन त्यावेळी तुम्ही बघत रहाल. परंतु वास्तव हे असते की, ते फक्त विचार करून स्वतःला सुखी समजत असतात.
     तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर विचार करत बसण्यापेक्षा, जो काही विचार केला आहे त्यावर कृती करणे ही तितकेच आवश्यक असते. एखादा नवीन चांगला विचार मनामध्ये आला की, तो जास्तीत जास्त प्रमाणात आचरणात कसा आणता येईल याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. स्वतःजवळ असणार्‍या गोष्टींचा, साधनांचा पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे. नाहीतर कालांतराने त्या गोष्टींचा आपोआप नाश होत असतो हे आपण लक्षात ठेवा. फक्त विचारात वेळ दवडू नका तर जो काही चांगला विचार केला आहे, त्यावर कृती करण्यात वेळ घालविला तर यश नक्कीच मिळेल.

No comments:

Post a Comment