Wednesday, February 17, 2016

सवय करून घ्या.

     तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये अनेक घटना घडत असतात मग त्यातील काही घटना मनासारख्या म्हणजेच पसंत पडणार्‍या तर काही मनाविरुद्ध म्हणजेच पसंत न पडणार्‍या हि असतील त्याकडे दुर्लक्ष केलेलेच चांगले. ज्यावेळी तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे एक आव्हान म्हणून पाहू लागत त्यावेळी तुमची प्रगती होत असते. परंतु एक लक्षात ठेवा जेंव्हा काही व्यक्ती तुमच्यातील अनेक चांगल्या गुणांची चेष्ठा, मस्करी, किंवा वायफळ गप्पा मारण्यासाठी विषय म्हणून घेत असतील किंवा तुम्ही करीत असलेल्या एखाद्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करीत असतील तेंव्हा तुमची प्रगती होत आहे हे जाणून घ्या. स्वतः ची प्रगती करायची असेल तर इतर लोक काय म्हणत आहेत याकडे दुर्लक्ष करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. अनेकांची प्रगती अशाच किरकोळ घटनांच्यामुळे थांबलेली असते. तुम्ही एखाद्या ध्येयाकडे जात असताना नेहमी तुमच्या बरोबर एक तरी हितचिंतक असणे आवश्यक आहे. कारण एखाद्या ठिकाणी तुम्ही गोंधळून गेलात तर तो तुम्हाला नक्कीच सावरण्यास मदत करेल. मग तो हितचिंतक तुमचे आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रीण कोणीही असो, पण बरोबर असणे आवश्यक असते. लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग होत नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणे ही खूप महत्वाचे आहे.
     जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. अनेक व्यक्तींना तुम्ही पाहता कि नेहमी अहंम उराशी बाळगून असतात. मी खूप कष्ट केले, माझ्यासारखं कोणी केलं नाही, मी इतरांसाठी चांगल्या गोष्टी केल्या, किंवा मी भविष्यात हे करणार ते करणार, पुढे असं होणार तसं होणार अशा वायफळ गप्पा करीत असतात. परंतु त्या दिशेने एक हि पाऊल पडताना दिसत नाही, आज जे काही ठरविलेले असते कदाचित उद्या काहीतरी वेगळं आणि नवीन विचार घेऊन पुन्हा दररोजच्या सारखे वायफळ बोलताना पाहतो. पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशी स्थिती असते. अशा व्यक्तींना वाटते कि कुणावाचूनमाझे काहीच आडत नाही. परंतु हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे ही सांगता येत नाही. एखादे काम नवीन व्यक्तीकडून पूर्ण करू शकता, परंतु जुन्या व्यक्तीची उणीव मात्र नक्कीच राहते हे विसरून चालत नाही.
     काल परवा माझ्या वाचनात आलेलं एक उदाहरण सांगतो, एका फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो. मी विचारले, ‘आज काय भाव आहे द्राक्षाच्या घडांचा?’ तो बोलला, ‘80 रूपये किलो’. जवळच सुट्टी द्राक्ष ठेवलेली होती. मी त्याला विचारले, ‘ह्यांचा काय भाव आहे?’ तो बोलला, ‘40 रूपये किलो’. मी त्याला विचारले
‘इतके कमी का?’ तो बोलला ‘साहेब, ही खुप चांगली द्राक्ष आहेत. पण आपल्या घडातुन तुटलेली आहेत.’
मी समजून गेलो आपल्या जवळच्यांच्या पासून वेगळे झाल्यावर आपली किंमत अर्ध्याहून कमी होऊन जाते. वरील उदाहरण खरे वाटते. कारण अनेकांना असे वाटते कि मी करीत असलेल्या कामाचे श्रेय फक्त आणि फक्त मी घेणार. परंतु त्यासाठी राबणारे हात अनेक असतात हे तो विसरतो. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हावयाचे असेल तर मात्र एकत्र राहून काम करण्याची सवय करून घ्या एकटे राहिलात तर तुमची प्रगती
होणार नाही. त्याचबरोबर तुमचे आयुष्य हे कापूर आहे. वापरले तरी संपते आणि नाही वापरले तरी संपते. त्यामुळे नेहमी वाईट बोलणार्‍या, तिरस्कार करणार्‍या व्यक्ती स्वतःच्या आसपास ठेवा. आपल्या मराठीमध्ये एक छान म्हण आहे, निंदा करणार्‍यांचे घर नेहमी बाजूला असावे म्हणजे स्वतः ची प्रगती मोजण्याची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही तुम्ही यशस्वी व्हाल.

No comments:

Post a Comment