Sunday, April 16, 2017

डिनर With…???



          सकाळी मला एका मित्राने एक व्हिडीओ पाठवला होता. तो पाहून मी त्याला फोन केला आणि विचारले कि, जो व्हिडीओ तू पाठवला आहेस त्यातून तुला नक्की काय सांगायचं आहे? त्यावर तो म्हणाला, काही नाही रे मला आवडला म्हणून मी पाठवला आहे. काही वेळात त्याचे आणि माझे संभाषण संपले. परंतु मला त्या व्हिडीओमधील सारांश लक्षात आला कि, काही व्यक्ती इतरांना सांगण्यात आणि स्वतःच्या वर्तनात फरक असताना सुद्धा वरवरचा चांगुलपणा टिकवण्यासाठी, मिळवण्यासाठी तसे वागत असतात.
          अनेक व्यक्तींना हेच सांगत आहे कि, आपण जे इतरांना सांगतो त्याचा सर्वप्रथम स्वतः उपयोग किंवा वापर करा. मी दोन दिवसापूर्वी माझ्या सर्व सहकाऱ्यांना व्हाटस अॅपच्या माध्यमातून एक साधा प्रश्न विचारला होता. तो म्हणजे, “आपण रात्रीचे जेवण सर्वाधिक कोणासोबत करू इच्छिता? कोण असेल?” आपल्या प्रतिक्रिया मला ९०२८७१३८२० या क्रमांकावर पाठवा. असंख्य व्यक्तींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अजून हि काही व्यक्ती प्रतिक्रिया पाठवत आहेत. त्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.
          वरील प्रश्न केल्या नंतर अनेक व्यक्तींच्या प्रतिक्रियेनुसार जवळपास ९० टक्के लोक रात्रीचे जेवण हे आपल्या फॅमिली / कुटुंबासोबत घेऊ इच्छित आहेत. तर बोटावर मोजण्या इतपत व्यक्ती या मित्र-मैत्रिणी किंवा त्यांच्या खास व्यक्ती बरोबर घेऊ इच्छित आहेत. काही व्यक्तींनी नाव सांगितले तर काहींनी नाही. ज्या व्यक्ती आपले रात्रीचे जेवण आपल्या परिवारासोबत घेऊ इच्छितात, त्यांचे खरचं कौतुक करावसं वाटत आहे. त्याचे कारण म्हणजे या व्यस्त जीवनात किमान थोडा वेळ तरी ते कुटुंबाचा विचार करत आहेत.
          काही व्यक्ती आपल्या परिवारापासून दूर असतात. त्यामुळे त्यांना वाटत असते कि, आपण दररोज आपल्या माणसात बसून जेवण करूया. कारण असे म्हणतात कि, “दूर राहिल्याशिवाय आपल्या माणसांची किंमत कळत नाही.” रात्रीचे जेवण आपल्या परिवारासोबत घेण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या अनेक व्यक्तीमध्ये आपल्याला एक गोष्ट जरूर पहावयास मिळते. ती म्हणजे ज्यावेळी ते आपल्या परिवारासोबत जेवण घेत असतात. त्यावेळी ते स्वत:मध्ये एवढे गुंतलेले असतात कि, फक्त नावाला ते उपस्थित असतात.
          अनेकजण रात्रीचे जेवण करत असताना एका हातात मोबाईल किंवा टीव्हीचा रिमोट असतो. त्या जेवणावर आणि शेजारी बसलेल्या व्यक्तींकडे त्यांचे लक्षच नसते. मग अशा जेवणाचा किंवा परिवारासोबत जेवणाचा काहीही उपयोग नाही. आपण गर्वाने सर्वाना सांगतो कि, मी माझ्या कुटुंबासोबत जेवतो. परंतु त्या शरीराने फक्त कुटुंबात असून काय उपयोग. मनाने आपण त्यांच्या बरोबर असणे हि आज काळाची गरज बनत चालली आहे. किती तरी वेळा भाजी चांगली झाली नाही म्हणून किंवा आपल्या आवडीची भाजी नाही म्हणून आणि सकाळपासून आपल्या सोबत ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा राग काढण्याचे ठिकाण म्हणून आज रात्रीचे जेवण प्रसिद्ध होत आहे.
          आपण वाईट वाटून घेऊ नका. परंतु आज ही आपल्या समाजात वाढत चाललेली वाईट परिस्थिती आहे. आपल्या परिवारामध्ये लहान बालके असतात, ती बालके मग आपलेच अनुकरण करत लहानाची मोठी होत असतात. पुढील पिढी उत्तम घडविण्यासाठी आपण स्वत: मध्ये काही छोटे-छोटे बदल केले तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या परिवारासोबत / कुटुंबासोबत किंवा आपल्या प्रिय व्यक्ती सोबत आनंदाने, उत्साहाने राहू शकतो. पुन्हा एकादा मी सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो.
      धन्यवाद.....
-    मंगेश विठ्ठल कोळी.
-    ९०२८७१३८२०

3 comments:

  1. खुपच छान .अगदी बरोबर आहे .

    ReplyDelete
  2. एकदम मस्त, अगदी बरोबर आहे...

    ReplyDelete