Tuesday, May 30, 2017

कही ख़ुशी... कही गम....



“कही ख़ुशी कही गम” या वाक्याप्रमाणे गेले काही दिवस वातावरण निर्माण झाले आहे. काल बारावीचा निकाल लागला अनेकांची भविष्यातील वेगवेगळी स्वप्न पूर्ण करण्याच्या इच्छा पुर्णत्वाकडे जात असल्याने आनंदाचा क्षण होता. पालकांचा तर आनंद आणि अभिमानाचा दिवस मनाला जातो. तणावाच्या आणि स्पर्धेच्या जीवनामध्ये रिझल्टला अनन्य साधारण महत्व प्राप्त होत आहे. याचे कारण असे आहे, की आज प्रत्येकाला एक विशिष्ट सवय जडत चालली आहे. काहीही झाले तरी उत्तम, उत्कृष्ट रिझल्ट मिळालाच पाहिजे. असा आग्रह पाल्याहून अधिक पालकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचे सर्वत्र दिसून येते. रिझल्ट म्हणजे काय तर उत्तम प्रकारचे क्रमांक मिळाले म्हणजे उत्तम रिझल्ट असा गैरसमज अनेकांमध्ये आज स्पष्ट दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती मग ती लहान असो किंवा मोठे कशाही आणि कोणत्याही प्रकारचे काम करत असो रिझल्टचा विशेष महत्व दिले जाते. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय असो रिझल्टची एक व्यसनाधीनता सर्वाना जडू लागली आहे.

शिक्षण क्षेत्रात पाहायला गेले तर बारावी पास होणे म्हणजे जीवनाला वेगळी कलाटणी देणारी घटना मानली जाते. खरे देखील आहे, त्याचे दोन परिणाम सर्रास पहावयास मिळतात एक म्हणजे संपूर्ण वर्षभर कष्ट घेऊन, अनेक गोष्टींचा त्याग करून केलेल्या अभ्यासाचा रिझल्ट मिळतो. दुसरी म्हणजे मिळालेल्या गुणांद्वारे पुढचे भवितव्य निर्धारित होत असते. तसेच ज्या विद्यार्थ्यांना मनासारखे यशप्राप्त झाले नाही. त्यांनी मनाशी एक निर्धार करायला हवा आणि त्या निर्धाराला सांगू नका की तुम्हाला भय असल्याचे. याउलट तुमच्या भयाला सांगा की तुमचा निर्धार किती मोठा आहे. सर्वात मोठी चूक म्हणजे मनामध्ये सततची एक भीती बाळगने होय. ती म्हणजे ‘मी आता यापुढे काहीच करू शकत नाही’ किंवा ‘मला यापुढे कधीच कसल्याही प्रकारचे यश मिळणार नाही.’ अशा प्रकारच्या नकारात्मक विचाराची मनामध्ये जोपासना होणे टाळता आले पाहिजे.

पाल्यांच्या बरोबर पालकांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की संयम आणि माफ करण्याची ताकद अंगी बाळगल्याने कोणतीही व्यक्ती अतिउच्च शिखरापर्यंत झेप घेऊ शकते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ज्यावेळी नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा आपण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडतो त्याठिकाणी रिझल्ट या शब्दाला विशेष महत्व आहे. मग नोकरी शासकीय, निमशासकीय किंवा खासगी असो काही वर्षापूर्वी असे समजले जात होते की सरकारी नोकरी लागली म्हणजे आयुष्याचे कल्याण झाले पुढील आयुष्य आरामदायीपणाने जगू शकतो. परंतु आता शासकीय कार्यालयात देखील सर्व विभागीय कार्यालयाकडून प्रत्येक कर्मचाऱ्याचा कामाचा, प्रगतीचा आणि काम करण्याच्या पद्धतीचा वार्षिक अहवाल मागविला जात आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची पदोन्नती किंवा वेतनश्रेणी आणि इतर गोष्टी त्याने वर्षभर कामाच्या अहवालाने म्हणजेच रिझल्टने होणार आहेत. खासगी संस्थेमध्ये यांची अंमलबजावणी खूप वर्षापासून सुरु आहेत त्याचा परिणाम एकंदरीत संपूर्ण विकासावर होत असतो. राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने गरीब आदिवासी तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विविध योजनाची योग्यरीतीने अंमलबजावणी सुरु आहे त्यामुळे आज कित्येकांना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत स्वत:च्या विचारांची क्षमता वाढण्यास मदत होत आहे. या योजनाचा सर्वच विद्यार्थ्यांनी सुयोग्य तो वापर करून महाराष्ट्राला सर्वच स्तरावर प्रगतीपथावर नेण्यास मदत करायला हवी. १२वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन....


- मंगेश विठ्ठल कोळी.
- ९०२८७१३८२०

No comments:

Post a Comment