Tuesday, March 14, 2017
Wednesday, March 8, 2017
जागतिक महिला दिनानिमित्त....
जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक
क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे.
महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला
विशेष महत्त्व आहे.
भारतीय दंडसंहीतेचं कलम ३७७ समलैंगिक
संबंधांना अनैतिक ठरवून त्यांना अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा ठरवतं. आपल्या देशावर
इंग्रजांचं परकी सरकार होतं तेव्हा वसाहतवादी शोषणाचं धोरण राबवणाऱ्या गोऱ्या
सरकारनं मेकॉलेद्वारा भारतीय दंडसंहितेच्या माध्यमातून बुरसटलेल्या १९ व्या
शतकातल्या 'व्हिक्टोरीयन' नैतिकतेचे बंध आपल्यावर लादले ! पण आता
आपण स्वतंत्र आहोत. समलैंगिकता ही स्वाभिमानी राष्ट्राची गरज आहे.
कारण आपल्या देशात घरात मुलीचा जन्म झालेला कुणालाच नकोय.
सर्व घरांमध्ये मुलंच जन्मणार, मुली 'नकोशी' झालेल्या. की मग एका पिढीच्या आत समलैंगिकतेशिवाय पर्यायच
उरणार नाही! मुलगी माझ्या
घरात जन्माला यायला नको, पण शेजारच्या घरात मात्र जन्माला यावीच. हुंडा मिळण्याच्या
कामी येते. आणि पुढच्या पिढीच्या कुलदीपकाचा जन्म कसा होणार? शिवाजी पण शेजारच्या
घरात जन्माला यावा आणि मुलगी पण. माझ्या घरात मुलगाच जन्माला यायला हवा कुलदीपक.
मुलगी येणार असेल तर? टेन्शन नको. गर्भपात करता येतो. कायदा त्याविरुद्ध आहे? म्हणून काय
झालं! कायदा काय भ्रष्टाचार अन् जातिभेदाविरुद्ध सुद्धा आहे. त्यानं काय थांबला का
भ्रष्टाचार आणि जातीभेद? तसंच आहे. जन्माला येणारी जर मुलगी असेल तर निस्वार्थी
भावनेनं आणि कायद्यापासून धोका पत्करून गर्भपात करणारे समाजसेवक स्त्री-पुरुष
डॉक्टर आहेत की. त्यांनी 'हिपोक्रॅटीक' शपथ घेतलेली असते ना की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मुलींचे
गर्भ आम्ही पाडूच पाडू. शिवाय मुलीला जन्माला घालणाऱ्या आईला आपण अवदसा, पांढऱ्या
पायाची म्हणतोच की.
जन्माला येणाऱ्या बाळाचं लिंग पुरुषावरून
- वडिलांवरून ठरतं असं विज्ञान सांगतं म्हणून काय झालं? बाई मुलीला जन्माला घालते म्हणजे समजते काय मेली चांडाळीण अवदसा घरभेदी. दोष
सावित्रीचाच कशावरून, माझा कशावरून नाही असं दीडशे वर्षांपूर्वी
महात्मा फुले म्हणून गेले. त्याचं काय राव, तो काळ जुना होता, फुले महात्मा होते. आम्हाला चौकात आमचे
पुतळे नकोत, घराण्याची परंपरा चालवणारा कुलदीपक हवा. मुलीला जन्माला येण्याचा हक्कच नाही.
आलीच तर तिला बालपणीच मारून टाकली पाहिजे.
थेट मारता आलं नाही तर कुपोषण, शिक्षणाचा अभाव, गुराढोरांचं हगणं-मुतणं काढ, वर्षाच्या वर्षाला जन्माला येणाऱ्या
भाऊरायाला पाठुंगळी बांधून कंबरडं मोडून घे (नाहीतर तो भाऊराया वयात आला की तुझ्या
कंबरड्यात लाथ घालणारच आहे उमराव जान!) असे अनेक उपाय आहेत. सूनबाई हुंडा आणायच्या
कामी येते ना. आणला नाही किंवा आणून झाल्यावर तिचा बाप खंक झाला की तिला जाळून
मारता येतं ना. मुळात स्त्री इतकी समजूतदार आहे की ती जळून मारण्याची वेळ
येऊ देत नाही, आपणहून दोर, पंखा, स्टोव्ह, विहीर यांना जवळ करते
उगीच नाही आपण ईश्वराचीही स्त्री रूपात पूजा करणाऱ्या
संस्कृतीचे वारस आहोत. ती विश्वजननी असते, जगदंबा असते, आई भवानी असते. आपण पृथ्वीला धरती माता, देशाला भारत
माता, गृहिणीला
गृहलक्ष्मी म्हणतो! 'मातृदेवो भव' म्हणणारी संस्कृती आहोत आपण !! तिनं अमूर्त देवताच राहावं, मानव रूपात
जन्म घेऊ नये.
पण सन्मानीय सुप्रीम कोर्टानं मोठ्या दूरदृष्टीनं ओळखलंय की
आपण ज्या वेगानं प्रगती करतो आहोत ते पाहता लवकरच अनेक पुरुषांना स्त्री मिळणारच नाहीये
! त्यांना पुरुषावरच 'भागवून' घ्यावं
लागणार. शिवाय लोकसंख्या नियंत्रणाचाही याहून प्रभावी दुसरा मार्ग तरी कोणता? म्हणून आत्ताच
समलैंगिक संबंधांना संमती द्या कसे.
तरी स्थलकालाच्या मर्यादेत हे सुद्धा सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं 'पुरुषप्रधान' भाष्य झालं. याबद्दल, न जन्मलेल्या सर्व मुलींच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करून थांबतो.
Monday, February 27, 2017
राष्ट्रीय विज्ञान दिन....
28
फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा
पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान
दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक,
वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन
आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक
संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस
खूप उत्साहाने साजरा करतात.
काही दिवसांपूर्वी
भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह
अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे
मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या
विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्र,
तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील
ज्या अंधश्रध्दा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या
प्रगतीचे लक्षण मानले जाते.
आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून राहत आहे
की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुध्दा एक विज्ञानाचे आणि
प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा
मशीनमुळे योग्य वेळेत योग्य कामे करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे.
1999 पासून
भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबवल्या
जातात. यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही
वर्षाचे नियोजन आपण आतापासून करू शकतो आणि पुढील काळातील होणारे नुकसान टाळण्याचा
प्रयत्न करू शकतो. 1999 मध्ये आमचे पृथ्वी बदलणे ही संकल्पना
राबविण्यात आली. 2004 मध्ये समुदायातील उत्साहवर्धक
वैज्ञानिक जागृती ही संकल्पना राबविण्यात आली. 2009 मध्ये
विज्ञान विस्तृत मिळाल्यामुळे तर 2013 मध्ये मॉडिफाईड पिके व
अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर
देण्यात आला. सन 2013 पासून ‘रणम
प्रभाव’ अमेरिकन केमिकल सोसायटीकडून आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक
रासायनिक खुण म्हणून नियुक्त केले गेले.
फेब्रुवारी 2014 ला
वैज्ञानिक स्वभाव वाढविण्यास प्रोत्साहन देणे ही संकल्पना राबविण्यात आली. चालू
वर्षामध्ये ‘खास विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हि संकल्पना
राबविण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी भारतातमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाला अनेक
ठिकाणी चांगले संभाषण, विविध संशोधने शास्त्रज्ञांची
चर्चासत्रे अशा अनेक कार्यक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला तसेच संपूर्ण सृष्टीला
चांगला फायदा झाला आहे. नवनवीन ठिकाणी नोकरीच संधी मिळाल्या आहेत आणि जीवन जगण्याचे,
उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतीशिल साधन मिळाले आहे. त्याचा सामाजिक, आर्थिक, व्यवहारिक चांगला फायदा होत आहे.
आपल्याला ज्या
सुखसोई आता उपलब्ध आहेत,
त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू
शकतो हे सुध्दा विज्ञानच ठरवू शकते. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना
खूप खूप शुभेच्छा....!
श्री. मंगेश विठ्ठल कोळी
मो. ९०२८७१३८२०
Wednesday, February 8, 2017
विधान भवन ग्रंथालय
आज मुंबईमध्ये येऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले होते. 26 जानेवारीच्या पूर्व संध्येला मंत्रालय इमारती बरोबरच विधान भवन इमारत सुद्धा आकर्षक रोषणाईने उजळून निघाले होते. विधान भवन इमारत बाहेरून पाहिली तर एक अजरामर कला कुसरतेचा अलौकिक नमुनाच आहे. इमारतीचे देखणे रूप आणि अवाढव्यपणा सर्वांनाच भुरळ घालतो. मला ही बाहेरून पाहिल्यानंतर आतमध्ये जाऊन पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. मुंबईत असे पर्यंत एकदा तरी ही इमारत, त्यामध्ये चालणारे कामकाज जवळून पाहण्याची तीव्र इच्छा आज पूर्ण झाली.
विधान मंडळ सचिवालयमध्ये असणाऱ्या ग्रंथालयाबद्दल खूप काही गोष्टी ऐकल्या होत्या. तिकडे असणाऱ्या पुस्तकांची अनेक अधिवेशन काळात बऱ्याच आमदारांच्या भाषणामध्ये या ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या पुस्तकातून वेळोवेळी संदर्भ घेतलेला ऐकला होता. त्याच बरोबर अनेक व्यक्ती संशोधन करण्यासाठी आणि संदर्भासाठी या ग्रंथालयातील पुस्तकांचा उत्तम पद्धतीने उपयोग केला जातो. असे समृद्ध ग्रंथालय पाहण्याची उत्सुकता वाढली होती. मी स्वतः लिहिलेली पुस्तके या ग्रंथालयात असावे अशी खूप वर्षांपासूनची इच्छा होती.
स्वतः लिहिलेली पुस्तके घेऊन विधान भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करत असताना येथील सुरक्षेची जबाबदारी असणारे प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित काळजीपूर्वक तपासून पाठवत होते. त्या पद्धतीने माझीही तपासणी झाली. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पाचव्या मजल्यावर असणारे भव्यदिव्य आणि आटोपशीर पद्धतीने ठेवलेल्या पुस्तकांना पाहून कोणत्याही वाचकाला समाधान मिळेल. ग्रंथालयामध्ये तांत्रिक सहायक श्री. नि.ब. वडनेरकर सरांना भेटलो. त्यांना सांगितले की, मी स्वतः लिहिलेली *यशोमंदिर* आणि *यशोशिखर* विधान भवनाच्या या ग्रंथालयामध्ये भेट द्यावयाची संकल्पना सांगितली.
वडनेरकर सरांनी माझी विनंती मान्य केली. त्याचबरोबर ग्रंथालय फिरून पाहता येईल का? असा प्रश्न करताच त्यांनी आनंदी चेहऱ्याने होकार दिला. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला हि मिळालेली संधी ग्रंथालयातील असणाऱ्या पुस्तकांची पाहणी करण्यास सुरुवात केली. या ग्रंथालयामध्ये 80 हजारांहून अधिक पुस्तकांची संख्या असणारे, प्रत्येक विषयाशी संबंधित असणाऱ्या पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे. तसेच विषयानुसार पुस्तकांची मांडणी, दिशा आणि पुस्तकांची मांडणी केलेले फलक, योग्य ती बैठक आणि प्रत्येक पुस्तकावरती विधी मंडळ ग्रंथालयाचे लेबल त्याच्यावर चिकटवलेले होते. त्या प्रत्येक पुस्तकाची नोंदणी असणारे क्रमांक स्पष्टपणे दिसत होते आणि त्या क्रमांकाची नोंद चोखपणे ठेवलेली होती. कोणतेही पुस्तक वाचकाला वाचण्यासाठी दिले जात असताना त्या व्यक्तीच्या नावाची नोंद हि घेतली जाते. आजपर्यंत मी पाहिलेल्या ग्रंथालयातील हे खूप भव्यदिव्य असे आहे.
ग्रंथालय फिरून सर्व पुस्तकांवर नजर फिरवत असताना मंत्रमुग्ध झालो होतो. बऱ्याच वर्षांपूर्वी फक्त नावे ऐकली होती ती पुस्तके येथे पाहून मनाला अत्यानंद झाला. थोडा वेळ ती पुस्तके चालण्यात स्वतः मग्न झालो. एक एक पाऊल पुढे चालताना या समृद्ध, भव्यदिव्य, आटोपशीर मांडणी केलेली पुस्तके मनात घर करून राहत होती. शेवटी वेळे अभावी मी तिकडून बाहेर पडत असताना जड अंतकरणाने विधी मंडळ ग्रंथालयाचा निरोप घेतला. मी शरीराने तिकडून बाहेर पडलो असलो तरी माझ्या मनात अजून हि तिकडच्या पुस्तकांची छायाचित्रे ताजीतवानी आहेत. माझ्या जीवनातील अविस्मरणीय असा आजचा दिवस ठरला.
- श्री. मंगेश विठ्ठल कोळी
९०२८७१३८२०
Saturday, December 10, 2016
Tuesday, December 6, 2016
Subscribe to:
Posts (Atom)













