Tuesday, August 8, 2017

डोंबिवली हल्ला आणि सामान्य नागरिकाची ताकद



आज संपूर्ण जगाला दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागत आहे. सर्वच देशांच्या प्रगतीला दहशतवाद नावाचा गंज लागला आहे. काही ठराविक देश किंवा संघटना या जगातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असून ते नेहमी निसर्गाच्या विरुद्ध बाजूने विचार करत असताना दिसतात. परंतु निसर्गाच्या आणि नेहमी शांतता बाळगणारा आपल्या देशावर आज पर्यंत अनेक दहशतवादी कारवायांना सामोरे जाऊन त्यावर विजय प्राप्त केला आहे आणि या विजयामध्ये पोलीस, भारतीय लष्कर आणि सामान्य नागरिक याचा खूप महत्वाचा वाट असतो. लेखक अभिषेक ज्ञानेश्वर ठमके लिखित डोंबिवली टेरर अॅटॅक अॅट डोंबिवली स्टेशन हे पुस्तक मोठ्यातला मोठा दहशत वाडी हल्लाला कशा प्रकारे सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवता येईल हे सांगत आहे. या विजयामध्ये सामान्य नागरिक तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग उत्तम प्रकारे केल्यास त्याचा मानवाचा जीव वाचवण्यासाठी मदत होते याची प्रचीती देणारे आहे.
डोंबिवली टेरर अॅटॅक अॅट डोंबिवली स्टेशन या पुस्तकात लेखक अभिषेक ठमके यांनी १५ ऑगस्ट रोजी मुंबई मधील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचे वर्णन घेतले आहे अतिशय कमी शब्दामध्ये उत्कृष्ट लेखन केले आहे. एखाद्या देशावर हल्ला करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची आखणी केली जाते. दहशतवादी कसे निवडले जातात. काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारचे विचार पेरले जातात आणि त्याचा त्यांच्यावरती कसा परिणाम होतो. हे लेखकाने सांगितले आहे. भारतासारख्या देशावर हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवादी आणि त्यांना प्रतिउत्तर देताना पोलिसांनी केलेली आखणी खूप महत्वाची असते. दहशतवादी भारतामध्ये कसे येतात त्यानंतर पोलीस त्यांना कसे नजर कैदेत ठेवतात. मुंबई विद्यापीठात हल्ला करून दादर स्टेशन पर्यंत पोहचून तिकडे हल्ला करून पुन्हा कल्याण स्टेशनला जाण्याऐवजी डोंबिवली स्टेशनवर थांबून कसा हल्ला केला जातो. याचे लेखकाने रोमांचिक वर्णन केले आहे.
सामान्य नागरिक १५ ऑगस्ट रोजी राष्ट्र ध्वजाला वंदन करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. डोंबिवली स्टेशनवरून वर्षानुवर्षे प्रवास करणाऱ्या व्यक्ती नेहमी प्रमाणे प्रवास करत आहेत आणि अचानक दहशतवादी हल्ला झाल्याने सर्वाची झालेली धावपळ त्याचा बरोबर आपल्या जवळच्या व्यक्तीचा झालेला मृत्यू या सर्व गोष्टी विसरून दहशतवाद्याना ठार मारण्याची सामान्य नागरिकाची भावना लेखकाने खूप छान पद्धतीने सांगितली आहे. हे पुस्तक वाचत असताना प्रत्येकाला पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील धाडस पाहून अभिमान नक्की वाढेल. संपूर्ण जगाच्या नजरेसमोर भारत हा बलवान आणि शौर्याचा देश म्हणून नक्कीच उभा राहील. डोंबिवली टेरर अॅटॅक अॅट डोंबिवली स्टेशनहे पुस्तक नक्कीच येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा देणारे ठरेल.  या प्रकाशनाची जबादारी स्वीकारणा-या जयसिंगपूर येथील कविता सागर प्रकाशनाचे प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या या पुस्तकास आणि लेखक अभिषेक ज्ञानेश्वर ठमके यांना मी पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा देतो!
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

No comments:

Post a Comment