मी आणि
माझा मित्र बाहेर फिरायला गेलो. अचानक मित्र बोलला की, दिवाळी जवळ येत आहे.
मित्रांना भेट देण्यासाठी काही वस्तू (कपडे, मिठाई, ग्रिटिंग वगैरे) गोष्टींची
खरेदी करूया. मी हो चालेल अस बोललो. आम्ही मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच
दादर मार्केट जवळ गेलो. मार्केट मध्ये पाऊल टाकताच अनेक आवाज ऐकायला मिळाले चलो
देड्सो देड्सो, चलो तीनसो तीनसो तीनसो तर काही ठिकाणी चलो पाचसो मे दो पाचसो मे
दो, असा आवाज ऐकायला येत होता एक तर व्यक्ती खूप मजेशीर आणि मोठ्या आवाजात आणि
पूर्ण आत्मविश्वासाने म्हणत होती की, पुरे मंबई मे काही भी नही मिलागा इतना सस्ता
आओ लेलो लेलो. त्या ठिकाणी छोटे छोटे दुकाने मांडून बऱ्याच व्यक्ती व्यवसाय करताना
दिसत होत्या काही लहान मुले मुली सुद्धा आपल्या हातात असणाऱ्या विविध प्रकारच्या
वस्तू विक्री करण्यासाठी मोठ मोठ्याने आवाज देऊन ग्राहकाला आकर्षित करण्याचा
प्रयत्न करत होती.
आम्ही
दोघे फिरत असताना काही वस्तू मला देखील आवडल्या. मी मित्राला सांगितले अरे, या
ठिकाणी लहान मुला मुलींचे कपडे खूप सुंदर आणि आकर्षक आहेत. त्यावर मित्र म्हणाला
अरे, हे तर एक दुकान पाहत आहेस अशी जवळ पास दोनशे ते तीनशे दुकाने आहेत या
रस्त्यावर आणि मुख्य दुकाने आतल्या बाजूला आहेत. आम्ही फिरताना काही वस्तू
मित्राने घेतल्या. त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेट वस्तू म्हणून काही
कपडे, मिठाई, ग्रिटिंग वगैरे घेत असताना मी त्याला म्हणालो अरे हे सर्व तू कोणाला
देणार आहेस? त्यावर तो म्हणाला, नातेवाईक आणि मित्र परिवार यांना दिवाळी निमित्त
भेट म्हणून देणार आहे. आमच्यातील संवाद सुरु होता खूप तहान लागली होती पाणी कोठे
दिसत नव्हते. एका ठिकाणी ताक, लस्सी विकणारे छोटे दुकान दिसले मग आम्ही तिकडे
गेलो. दोघांनी ताक घेतले आणि पिले. आणि पुन्हा काही वस्तू खरेदी करण्यासाठी पुढे
निघणार एवढ्यात मला त्या गर्दीत आयडीएल पुस्तकांचे दुकान दिसले. मी मित्राला तिकडे
जाण्याचा आग्रह धरला आणि त्याने तो मान्य केला.
पुस्तकांच्या
दुकानात प्रवेश केला खूप सारी पुस्तक खरेदी मंडळी तिकडे उभा असलेली दिसली. एक
व्यक्ती दिसली अंदाजे साठ-पासष्ठ वय असेल. त्यांच्या हातामध्ये जवळपास दहा-पंधरा
लहान मोठी पुस्तके दिसली. त्या व्यक्तीशी मी संवाद साधला. त्यांना मी विचारले की,
एवढी सगळी पुस्तके कशासाठी? कारण त्या पुस्तकांमध्ये काही लहान मुलांची पुस्तके,
काही विनोदी पुस्तके, त्याबरोबर लहान-मोठ्या कादंबरी यांचा समावेश होता. जवळपास
हजार दीड हजार रुपये किमतीची पुस्तके असावीत. त्यावर तो व्यक्ती म्हणाला म्हणाला
अरे दिवाळी जवळ येत आहे ना? मी गेली आठ ते दहा वर्षे झाली प्रत्येक दिवाळीला
पुस्तके खरेदी करून माझ्या लहान नातवांना, माझ्या मुलांना त्या बरोबर नात्यातील
अनेकांना दिवाळीची भेट म्हणून देतो.
माझा आणि
त्या व्यक्तीचा संवाद सुरु होता. ते पुढे बोलत होते की, कपडे किंवा दिवाळीचा खाऊ
सर्वांच्या घरी असतो. आणि दिवाळीच्या काळात अनेकांना रिकामा वेळ असतो त्यावेळी काय
करायचे म्हणून टीव्ही पाहतात किंवा जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर वेळ घालवत असतात.
त्यापेक्षा मी दिलेल्या पुस्तकांचा वापर वाचनासाठी केला तर त्यांना खूप काही
शिकायला मिळेल. मोबाईलच्या या ३ जी, ४ जी च्या काळात आपली हरवत चाललेली वाचन
संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मला त्यांच्या बोलण्यातून एक नवी उर्जा मिळत
होती, शेवटी ते म्हणाले तू काय करतोस मी सांगितले की, मला हि वाचनाची आणि थोडं फार
लिहिण्याची आवड आहे. हे ऐकून त्यांनी दुकानदा कडून आणखी एक पुस्तक विकत घेतले आणि
मला दिवाळीची भेट म्हणून दिले. मी नको म्हणत असताना ते म्हणाले एका वडिलाने भेट
दिले असे समज, मी ते पुस्तक घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद पाहायला
मिळाले. या क्षणी मला एक ओळ आठवली ती म्हणजे,
“पुस्तकाने
अशक्त मस्तक सशक्त होते व सशक्त मस्तक कोणासमोर डोळे झाकून नतमस्तक होत नाही.”
-
मंगेश विठ्ठल कोळी.
-
मो.९०२८७१३८२०
Khup chan
ReplyDelete