Friday, October 6, 2017

23 ऑक्टोबरला सैन्यभरती....


            अनेक तरुणांचे स्वप्न असते की भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशाचे संरक्षण करावे. त्यासाठी भरपूर शारीरिक मेहनत घेतात त्याच बरोबर अभ्यासही करतात. तन मन लाऊन सर्वस्व झोकून देऊन ते सैन्य भरतीसाठी प्रयत्न करतात. याची आता एक सुवर्ण संधी २३ ऑक्टोबर २०१७ रोजी उपलब्ध झाली आहे.

प्रादेशिक सेनेच्या 110 इन्फट्री बटालियन, मद्रास, रेडफिल्डस, कोईम्बतूरमार्फत दि.23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सोल्जर (जीडी) 8 पदे आणि सोल्जर (हाउसकीपर) ची 3 पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती या बटालियनकडून देण्यात आली आहे.

            सैन्य भरतीसाठी शारीरीक चाचणी पीआरएस ग्राउंड कोईम्बतूर येथे सकाळी 6 वा. पासून आयोजित करण्यात आली आहे. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी तसेच मुलाखत त्यानंतर आयोजित करण्यात येईल. नागरी क्षेत्र किंवा स्वयंरोजगार, माजी एनसीसी छात्र (उत्कृष्ट नेमबाज), उत्कृष्ट कलाकार, पेंटर, हलके, अवजड वाहनचालक परवानाधारक, संगीतकार, सैनिक, माजी सैनिकांचे अवलंबित यांना प्राधान्य दिले जाईल. नागरी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचा-यांना आपल्या कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्रसादर करावे लागेल.

            उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षाच्या दरम्यान असावे. उंची 160 सेंटीमीटर, वजन 50 किलोग्रॅम आणि छाती 77 सें.मी. तर फुगविल्यानंतर 82 सें.मी असावी. सोल्जर (हाउसकीपर) पदासाठी उमेदवार किमान 8वी पास आणि हाउस किपींग प्रशिक्षित असावा. सोल्जर (जीडी) पदासाठी उमेदवार किमान 45 टक्के गुणांनी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावा किंवा 12 वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेला असावा.

            भरतीसाठी येतांना उमेदवारांनी सोबत - 10 वी, 12 वी, पदवी, प्रमाणपत्र आणि गुणपत्रके, शाळा सोडल्याचा दाखला, प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सहीचा अधिवास दाखला,  चारित्र्य प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज 10 छायाचित्रे, नातेवाईकांसोबतचे 5 एकत्रित छायाचित्रे, कुटुंबाची 4 छायाचित्रे, स्वत:चे पॅनकार्ड, स्वत:चे आणि कुटूंबातील सदस्यांचे आधारकार्ड, जातीचा दाखला, विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला, पत्नीचे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक, मुलांचे जन्मदाखले, संयुक्त बचत खाते, अवलंबितांचे आधारकार्ड आणावे, असे आवाहनही बटालियनने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

-         मंगेश विठ्ठल कोळी.

No comments:

Post a Comment