“बदल
घडत नाही, तो घडवावा लागतो” निसर्गाचा हा साधा आणि सोपा नियम आज मानवाने स्वत:चे
जीवन जगत असताना त्याचा अवलंब केला पाहिजे. सर्व सजीव सृष्टीतील मानव ही
निसर्गातील सर्वोत्तम निर्मिती समजली जाते. कारण इतर सजीवांच्या वैचारिक दृष्टिकोनापेक्षा
मानवाची वैचारिक पातळी त्याचबरोबर त्याचा असणारा व्यापक दृष्टीकोन आणि विविध
नैपुण्य एकाच ठिकाणी / अंगी असणारा तो एकमेव सजीव असावा.
काल
परवा दिवाळी अगदी आनंदाने, उत्साहाने, नयनरम्य असा दिव्यांचा असणारा सण सर्वांनी
साजरा केला. या सणाचे विविध गुण, त्याच बरोबर या सणाविषयी असणाऱ्या धार्मिक,
सामाजिक, सांस्कृतिक विविध आख्यायिका त्यानिमित्ताने ऐकायला वाचायला आणि पाहायला
सुद्धा मिळाल्या. यामध्ये सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात हातभार होता. अनेक चांगले
संदेश देणारे मेसेजेस मला वाचायला मिळाले. दिवाळीत साजरे होणाऱ्या प्रत्येक
दिवसाचे स्थान किंवा महत्व काही निराळेच असते.
प्रत्येक
गावात हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या पद्धती जरी वेगळ्या
असल्या तरी संदेश मात्र एकच असतो. आपला वैचारिक दृष्टीकोन अंधकाराकडून प्रकाशाच्या
दिशेने घेऊन जाणे. आजची तरुण पिढी वाया गेली आहे, किंवा त्यांना काही समजत नाही.
असे मानणाऱ्यांची संख्या आज देखील समाजात प्रचंड प्रमाणात पहावयास मिळते ती याच
सणाच्या निमित्ताने. अशी विचारसरणी बाळगणाऱ्या व्यक्ती त्यांनी ठरवलेल्या चौकटीत
राहूनच विचार मांडत असतात हे स्पष्ट जाणवते.
मागील
वर्षी दिवाळीत ज्याप्रमाणे अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन साजरी केली गेली.
त्याचप्रमाणे किंवा त्याहून अधिक प्रमाणात यावर्षी भर पडलेली दिसली. ज्या
व्यक्तींना दिवाळी साजरी करता येत नाही त्यांच्या बरोबर अनेक व्यक्तींनी दिवाळी
साजरी केल्याचे फोटो, बातम्या, व्हिडीओ पाहायला मिळाल्या. वर्षातील एखादा दिवस आपण
त्यांना मदत करतो हि भावना चांगली आहे. त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद द्यावेत
तेवढे थोडेच आहेत. परंतु त्यांचे कायम स्वरूपी बदल घडविणे हि काळाची गरज आहे, तरच
आपण ज्या अर्थाने हा दिवस साजरा केला तो सत्कारणी लागेल.
काही
दिवसापूर्वी अशाच कोणी एका मित्रांनी एक फोटो मला पाठवला होता. तो फोटो पाहून मन
अगदी सुन्न झाले. त्या फोटोमध्ये एक महिला पर्यटनाच्या निमित्ताने एका गावात गेली
होती. त्यावेळी तिला त्या गावात कुपोषित बालक पहावयास मिळाले. तिने स्वत:कडे
असणारा खाऊ त्या कुपोषित बालकाला दिला आणि पाणी पाजत आहे असा तो फोटो होता.
शारीरिक दृष्ट्या कमकुवत असून सुद्धा त्या लहान मुलाच्या जगण्याची इछ्या त्या
महिलेला जाणवली असावी. बदल घडला पाहिजे कोणी तरी बदल घडवेल अशा बोल घेवड्या
व्यक्तीची समाजात खूप मोठी संख्या वाढत आहे.
महिलेने
त्याला दत्तक घेतले असावे किंवा त्याची पालन पोषण करण्याची कायमची जबाबदारी घेऊन
त्यामध्ये बदल घडवण्याची तीव्र इच्छा मनी बाळगली असावी. त्या कुपोषित असणाऱ्या
मुलाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी तिने स्वीकारली असावी. काही वर्षानंतरचा
त्याच महिलेचा फोटो आणि त्याच कुपोषित बालकाचा फोटो हि पाहायला मिळाला मला
विश्वासच बसला नाही. ते बालक अगदी शारीरिक आणि त्याच बरोबर मानसिक दृष्ट्या
तंदरुस्त असल्याचा फोटो होता. पूर्वी कुपोषित दिसणारे बाल आणि आता तंदरुस्त
दिसणारे बाल यांचा फोटो आज मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर फिरत आहे.
बदल
हा घडत नाही तर तो घडवावा लागतो. फक्त एक दिवस कार्य करून तो घडत नाही तर त्यासाठी
निरंतर कार्यरत रहावे लागते. एक दिवस कार्य करून थोडीशी प्रसिद्धी मिळवायची हि
भावना मुळासकट उखडून टाकायला हवी. वायफळ चर्चा करत बसण्यात वेळ दवडण्यापेक्षा हा
बदल घडवण्यास सुरुवात केली तर खऱ्या अर्थाने आपण खूप मोठा बदल घडवू शकतो. खरच त्या
महिलेला माझा मनापासून सलाम. आणि तिने केलेल्या बदलाची सुरुवात आपण देखील करू शकतो
यासाठी हा सर्व लेखनाचा आटापिटा....
-
मंगेश विठ्ठल
कोळी.
-
मो. ९०२८७१३८२०
No comments:
Post a Comment