Monday, October 9, 2017

दिवाळीची अनोखी भेट....



मी आणि माझा मित्र बाहेर फिरायला गेलो. अचानक मित्र बोलला की, दिवाळी जवळ येत आहे. मित्रांना भेट देण्यासाठी काही वस्तू (कपडे, मिठाई, ग्रिटिंग वगैरे) गोष्टींची खरेदी करूया. मी हो चालेल अस बोललो. आम्ही मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच दादर मार्केट जवळ गेलो. मार्केट मध्ये पाऊल टाकताच अनेक आवाज ऐकायला मिळाले चलो देड्सो देड्सो, चलो तीनसो तीनसो तीनसो तर काही ठिकाणी चलो पाचसो मे दो पाचसो मे दो, असा आवाज ऐकायला येत होता एक तर व्यक्ती खूप मजेशीर आणि मोठ्या आवाजात आणि पूर्ण आत्मविश्वासाने म्हणत होती की, पुरे मंबई मे काही भी नही मिलागा इतना सस्ता आओ लेलो लेलो. त्या ठिकाणी छोटे छोटे दुकाने मांडून बऱ्याच व्यक्ती व्यवसाय करताना दिसत होत्या काही लहान मुले मुली सुद्धा आपल्या हातात असणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू विक्री करण्यासाठी मोठ मोठ्याने आवाज देऊन ग्राहकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती.

आम्ही दोघे फिरत असताना काही वस्तू मला देखील आवडल्या. मी मित्राला सांगितले अरे, या ठिकाणी लहान मुला मुलींचे कपडे खूप सुंदर आणि आकर्षक आहेत. त्यावर मित्र म्हणाला अरे, हे तर एक दुकान पाहत आहेस अशी जवळ पास दोनशे ते तीनशे दुकाने आहेत या रस्त्यावर आणि मुख्य दुकाने आतल्या बाजूला आहेत. आम्ही फिरताना काही वस्तू मित्राने घेतल्या. त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेट वस्तू म्हणून काही कपडे, मिठाई, ग्रिटिंग वगैरे घेत असताना मी त्याला म्हणालो अरे हे सर्व तू कोणाला देणार आहेस? त्यावर तो म्हणाला, नातेवाईक आणि मित्र परिवार यांना दिवाळी निमित्त भेट म्हणून देणार आहे. आमच्यातील संवाद सुरु होता खूप तहान लागली होती पाणी कोठे दिसत नव्हते. एका ठिकाणी ताक, लस्सी विकणारे छोटे दुकान दिसले मग आम्ही तिकडे गेलो. दोघांनी ताक घेतले आणि पिले. आणि पुन्हा काही वस्तू खरेदी करण्यासाठी पुढे निघणार एवढ्यात मला त्या गर्दीत आयडीएल पुस्तकांचे दुकान दिसले. मी मित्राला तिकडे जाण्याचा आग्रह धरला आणि त्याने तो मान्य केला.

पुस्तकांच्या दुकानात प्रवेश केला खूप सारी पुस्तक खरेदी मंडळी तिकडे उभा असलेली दिसली. एक व्यक्ती दिसली अंदाजे साठ-पासष्ठ वय असेल. त्यांच्या हातामध्ये जवळपास दहा-पंधरा लहान मोठी पुस्तके दिसली. त्या व्यक्तीशी मी संवाद साधला. त्यांना मी विचारले की, एवढी सगळी पुस्तके कशासाठी? कारण त्या पुस्तकांमध्ये काही लहान मुलांची पुस्तके, काही विनोदी पुस्तके, त्याबरोबर लहान-मोठ्या कादंबरी यांचा समावेश होता. जवळपास हजार दीड हजार रुपये किमतीची पुस्तके असावीत. त्यावर तो व्यक्ती म्हणाला म्हणाला अरे दिवाळी जवळ येत आहे ना? मी गेली आठ ते दहा वर्षे झाली प्रत्येक दिवाळीला पुस्तके खरेदी करून माझ्या लहान नातवांना, माझ्या मुलांना त्या बरोबर नात्यातील अनेकांना दिवाळीची भेट म्हणून देतो.

माझा आणि त्या व्यक्तीचा संवाद सुरु होता. ते पुढे बोलत होते की, कपडे किंवा दिवाळीचा खाऊ सर्वांच्या घरी असतो. आणि दिवाळीच्या काळात अनेकांना रिकामा वेळ असतो त्यावेळी काय करायचे म्हणून टीव्ही पाहतात किंवा जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर वेळ घालवत असतात. त्यापेक्षा मी दिलेल्या पुस्तकांचा वापर वाचनासाठी केला तर त्यांना खूप काही शिकायला मिळेल. मोबाईलच्या या ३ जी, ४ जी च्या काळात आपली हरवत चाललेली वाचन संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मला त्यांच्या बोलण्यातून एक नवी उर्जा मिळत होती, शेवटी ते म्हणाले तू काय करतोस मी सांगितले की, मला हि वाचनाची आणि थोडं फार लिहिण्याची आवड आहे. हे ऐकून त्यांनी दुकानदा कडून आणखी एक पुस्तक विकत घेतले आणि मला दिवाळीची भेट म्हणून दिले. मी नको म्हणत असताना ते म्हणाले एका वडिलाने भेट दिले असे समज, मी ते पुस्तक घेतले.  त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद पाहायला मिळाले. या क्षणी मला एक ओळ आठवली ती म्हणजे,

“पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते व सशक्त मस्तक कोणासमोर डोळे झाकून नतमस्तक होत नाही.”

-         मंगेश विठ्ठल कोळी.

-         मो.९०२८७१३८२०

Friday, October 6, 2017

23 ऑक्टोबरला सैन्यभरती....


            अनेक तरुणांचे स्वप्न असते की भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशाचे संरक्षण करावे. त्यासाठी भरपूर शारीरिक मेहनत घेतात त्याच बरोबर अभ्यासही करतात. तन मन लाऊन सर्वस्व झोकून देऊन ते सैन्य भरतीसाठी प्रयत्न करतात. याची आता एक सुवर्ण संधी २३ ऑक्टोबर २०१७ रोजी उपलब्ध झाली आहे.

प्रादेशिक सेनेच्या 110 इन्फट्री बटालियन, मद्रास, रेडफिल्डस, कोईम्बतूरमार्फत दि.23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सोल्जर (जीडी) 8 पदे आणि सोल्जर (हाउसकीपर) ची 3 पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती या बटालियनकडून देण्यात आली आहे.

            सैन्य भरतीसाठी शारीरीक चाचणी पीआरएस ग्राउंड कोईम्बतूर येथे सकाळी 6 वा. पासून आयोजित करण्यात आली आहे. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी तसेच मुलाखत त्यानंतर आयोजित करण्यात येईल. नागरी क्षेत्र किंवा स्वयंरोजगार, माजी एनसीसी छात्र (उत्कृष्ट नेमबाज), उत्कृष्ट कलाकार, पेंटर, हलके, अवजड वाहनचालक परवानाधारक, संगीतकार, सैनिक, माजी सैनिकांचे अवलंबित यांना प्राधान्य दिले जाईल. नागरी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचा-यांना आपल्या कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्रसादर करावे लागेल.

            उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षाच्या दरम्यान असावे. उंची 160 सेंटीमीटर, वजन 50 किलोग्रॅम आणि छाती 77 सें.मी. तर फुगविल्यानंतर 82 सें.मी असावी. सोल्जर (हाउसकीपर) पदासाठी उमेदवार किमान 8वी पास आणि हाउस किपींग प्रशिक्षित असावा. सोल्जर (जीडी) पदासाठी उमेदवार किमान 45 टक्के गुणांनी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावा किंवा 12 वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेला असावा.

            भरतीसाठी येतांना उमेदवारांनी सोबत - 10 वी, 12 वी, पदवी, प्रमाणपत्र आणि गुणपत्रके, शाळा सोडल्याचा दाखला, प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सहीचा अधिवास दाखला,  चारित्र्य प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज 10 छायाचित्रे, नातेवाईकांसोबतचे 5 एकत्रित छायाचित्रे, कुटुंबाची 4 छायाचित्रे, स्वत:चे पॅनकार्ड, स्वत:चे आणि कुटूंबातील सदस्यांचे आधारकार्ड, जातीचा दाखला, विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला, पत्नीचे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक, मुलांचे जन्मदाखले, संयुक्त बचत खाते, अवलंबितांचे आधारकार्ड आणावे, असे आवाहनही बटालियनने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

-         मंगेश विठ्ठल कोळी.

Wednesday, October 4, 2017

इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या निर्मितीतून युवकांना रोजगार....

वर्धा जिल्ह्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून एकाच दिवशी 5 हजार कोटींच्या कामांना सुरूवात होत आहे. चौपदरी रस्ते, ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील उद्योगांना चालना मिळणार असून या विकासाला पुरक म्हणून सेवाग्राम विकासाचा 266 कोटींचा आराखडा हाती घेण्यात आला आहे. या सर्व प्रयत्नांमधून इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या निर्मितीमधून स्थानिक युवकांना रोजगार हे एकमेव ध्येय समोर ठेवण्यात आले.
ड्रायपोर्टची निर्मिती हे या परिसराला मिळालेले मोठे वरदान ठरणार आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष पोर्टमध्ये सुविधा मिळणार आहेत. विदर्भातील शेतकरी आणि उद्योजक आपला माल थेट विदेशात पाठवू शकतील. यामुळे आयात-निर्यातीला चालना मिळेल. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पांत स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी सिंबॉयसीसच्या माध्यमातून कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात स्थानिक युवकांनाच प्रशिक्षित करून पोर्टमध्ये काम देण्यात येईल.
पोर्टलेटचा विकास हा देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतो. वर्धा आणि जालना येथील ड्रायपोर्ट हे राज्यातील मागास भागाला विकसि करणारे प्रकल्प आहेत. कार्गो हब, बुटीबोरी ते वर्धा आणि वर्धा ते यवतमाळ या चारपदरी रस्त्यामुळे या भागातील शेतमाल आणि औद्योगिक उत्पादने या ड्रायपोर्टपर्यंत सहज आणि जलदरत्या पोहोचतील. देशातील एकर प्रणालीमुळे मालवाहतूक क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येत्या काळात नागपूर हे मालवाहतुकीचे केंद्र होणार आहे.
महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून सेवाग्राम आज जागतिक नकाशावर सर्वांना परिचित आहे. जगातील नामवंत या ठिकाणी येऊन संशोधन करण्यास इच्छुक आहेत. याठिकाणी पर्यटक येऊन महात्मा गांधीजींच्या विचारापासून प्रेरणा घेतील. गांधीजींची ग्रामविकासाची संकल्पना आजही मार्गदर्शक आहे. याच संकल्पनेतून उभा राहिलेला रूरल मॉल महिला आणि शेतकरी बचतगटांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. गांधीजींनी या जिल्ह्याला दिलेला वारसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला असून यातूनही रोजगाराच्या संधी निर्माण होतील. 
जलसंधारणाच्या सर्वात जास्त योजना वर्धा जिल्ह्यात सुरू झाल्या आहे. सिंचनाच्या निर्मितीमुळे जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. सिंचनाच्या माध्यमातून परिवर्तनाची नांदी शेती आणि उद्योगात येणार आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार असून त्याला स्वातंत्र्याची अनुभूती मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
-         मंगेश कोळी, ९०२८७१३८२०

Tuesday, October 3, 2017

दिनांक 30 सप्टेंबर 2017 व्यक्तिमत्व विकास हे साप्ताहिक सविस्तर वाचण्यासाठी......





राजा आणि चोर...

          
          एक गृहिणी आपल्या मुलाला घेवून बाजारातून चालली होती, त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने आपल्या आईला विचारले "आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" आई म्हणाली "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल".
थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला "आई तो बघ आजून एक चोर आला", आई म्हणाली "हळू बोल, ते मारतील आपल्याला, तो राजा आहे."
मुलगा आईला म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे."
आई म्हणाली "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही."
राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे."
"आपले मन, आपल्या भावना आणि आपले विचार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. *निवड तुमची आहे.* 
- श्री. मंगेश विठ्ठल कोळी,
- मो. 9028713820