Wednesday, June 28, 2017

एस आय कॅन....


काही दिवसापूर्वी १०वी, १२वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आता सर्व विद्यार्थ्यांची ओढ ही पुढील शिक्षणासाठी उत्तम प्रकारच्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळेल. काही विद्यार्थी द्विधा मनस्थितीमध्ये असल्याचे जाणवते. विद्यार्थ्यांनी ज्या कोणत्या क्षेत्रात प्रवेश घेतला आहे तो मी यशस्वीरीत्या पूर्ण करेन असा आत्मविश्वास पालकांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजवायला हवा. एस आय कॅन (मी हे करू शकतो) हा शब्द प्रत्येक पालकांनी दिवसातून एकदा तरी विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे. जी व्यक्ती या शब्दाचा अर्थ समजावून घेऊन कृती करते ती नक्कीच प्रगतीच्या मार्गावर चालत असते. ज्या व्यक्ती फक्त ऐकतात किंवा दुसऱ्याला ऐकवतात त्या प्रमाणे कृती करीत नाहीत त्यांची प्रगती खुंटते. काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहण्यात आला. त्या व्हिडिओमधील अपंग असणाऱ्या व्यक्ती खूप काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी किंवा पूर्ण शरीराचे भाग असून सुद्धा एखादी व्यक्ती ज्या गोष्टी करू शकत नाही त्या सहजरीतीने करून दाखवतात.
अनेक अपयशी व्यक्तींना त्यांच्या अपयशाचे कारण विचारले तर सर्व काही असून सुद्धा अनेक गोष्टींची यादी देतात. ते निर्लजपणे स्वतः मधील असणाऱ्या अवगुण सांगतात किंवा सर्व दोष नशिबाला देतात. स्वतः वरची जबाबदारी झटकताना दिसतात. माझे ते कर्तव्य नाही, असे शब्द बोलतात. जी व्यक्ती कर्तव्य हा शब्द वापरतात ते कधीही स्वतः चा सर्वांगीण विकास करू शकत नाहीत.
स्वतः जवळ असणाऱ्या गुणांचा, शारीरिक-मानसिक कौशल्यांचा तसेच क्षमतांचा पुरेपूर वापर करून प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळविण्यासाठी सतत कष्ट घेत असतात. अशा व्यक्ती नेहमी स्वतः जवळ असणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा यादी तयार करतात. त्यानुसार त्यावर सतत मेहनत घेऊन अशक्य वाटणाऱ्या गोष्टीवर सहज विजय मिळवतात. नेहमी ते इतरांना ‘एस आय कॅन’ या शब्दाचा अर्थ साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये कृतीतून दाखवून देतात. त्या पद्धतीने प्रत्येक काम करत असताना स्वतः नेहमी सांगत रहा. ‘एस आय कॅन’ आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहचा.

-       मंगेश विठ्ठल कोळी
-       ९०२८७१३८२०

Tuesday, June 20, 2017

“शिक्षक” पुन्हा पात्रतेच्या परीक्षेत.......


आज महाराष्ट्रात विविध अनेक विद्यापीठे उपलब्ध असून त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लहान-मोठे कोर्स उपलब्ध झाल्याने अनेक विद्यार्थ्यांची ओढ अशा कोर्सकडे वाढत आहे. उत्तम विद्यार्थी घडवायचा असेल तर ज्ञानाने परिपूर्ण असणारा अध्यापक वर्ग सुद्धा आवश्यक असतो. गेल्या काही वर्षापासून राज्य शासनाने केंद्र शासनाच्या ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’च्या आधारावर राज्यातही ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ लागू केली. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. यंदाच्या वर्षीची शिक्षक पात्रता पुढच्या महिन्यात घेण्यात येणार आहे. बी.एड., एम.एड., पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना हि परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय अध्यापक म्हणून पात्र समजले जात नाही.
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरासाठी घेतली जाते. पहिला स्तर आहे म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी आणि दुसरा स्तर इयत्ता सहावी ते आठवी. सर्व व्यवस्थापने, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे. या परीक्षेसंबंधी सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना तसेच ऑनलाईन अर्ज भरणे, अर्ज स्वीकृती, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mahatet.in  आणि www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा -2017 (MAHATET 2017) परीक्षेचा ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी 15 जून 2017  ते  30 जून 2017 असा आहे. प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट 10 जुलै 2017 ते 22 जुलै 2017 या कालावधीत काढता येईल. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर –I  ची वेळ 22 जुलै 2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 अशी आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर –II ची वेळ 22 जुलै 2017 रोजी दुपारी 2.00 ते 4.30 अशी असेल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव ढेरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. परंतु एक प्रश्न आणखी अनुत्तरित राहतो तो म्हणजे हि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते का? त्यासाठी शासन नक्की काय उपाय योजना करेल हे आता येणारा काळच ठरवेल.
-       मंगेश विठ्ठल कोळी
-       मो. ९०२८७१३८२०

Sunday, June 18, 2017

पिशवी बदला म्हणजे कळेल.....

काल ‘फादर्स डे’च्या निमित्ताने “जागरूक पालक, यशस्वी बालक” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी पुणे येथे गेलो होतो. कार्यक्रम खूप छान पद्धतीने सुरु होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा मान मला मिळाला. कार्यक्रमात सर्वांचे सत्कार झाले, त्यापाठोपाठ मनोगते ही झाली. शेवटी अध्यक्षीय भाषणाची वेळ जवळ आली. मग मी बोलायला उठलो. बोलता-बोलता मी हॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वाना एक प्रश्न केला. आज सकाळपासून किती व्यक्तींनी आपल्या वडिलांना ‘फादर्स डे’ निमित्त शुभेच्या दिल्या त्यांनी हात वर करा? मला आश्चर्य वाटले, बोटावर मोजण्याइतपतच व्यक्तींनी हात वर केला होता. त्यावर मी म्हणालो, इथे बसलेल्या सर्वांचे स्वत: च्या वडिलांविषयी खूप प्रेम असेल परंतु ते प्रेम व्यक्त करणे सुद्धा आवश्यक असते.
कार्यक्रम संपला आणि मी मुंबईला परत निघण्यासाठी बाहेर पडलो. चिंचवड रेल्वे स्टेशनच्या जवळ पायी चालत जात असताना, स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावर बसून शालेय साहित्य विकणाऱ्या कुटुंबाला पाहिल. दोन लहान मुले आणि नवरा बायको होते. काही व्यक्ती ते शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी तेथे आले होते. मी त्या दुकानाजवळ जाऊन उभा राहिलो. थोडीशी गर्दी कमी झाल्याचे पाहून मी त्या दुकानदाराला म्हणालो, ही मुलं तुमची आहेत ना? तो हो बोलला. कोणत्या शाळेत जातात? असा प्रश्न मी विचारला. त्यावर तो व्यक्ती म्हणाला, साहेब शाळेत नाही जात, शाळेची फी भरायला पैसे नाहीत? हा धंदा करून कस बस दोन वेळच पोट भरत आमचं.
आता आमचं बोलण संपलं, मी स्टेशनकडे निघालो. माझ्या मनात त्याचे बोलणे तसेच्या तसे घर करून राहिले. जो व्यक्ती मुलाच्या शाळेचे समान विकण्याचे दुकान मांडून बसला होता. त्याची मुले शिक्षणापासून वंचित आहेत. याचे मला खूप वाईट वाटले. काही दिवसापूर्वी मला व्हॉट्स अॅप वरती एका मित्राने एक वरील चित्र पाठविले होते. हे विदारक चित्र जो पर्यंत आपल्या समाजातून नष्ठ होणार नाही, तो पर्यंत आपली प्रगती होणे शक्य नाही. हे सत्य आहे. अनेकजण आपल्या आई वडिलांविषयी एक वाक्य बोलताना दिसतात. ते म्हणजे “माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केल?” असे प्रश्नार्थक वाक्य सारास ऐकायला मिळते. त्यांनी जर वरील चित्रामधील खांद्यावर असलेली पिशवी बदलली तर काय झाले असते? किंवा आपण सध्या काय करत असतो? याचा विचार करा. कोणत्याही परीस्थित आपल्या आई-वडिलांनी काय केले? असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी आपल्यासाठी खूप काही केल्याच्या गोष्टी डोळ्यासमोर आणा. जीवन हे खूप सुंदर आहे त्याला आणखीन सुंदर बनवा.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

Wednesday, June 14, 2017

नवीन करिअर....


बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. आपल्याला माहीत आहे, वाहते पाणी नेहमी स्वच्छ आणि निर्मळ राहते. त्याप्रमाणेच काळानुसार मानवाने स्वत:मध्ये बदल घडवून घेतले पाहिजेत. शिक्षण क्षेत्रात देखील आपण पाहतो की, खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायाभिमुख आणि आधुनिक शिक्षण सुद्धा खूप मोलाचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशातील विद्यापीठांतून शिकवले जाणारे बीए आणि बीएसस्सी पदवी अभ्यासक्रम सध्याच्या हायटेक युगात अनुपयोगी ठरत असून ते बंद करून त्या जागी प्रभावी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्याचा हायटेक प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आणला आहे.
यापुढे देशभरात बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन (बी. व्होक) हा पदवी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. या नव्या डिग्री कोर्सचा अभ्यासक्रम उद्योगजगताच्या मागणीनुसार तयार केला जाणार आहे. बीए आणि बीएस्सी हे विद्यापीठात शिकवले जाणारे पदवी अभ्यासक्रम सध्याच्या हायटेक युगात रोजगार मिळवून देण्यास सक्षम नसल्याचा दावा यूजीसीने केला आहे. त्यातून केवळ कारकूनच तयार होत आहेत. त्याऐवजी संगणक युगाशी नाते जोडणारा आणि प्रचलित उद्योगधंद्यासाठी सक्षम कर्मचारी तयार करणारा बी.व्होक. हा अभ्यासक्रम येत्या काही वर्षांत बीए आणि बीएस्स्सी या अभ्यासक्रमांची जागा घेणार आहे.
भविष्यात देशातील महाविद्यालयांना ते राबविणारे अभ्यासक्रम पायाभूत सुविधा, शिकविल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणि संशोधनात्मक उपक्रम राबविण्याची क्षमता पाहूनच शैक्षणिक अनुदान दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षण संस्थांना अधिकाधिक जबाबदार बनविण्याचा यूजीसीचा हेतू आहे. बी. व्होक हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम येत्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात देशातील २०० महाविद्यालयांत सुरू केला आहे. त्यानंतर पुढच्या १० वर्षांत तो देशभरातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांत शिकविण्यासाठी समाविष्ट करण्याची घोषणा यूजीसीने केली आहे.
सध्याच्या हायटेक युगात उद्योगक्षेत्राचा चेहरामोहराच बदलला आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाला बीए आणि बीएस्सी या केवळ पदवी अभ्यासक्रमांबाबत फेरविचार करावाच लागेल. कारण या पदव्यांच्या बळावर नोकऱ्याच मिळत नाहीत हे भीषण वास्तव आहे. बी.ए. आणि बी.एस्सी हे अभ्यासक्रम आता कालबाहय़ झाले असून, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ते बंद करण्याची तयारी चालवली आहे. नव्या अभ्यासक्रमांना बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन कोर्स या नावाने ओळखले जाईल. उद्योगविश्वाच्या मागणी व गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. बी.ए., बी.एस्सी.तून बेरोजगारांची फौज तयार होत होईल.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल होत असून, सुधारित श्रेयांकाधारित श्रेणी पद्धतीचा (सीबीजीएस) वापर होणार आहे. यानुसार बीए, बीकॉम आणि बीएस्सी या पारंपरिक अभ्यासक्रमासाठी अंतर्गत २५ गुणांची परीक्षा रद्द होत आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आता थेट १०० गुणांची परीक्षा द्यावी लागेल. मात्र स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी अंतर्गत परीक्षा सुरूच राहणार आहे. पारंपरिक अभ्यासक्रमासाठी २५ गुणांची अंतर्गत परीक्षा होत असे. यात १५ गुण तोंडी परीक्षा, तर वर्तणूक व उपस्थिती यांचे अनुक्रमे ५-५ गुण दिले जात. यापुढे हे गुण रद्द होणार आहेत. यामुळे या गुणांमध्ये महाविद्यालयात होणारे गैरप्रकार बंद होतील.
पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या प्रश्नपत्रिका आता विद्यापीठाकडून तयार केल्या जाणार आहेत. याचबरोबर २०१६-१७ला पदवीच्या प्रथम वर्षांला नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. विद्यापीठाने सर्व शाखांचे अभ्यासक्रम बदलण्याचे ठरविले आहे. कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगार संधी लाभाव्यात यासाठी विद्यापीठाकडून पहिल्यांदाच शेवटच्या सत्रात प्रत्यक्ष प्रकल्प ही संकल्पना राबविली जाणार आहे. या नवनवीन संकल्पामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणपूर्ण केल्यानंतर लवकरच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

-       मंगेश विठ्ठल कोळी
-       मो. ९०२८७१३८२०

Tuesday, June 13, 2017

महाराष्ट्री असल्याचा फक्त गर्व नको......



आज ऑफिसमधून घरी पायी चालत जात असताना मी आणि माझा मित्र मराठी माणसाबद्दल बोलत चाललो होतो. मी माझ्या मित्राला मराठी माणसाचे कौशल्य, त्याच्या अंगभूत असणाऱ्या गुणांविषयी सांगत होतो. त्याचे मात्र अवगुण आणि स्वत:च्या गुणांची ओळख नसणाऱ्या मराठी माणसाबद्दल बोलणे सुरु होते. त्यातील काही गोष्टी मला देखील पटल्या. बोलत बोलत चर्चगेट रेल्वे स्टेशन केंव्हा आले हे मला समजलेच नाही. आम्ही एकमेकाला उद्या ऑफिसला भेटण्याचे प्रोमिस करून निरोप घेतला. आमच्यामधील संभाषण संपले हे खरे, परंतु त्याच्याशी बोलताना जे अवगुण त्याने सांगितले त्याचा काही काळातच प्रत्येय येईल असे वाटले नव्हते.
मी त्याच विचारात मग्न होऊन चर्चगेट रेल्वे स्थानकात दाखल झालो. नेहमीप्रमाणेच आजची खूप वरदळ पहावयास मिळाली. आता वर्दळीची मला सवय झाली आहे. जाता-जाता एक मराठी माणूस दिसला. तो मोबाईलवर कोणाला तरी मोठमोठ्याने बोलत होता. त्याचे संभाषण संपल्यावर चालत जात असतानाच मी त्याला विचारले तुम्ही कोणत्या गावचे? त्यावर पहिला शब्द तो म्हणाला जय महाराष्ट्र.. मी ही मानेने त्याला होकार दिला. पुढे विचारले कोणत्या गावाचे? त्यावर तो म्हणाला, मी साताऱ्याचा आहे. त्याने विचारले काय झाले? मी म्हणालो, भाषा वेगळी वाटली म्हणून विचारले. रेल्वे लागायला आणखी काही मिनिट बाकी होते त्याच्याशी माझे पुढचा संवाद सुरूच होते.
आमचे संवाद सुरु असतानाच त्याव्यक्तीने जवळ असलेले चिप्सचे पॅकेट काढले आणि खाऊ लागला. मला ही खाणार का? म्हणून विचारले. मी नको म्हणून सांगितले. बोलता-बोलता तो म्हणाला की, आजकाल मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातील खूप व्यक्ती राहतात. त्यामुळे मुंबई खूप गहाण अस्वच्छ होत चालली आहे. त्याचे हे बोलणे ऐकत असतानाच रेल्वे प्लॉट फॉर्म क्रमांक २ वर येत असल्याचे कानावर पडले. त्याने हातातील रिकाम्या चीप्सचा कागद रेल्वेच्या पटरीवर टाकला आणि तोंड पुसत पुढे गेला. हातानेच मला जातो असा इशारा केला. मी स्मितहास्य करून मानेने त्याला होकार दिला. प्लॉट फॉर्मवर रेल्वे लागली मी रेल्वेमध्ये बसलो रेल्वे सुरु झाली.
चर्चगेटमधून बाहेर पडून पहिला थांबा मरीन लाईन्स येथे रेल्वे थांबली. पाच व्यक्ती माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांचे संभाषण सुरु झाले. त्यावरून मला समजले की, हे सर्व गुजराती आहेत. काही वेळ गेल्यानंतर त्यातील एका व्यक्तीने सर्वाना चॉकलेट दिले. सर्वजण खात होते आणि चॉकलेटचे कागद एका व्यक्तीकडे असणाऱ्या पिशवीत टाकत होते. मी हे सर्व पाहत असताना थोड्या वेळापूर्वी भेटलेला आणि स्वत:ला महाराष्ट्री मानणाऱ्या व्यक्तीचे वागणे माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. थोड्या वेळाने रेल्वे लोअर परेलला पोहोचली. त्या गुजराती व्यक्तीपैकी एकाने पुन्हा एकदा सर्वाना चॉकलेट खायला दिले. त्यातील एका व्यक्तीने चॉकलेट खाऊन कागद खिडकीतून बाहेर टाकला.
सर्वांनी कागद टाकण्यासाठी त्यातील एका व्यक्तीने पिशवी पुढे केली. सर्वांनी त्यात कागद टाकले परंतु त्या व्यक्तीने सांगितले की, मी चुकून बाहेर टाकला. तेंव्हा त्यातील एका व्यक्तीने त्याला शिक्षा केली. ती म्हणजे स्वत: कान पकडून सर्वांची माफी मागून दोन वेळा उठबस करायची. त्या व्यक्तीने स्मितहास्य करून मान्य करत सर्वांची माफी मागितली. हे सर्व घडत असताना माझ्या मनात अनेक प्रश्नाचे वादळ उठत होते. आपण स्वत: महाराष्ट्री, मराठी असल्याचे गर्वाने सांगतो आणि आपली वागणूक ही महाराष्ट्राला आणखी खराब करणारी असेल तर त्याचा काय उपयोग? मराठी असो वा गुजराती कोणता ही व्यक्ती असो स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून सुरु व्हायला हवी असे मला वाटते. दुसरा कसा वागतो? मग मी का वागू नये? असे विचार आता दूर लोटले पाहिजेत. तरच आपण प्रगती घडवू शकतो. अन्यथा फक्त “बोलायचे एक आणि करायचे एक” असे होईल.
-       मंगेश विठ्ठल कोळी.
-       मो. ९०२८७१३८२०

Friday, June 9, 2017

आनंद लुटता आला पाहिजे...

उन्हाळ्याच्या त्रासाने वणवण फिरणारे सर्व सजीव प्राण्यांना ओढ लागते ती पावसाची. गेली ४-५ वर्षापासून निसर्गाची अनियमितता लक्षात घेता सर्वच ऋतूमान बदलल्याचे जाणवते. या बदलणाऱ्या ऋतूचक्राला नक्की कोण जबाबदार असेल? या प्रश्नांचे उत्तर शोधणे म्हणजे समुद्रातील सिंपल्यामध्ये मोती शोधण्यासारखा तसा काही प्रकार आहे. चातक पक्षाला लागलेली तहान फक्त आणि फक्त पावसाचे पाणीच भागवू शकते. बदलणाऱ्या निसर्गाकडे पाहताना असे जाणवते की, भूतलावर सजीवसृष्टीचा ऱ्हास होईल की काय अशा प्रकारचे वातावरण निर्माण होत आहे. काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ पाहण्यात आला होता त्यामध्ये भविष्य काळातील एक चित्र दाखवले होते ते म्हणजे जर जीवंत राहायचे असेल तर स्वत:च्या पाठीवर ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन चालावे लागेल.
बदलणाऱ्या ऋतूचक्राला मानव कंटाळवाण्या नजरेने किंवा निराशाजनकतेने पाहत आहे. थंडी खूप वाढली तरी ती मानवाला सहन होत नाही किंवा जास्ती प्रमाणात उन्हाचा त्रास देखील मानवाला नकोसा वाटत आहे. उन्हाळ्याने त्रासलेल्या मानवाला पावसाची सुरुवात खूप आल्हादायक वाटते. परंतु स्वत:च्या खोलीत बसून खिडकीतून किंवा दाराच्या उंबऱ्यावर बसून पावसाचा अनुभव घेण्यात आजची पिढी आनंद मनात आहे. याचे कारण ही तेवढे मजेशीर आहे. टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या अनेक जाहिराती ज्यामध्ये पावसाळ्यात भिजल्याने किटाणू किंवा पावसात भिजल्याने कशा पद्धतीने पसरतात हे दाखवले जाते. त्यापासून वाचण्यासाठी अमुक साबण किंवा हँड वॉश वापरावा असे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज सकाळी पावसाचा अनुभव घेण्यासाठी बाहेर पडलो. पावसाचा मुक्तपणे आनंद घेत मस्त भिजत चालत जात असताना अचानक काही मुले दिसले. त्यांना पाहून मी तिकडेच थांबलो. तीन-चार मुले एका लहान डबक्यामध्ये खेळ खेळत असताना दिसले. खूप आनंदाने चिखल पाण्याची उधळण चालली होती. त्यातील एक मुलगा तर इतर मुलांच्या अंगावर उड्या मारून खेळताना दिसला. एका छोट्याशा डबक्यातील पाणी आणि त्याच क्षणी आकाशातून मुसळधार पडणारा पाऊसाचा मुक्तपणे आनंद घेत होते. हे सर्व दृश पाहून मनात विचार आला कि, कोणीही प्रत्येक ऋतूचा आनंदाने आगमन आणि स्वीकार करतो काही मानव तेवढे त्याला अपवाद आहे.
मानव मुक्तपणे करू शकणाऱ्या गोष्टीसुद्धा करत नाही. याचे कारण म्हणजे त्याला स्वत:ला जास्त दिवस जगायचे असते. (मानवाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जीवन मोठे असले पाहिजे, लांबलचक नाही.) मग जास्त उन्हात गेल्यावर शरीराला त्रास होतो. एकीकडे पावसात जास्त भिजले की, किटाणूचा त्रास होतो असे आपण येणाऱ्या पिढीला सांगत आहे. आणि दुसरीकडे आपण लहानपणी केलेल्या गंमती, मौज, मजा, मस्तीच्या क्षणाच्या कहाणी किंवा अनुभव आनंदाने सांगत असतो. ज्याप्रमाणे निसर्गाच्या बदलाचा स्वीकार करून त्याचा आनंद लुटताना दिसले. त्याप्रमाणे आज लहान मुलेमुली दिसत नाहीत किंवा तरुण-प्रौढ व्यक्तीसुद्धा दिसत नाहीत. मानवाने प्रत्येक ऋतूचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे, त्याला मुक्तपणे अनुभवता आला पाहिजे तरच जीवन सुखी समृद्धी होईल. सुखी जीवनाचा शोध घेण्यापेक्षा जे जीवन आहे त्यात सुख शोधले पाहिजे असे माझे मत आहे. आपणास काय वाटते जरूर खाली कमेंटमध्ये लिहावे ही विनंती...
-    मंगेश विठ्ठल कोळी.
मो. ९०२८७१३८२०

Wednesday, June 7, 2017

कृषी अॅप्स – माझा लेख महाराष्ट्र शासनाचे “महान्युज” या वेबसाईट प्रसिद्ध झाला आहे.


https://www.mahanews.gov.in/Home/MahaNewsHome.aspx

माहिती तंत्रज्ञानाचे जाळे खेडोपाडी जाऊन पोहोचले आहे. शेतकरीदेखील वीज बील ऑनलाइन पेमेंट करून भरत आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून शेतकरी स्मार्ट झाले आहेत. शेतमालाचे ऑनलाइन भाव पाहणे, हवामानाचा अंदाज घेणे, कृषीविषयक सल्ला घेणे आदी कामे शेतकरी मोबाइलद्वारे करू लागले आहेत. कृषी क्षेत्राविषयी अत्यंत उपयुक्त माहिती देणारे अनेक अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. शेतीसंदर्भातील माहिती देण्याऱ्या अशा मोबाइल अॅप्सचा अधिकाधिक शेतकऱ्यानी वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. काही उपयुक्त अॅप्सची माहिती....

1) मोबाईल अॅपचे नाव - शेतकरी मासिक (Shetkari Masik)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - शेतकरी मासिकातील लेख

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल

2) मोबाईल अॅपचे नाव - (Maharain)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - मंडळ, तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरील आजचा,पर्यंतचा व सर्वसाधारण पाऊस

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळमहारेन

3) मोबाईल अॅपचे नाव - क्रॉप क्लिनिक (Crop clinic)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या ५ पिकांच्या किडी व रोग व त्यांच्या उपाययोजना किडनाशके ट्रेड नेम व दुकानदाराची यादी

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळmahaagriiqc.gov.in

4) मोबाईल अॅपचे नाव - कृषि मित्र (Krishi mitra)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - तालुक्यातील खते, बियाणे, औषधे विक्रेत्यांची माहिती

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळmahaagriiqc.gov.in

5) मोबाईल अॅपचे नाव - एम किसान भारत (mKisan India)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - कृषि हवामान विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्ले

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळफार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल

6) मोबाईल अॅपचे नाव - किसान सुविधा (Kisan Suvidha)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - हवामान, कृषि निविष्ठा व्यापारी, बाजारभाव पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत मागणी

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल

7) मोबाईल अॅपचे नाव - पुसा कृषि (Pusa Krishi)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - पिकांच्या विविध जाती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल

8) मोबाईल अॅपचे नाव - क्रॉप इनशुरन्स (Crop Insurance)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - पिक विमा माहिती

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल

9) मोबाईल अॅपचे नाव - डिजीटल मंडी भारत & (Digital Mandi India)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय बाजारसमितीचे शेतमालाचे दर

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल

10) मोबाईल अॅपचे नाव - अॅग्री मार्केट (AgriMarket)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - ५० किमी परिसरातील शेती उत्पादनाचे बाजारभाव व जिल्हा/राज्य/देश पातळीवरील महत्तम दर

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल

11) मोबाईल अॅपचे नाव - पशु पोषण (Pashu Poshan)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - जनावराचे आहार विषयक मार्गदर्शन

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल

12) मोबाईल अॅपचे नाव - cotton (Kapus)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - कापूस लागवड तंत्रज्ञानाची माहिती

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर

13) मोबाईल अॅपचे नाव - एकात्मिक कीड व्यवस्थापन  (IPM)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - मुख्य पिकावरील कीड व्यवस्थापनाची माहिती

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर

14) मोबाईल अॅपचे नाव - हळद लागवड, (halad Lagwad)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - हळद लागवड, प्रक्रिया व तंत्रज्ञानाची माहिती

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर

15) मोबाईल अॅपचे नाव - पिक पोषण (Plant nutrition)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - पिकांसाठी अन्नद्रव्याची गरज, आवश्यकता कमतरतेची लक्षणे, अन्नद्रव्ये संवेदनशील पिके, सुक्ष्म अन्नद्रव्ये इ.बाबत माहिती

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर

16) मोबाईल अॅपचे नाव - लिंबू वर्गीय फळझाडांची लागवड (Citrus Cultivaiton)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - मोसंबी व लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीबाबत माहिती

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर

17) मोबाईल अॅपचे नाव - शेकरु (Shekaru)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती - कृषि योजना, प्रदर्शने, प्रशिक्षण याबाबतची माहिती

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर

18) मोबाईल अॅपचे नाव - इफ्को किसान  (IFFCO Kisan)

अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती – हवामान, बाजारसमिती दर, तज्ज्ञ, ज्ञानभांडार, सल्ला, बातम्या, बाजार प्रोफाईल, जॉब्स, व्हिडीओज

मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ – गुगल प्ले स्टोअर

कृषी विभाग संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in
संकलन
मंगेश विठ्ठल कोळी
मो.९०२८७१३८२०

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Monday, June 5, 2017

चंद्रकोर म्हणजे काय.........!


छत्रपती शिवाजी महाराज कि जय, राजे पुन्हा जन्माला या, एकच धून ६ जून, राजे तुमची आम्हाला गरज आहे, महाराजांचा नाद करायचा नाही, एकच राजा शिवाजी राजा.... अशा प्रकारची वाक्य असणारे मोठ-मोठे डिजिटल फलक आज सकाळी ऑफिसला जाताना दिसले. त्यातून माझ्या लक्षात आले की, उद्या ६ जून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. शेकडो वर्षानंतर सुद्धा मराठी माणसाच्या मनात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचा आदर तिळमात्रही कमी झालेली नाही. हे पाहून अभिमान वाटतो महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही तर ते एक सर्वोच्च स्थान आहे. फक्त नाव घेताच अनेकांच्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण झाल्याचे जाणवते.

मित्रांनो सध्या महाराष्ट्रभर एक स्टाइल खूपच जोरदार दिसत आहे आणि ती म्हणजे छत्रपती शिवरायांचा गेटअप. जागोजागी छत्रपतींसारखी दाढी-मुछ आणि कपाळावर चंद्रकोर ठेवलेले तरूण नजरेस येत आहेत. त्याच बरोबर अनेक तरुणीसुद्धा स्वत:च्या कपाळावर चंद्रकोर टिकली किंवा कुंकू लाऊन स्वत: जिजामातासारख्या दिसण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु बऱ्याच लोकांना ही गोष्ट खटकत असेल पण मी मात्र अशा तरूण-तरुणींचे कौतुक करतोय. उगाच चित्रविचित्र स्टाइलपेक्षा राजांची आणि जिजाऊची आठवण करून देणारी स्टाइल मलातरी खूप आवडली.

पण विचार करायला लावणारी गोष्ट अशी की, ज्या वेगाने महाराजांच्या दिसण्याच अनुकरण करीत आहोत? काय त्याच वेगाने त्यांच्या विचारांचही अनुकरण करणार आहोत? खरतर महाराजांनाही तेच आवडले असते. महाराज हे गुणांची खाण होते. जसे हिरे, माणिक, मोती अमुल्य असतात तसे शिवाजी महाराजांचे विचार आहेत. त्यांच्या एका तरी गुणावर चालण्याचा नुसता प्रयत्न जरी केला तरी आयुष्याच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांसारखा गेटअप करणाऱ्या तरूणांना विनंती आहे की, नुसताच गेटअप करून फिरू नका. शिवचरीत्र नक्कीच वाचा कारण महाराज त्याच्या गेटअपमुळे महान नव्हते. ते त्याच्या कर्तृत्वाने महान होते.

एखाद्या पदावर नियुक्ती झाली की, त्या पदाच्या जबाबदाऱ्यासुद्धा पेलता आल्या पाहिजेत. कोणतीही संधी रिकामी येत नाही त्याच्या बरोबर जबाबदारी ही असतेच. महाराजांचा गेटअप करतांना नैतिक जबाबदाऱ्या येतात. निदान सामाजिक जीवन जगतांना तरी सांभाळल्या पाहिजेत. विचार करा महाराजांचा गेटअपमधील तरूण मुलींची छेड काढू लागले तर? मारामाऱ्या करू लागले तर? आई-वडीलांना शिव्या घालू लागले तर? दारू पिऊन रस्तावर लोळू लागले तर? आणि तरुणीही भर चौकात सिगारेट ओढू लागल्या तर? महाराजांच्या जीवाला किती वेदना होतील. आज एक असाच महाराजांचा गेटअप केलेला तरूण मला जाताना दिसला. हुबेहूब शिवरायच. पहाताच क्षणी महाराजांची आठवण व्हावी असा. मला तो खूप आवडलाही त्याला तसं मी म्हणालो. परंतु पुढे काय?

पूर्ण दिवसभर तोंड गुटख्यानं भरलं होतं नंतर मावा, सिगारेट आणि बिअरची आँर्डर देतांना त्याला जेव्हा बघितलं तेव्हा काळजात एक वादळ उठलं. अनेक जण भ्रमंती करण्यासाठी गडकिल्ल्यांवर जातात एन्जॉय करतात आपल्या जवळ असणाऱ्या दारूच्या बाटल्या पिऊन तिकडे फोडतात आणि त्याच बाटलीच्या काचेने गडावरील झाडावर स्वत:चे आणि प्रियसीचे नाव कोरतात जे कोणी तंबाखू खातात ते स्वत:च्या जवळ असणाऱ्या चुन्याचा वापर गडावरून दगडावर नाव लिहिण्यासाठी वापर करतात. तर एकीकडे गडकिल्ले साफसफाई करणारे तरूणही नजरेस पडत आहेत. म्हणूनच सांगतो मित्रांनो तुमच्या शिवप्रेमाला सलाम पण सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वागा. विनंती आहे की, महाराजांचा गेटअप हा चेष्टेचा, मस्करीचा, थट्टेचा विषय होऊ देऊ नका. महाराजांना दुखावण्याच किंवा त्यांनी केलेल्या कर्तृत्वाला कोठेही धक्का लागेल असे काम आपल्या हातून होऊ देऊ नका.

जय भवानी, जय शिवाजी.....